वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. दर्याखोर्यातून बेफाम दौडत जाणार्या घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर ऊन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पहायला ऊन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी. - पु.ल. देशपांडे
फार दिवसांपूर्वी ’नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात शंकर महादेवन यांनी ’बगळ्यांची माळ फुले’ गायले होते. त्यावेळी गाण्याचे मूळ गायक ’वसंतराव देशपांडे’, अशी प्रथमच माहिती मिळाली. पण, वसंतरावांची पहिली खरी ओळख झाली ती पुलंनी त्यांच्यावर लिहीलेल्या एका लेखातून. त्यानंतर, वसंतरावांची मला झेपतील अशी गाणी मी नेटवरून शोधून काढली आणि सर्वच्या सर्व गाणी भुरळ घालणारीच होती.
पुलंनी वसंतरावांना बर्याच मैफिलींमधे पेटीवर साथ केली होती. आता, या सर्व मैफिली शास्त्रिय होत्या आणि त्या प्रांताचा आणि आमचा तसा संबंध असण्याची गरज भासली नव्हतीच. तरीही गाणी केली डाऊनलोड. शास्त्रिय संगीतातलं काहीही कळत नसूनही ती सर्व गाणीही प्रचंड आवडली. आजकाल तर दिवसातून एक-दोनदा तरी त्यांची गाणी ऐकतोच ऐकतो.
पुलंच्या त्या लेखानंतर वसंतरावांबद्दल जाणून घेण्याची फार उत्सुकता लागून राहिली. शोधता शोधता एक असाच दिर्घ लेख हाती लागला (विकीपीडियावर वसंतरावांच्या पेजवर खाली दिलेल्या एका लिंकमधे तो उपलब्ध आहे). एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व, पण गर्व, मीपणा याचा नावालादेखील लवलेश नव्हता. वझेबुवांबरोबर ते तालमीत जायचे. त्यांच्या दोन-अडीच वर्षांच्या ओळखीत वझेबुवांना एकदाही कळले नाही की वसंतराव गातातही म्हणून.
कोणत्याही घराण्याचे पाईक म्हणून त्यांनी मिरवलं नाही. एका मैफिलीमधे, त्यांच्या अतिशय रंगलेल्या गाण्यानंतर एकाने त्यांना विचारलं की, "काय हो देशपांडे, तुमचं घराणं कुठलं?" त्यावर ते ताडकन उत्तरले की, "आमच्यापासूनच सुरू होणारं आहे आमचं घराणं". पण गातानाचे वसंतराव आणि गृहास्थश्रमातले वसंतराव यामधे कमालीचा फरक. अगदी दोन ध्रुवच.
गाणं शिकताना त्यांनी कसलाही पडदा मनावर पडू दिला नव्हता. ज्या नम्रतेने त्यांनी लाहोरच्या दर्ग्यामधे पटियाला घर्याणाचे उस्ताद असद अली खाँ यांच्याकडे ४-५ महिने फक्त मारवा शिकला, त्याच अदबीने सुरेशबाबू मानेंकडे पुण्यात गाणं. गाणं गातानाही स्पृश्य-अस्पृश्यता अजिबात नाही. म्हणूनच, जेवढं ’सावरे ऐ जय्यो’, ’ना मारो पिचकारी भर’, ’शतजन्म शोधिताना’, ’सुरत पिया की’ ऐकताना आपण तृप्त होतो, तेवढाच आनंद ’कोंबड्याची शान’ किंवा ’कुणासाठी सखे तु’ सारखी तुलनेने हलकी-फुलकी गाणी ऐकतानाही मिळतो.
मी त्यांच्याबद्दल काही लिहीण्याची तशी काही गरजच नाही. तसा मी काही त्यांच्या कुटुंबाच्या परिचयाचा नाही किंवा त्यांच्या गाण्याविषयी लिहीण्याएवढा जाणकारही. पण त्यांचं गाणं फार आवडलं, त्यांच्याबद्दल वाचलं आणि वाटलं की आपल्याला जे माहिती झालं ते शेअर करावं.
शास्त्रिय संगीत कळत नसलं तरी गाणं ऐकण्याची आवड असणार्या प्रत्येकाला त्यांचं गाणं नक्कीच मोहिनी घालणारं आहे. शारद पौर्णिमेला रात्री बरसणारं चांदणं अनुभवायला ’खगोलशास्त्रि’ असणं गरजेचं नसतं. वसंतरावांचं गाणं तर त्या चांदण्यापेक्षाही मोहित करणारं आहे....
वसंतरांवांबद्दल आपल्याला काही अधिक माहिती असल्यास नक्की सांगा...
खालील लेख जरूर वाचा.
http://cooldeepak.blogspot.com/2009/01/blog-post.html
http://www.sawf.org/newedit/edit07232001/vasantrao.htm
भारी समर्थ (वाटलच तर आपली पायधूळ येथे झाडा: http://ranjitbhosale.blogspot.com/)
प्रतिक्रिया
3 Aug 2010 - 8:54 pm | असुर
वसंतरावांची गाणी म्हणजे पर्वणी. 'घेई छंद', 'सूरत पिया की' मला विशेष आवडतात.
