मला पाऊस खूप आवडतो. :) (चला शाळेतल्या निबंधासारखी सुरुवात झाली). पूर्वी पुण्यात जेव्हा वाड्यात रहायचो तेव्हा पावसाळ्यात १-२ कौले फुटली असतील तर तिथून पाणी गळायचे. तेव्हा आई त्या खाली बादली लावून ठेवायची. तेव्हाच्या वाड्यांमधे कॉर्पोरेशनचे पाणि दिवसातून २ दा २ तास येत असे. त्यामुळे त्यावेळात दिवसभराचे वापरायचे पाणी भरून ठेवायला लागायचे. तेव्हा पावसाळ्यात अशा साठवलेल्या पाण्यामुळे पाण्याची ऐश असायची. एखाद्या ठिकाणी कौल थोडंच फुटलं असेल तर तिथे त्याखाली फरशीवर नुसतं फरशीपुसणं टाकून ठेवायची. मी मस्त वाड्याच्या गॅलरीत (किंवा सज्जात) उभाराहून कौलावर तडाडणारा पाऊस ऐकत उभा रहायचो. वाड्याच्या आजूबाजूला लावलेली झाडं जी गॅलरी पासून खूप दूर होती ती वार्याच्या फटक्यानी हलकेच वाड्याच्या भिंतीना थापट मारून जायची. अंगणात साचलेले पाणी वाड्याबाहेर पाणी जावं यासाठी असलेल्या बोगद्यातून बाहेर जाण्यासाठी झेपाऊ लागे तेव्हा त्यात भोवरे तयार होत. मग आम्ही कागदाचे कपटे वरून टाकायचो आणि भोवर्यात जाऊन फिरायला लागले की तयार होणारी नक्षी पाहून हरखून जायचो. वाटायचॉ आपण कागदाचे कपटे असलो असतो तर किती मजा आली असती मस्तं या वाहत्या पाण्याबरोबर जाऊन त्या भोवर्यात गरगर फिरलो असतो. मजाच मजा. आईला मग तसं सांगितलं की म्हणायची की "अरे कपटे केरातच जातात. ते त्या पाण्यात फिरतात आणि बाहेर जाऊन गटारातच जातात. त्यात कसली आलीये मजा". मला वाटायचं "तिला वेडीला कळतच नाही काय मजा आहे त्या कपट्यांची." पुढे मोठा झाल्यावर कस्पटासमान वागणूक मिळाल्यावर वाटलं बरं झालं की कपटे झालो नाही. मी वाढत राहीलो आणि पुण्यातला पाऊसही. पूर्वी खरंच आषाढातली पावसाची तोफ श्रावणात अगदीच पारीजातकाच्या सड्यासारखी हळूवार होत असे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने शाळांना सुट्टी असे कींवा शाळांमधेही गंमत जम्मत चालू असे. एखाद्या श्रावणातल्या शुक्रवारी शाळेत फुटाणे वाटायचे. एखाद्या सोमवारी केळी. घरी सुधा पुरणाची दिंड, पुरणाची पोळी, साखरभात, भाजणीचे वडे असे नेहेमीची चापरीतले (नेहमी चापायचे) किंवा कधी केनीकुर्डूची भाजी, भारिंगीची भाजी अशा अनवट भाजा खायला मिळायच्या. चातुर्मास घरी पाळत नसले तरी श्रावण महीना आवर्जून पाळला जायचा. म्हणून श्रावणात कांदा, लसूण कशात वापरायचे नाहीत. तसेच वांगं पण नसे श्रावणात (त्यामुळे मी खूष).
