पुन्हा कधी येशील?

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
9 Aug 2010 - 10:59 am

लिफ़्टचा दरवाजा दहाव्या मजल्यावर उघडला, तेव्हा आधीच चार माणसे आत होती. तरीही मारीयाने सॉरी म्हणत म्हणत कशीबशी चाकांची खुर्ची आतमधे घुसवलीच. खुर्चीत बसलेल्या अंकल मॅथ्युने कोरडा आवंढा गिळून आपला ह्या कोंबाकोंबीत काहीच भाग नसल्याचे दर्शवले. त्याची बहुदा काही गरज नव्हती. लिफ़्टमधल्या माणसांनी विकलांग अंकल मॅथ्युकडे पाहिले देखील नसावे. त्यातले दोघे लिफ़्टच्या भिंतीला सावलीसारखे चिकटून जागा करून देण्याचा प्रयत्न करत होते. बाकी दोघांनी मारीयाच्या दोन्ही बाजुंना आपापली जागा मिळवली. समोरच्या बंद दाराकडे बघतांना अंकलला ते दोघे मागे उभे असलेल्या मारीयाला जरा चिकटूनच उभे राहीले असल्याचा भास होत राहीला.

मारीयाने नेहमीच्या सराईतपणे खुर्ची बाहेर काढून क्लब हाऊसजवळच्या जॉगींग ट्रॅकवर घेतली. संध्याकाळी बाहेर फ़िरवतांना मिळणारी मोकळी हवा तिलाही हवीहवीशी वाटत असणार. ट्रॅकवर फ़िरणारे, धावणारे आनंदी, सुखी लोक, धमाल करणारी मुले बाळे, टेनीस कोर्टवर जबरदस्त फ़टके हाणणारे खेळाडु, ऑफ़िसमधला थकवा घालवण्यासाठी पोहण्याच्या तलावात डुंबणारे शौकीन. ही सगळी मजा बघत मारीयाचाही वेळ मजेत जात असणार. अंकल मॅथ्युसाठी तर रोजची हीच एक वेळ आवडती होती. दिवसभर नुसते पलंगावर पडून रहा किंवा टीव्ही समोर काहीतरी हलती चित्रे बघत बसा. बोलणार तरी कोणाशी? मुलीचा डायव्होर्स झालेला. अंकलकडे बघायला म्हणून फ़िलीपिनो मेड मारीया होतीच. मारीयाच्या भरोशावर मॅथ्युला ठेवून टिना दिवसभर कामावर जायला मोकळी असायची. अंकलचा नातू त्याच्या बायकोसोबत दूर रहात होता. आलाच तर कधी रविवारी भेटायला म्हणून, तो देखील एकटाच यायचा. तेव्हा चार शब्द त्याच्याबरोबर बोलायला तरी मिळायचे. एरवी अर्धांगवायु झालेल्या अंकलचे बोबडे बोलणे ऐकणे सगळ्यांनाच नको वाटायचे.

पलंगावर पडून रहाण्याचा कंटाळा आला की अंकल मारीयाला सांगायचा- बैठक खोलीत घेऊन जा. टी व्ही पाहून डोळे दुखले की, बेडवर घेऊन जा. असे तीन चारवेळा झाले की मारीयाची कटकट ऐकावी लागायची. अंकल मॅथ्यु बोबड्या भाषेत तिला खूप बोलून घ्यायचा. तिला समजले तरी ती न समजल्यासारखे करायची. बरेचदा मग ती अंकलकडे लक्षच देत नसे. मॅडमनी दिलेली कामे पुर्ण करायची आहेत असे सांगून ती तासनतास आतल्या खोलीत फ़ोनवर मित्रांशी गप्पा छाटत बसायची.

