उजव्या बाजुस गजबजणारी तीच गाज घुमते अरबी
हा तोच किनारा फिरतो मी ।।धृ।।
दगडावरती झोकुन सारे
वार्यामनिचे गुपित खारे
लेउन लाटा उधळण करती तीच तुषारांची धुंदी ।।१।।
तोच दिवस त्या महिन्याचाही
तोच कोन त्या किरणांचाही
परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही ।।२।।
धरून ऐना कुंद हवेला
तनामनाने हिरवुन गेला
तसा न सागर आज सांगतो जन्मजन्मीच्या गुजगोष्टी ।।३।।
केसांमधल्या लाटा सारत
शब्दहासरे तुषार बरसत
उजव्या बाजुस गाज रोखुनि चालत तू ना मजसाथी ।।४।।
काय बोललो तेव्हा आपण
कसे कुठे अन गेले ते क्षण
मनात ओल्या रेतीवरच्या त्याच खुणा धरल्या जपुनी ।।५।।
डाव्या बाजुस गाज अता ही
सूर्यास्ताची सरते तरिही
जादू उरली अजुनी अपुल्या स्पर्शधुंदीच्या लाटांची ।।६।।
प्रतिक्रिया
22 Jul 2010 - 9:16 am | मुक्तसुनीत
कविता आवडली.
या कवितेचा ताल मला अपरिचित आहे. वाचत असताना लय जाणवत मात्र होती. याचे मिलीसेंटीडेसी असे काही ष्टांडर्डापैकी आहे काय मास्तर ?
22 Jul 2010 - 8:36 pm | धनंजय
असेच म्हणतो.
"तोच-तोच-तीच...व्यर्थ फेर" येथे काळात अचलता, नंतर
"तसा न सांगतो, चालत तू ना", असे भूत-वर्तमानातील ठळक फरक
"त्याच खुणा धरल्या, तीच जादू उरली" मध्ये पुन्हा भूत-वर्तमानात साम्य, पण कारुण्याची झालर असलेले...
बांधणी नाविन्यपूर्ण आहे. "तोच चंद्रमा नभात"वर आणखी एक मजला चढवलेला आहे.
(उगाच आपली मल्लीनाथी : "शब्दहासरे" आणि "स्पर्शधुंदीच्या" शब्दांत अगदी शरदिनी आठवल्या. "ला-ल-ला-ल-ला" अशा सितरखानी ठेक्यातले विशेष्य-विशेषण धाटणीचे विचित्र समास - हा त्यांचा "पॅटंट" होता.)
@मुक्तसुनीत : वृत्त-नाम मलाही माहीत नाही, पण या प्रकारचे मात्रावृत्त मराठी कवितेत नैसर्गिक आहे, म्हणून लयही परिचित वाटते.
येथे मिलिसेंटीडेसी असे : (शिवाय प=८ मात्रा, भृ=६ मात्रा हे लक्षात ठेवणे. ८ किंवा सहा मात्रांच्या गणानंतर येणार्या "टाळी" किंवा तत्सम यतीमुळे कवितेची लय आपोआप जाणवते.)
प*२
प*२
प*२, प+भृ ॥
(शेवटच्या अक्षरावर आघात, आणि मग थोडासा विराम अपेक्षित आहे/आपोआप दिला जातो.)
23 Jul 2010 - 3:41 am | राजेश घासकडवी
असंच म्हणतो. हीच लय कानाला जाणवणारं गाणं ऐकल्यासारखं /कविता वाचल्यासारखं वाटतं.
22 Jul 2010 - 7:22 pm | श्रावण मोडक
कविता आवडली. धनंजयने 'तोच चंद्रमा'चा नेमका उल्लेख केला. मी असं साधर्म्य शोधत होतो. ते इथं नेमकं सापडलं.
22 Jul 2010 - 7:24 pm | क्रेमर
विशेष सुंदर.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
22 Jul 2010 - 7:37 pm | शुचि
विरहगीत आवडलं.
विशेषतः- "तोच दिवस त्या महिन्याचाही
तोच कोन त्या किरणांचाही
परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही""
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
23 Jul 2010 - 4:14 am | आमोद शिंदे
सर्वच कडवी आवडली. जमून आली आहे कविता!!