पावसाळ्यात शाळेत जाताना-येताना रेनकोट घालून कंपू करून चालत जायचं. एखादी रिक्षा अंगावर पाणी उडवून गेली तर शिताफीने कंपू रिक्षाचा पाठलाग करायचा आणि त्या रिक्षाला गाठून, रिक्षावर चिखल चिखल उडवून रिक्षावाला मारायला मागे धावला तर या बोळातून त्या बोळात या वाड्यातून त्या वाड्यात वेगवेगळ्या दिशांनी पळायचं. रिक्षावाला हैराण व्हायचा. मग ठरलेल्या ठिकाणि परत येऊन परत शाळेकडे-घराकडे जायचं.शाळेच्या ग्राऊंडवरच्या चिखलात लाल रबरी छोट्या बॉलनं फुटबॉल खेळायचा. चिखल उडवत बॉल तडकावयचा आणि २ विटांमधल्या गोलमधे मारायचा. त्यात नडग्यांना नडग्या, घोट्याला घोटे आपटून सडकून निघायचे. कोणतरी एक रोज झांजरलेला असायचा किंवा लंगडत असायचा. शाळेतून घरी जाताना जोरजोरात गप्पा मारत दंगा करत घरी जायचं. मित्रांच्या नावाच्या मागे भकार, मकार लावायला आम्ही लहान वयातच शिकलो. म्हणजे पाचवी सहावीत. जसा कंपू घराच्या रेंज मधे येई तशी शाळेत उधळलेला आमचा भाषेचा वारू पुन्हा साजूक तूपात शिरे. ;)घरी पोचताच आली डुकरं उकीरड्यात लोळून म्हणून उद्धार होई. मग कपडे बदलून गरमागरम वरणभात खाऊन पाऊस बघत, समोर स्वाध्यायाच्या (मराठी शाळेत शिकलेल्याना स्वाध्याय म्हणजे काय असा प्रश्न पडणार नाही. पण हा स्वाध्याय म्हणजे घरचा अभ्यास नव्हे तो वेगळा. स्वाध्यायाचा हप्ता प्रत्येक विषयात महीन्यातून एकदाच असे पण घरच्या अभ्यासाची वसूली रोजची असे. घरचा अभ्यास कधीच करत नसू पण स्वाध्यायाचा कर मात्र न चुकता भरत असू) वह्या घेऊन पेंगायचं. चारचा ठोका पडला की सारा कंपू बनियन-हाफपँट अशा कुमारसुलभ वेषात परत दंगा करायला हजर. मग दुसर्या दिवशी सकाळीच घरचा अभ्यास न केल्यामुळे गणिताच्या नाईक बाई आमची रवानगी वर्गाबाहेरच्या व्हरांड्यात करत. मग पुन्हा तो पाऊस आणि मी दोघेच सोबती. मस्तपैकी व्हरांड्यात उभे राहून गळणार्या पागोळ्या बघत बघत तास कसा संपायचा कळायचंच नाही. पावसाळ्यात धांद्रटपणामुळे पळताना पाय घसरून पडणे ठरलेलेच. मस्तंपैकी पार्श्वभाग सडकून निघे. एखाद्यावेळेला डोक्याला खोक पडणे वगैरे होत असे. इतरवेळेला घसरून पडल्यावर कपडे खराब झाले म्हणून ठरलेला घरचा 'आहेर' खोक वगैरे पडली तर मात्र मिळत नसे.
कॉलेजात मात्र या पावसाने अनेक वेगळे रंग दाखवायला सुरुवात केली. शिंग फुटलेल्या आमच्या डोक्यातून सिग्रेटिची झिंगही खेळू लागली. मस्तंपैकी एस एम जोशी पुलाखाली जाऊन आमचा कंपू शिग्रटी फुकायचा. कारण नदीपात्रातला रस्ता तेव्हा नव्हता त्यामुळे तो भाग एकदम निर्मनुष्य म्हणून आमचासाठी सेफ. पुलाखाली पाऊस पण लागत नसे, पण आजूबाजूला मात्र पाऊस मस्त रपरपत असे. थोडेसे नदीचेही पाणी वाढलेले त्यामुळे पाण्याला गटाराची घाण येत नसे. तिथल्या निर्जनतेचा वेगळा फायदा काही काही कॉलेजातली जोडपीही घेत. ते त्यांच्या खेळात दंगलेले आणि आम्ही त्यांना बघत बघत झुरके मारण्यात. त्यांचे ऊर प्रणायाने उसासत आणि आमचे शिग्रेटीने.
अजूनही काही लोक पावसाला शिव्या देतात किरकिरतात पण मी मात्र पाऊस पडू लागला की पावसासाठीची माझी खास जीन्स आणि टि-शर्ट घालतो आणि गाडीवर टांग टाकून बोंबलत बाहेर फिरायला निघतो.
प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 10:46 am | नंदन
लेख, आवडला. एकदम पुपेशैलीतला!
26 Jul 2010 - 12:04 pm | निखिल देशपांडे
लेख आवडलाच
26 Jul 2010 - 6:16 pm | प्रभो
लेख आवडलाच
26 Jul 2010 - 10:56 am | स्पंदना
लेख अतिशय छान लिहिलाय फक्त शिर्षक काय कळल नाही राव. आम्ही पुण्याचे न्हाय म्हणुन असल काय? बाकि सार अगदी तस्स डोळ्यासमोर उभ रहात हे श्रेय १००% लेखकाच.
