दुर्मुख

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
12 Aug 2010 - 2:02 pm

संध्याकाळ झाली होती. नेहेमीप्रमाणेच दुर्मुख स्वयंपाकघरात चहा घेत बसला होता. बेल वाजली. त्याने तत्परतेने दरवाजा उघडला. बायकोच्या हातातल्या जड पिशव्या आत आणून ठेवल्या. वॉश घेऊन आल्यावर तिने म्हटले," खायला आणले आहे, सामोसे आणि बंटीचा आज वाढदिवस आहे ना , म्हणून आइसक्रीमही आणले आहे."
बिचारी दिवसभर नोकरी करुन स्टेशनवर उतरल्यावर, बाजारहाटही करत होती. दुर्मुखला नैराश्याचा झटका आल्यापसून तो घरातले काहीच काम करत नसे. ऑफिसला जाऊ लागला होता हेच नशीब! बायको त्याला चांगलीच संभाळून घेत होती. आईची चाहूल लागताच रुमचा दरवाजा उघडून बंटी बाहेर आला. बाबा डायनिंग टेबलाशी बसला आहे हे पहाताच तिथे न बसता त्याने एक बशी घेतली, गरम पंजाबी सामोसे बशीत ठेवून डीप फ्रीजमधे ठेवले. मग एका प्लास्टिकच्या बाऊलमधे आइसक्रीम काढून ते मायक्रोवेव्हमधे १ मिनिटासाठी ठेवले. दोन्ही खाण्याच्या वस्तु घेऊन तो टीव्ही बघायला निघून गेला. बंटीला कुठलीही गरम गोष्ट खायला आवडत नसे, तसेच आइसक्रीम तर पातळ करुनच खायचे असते असे त्याचे मत होते. दुर्मुख दरवेळेस हे पहात असे आणि दरवेळी त्याचा चेहेरा आणखीनच दुर्मुखलेला होत असे. "अरे, तू कशाला याचा त्रास करुन घेतोस ? त्याला करु दे पाहिजे ते." दुर्मुखने एक निश्वास सोडला आणि तो यांत्रिकपणे सामोसा खाऊ लागला.
दुर्मुखला एकेक जुन्या गोष्टी आठवू लागल्या. बायकोमुलांबरोबर केलेल्या भन्नाट ट्रीप्स, शाळेच्या अ‍ॅडमिशनसाठी दोन्ही मुलांच्या वेळी केलेली धांवपळ , बंटीला सतत ताप येत असताना झालेली हॉस्पिटलची धावपळ, मोमूच्या व्हिसासाठीचे टेन्शन आणि शेवटी ती अमेरिकेला गेल्यावर आलेले रितेपण .... त्याला हे कळेना.. या सगळ्यातून जाताना आपल्याला नैराश्याने नक्की कधी ग्रासले ? मोमू शिकायला पहिल्यांदा घराबाहेर पडली तेंव्हा आपण व्याकुळ झालो होतो हे खरे. पण तुम्हाला मोमूच आवडते आणि मी मुळीच नाही, असे बंटी म्हणाला तेंव्हा आपण हादरलो होतो. काय फरक झाला होता आपल्या हातून ? मोमू जात्याच समजूतदार होती. बंटीवर अनेकदा हात उचलावा लागला होता. पण असे तर अनेक घरांत असते. खोडकर मुलं जास्त मार खातातच!
कित्येक वर्षे कशी आनंदात गेली होती. मोमूला पाहिजे ती लाईन मिळाली होती. बंटी बाराव्वीत पोचला होता. आता चारपाच वर्षे काढली की सगळ्या आर्थिक समस्या संपून एकदम समाधानी आयुष्य होणार .. याच आनंदात होतो आपण. पण अचानक..
बंटीने बाराव्वीला ड्रॉप घेतला तेंव्हा धक्का बसला तरी, त्याचे शिक्षण तिथेच थांबेल असे कधी वाटलेच नव्हते. .. मग ते कॉलेज, क्लासेस मधून फोन येणे... त्यांच्यापुढे याचना... शेवटी त्या सायकिअ‍ॅट्रिस्टकडच्या फेर्‍या .... आणि त्यातून काहीच निष्पन्न न होणे.... नातेवाईक, मित्र, ओळखीचे यांचे सल्ले ... डोके गरगरु लागले.
कसाबसा सामोसा संपवून दुर्मुख आतल्या खोलीत जाऊन पडला. बिच्चारी बायको दोन 'सरफिर्‍यां' साठी स्वयंपाक रांधू लागली.

कथारेखाटनविचार

प्रतिक्रिया

मन१'s picture

12 Aug 2010 - 2:28 pm | मन१

वाचवत नाही.

मदनबाण's picture

12 Aug 2010 - 6:09 pm | मदनबाण

छ्या...असं काही वाचवत नाही !!! :(

क्रेमर's picture

12 Aug 2010 - 6:48 pm | क्रेमर

कथेचा विषय व मांडणी आवडली. अजुन लिहिले असते तर परिणामकारक होऊ शकली असती.

