एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
24 Aug 2010 - 10:05 pm

एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा

एकदा तरी भेट देई मज पांडूरंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||धृ||

किती वारी चालू आता किती दिंडी चालू
संसारातून सोडवी आता नको वेळ घालू
आतूरले डोळे माझे वाहे चंद्रभागा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||१||

किती ग्रंथ वाचले अन म्हटल्या मी ओव्या
संतांच्या साथीने कितीक आरत्या म्हणाव्या
शिणलो रे मी आता होई पापभंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||२||

जळावीण मासा जिव धरी कैसा
मायेविणा पोर प्रेम पाही जैसा
नको धरू राग आता नेई तुझ्या संगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||३||

आयुष्य नासले अनंते हाती केले पाप
पुण्य नाही केले कर आता माफ
शेवटाला आलो रंगलो तुझ्या रंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०८/२०१०

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मृगनयनी's picture

25 Aug 2010 - 2:27 pm | मृगनयनी

पाषाणभेद'जी!.. खूप छान!

मिसळपाववरती "देवा"ला मानणारेही मिपाकर आहेत.. त्यामुळे बरे वाटले.... :)

आयुष्य नासले अनंते हाती केले पाप
पुण्य नाही केले कर आता माफ
शेवटाला आलो रंगलो तुझ्या रंगा
तुझ्या भेटीसाठी गातो मुखी अभंगा ||४||

खूप सुन्दर भावना....

________________

फक्त आयुष्याच्या शेवटी देवाला शरण जाण्यापेक्षा बाल्/तरूण वयापासूनच जर देवाला शरण गेले.. तर ते अधिक श्रेयस्कर असते.. असे मला वाटते....

देवाला शरण जाणे... म्हणजे काहीच कर्म न करणे... असे नव्हे... तर.. केलेले प्रत्येक कर्म देवाला / गुरुला अर्पण करणे होय! :)

अर्थात... ही शिकवणही माझ्या गुरुंचीच्च ! :) :)

________________

ही रचना आपलीच आहे का? पाषाणभेद'जी ?
खूप भक्तीपूर्ण आहे... :)

अजून येऊ देत! :)

पाषाणभेद's picture

25 Aug 2010 - 6:30 pm | पाषाणभेद

हॅ हॅ हॅ.... कसचं कसचं अवो ती तर दगडफोडे म्हून हायेत ना मिपा वर त्यांच्यावालं गानं हाय हे. मी त्ये त्यांच्यावाल्या आंतरजालवहीमधून उतरवून घ्येयेले. आवं चोरीच म्हना की ही.

(विट्टला! विट्टला! काय पन लोकं हायती!...... सरळसरळ चोरी करत्यात आन वर त्वांड करूनशान सांगत्यातबी. पांडुरंगा काय दिस आल्याती. लवकर ने बाबा.)

( बाकी ताई या इथं बगा. युगलगीतं, लावन्या, गण, गौळन, आन पवाडेबी हायेत बगा. त्ये बी त्या दगडफोड्यानंच लिवलंय म्हनं)

सर्वांच्या प्रतिक्रियेसाठी अन वाचनाबद्दल धन्यवाद. अशीच कृपा राहू द्या. :-)

निरन्जन वहालेकर's picture

25 Aug 2010 - 2:38 pm | निरन्जन वहालेकर

सुंदर अभंग ! !
पांडुरंगाच्या चरणी मन विलीन झाले ! ! !
असेच अजून येऊ देत.

असुर's picture

25 Aug 2010 - 3:49 pm | असुर

व्वा!
अभंगातला आर्त भाव खरोखर सुंदर..
'नको देवराया अंत असा पाहू' मधली कान्होपात्रेची आर्तता जशी मनाला भिडून जाते तसाच आपला अभंग देखील!

हा अभंग केवळ सुंदर आहे!
कोणी देव मानो वा न मानो, त्या वादात या सुंदर धाग्याचं काश्मिर होऊ नये ही समंजस अपेक्षा!

-- (गळा तुळशीच्या माळा) असुर

दिपक's picture

25 Aug 2010 - 3:07 pm | दिपक

प्रल्हाद शिंदे नी गायलेली गाणी आठवली.

---
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान , मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान !!!

नंदू's picture

25 Aug 2010 - 5:06 pm | नंदू

पाषाणभेदजी,

अभंग फारच छान जमलाय. आवडला हे. वे. सां. न. ल.

नंदू

चिंतामणी's picture

25 Aug 2010 - 6:35 pm | चिंतामणी

अभंगाची गोडी करी ज्यास वेडी
तोची पुण्य जोडी, पंढरीचे.