सूर आज माझे का अबोल झाले
आसवांच्या पुरात डोळे पुरे न्हाले
सूर आज माझे का अबोल झाले ||धृ||
माझ्या हृदयीच्या छेडूनी सप्त तारा
आरोह अवरोहा संगे चाले मन भरारा
असलेच कितीक राग नित्य नवे ऐकले ||१||
झंकारूनी स्वरांना घेवूनी रोज ताना
ओठी माझ्या येई फुलोनी नवा तराणा
कसले आता गाणे कसले नवे तराणे ||२||
मैफलीत माझ्या कधी मालकंस आला
वसंतापरी मला तो मल्हार भेटूनी गेला
मी रागदारी गाता शेवटी भैरवीच झाले ||३||
आसवांच्या पुरात डोळे पुरे न्हाले
सूर आज माझे का अबोल झाले ||धृ||
- पाषाणभेद
१७/०७/२०१०
प्रतिक्रिया
20 Jul 2010 - 4:23 pm | सागर
पाषाणभेदा,
सुंदर काव्यपुष्प गुंफले आहेस
खास करुन तिसरे कडवे सुरेख गुंफिले आहेस.
तिसर्या कडव्याची ताकद अफाट असल्यामुळे पहिल्या २ कडव्यांना झुंझावे लागते एवढे नक्की.
मैफलीत माझ्या कधी मालकंस आला
वसंतापरी मला तो मल्हार भेटूनी गेला
मी रागदारी गाता शेवटी भैरवीच झाले
असा काव्यप्रकार गुंफणे एक तर कठीण. त्यामुळे तुझे अभिनंदन :)
एवढ्या सुंदर कवितेस .......
... वाचकांचे प्रतिसाद का अबोल झाले? :(
20 Jul 2010 - 7:14 pm | Dhananjay Borgaonkar
सुंदर कविता!!!