महाराष्ट्रात पुरण्पोळी करताना दोन-तीन प्रकार आढळतात. नागपूरकडे पुरणात पुर्ण साखर वापरतात, तर कोल्हापूर भागात पुर्ण गुळ, खानदेशात तर हरभरा डाळ ऐवजी तुरीचे किंवा मुगाचे पुरण करतात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात हरभराडाळ व त्याच्यात निम्मी साखर व निम्मा गुळ हे प्रमाण असते.
साहित्यः
३ वाट्या हरभराडाळ
३ वाट्या गुळ (चवीप्रमाणे कमी जास्त करणे)
१च.जायफळ पूड
१च्.वेलची पूड
३ वाट्या कणिक
३ टे.स्पून मैदा
मीठ
३/४ वाटी तेल
तांदळाची पिठी
१. हरभराडाळ स्वच्छ निवडून धुवून शिजवणे, प्रेशर कुकर मधे शिजवायची असल्यास ५ वाट्या पाणी घालून, पुर्ण प्रेशर आल्यावर.गॅस बारीक करून ५ मि.शिजवणे.
२.डाळ शिजल्यावर चाळणीवर ओतून निथळून घ्यावी.( या पाण्याचा उपयोग कटाच्या आमटी साठी करावा.)डाळ जाड बुडाच्या पातेल्यात काढून थोडी डावाने घोटावी. त्यात गुळ घालून शिजायला ठेवावे. पुरण चांगले शिजले की पातेल्याच्या कडेने सुटू लागते. तसेच झारा पुरणात मधोमध उभा केला तर पडत नाही म्हणजे पुरण शिजले म्हणायचे. त्यात जायफळ, वेलदोडे पूड घालावी. व पुरण, पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.
३.कणिक व मैदा चाळून घ्यावे व मीठ व पाव वाटी तेल घालून कणिक सैलसर भिजवावी.
४.दोन तास कणिक भिजल्यावर परत परातीत पाणी व तेलाचा वापर करून चांगली तिंबावी. कणिक चांगली मळून सैल झाली पाहिजे.
५.तांदुळाची पिठी हाताला लावून कणकेचा छोटा गोळा हातावर घ्यावा. साधारण कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट (किंवा जास्त) पुरण घेऊन हलक्या हाताने कणकेत भरावे व उंडा हाताने बंद करावा.
६.पोळपाटावर पिठी घेऊन हलक्या हाताने पोळी लाटावी व मंद आचेवर तव्यावर गुलाबी सारखे डाग पडेपर्यंत भाजावी.
टीपः
१.पुरण शिजवण्यासाठी डाळ चांगली शिजलेली हवी.
२.पुरणात थोडी साखर घालावी. पुरण लवकर आळते. गोडी चांगली येते.
३.पोळी तव्यावर टाकल्यावर वारंवार उलटू नये. एका बाजून पुर्ण फुगली कि दुसर्या बाजूने भाजावी.
४.पुरण सैल वाटले तर मलमलच्या फडक्यावर टाकावे.(फडके पाणी शोषून घेते). घट्ट वाटले तर दुध किंवा कटाच्या पाण्याच्या हाताने सारखे मळून घ्यावे.
५.वरील साहित्यात १५-१६ पोळ्या होतात.
प्रतिक्रिया
5 Apr 2008 - 9:51 pm | अभिता
कनकेत २चमचे रवा घालावा. लातायाला बरि पदते.
5 Apr 2008 - 9:58 pm | इनोबा म्हणे
लातायाला बरि पदते.
अना ताई/दादा जरा टंकलेखन साहाय्य पहा की. म्हंजी आमाला बी वाचायला सोप्पं जाईल.
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
6 Apr 2008 - 12:41 am | स्वाती राजेश
पुढच्यावेळी नक्की रवा घालून पाहीन गं.
5 Apr 2008 - 10:34 pm | प्रभाकर पेठकर
पाककृती छान दिली आहे. अभिनंदन.
6 Apr 2008 - 12:22 am | विसोबा खेचर
वा स्वातीताई, मिपावर गुढीपाडव्याचा नेवेद्य आपण तुमच्या पुरणपोळीचाच दाखवू! :)
तात्या.
6 Apr 2008 - 12:44 am | स्वाती राजेश
तात्या,
विचार केला पुरणपोळी ने सर्वांचे तोंड गोड करूया!!!!
आणि नविन वर्षाची सुरवात करूया.
अवांतरः उद्या भारतात सर्वांकडे पुरणपोळी असणारच आहे तरी लिहीली कृती.
9 Apr 2008 - 11:05 pm | वरदा
पुरणयंत्र नसेल तर काय करायचं? आणि ती कणीक बुडेल इतकं तेल घालून ठेवायचं का? पुस्तकात असं लिहिलय्....तू तेल कुठलं वापरतेस? रोज घरात ऑलिव्ह ऑईल वापरते मी त्यामुळे मला आणावं लागेल तेल्...पीनट ऑईलच हवं का?
10 Apr 2008 - 4:20 pm | स्वाती राजेश
पुरणयंत्र नसेल तर मी मिक्सर किंवा हँडब्लेंडर चा उपयोग करते. पण त्यासाठी हरभराडाळ चांगली शिजली असली पाहिजे.
मी इंडियात शेंगदाणा तेल वापरते.पण इथे सनफ्लॉवर वापरते.
कणिक बुडेल इतके तेल घालत नाही पण त्याचा बेस तरी तेलात बुडेल इतके घालते.
10 Apr 2008 - 2:03 pm | मनस्वी
स्वातीताई,
३ वाट्यांपैकी पाव वाटी तेल कणिक भिजवायला वापरले तर उरलेले सर्व २-३/४ वाट्या तेल कणिक तिंबताना वापरावे का?
पाककृती छान सोपी वाटते. नाहीतर पुरणपोळी म्हटल्यावर संकट आल्यासारखे वाटते. आता नाही वाटणार. नक्की करून बघणार.
10 Apr 2008 - 2:14 pm | केशवसुमार
३/४ वाटी म्हणजे तीन चथुर्तांश वाटी , पाऊण वाटी ....३ किंवा ४ वाट्या नसावे.. असे वाटते..
10 Apr 2008 - 4:22 pm | स्वाती राजेश
मी तीन चतुर्थांश वाटी म्हटले.
10 Apr 2008 - 4:27 pm | मनस्वी
आले लक्षात :)
10 Apr 2008 - 5:20 pm | वरदा
मनस्वी म्हणते तशी अशी पाहिल्यावर सोप्पी वाट्टेय करायला...करुन पाहीली पाहीजे सवडीने...
तू म्हणतेस तसा उपकरणांचा एक थ्रेड चालू करते..मग मला मिक्सर कुठला वापरतेस ते सांग....