सफर - किल्ले तोरणा

येडाखुळा's picture
येडाखुळा in कलादालन
24 Aug 2010 - 11:17 am

नमस्कार मित्रहो,

गेल्या शनिवारी मी किल्ले तोरणा येथे जाऊन आलो. एकदम मस्त ट्रेक झाला माझ्या जुन्या मित्राबरोबर..

तोरण्याची माहिती सर्वांना असेलच तरीही जुजबी ओळख करून देतो. शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी हा गड घेतला. कानद खोर्यातला हा सर्वात उंच किल्ला. ( आणि कदाचित पुणे जिल्ह्यातला सुद्धा..चू.भू.देणे घेणे ) पूर्वी हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली होता आणि अगदीच दुर्लक्षित अवस्थेत होता. म्हणजे राजांच्या ताब्यात आल्यावरच याचं भाग्य उजळलं असं समजायला काही हरकत नाही. अतिशय उंच आणि बेलाग किल्ला आहे हा. याचं दुसरं नाव प्रचंडगड.

आम्ही सकाळी सात वाजता पुण्याहून निघालो. सिंहगड रस्त्यावरून तसेच पुढे पाबे खिंडीत गेलो. तोरणा/राजगडला जायला नसरापूर मार्गे जाण्यापेक्षा हा रस्ता अजून जवळचा आहे. पाबे खिंडीत थोडा वेळ थांबून आम्ही सिंहगड, राजगड आणि तोरण्याचं दर्शन घेतलं. आणि मग तिथून पुढे थेट वेल्हा. खाली जास्त गाड्या दिसत नव्ह्त्या त्यामुळे मनापासून खुश झालो. नाहीतर आजकाल गडांवर पण गर्दी व्हायला लागली आहे. सिंहगड, लोहगड हे शनिवार-रविवार सुट्टिच्या दिवशी करायचे गड आता राहिले नाहियेत. तोरणा चढताना जरा फाटते या हौशी लोकांची...त्यामुळे जरा गर्दी कमी. तरीपण राजगड ला ही आजकाल बाजार भरायला लागला आहे. असो...तो एक अजून वेगळाच विषय होईल.

चढायला सुरवात केली आणि पहिलाच धक्का बसला. दोन वर्षांपूर्वी चा हा फोटो पहा आणि आत्ताचा. काही बोलायची गरजच नाही. पूर्वी ओढ्याला किती पाणी होतं ...

आत्ताचा.....

थोडेसे खिन्न होऊन चढ चढू लागलो. तोरण्याचा पहिल्याच सोंडेवरचा चढ पेकाट मोडतो...निदान माझं तरी..त्यामुळे माझा वेग जरा कमी होता आणि त्यात भर म्हणून चक्क ऊन पडलं होतं.
पण तो पार केल्यानंतर फारशी चढाई नाही.

नंतर वाटेत जाताना ऊन गायब झालं आणि जसं जसं वर गेलो तशी तशी हवा थंड होऊ लागली. पलीकडल्या तलावाचं पाणी अगदी निळंशार दिसत होतं आणि तिकडे ढग सुद्धा खाली उतरले होते. त्यामुळे थोडी फोटोग्राफीची हौस भागवून घेतली. जरा पाऊस येतो कि काय असं वाटलं म्हणून लवकरच पुढे निघालो. पण छे! कसलं काय...आलाच नाही बेटा..

नंतर मात्र इकडे तिकडे न करता सरळ बिनी दरवाजा गाठला.

वाटेत सुद्धा जो एक छोटा धबधबा लागतो, त्याला फारच कमी पाणी होतं. आता वर अगदी ढगांमधूनच चालत होतो. पहिली जाऊन गाठली ती झुंजार माची...काही वेळ खाली नुसतेच ढग होते त्यामुळे थोडा वेळ तिथे बसायला लागलं. नंतर मात्र ती कसर भरून निघाली.

नंतर मेंगाई देवीचं दर्शन घेऊन पुढे निघालो. या वेळेपर्यंत दर वर्षी तोरण्याला निळी छोटी फुलं फुललेली दिसतात पण या वेळी जास्त दिसली नाहीत. आम्ही आता बुधला माची कडे निघालो होतो. हे अंतर जरा जास्त आहे म्हणून थोडी घाई..

वाटेत एक गुप्त दरवाजा आहे. त्यातून रांगत गेलं की बुरूज आहे. अर्थात त्या बुरूजाचा भाग वरूनही दिसतोच. अगदी सुबक रचना आहे. तिथे थोडा वेळ घालवला...

आणि कोकण दरवाज्याकडे निघालो. हा आहे कोकण दरवाजा.

अजून सुद्धा बुधला लांबच दिसत होता

आता झपाझप चालायला सुरूवात केली आणि थांबायचं नाही असं ठरवलं...पण हा आला आडवा...