'तू-नळी'वरचे धागे हापिसात बसून देणं शक्य नाहीये... पण वसंतराव हे नाव वाचून रहावलं नाही म्हणून हा प्रतिसाद!
घरी गेल्यावर दुवे देईनच! (हा धागा काढल्याबद्दल सध्या तुम्हाला दुवा देतोय!)
-- (वसंतरावांचा पंखा) असुर
3 Aug 2010 - 9:00 pm | मिसळभोक्ता
सुरत पिया की सारखी रागमाला असो, किंवा ऐ जैयो सावरे, किंवा त्यांचा भन्नाट मारवा. ते गेल्याचे कळले तेव्हा भीमसेन मैफिलीत होते. त्यांनी मैफिल थांबवून शद्धांजली देताना म्हटले: "आज महाराष्ट्रातला मारवा हरपला."
आणि हे सगळे ताकदीने गाणारा माणूस "झांजीबार, दुनिया वेड्यांचा बाजार" देखील गातो, म्हटल्यावर त्याचा मोठेपणा कळतो.
वसंतराव नागपूरचे. त्यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याची खूपदा संधी मिळाली. आयुष्याचे चीज झाले.
आप्तांनी आणि मित्रमंडळींनी वसंतरावांचे सांगितलेले बरेच किस्से आहेत. नंतर कधीतरी.
3 Aug 2010 - 9:04 pm | भारी समर्थ
'झांजीबार'? पहिल्यांदाच असलं गाणं असल्याचं कळतय.
वेळ मिळेल तसे अनुभव/ किस्से आणि जमेल तसं गाण्यांचे दुवेही कळवा.
धन्यवाद!
भारी समर्थ
3 Aug 2010 - 9:11 pm | धमाल मुलगा
"झांजीबार..ही दुनिया वेड्यांचा बाजार.. " हे ते गाणं.
>>वसंतराव नागपूरचे. त्यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याची खूपदा संधी मिळाली. आयुष्याचे चीज झाले.
खरंय महानशिबवान तुम्ही. आणि गाणे प्रत्यक्ष ऐकण्याची संधी 'खूपदा' मिळणं म्हणजे काय बोलावं देवा... सुंदरच!
4 Aug 2010 - 10:04 am | सोम्यागोम्या
वसंतरावांवर धागा काढल्याबद्दल आभार. त्यामुळे आम्हाला आमची आवड सांगायची संधी मिळाली. त्यांचे सगळेच राग आवडातात. त्यातल्या त्यात खालील रागांचे त्यांचे सादरीकरण मला भावते.
मै पतिया लिख भेजी- मारू बिहाग
ना मारो भर पिचकारी -देस
पवन चलत - परज
करम किजे करतार-सलगवरली
आजा रे आजा पथिकवा-मधुकंस
4 Aug 2010 - 5:25 pm | भारी समर्थ
पवन चलतचे लिरीक्स (काय बरं म्हणतात याला मराठीत? काव्य!) टाकाल का? जमलं तर संदर्भार्थासह?
भारी समर्थ
5 Aug 2010 - 5:52 am | सोम्यागोम्या
भारी समर्थः
आम्हाला ऐकू आले तसे, यात चुका असण्याची दाट शक्यता आहे. अगदी बरोबर जे शिकले आहेत किंवा जाणकार आहेत तेच सांगू शकतील.
पवन चलत आली कियो चंद्रि के तू
चलो मितवा बालम ब्रगवा
हम तुम मधुवा प्रिये कर रंगरलिया
पगर पैया भरज बैया
भरजईया सानिध पिया
तोरी फुलवारी चट के दहि कलिया
4 Aug 2010 - 8:59 pm | असुर
>>>मै पतिया लिख भेजी- मारू बिहाग
याची लिंक आहे का एखादी??
--असुर
4 Aug 2010 - 10:34 pm | भारी समर्थ
येथे टिचका
भारी समर्थ
5 Aug 2010 - 5:32 am | सोम्यागोम्या
१. मै पतिया लिख भेजी- मारू बिहाग (४१:१७ ला सुरु)
२. परज ए लाल लाल व पवन चलत
http://www.mediafire.com/?sharekey=40x08526w22c4
5 Aug 2010 - 12:42 am | घाटावरचे भट
जुना एक धागा आहे मी सुरु केलेला. त्यात वसंतरावांचा दोन गंधारांचा गौड मल्हार लिंकवलाय. पण धागा सापडत नाहीये.
5 Aug 2010 - 1:17 am | चतुरंग
वसंतखांबद्दल लिखाण आहे आणि आम्ही मदतीला येणार नाही असे कसे?
हा घे तो धागा २ गंधारवाला, एकापेक्षा एक मस्त चिजा डकवल्यात इथे -
http://www.misalpav.com/node/3854
(वसंतवेडा)चतुरंग