स्मशानात जागा हवी तेवढी

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
18 Aug 2010 - 10:37 am

स्मशानात जागा हवी तेवढी

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती?
हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे?

तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला
तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे?

जरी सत्य तू बोलतो मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता?
सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे?

कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

कसा व्यर्थ नाराज झालास आंब्या, वृथा खेद व्हावा असे काय ते
फ़ळे चाखण्याचेच कौशल्य ज्याला, तया ओलणे ते जमावे कसे?

शिवारात काळ्या नि उत्क्रान्तलेल्या खुज्या माकडांचा धुमाकूळ तो
जिथे कुंपणे शेत खाऊन जाते, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

अभय काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..!
.
.
गंगाधर मुटे
...................................................................................
(वृत्‍त - सुमंदारमाला)
...................................................................................

कवितागझल

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

18 Aug 2010 - 12:01 pm | गंगाधर मुटे

शेती संबधीत काही शब्दांचे ढोबळमानाने अर्थ.

खुरटणे = वाढ खुंटणे,
तण = पिकांत वाढणारे अनावश्यक गवत
ओलणे = ओलीत करणे,पाणी देणे
////////////////////////////////////////////////////

मदनबाण's picture

18 Aug 2010 - 12:32 pm | मदनबाण

अ प्र ति म... :)
गझल फार आवडली... :)

नगरीनिरंजन's picture

18 Aug 2010 - 12:35 pm | नगरीनिरंजन

असेच म्हणतो.

वेताळ's picture

18 Aug 2010 - 12:50 pm | वेताळ

आवडली.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Aug 2010 - 12:52 pm | llपुण्याचे पेशवेll

कविता फार फार फार आवडली.

अर्धवट's picture

18 Aug 2010 - 5:47 pm | अर्धवट

पुप्याशी बाडिस

मस्त! छान वाटले वाचून. सर्वच द्विपदी उत्तम.

"तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?" ही ओळ खास अन् खूप आवडली.

थोडा छिद्रान्वेषीपणा -

कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा
तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

येथे तुम्हाला जे म्हणायचे आहे त्यात "पशूंना तिने घाबरावे कसे?" हे नीटसे बसत नाही असे वाटते.
तिला पशूंची भिती कसली असे ध्वनीत व्हायला हवे आहे, पण तसे होत नाही.. थोडे चुकल्यासारखे वाटले. राग नसावा. :)

गंगाधर मुटे's picture

18 Aug 2010 - 10:05 pm | गंगाधर मुटे

तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे.
पण रदिफ,काफिया,अलामत,वृत्त सांभाळून
लिहायचे म्हटले की खूप मर्यादा येतात.
तरी पण बघतो, काही करता आले तर.

नंदू's picture

18 Aug 2010 - 6:43 pm | नंदू

छान. नेहमी प्रमाणे.

नंदू

अथांग's picture

19 Aug 2010 - 12:13 am | अथांग

जिथे कुंपणे शेत खाऊन जाते, तिथे त्या पिकांनी लपावे कसे?

अभय काळजी त्या मृताची कशाला, स्मशानात जागा हवी तेवढी
समस्या इथे ग्रासते जीवितांना, विसावा कुठे अन्‌ वसावे कसे..!

फारच सुरेख !

-अथांग.

वारा's picture

19 Aug 2010 - 12:17 am | वारा

आवडली सत्याला धरुन...

गंगाधर मुटे's picture

20 Aug 2010 - 12:14 am | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.