माहेराची आटवण येई
आला हिरवा श्रावण आषाढ सरून जाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ||
बाच्या मळ्यामंदी पिंपळाला बांधला झोका
पुढं जाई मागं येई चुके काळजाचा ठोका
पति संग बांधलं मन, इथं झुल्याला जागा न्हाई
झोक्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||१||
भाऊ मुद्दामच बांधे झोका वरच्या फांदीला
सुर जाई लांब मोठा जवा राही मैत्रीण जोडीला
इथं मोठ्या शेहरात नावालाही सोबत न्हाई
झुल्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||२||
बरोबरीच्या पोरींसंगे खेळायाची सागरगोटी
जिंकायाची परत्येक ढाय राही मोटी बहिन पाठी
भादव्यात नेमानं भजायाची गुलाबाई
झुल्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||३||
सहावा सरून काल सातवा लागला
बाळराजाच्या चाहूलीचा गोळा पोटात आला
माझ्या घरीही येईल झोका, दोन महिनं वाट पाही
झुल्यावर झुलतांना माहेराची आटवण येई ||४||
आला हिरवा श्रावण आषाढ सरून जाई
झोक्यावर झुलायाची माहेराची आटवण येई ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०७/२०१०
प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 8:45 pm | पारुबाई
फारच छान कविता.
27 Jul 2010 - 5:56 am | राजेश घासकडवी
झोका, झुलणं, बांधणं, सोबत, व पाळणा यांचा मेळ आवडला. कडवं ३ सोडलं तर झोका झुलून माहेराहून सासरला, भूतकाळातून सध्याच्या काळात येतो.
27 Jul 2010 - 8:56 am | पाषाणभेद
बरोबर बोललात. तरी पण "भादव्यात नेमानं भजायाची गुलाबाई" म्हणजे ती आता भजत नाहीए असे वाटत नाही का? नसल्यास योग्य बदल सुचवा. भाद्रपद श्रावणानंतर येतो. अन आता भाद्रपदात गुलाबाई भजत नाही म्हणून 'आता नाही भजत गुलाबाई' किंवा अशा अर्थाचा बदल करू शकता.
28 Jul 2010 - 9:55 am | निरन्जन वहालेकर
सुन्दर कविता ! आवडली ! !
ढाय जीतली पाषाणराव तुम्हि ! ! !.
28 Jul 2010 - 12:46 pm | मितभाषी
अरे व्वा!
पाभे. मस्त जमलिय.
यावरुन एक पारंपारीक गाणे आठवले. नागपंचमीला माहेरवासिनी झोका खेळताना हे गाणे म्हणायच्या. गाणे पूर्ण आठवत नाही. जेवढे लक्षात आहे तेवढे लिहीतो. कुणाला माहीत असल्यास कॄपया पूर्ण करावे.
************`````````````````````````````******************
आली श्रावण पंचमी सखे गं.
पंचमीनं घातलाय डोळा सखे गं.
पुढं आला श्रावण पोळा सखे गं
पोळ्याची निसते डाळ सखे गं
पुढे आली घटाची माळ सखे गं.
.................
........
भावश्या.
10 Oct 2015 - 6:39 pm | माहितगार
चांगली कविता, गूगलवरून शोधत पुन्हा मिपावर पोहोचलो, धागा वर काढण्यासाठी प्रतिसाद दिला.
10 Oct 2015 - 7:03 pm | dadadarekar
छ्हान