शिल्पा ब's picture

12 Aug 2010 - 10:26 pm | शिल्पा ब

अशा घटना फार वाईट.

बहुगुणी's picture

12 Aug 2010 - 10:34 pm | बहुगुणी

Dark गोष्ट आहे, पण दाहक वास्तवाचं कथानक फक्त चार पॅराग्राफ मध्ये नेमकं मांडलंय, style आवडली.

नावातकायआहे's picture

12 Aug 2010 - 10:59 pm | नावातकायआहे

खरेच असे काही वाचवत नाही...
देव करो आणि ही 'गोष्टच' असो

ड्रॉप का घेतला काही कळले नाही.

सहज's picture

13 Aug 2010 - 6:46 am | सहज

छान कथा म्हणून सोडून द्यावे तरी मनात काथ्याकूट सुरु होतो. पण त्यात कथेचे यश आहे.

चला आजचा गृहपाठ - बंटीने पुढे काय शिकावे व बंटीचे उपजीविकेचे उपलब्ध पर्याय

सुनील's picture

13 Aug 2010 - 7:06 am | सुनील

थोडकी आणि परिणामकारक कथा.

तिमा's picture

13 Aug 2010 - 5:12 pm | तिमा

सर्वांचे आभार. ही गोष्ट लिहावी का नाही याबद्दल अनेक दिवस मनाची तयारी होत नव्हती. गोष्ट डार्क तर आहेच पण दुर्दैवाने खरी आहे. सदर व्यक्ति आता नैराश्यातून बाहेर पडली आहे आणि आपले प्राक्तन मान्य करुन परत नॉर्मल जगायला लागली आहे.
अर्थातच त्या व्यक्तिची ओळख गुप्त ठेवणे मला भाग आहे.
कथा लिहिण्याचा उद्देश फक्त अशा घटनाही प्रत्यक्षांत घडू शकतात हे वाचकांसमोर यावे एवढाच!

धमाल मुलगा's picture

13 Aug 2010 - 6:28 pm | धमाल मुलगा

बापरे!
ही घटना खरी असेल तर त्या व्यक्तीला स्वतःला, घरच्यांना किती त्रास सहन करावा लागला असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.

अवघड आहे. आपण समोर दिसेल तेव्हढंच जग असं मानुन चालतो आणि असा एखादा जोरदार धक्का आपले सारे ग्रह समज उलटेपालटे करुन टाकतो हेच खरं. :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2010 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलाशी सहमत......!

-दिलीप बिरुटे

(असा एखादा जोरदार धक्का आपले सारे ग्रह समज उलटेपालटे करुन टाकतो हेच खरं. )

सारे ग्रह एखादा जोरदार धक्का देऊन आपले समज उलटेपालटे करून टाकतात.
असो.
आता या लेखा विषयी :
वारंवार दिसणारी ही घटना फार थोडक्या शब्दात कथीत केल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.आताशा हे असे होते म्हणावे की आपला अनुभव तोकडा पडतो हे काही कळत नाही.
माझ्या मुलीला अपेक्षेपेक्षा (माझ्या ) कमी गुणांकन मिळाले होते तेव्हा माझाही असाच दुर्मुख झाला होता काय हे आता सुमुखीला विचारायला हवे खरे .
मास्तर अशावेळे कुठे गायब होताता ते काही कळत नाही बॉ.

विलासराव's picture

13 Aug 2010 - 7:37 pm | विलासराव

मी स्वतः बारावीला(सायन्स) ड्रॉप घेतला होता.अभ्यास झाला नाही या कारणाने. पन १९८६ च्या काळात तरी बरेचसे विद्यार्थी ड्रॉप घ्यायचे. आमच्या बॅचला ड्रॉप घेणारे ७-८ जण होते. घरी तर निकालाच्या दिवशी सांगितले होते. वडिल नाराज झाले पन मला समजुन घेतले त्यांनी. पुढे मी बीई केले.

मला तरी शिक्षण हेच सर्वस्व आहे असे वाटत नाही( धाडशी विधान करतोय याची जाणीव आहे). उच्च शिक्षण न घेताही यशस्वी होणारे लोक समाजात असतात.त्रास जास्त होतो एवढेच.
कुठ्ल्याही आईवडिलांच्या अपेक्षा असतातच त्यात वावगे असे काही नाहीच. पण मुलगा म्हनुन त्यांनीही (ईंजिनिअर/डॉक्टरच) झाला पाहिजे असा अट्टाहास धरु नये (मुलाची कुवत नसताना).

हे माझे व्यक्तिगत मत आहे.

मधुशाला's picture

13 Aug 2010 - 9:02 pm | मधुशाला

मला तरी शिक्षण हेच सर्वस्व आहे असे वाटत नाही
+१
उच्च शिक्षण न घेताही यशस्वी होणारे लोक समाजात असतात.
"यशस्वी" शब्दाची व्याख्या संकुचित ठेवली नाही तर कित्येक लोक यशस्वी आणि सुखी दिसतील.