26 Jul 2010 - 11:10 am | llपुण्याचे पेशवेll
नाही नाही. मध्यंतरी आमच्या एका दोस्ताने पाऊस एक रां* आहे वगैरे पावसाला शिव्या देणारी कविता लिहीली होती. पण मला त्याविरुद्ध वाटते. म्हणून तेच शिर्षक वापरले पण पावसाला चांगलं म्हणणारे लिहीले आहे.
26 Jul 2010 - 12:07 pm | छोटा डॉन
>>मध्यंतरी आमच्या एका दोस्ताने पाऊस एक रां* आहे वगैरे पावसाला शिव्या देणारी कविता लिहीली होती.
कोण हो तो दोस्त ?
ती कविता कुठे वाचायला मिळेल ?
- ( बंडखोर कवी ) डॉन्या ढसाळ
अवांतर :
पुप्याचा लेख मस्तच !
आवडला, ह्या निमित्ताने मिपावर पावसाच्या लेखांची बरसात व्हावी हीच सदिच्छा :)
26 Jul 2010 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या कवितेमुळे रुसुनच मध्ये पावसाने महाराष्ट्रात लॉग-इन करणे बंद केले होते हे आम्ही तुमच्या कानावर घातलेच होते.
असो..
पुप्या एकदम 'सरीवर-सरी' लेख रे :) खुपच छान लिहिले आहेस.
26 Jul 2010 - 3:07 pm | गणपा
हा हा हा शिर्षक वाचुन दचकलोच आणि आम्हालाही 'त्या' मित्राची आवर्जुन आठवण आली.
पुपे लेख एकदम फर्मास.
26 Jul 2010 - 10:56 am | सहज
पाउस ओसरल्यावर चिखल झालेल्या मैदानात एक टोकदार सळई रुतवण्याचा खेळ आठवला.
जाड जाड गांडूळे शोधुन बाहेर काढायची.... :-)
26 Jul 2010 - 1:31 pm | शुचि
मी पण खेळायचे सळईचा खेळ. आम्ही टॅड्पोल (बेडूकपिल्लं) ही पकडायचो दूधाच्या पारदर्शक पिशवीत.
26 Jul 2010 - 11:01 am | पाषाणभेद
रा* ?? या * चा अर्थ समजला नाही. न लिहीण्यासारखा आहे का तो *?
लेखात मस्त आठवणींना उजाळा दिला.
अवांतर : त्या काळी २ वेळा २ तास पाणी म्हणजे आता २४ तास पाणी का?
अन नसले तरी २ वेळा २ तास पाणी म्हणजे आम्ही पाहिलेल्या दुष्काळी दिवसांशी तुलना करतांना चंगळच की. त्या दिवसांमुळे पाण्याची काटकसर करण्याची चांगली सवय लागली. आता कुणी पाण्याची नासाडी करतांना पाहीले की डोक्यात तिडीक जाते.
26 Jul 2010 - 11:07 am | llपुण्याचे पेशवेll
आता घरात २४ तास पाणी असते पण ते नगरपालिकेचे नाही तर ते टाकीत साठवलेले. आता प्रत्येक सोसायटीत कूपनलिका कसते. त्यामुळं पिण्याचं पाणी फक्त नगरपालिकेचे भरून ठेवतो. कारण १.कूपनलिकेचे पाणी मचूळ असते २.कधी कधी भुयारी गटारे फुटली तर ते पाणी कूपनलिकेत जायचा संभव असतो.
त्या वेळेला २ तासात सर्व दिवसाचे वापरायचे + पिण्याचे पाणी भरून ठेवावे लागे. व नंतर ते जपून वापरले जाई.
26 Jul 2010 - 11:29 am | मराठमोळा
पुपे पेश्शल लिखाण...
:)
चला...आठवड्याची सुरुवात चांगली झाली...
26 Jul 2010 - 11:42 am | मस्त कलंदर
सहीच रे लेख पुपे..
आवडला हेवेनसांनल... :)
26 Jul 2010 - 11:43 am | विजुभाऊ
माझे अहमदनगरचे नातेवाईक सातार्याच्या पावसाला कायम वैतागतात. त्यंच्या मते पाऊस म्हणजे चिख्खल आणि ओलसरपणा.
