(मृगजळाचे अनधिकृत बांधकाम )

अडगळ's picture
अडगळ in जे न देखे रवी...
11 Aug 2010 - 9:33 am

ग्रेस याच्या अनेकरंगी , गूढगर्भ प्रतिमांचा गिलावा सामान्य व्यक्ती आणि प्रसंगावर मारून केलेलं हे बांधकाम

पिशवीतून घेऊन कोबी ,
चंद्राचा साजण आला
गात्रात उमटली ओवी
भाजीचा प्रश्न निवाला

फेकून विडीचा पावा,
दारात उभा गिरिधारी
क्षितीजाला आधण आले
तुज प्रीत चहाची भारी.

कापता दु:ख कांद्याचे,
डोळ्यातून चंद्र गळाले,
कोबीची हिरवी माया
डाळीचे मोती झाले.

खाऊन चिऊचे घास,
शयनाला साजण गेला,
अन उष्टी आवरताना
शबरीचा जीव रमेना

मालवता दीप घराचे
रक्तात फुले कोरंटी,
ओट्यावर लाजून हसली
ती कढईची वेलांटी.

शृंगारविडंबन

प्रतिक्रिया

दीपक साकुरे's picture

11 Aug 2010 - 10:52 am | दीपक साकुरे

याला म्हनतात 'मुक्त''छंद'..
कडव्या कडव्यात छंद मुक्त पने नाचतोय.. लै भारी

राजेश घासकडवी's picture

11 Aug 2010 - 11:10 am | राजेश घासकडवी

ग्रेसच्या कविता कळायला कठीण असतात, त्या सगळ्यांचंच असं सुलभीकरण व्हावं असं वाटतं. लगे रहो.

जरा मूळ कवितेचा दुवा दिलात किंवा ती टंकून दिलीत तर अधिकच बहार येईल.

अडगळ's picture

11 Aug 2010 - 5:34 pm | अडगळ

ग्रेसच्या प्रतिमाप्रचुर शैलीचे विडंबन करावे असा हेतू होता. त्यामुळे एकच अशी कविता डोळ्यासमोर नव्हती.
आठवतील त्या सगळ्या प्रतिमांवर हात मारून घेतला. (सुमित्रेची आद्यप्रतिमा सोडून)

केशवसुमार's picture

11 Aug 2010 - 6:06 pm | केशवसुमार

अडगळशेठ,
मस्त गिलावाकाम..
ग्रेसच्या कवितेचे विडंबन करायचे म्हणजे आधी कविता समजायला हवी.. त्यापेक्षा तुमचा हा मार्ग उत्तम..;)
चालू दे..
(गवंडी)केशवसुमार

दत्ता काळे's picture

11 Aug 2010 - 11:28 am | दत्ता काळे

अनाधिकृत बांधकामात पाण्याच्या लाईनचा ( पाईप लाईन ) प्रश्न कसा निर्माण होईल .. मृगजळ आहेच.

चतुरंग's picture

11 Aug 2010 - 5:18 pm | चतुरंग

(खुद के साथ बातां : रंगा, ग्रेसच्या कविता ह्यामुळे समजायला लागतील की काय? ;))

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2010 - 5:22 pm | बिपिन कार्यकर्ते

लै भारी

वाहवा .. फार उत्तम
एकदम आवडले :)

डाळीचे मोती आणि कढईची वेलांटी विशेष :)

क्रेमर's picture

11 Aug 2010 - 6:15 pm | क्रेमर

सुरेख विडंबन.

मुक्तसुनीत's picture

11 Aug 2010 - 7:39 pm | मुक्तसुनीत

लई भारी विडंबन. सुमित्रेबरोबर इतरही अनेक "आदिबंध" आहेत. (भाज्यासुद्धा सर्व कुठे झाल्या ? कांदामुळाभाजी आवघी ग्रेसाई माझी !) अजून येऊ द्यात ! :-)

केशवसुमार's picture

11 Aug 2010 - 8:49 pm | केशवसुमार

राघव वेळा पण राहिले की..

अडगळ's picture

11 Aug 2010 - 9:35 pm | अडगळ

होय .. चंदन , घोडा , चर्च , संध्यामग्नता ..बरंच काही आहे

श्रावण मोडक's picture

11 Aug 2010 - 10:15 pm | श्रावण मोडक

लै भारीच. इथं मिक्स व्हेज झालं. आता बाकीच्या एकेक भाज्या निवडून त्याही करायला हरकत नाही. :)

बेसनलाडू's picture

12 Aug 2010 - 3:17 am | बेसनलाडू

विडंबन आवडले. चित्रदर्शी वाटले.
(भरपेट)बेसनलाडू