वर्षभर तहानलेल्या चातकाला,
इवल्याश्या थेंबाने तृप्ती देताना.,
मिळेल मलाही त्याच्या प्रेमाची उब,
ही ग्वाही देणारा पाऊस.
त्याच्यामाझ्यात तलम रेशमी,
निमिषाचा अंतरपाट धरताना,
क्षणभर दुरावा देऊन मिलनासाठी,
इंद्रधनुष्य उभारणारा पाऊस.
त्याच्या केसातून ओघळताना,
माझ्या तळहातावर मोती बनुन येणारा,
त्याच्या ओठांवरुन मी अलगद,
माझ्या ओठांनी टीपलेला पाऊस.
मनाच्या कुपितली आठवणींची ,
अत्तर चौफेर शिंपडणारा ,
मला चिंब करत माझ्या,
तनामनावर बरसणारा पाऊस.
हव्याशा ओल्या स्पर्षाने,
नखशिखांत मला लपेटणारा ,
अन् त्याच्या माझ्या स्वप्नांचा वेडा,
झुला झुलवणारा पाऊस.
त्याच्या अन् माझ्या एकांतात,
हविहवीशी लुड्बूड करणारा ,
आमचे हात एकमेकात गुंतताना,
मला वाकुल्या दाखवणारा पाऊस.
आमच्या दोघांच्या प्रेमाने,
बावरुन थोडासा शहाणा झालेला ,
शेवटी त्याच्याच मिठीत उबेसाठी,
मला लोटणारा पाऊस.
प्रतिक्रिया
11 Aug 2010 - 10:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान कविता. अजून येऊ दे....!
-दिलीप बिरुटे
12 Aug 2010 - 1:51 pm | पाषाणभेद
पावसाची विविध रुपे आवडली. अजून येवू दे असेच म्हणतो.