मारीया अंकलला पार्क मधल्या गोलाकार रस्त्यावर फ़िरवून एका जागी बसवून ठेवायची. मग ती अंकलला नजरेच्या आड न होऊ देता, स्वत: जरा आसपास फ़िरून येत असे. कॉलनीतल्या बाकीच्या मेडसचे ते नेहमिचे गप्पा मारण्य़ाचे ठिकाण होते. तिथे रोज भेटणाऱ्या दोघी तिघींबरोबर मारीयाला एकमेकींच्या मॅडमच्या ऊखाळ्या पाखाळ्या ऐकण्याची करमणूक असायची. कधी चुकून त्या जवळपास बोलत असल्या तर अंकलच्या कानावर एखादे वाक्य पडत असे. एकदा असेच त्याने मारीयाकडून “बुढ्याचा तसा काही त्रास नाही, पण दिवसातून दहादा बेडरूम ते सोफ़ा अशा जागा बदलवायला लावतो” असे ऐकले होते. त्यानंतरचा दुसरा पूर्ण दिवस त्याने पलंगावर झोपूनच काढला होता.

नेहमीच्या झाडाखाली खुर्चीत बसलेल्या अंकल मॅथुला अचानक विचित्र मळभाने घेरून टाकले. ह्या आनंदी गर्दीमधे तो किती एकटा होता! काय माझे हे आयुष्य? नव्वद वय झाले. अजून किती वर्षे अशी परावलंबी काढायची? आजुबाजुला फ़िरणारे हे इतके लोक. सगळे अनोळखी. अगदी रोज दिसणारे चेहरे, पण मला न जाणणारे. त्यांचे एक सोडा. ही मारीया पण तशीच. काय तिचा आपला संबंध? ती आपुलकीने माझे सगळे करीत असेल का? बोलून चालून एक पगारी नोकर. यांत्रिकपणे रोज सकाळी आपल्याला एकदा खंगाळून काढणार, कपडे बदलायला, चार घास तोंडात कोंबायला मदत करणार. संध्याकाळी खुर्चीत फ़िरवून आणणार. मला जाळणाऱ्या एकटेपणाच्या वेदना तिला कुठून कळणार?

“अंकल, अ फ़्लावर फ़ॉर यू” एक चिमुकली बाहुली मॅथ्युजवळ येऊन गोड हसली. तिने एक गुलाबाचे फ़ुल समोर केले. अंकलनी तिच्या हातातून फ़ूल घेऊन थरथरणाऱ्या ओठांनी तिला थँक्यु म्हटले. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून तिचाही चेहरा आणखिनच उजळला. आपल्या आईचा हात धरून ती तिला ओढत कुठेतरी घेऊन गेली. टिना लहान होती तेव्हा मॅथ्यु आणि मार्गारेट असेच तिला घेऊन पार्कमधे जात. तेव्हा फ़्रेंडशिप दिवस असला की टिना दिसेल त्याला फ़ुले वाटायची. नंतर मार्गारेट अचानक मॅथ्युला सोडून दूरवरच्या प्रवासाला निघून गेली. टिनाने हात धरायला एक हक्काचा साथी शोधला. मॅथ्यु स्वत:च्या घरात एकटाच उरला. सुरवातीला टिना व तिचा नवरा, दोघेही अंकलला भेटायला येत. मग एक दिवस टिना एकटीच आली. तिचे येणेही हळुहळु बंद झाले. फ़ोनवरून अधूनमधून नवऱ्याविषयीच्या कुरबुरी ऐकायला येत. पुढे ती लहानग्या डेनीसला घेऊन घरी आली, ती परत न जाण्यासाठीच.

मॅथ्युला आठवले- टिनाच्या तशा परिस्थितीत देखील आपले एकटेपण आता संपणार ह्याचे आपल्याला खोल कुठेतरी जरा बरेच वाटले होते. त्या गोष्टीला कितीतरी वर्षे उलटून गेली असतील. तेव्हापासून आजतागायत एकटेपणाने आपल्याला एकटे सोडलेले नाही. अगदी टिना जवळ राहून देखील. मार्गारेट कुठे आहेस गं तू? मॅथ्युने अबोल टाहो फ़ोडला. त्याच्या उघड्या कलत्या ओठांमधून लाळेची एक रेष खाली ओघळली.