आम्ही मात्र मस्त सातार्याचा पाऊस एन्जॉय करायचो.
भुरभुर पडणारा पाऊस , धुक्यात लपेटलेला हिरवाकच्च डोंगर, गार ओलसर फ्रेश हवा , हातात मस्त वाफाललेला मसालानी चहा चा मग.
दुपारी जेवल्यानंतर उकडून भाजलेल्या गरमागरम शेंगा,
पाऊस असा चवीने एन्जॉय करायचो
एकदा अहमदनगरला गेल्यावर त्या नातेवाइकांच्या पावसाला वैतागण्याचे कारण कळाले....
सातार्यातला पाऊस तुम्हाला एकदम हिरवाईत घेऊन जातो.
26 Jul 2010 - 2:49 pm | Pain
पावसाळ्यात शाळेत जाताना-येताना रेनकोट घालून कंपू करून चालत जायचं. एखादी रिक्षा अंगावर पाणी उडवून गेली तर शिताफीने कंपू रिक्षाचा पाठलाग करायचा आणि त्या रिक्षाला गाठून, रिक्षावर चिखल चिखल उडवून रिक्षावाला मारायला मागे धावला तर या बोळातून त्या बोळात या वाड्यातून त्या वाड्यात वेगवेगळ्या दिशांनी पळायचं.
लहानपणापासूनच..... ? :D
26 Jul 2010 - 2:59 pm | सुहास..
जबर्या !!
26 Jul 2010 - 3:17 pm | ऋषिकेश
वाह! माझ्या फार्फार आवडत्या ऋतूतल्या फार्फार छान दिवसांचे फार्फार सुरेख वर्णन फार्फार आवडले :)
26 Jul 2010 - 4:34 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त!!!
26 Jul 2010 - 6:32 pm | मेघवेडा
छान हो पुपे!
बाकी आजच्या दिवशी पावसावरचा लेख वाचून मन ५ वर्षं मागं गेलं! काय खतरा अनुभव होता तो.. बापरे!
26 Jul 2010 - 6:37 pm | अवलिया
सुरेख...
26 Jul 2010 - 7:24 pm | शानबा५१२
पाऊस एक रा* आहे.
मला वाटल पावसाच्या नावाने बोंबा मारणारा लेख आहे की काय?
ज्ञानात वाढ करणारे शब्द वाचायला भेटतील ह्या आशेने लेख वाचत होतो.
26 Jul 2010 - 8:44 pm | चतुरंग
एकदम पावसाळी लेख. जाम आवडला.
(रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमधून तयार होणारे सप्तरंगी वेडेवाकडे आकार पायाने ढवळून काढत, डबक्यातून फताक फताक चिखल आणि पाणी उडवत, मडगार्ड नसलेल्या सायकलवाल्याच्या पाठीवर उठणारी सरसर थेंबांची नक्षी बघत, वळचणीला उभ्या असलेल्या अंग थरथरवून पाणी झटकणार्या गायी निरखत, जोराच्या पवसालाही न जुमानता विहरणार्या पाकोळ्यांचा अचंबा वाटत गेलेलं लहानपण डोळ्यांसमोर आलं..)
26 Jul 2010 - 10:57 pm | पुष्करिणी
गमबुटात मुद्दाम पाणी साचवून पच्याक पच्याक असा आवाज काढत मुद्दाम फिरायचो मी आणि मैतरणी...विहीरीत पडणारा पाउस बघायला पण खूप मज्जा यायची.
पण तुमची रिक्षावाल्याचं रॅगिंग करायची आयडीया भारीच आहे!
26 Jul 2010 - 11:06 pm | राजेश घासकडवी
उपयुक्त स्किल्स :)
27 Jul 2010 - 1:52 am | असुर
पुपे! मान गये!
पुण्यातलं घर, पाऊस, पाणी साठलेले रस्ते, डबक्यात नाचणारी आणि त्यातच होड्या सोडणारी पोरं, आमची पावसाळी भटकंती आणि अजून काय काय.. सगळं सगळं आठवलं.. इकडे राणीच्या देशात येता-जाता पाऊस पडतो, पण हे काsही दिसत नाही हो! माझ्या पुण्याची आठवण करून दिलीत, धन्यवाद!
पाऊस खरच एक "राग" आहे! तो मल्हारासारखा मनात बरसून जातो, आणि पाऊस डोळ्यातून पडतो, आठवणींचा!!!
--असुर