खूपच छोटा होता...मस्त दगडावर बसला होता. पण आमची चाहूल लागली आणि तो नाराज झाला. माझा मित्र शेजारच्या पायवाटेनी पुढे गेला तर यानं डंख मारल्यासारखं करून माझी पंचाईत केली. खरं तर हा विषारी का बिनविषारी हे माहित नव्हतं आणि भितीही इतकी वाटत नव्हती. गेलो आम्ही तसेच पुढे. च्यायला इथे कारवी आणि बाकीचं गवत चांगलं खांद्या पर्यंत वाढलं होतं. आता मला भिती वाटायला लागली. इथे दोन चार साप खिशात, गळ्यात आले असते तरी कळलं नसतं. मध्येच चालताना पायात काही वेल आली...काही अडकलं तरी आम्हाला सापच आठवत होता. हा हा हा..

शेवटी बुधल्याला पोचलो. सकाळपासून काहीही खाल्लं नव्ह्तं ते इथेच खाल्लं. इथून कळतं तोरण्याला प्रचंडगड का म्हणतात ते

इथून राजगड ला जायचा रस्ता आहे. राजगड - तोरणा किंवा तोरणा - राजगड हा एक मस्त ट्रेक आहे पण शक्यतो नवख्यांसाठी नाही. कारण मजबूत चालायचं आहे आणि राजगडवरून येताना एक मस्त अवघड पॅच आहे. खाली अगदी डावीकडॆ अवघड वाट दिसतिये का? शिडी लावली आहे तिथे. तिथून खाली उतरायचं आणि पुढे एका ठिकाणीही थोडं अवघड आहे.

दर वेळी ट्रेक ला आम्ही एके ठिकाणी शांत बसतो. घड्याळ, मोबाईल, कॅमेरा हे सगळं बाजूला ठेवतो. कामाचे, जबाबदार्यांचे, कर्मकट्कटींचे विचार बाजूला सारतो आणि अगदी शांत शांत बसतो. बाजूची हिरवाई , मोकळा वारा, गूढ शांतता अगदी आत झिरपत जाते. तेच आत्ता आम्ही केलं. खरं तर उठून जायचं अगदी जिवावर आलं होतं पण खूप चालून अजून गड उतरायचा होता म्हणून परत निघालो.

परतीच्या वाटेवर अजूनही तो साप त्या दगडावर बसला होता. मला वाटलं मेला बिला कि काय..किंवा कोणी मारलं का काय? कारण काही असतात असे वीर..उगाच एखाद्या जीवाला मारून मर्दुमकी दाखवणारे..पण नाही. बहुतेक तो कात टाकणार होता लवकरच. मघाशी लक्षात नव्ह्तं आलं.

आता पुन्हा कोकण दरवाजा, मेंगाई देवीचं देऊळ, बिनी दरवाजा गाठला. आणि उतरायला सुरूवात केली. अगदी निवांत उतरलो. खालच्या ओढ्यामधे थोडा वेळ पाय टाकून निवांत बसलो. पुन्हा एकदा तोरणा डोळ्यात साठवून घेतला आणि पाबे खिंडीतून पुण्याकडे निघालो...

प्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

24 Aug 2010 - 12:09 pm | मृत्युन्जय

अ प्र ती म छा या चि त्रे

अमोल केळकर's picture

24 Aug 2010 - 12:27 pm | अमोल केळकर

मस्त छायाचित्रे

अमोल

चिगो's picture

24 Aug 2010 - 2:19 pm | चिगो

अतिशय सुंदर छायाचित्रे.. जावंस वाटतयं...

sandeepn's picture

24 Aug 2010 - 2:38 pm | sandeepn

फोटो एक नंबर आले आहेत.

मेघवेडा's picture

24 Aug 2010 - 2:54 pm | मेघवेडा

सुंदर!

असुर's picture

24 Aug 2010 - 2:59 pm | असुर

लै भ्भारी!! आपला अवडता किल्ला!! आणि इतकी हिरवाई पाहून डोळे निवले.

फोटु मस्तच!!

--असुर

प्रभो's picture

24 Aug 2010 - 6:47 pm | प्रभो

ज ह ब ह रा!!!

बेसनलाडू's picture

24 Aug 2010 - 10:43 pm | बेसनलाडू

नयनरम्य प्रकाशचित्रे आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

अनिल हटेला's picture

25 Aug 2010 - 7:46 pm | अनिल हटेला

मस्तच आलेत फोटो !

धन्यवाद सुरेख सफल घडवल्या बद्दल !!

किल्लेदार's picture

24 Aug 2010 - 11:50 pm | किल्लेदार

मी ३ वेळा ट्राय मारला या बाजूने आणि ३ र्‍यांदा गेलो तेव्हाच वरपर्यंत पोहोचलो........

भडकमकर मास्तर's picture

25 Aug 2010 - 4:59 am | भडकमकर मास्तर

उत्तम फोटो
आणि
दर वेळी ट्रेक ला आम्ही एके ठिकाणी शांत बसतो. घड्याळ, मोबाईल, कॅमेरा हे सगळं बाजूला ठेवतो. कामाचे, जबाबदार्यांचे, कर्मकट्कटींचे विचार बाजूला सारतो आणि अगदी शांत शांत बसतो. बाजूची हिरवाई , मोकळा वारा, गूढ शांतता अगदी आत झिरपत जाते. तेच आत्ता आम्ही केलं.
हे सर्वात जास्त आवडले

विसोबा खेचर's picture

25 Aug 2010 - 7:22 pm | विसोबा खेचर

शब्द नाहीत..!

तात्या.