“अंकल, टाईम टु गो होम” त्याची हनवटी टीश्युने टिपत मारीया म्हणाली.
डगडगती मान सावरत मॅथ्युने लुकडा पंजा जरासा वर करून बोलल्यासारखे केले.
“थोडा वेळ आणखी थांबलो असतो गं”
“परत जायला उशीर झाला तर मॅडम बोंबलतील मला” खुर्ची ढकलणे न थांबवता मारीया पुटपुटली. अंकलच्या संमतीचा काही प्रश्नच नसल्यासारखी ती लगबग घराकडे निघाली.

वाटेतला जास्वंदीचा ताटवा ओलांडतांना समोरून दुसरी एक ढकलखुर्ची येतांना दिसली. एक छोट्याशा शरीयष्टीची वृद्धा खुर्चीत बसलेली होती. “ही कोणी नवीनच आलेली दिसते आहे” मॅथ्यु विचार करीत राहीला. खुर्ची ढकलणारी मेड पाहून मारीया जरा थबकली. “ओह सुझाना! यु अल्सो पग्लालाकाद-लाकाद ड्युटी” सुझानाला तब्बल दोन आठवड्यांनतर पाहिल्याने मारीयाला तिच्याशी किती बोलु अन किती नाही असे झाले होते. दोन्ही ढकलखुर्च्या कोणाच्या वाटेत येणार नाही अशा एकाशेजारी एक लावून त्या दोघी “पकाल लकाद जलाकाका्द हापुनान” असे काहीसे फ़िलीपिनो भाषेत ब्लकान जाकान बडबडत राहिल्या. आता मारियाला, ऊशीर झाला तर मॅडम रागावेल वगैरे काही चिंता नव्हती.

मॅथ्युने बाजुच्या खुर्चीकडे पाहून मंद स्मित केले. पांढरे शुभ्र केस असलेली सडपातळ शरीराची वृद्धा. मार्गारेट आज असती तर अशीच दिसली असती का? क्षणभर मार्गारेटला ढ्कलखुर्चीत पाहून मॅथ्युला कसेसेच झाले. आपण दोघेही असे खुर्चीबद्ध असतो तर? मॅथ्युला एका जोडप्रॅम मधे दोन लहानग्या मुलांना घेऊन फ़िरायला जाणारी मेड आठवली. तशा जोड खुर्चीत तो आणि मार्गारेट! आणि मारीया धापा टाकत ढकलते आहे. त्याला हसूच फ़ुटले. बाजुच्या खुर्चीतील वृद्धेने आता मॅथ्युची दखल घेतली. मान किंचित तिरपी आणि जराशे ओठ विलग करून मॅथ्युला ओळख दिली.

“हॅव यु न्युली अराईव्ह्ड हियर?” मॅथ्युने बोबड्या भाषेत विचारले. पण आपले बोलणे तिच्या आकलना बाहेर असेल म्हणुन उत्तर अपेक्षित नव्हतेच.
ती फ़क्त मान थोडीशी त्याच्या बाजुला वळवून मंदशी हसत राहीली. ती काहीच बोलत नव्हती तरी मॅथ्युला त्या मंद स्मितानेच एकदम तरतरी आली. तो मग तिला काय सुचेल ते सांगु लागला. स्वत:विषयी, टिनाविषयी, नातू, मारीया, संध्याकाळचे हे फ़िरणे. त्याचे बोलणे तिला कळते आहे की नाही ह्याचे त्याला काहीच सोयरसुतक नव्हते. मधेच तिला काही विचारले तर त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ती “येस”, “नो” असे काही तरी पुटपुटायची. कधी तिच्या अपार्टमेंट ब्लॉककडे बोट दाखवून मी तिकडे कुठे तरी रहाते असे सांगायचा प्रयत्न करायची.

“अंकल व्हॉट यु टॉकीन्ग वीथ मॅडम? शी कान्नॉट हीयर” कानाकडे बोट दाखवीत मारीयाने नकारार्थी खुण केली. आता कुठे अंकलला तिच्या अबोलपणाचा उलगडा झाला.

अचानक भेटलेल्या त्या नविन मैत्रिणीबरोबर आणखी काही वेळ बोलावे असे मॅथ्युला वाटत राहिले. ती कुठली, ईथे नेहमी रहाणार, की काही दिवसांसाठी आली आहे? घरी कोण कोण आहे? कितीतरी विचारायचे होते. कदाचित मारीया आणि त्या दुसऱ्या मेडकडून काही कळले असते. एरवी कंटाळवाणी वाटणारी त्या फ़िलीपिनो मेडसची आपापसातली बडबड अशीच चालू रहावी. ह्या नविन मैत्रिणीबरोबर अजून निदान थोडा वेळ तरी घालवता यावा. आतापावेतो पार्कमधल्या दिव्यांच्या प्रकाशाने संध्यारंग गिळून टाकला होता. मारीयाला मॅडम घरी यायच्या आत पोहचण्याची घाई झाली होती.

तरीही अंकल मॅथ्युने धीर करून मारीयाला विचारलेच. “ईज शी कमिंग टुमॉरो?”
“अंकल आय डोन्ट नो. शी वील कम ईफ़ द अदर मॅडम सेंडस हर”
“मारीया वेट सममोअर. नो हरी.” अंकलने खुर्चीच्या एका चाकावर आपल्या त्यातल्या त्यात ताठ पंजाने गच्च ब्रेक धरून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मारीया खुर्ची ढकलू लागली. अंकलचा हाडकुळा पंजा थोडावेळ तग धरून हताशपणे बाजुला झाला.

थोड्या दूर अंतरावर दोन मेड्स बोलत उभ्या होत्या. त्या देखील परत जायच्या घाईत असाव्यात. दोघींच्या हातात साखळीला बांधलेली कुत्री होती. ती दोन्ही कुत्री विरुद्ध दिशांना ओढ घेणाऱ्या साखळ्यांना लटकत जवळ येण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होती.

शेजारच्या वृद्धेची खुर्ची थोडी हलली. ती पाठमोरी होण्याआधी मॅथ्युने घाईघाईने विचारून घेतले. “पुन्हा कधी येणार?” पाठमोऱ्या खुर्चीमधून मंद स्मिताची एक लड मागे सोडून ती हळुहळु दूर जाऊ लागली. अंकल मॅथ्यु त्या लडीला लोंबकळत रहाण्याच्या प्रयत्नात असतांना त्याचीही खुर्ची दुसऱ्या दिशेला चालू लागली.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

9 Aug 2010 - 11:29 am | अवलिया

चांगली कथा

गणपा's picture

9 Aug 2010 - 3:28 pm | गणपा

असच म्हणतो.

अर्धवट's picture

9 Aug 2010 - 11:35 am | अर्धवट

>>थोड्या दूर अंतरावर दोन मेड्स बोलत उभ्या होत्या. त्या देखील परत जायच्या घाईत असाव्यात. दोघींच्या हातात साखळीला बांधलेली कुत्री होती. ती दोन्ही कुत्री विरुद्ध दिशांना ओढ घेणाऱ्या साखळ्यांना लटकत जवळ येण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होती.

दादा, काटा आला हो अंगावर. खरच खुप ताकदवान शब्द आहेत तुमचे.

ज्ञानेश...'s picture

9 Aug 2010 - 2:33 pm | ज्ञानेश...

सुरेख कथा.

यशोधरा's picture

9 Aug 2010 - 2:36 pm | यशोधरा

चांगली कथा.

ईन्टरफेल's picture

9 Aug 2010 - 9:04 pm | ईन्टरफेल

लय भारी भाऊ आशाच कथा लिवा आमि वाचु जमल तर प्रतीक्रीया देउ नाय जामल तर सोडुन देउ .......................................आप्ल्याला कसल्याही वादात पडायचेअ नाय ! ..........काय...........??

निखिल देशपांडे's picture

9 Aug 2010 - 9:21 pm | निखिल देशपांडे

चांगली कथा

सुनील's picture

9 Aug 2010 - 9:43 pm | सुनील

छान लिहिलय अरुणराव!