स्त्री भ्रूणहत्या ही एक चिंताजनक सामाजिक समस्या आहे. देशात अनेक राज्यांना या समस्येचा विळखा पडला आहे. समाजिक प्रतिष्टेच्या जुनाट कल्पना आता पुन्हा भीषणपणे डोके वर काढताहेत. `ऑनर किलिंग' ही त्यातूनच निर्माण झालेली एक नवी समस्या आहे. स्त्री भृणहत्या आणि ही नवी समस्या एकमेकांशी निगडीत आहेत. कारण, दोन्हींचे भविष्यातील परिणाम एकच आहेत. त्यामुळे, खरे तर, या दोन्ही समस्या एकाच वेळी डोळ्यासमोर ठेऊन हाताळायला हव्यात. उत्तरेकडचे ऑनर किलिंगचे लोण आता दक्शिणेतही पसरू लागले आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचा आपला अभिमान असला, तरी, इथेही अनेक समजुती, प्रथा-परंपरांची जुनाट मुळे खोलवर जिवंत आहेत. कदाचित, त्यातून, भविष्यात अशा काही नव्या समस्या इथेही निर्माण होऊ शकतात. स्त्री भ्रूणहत्या ही खरे तर राज्यात उघडपणे दिसणारी समस्या नाही. तरीपण, अनेक जिल्ह्यांत स्त्रियांचे घटते प्रमाण ही एक चिंतेची बाब आहेच. प्रगत आणि समृद्ध अशा कोल्हापुर जिल्ह्यात, मुलींचे दर हजारी प्रमाण ८३९ इतके आहे. ऐतिहासिक पन्हाळा तालुक्यात तर मुलींचे प्रमाण आठशेपेक्षा कमी होते. गर्भलिंगनिदानावर बंदी असली तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी ते केले जाते. तसेच स्त्रीभ्रृण हत्याही केली जाते. जिल्ह्यातील सर्व सोनोग्रफी केंद्रे हेच या समस्येचे मूळ आहे, हेही उघडकीस आले. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत होती. कोल्हापुरच्या जिल्हा प्रशासनानेच हे खेदजनक वास्तव उघड केले आहे.
या समस्येला आळा घालण्यासाठी व स्त्रीभ्रृण हत्त्या रोखण्यासाठी कोल्हापूर प्रशासनाने `सेव्ह द बेबी गर्ल डॉट कॉम’ व `सायलेंट ऑब्झर्व्हर' हे उपक्रम सुरु केले आहेत. सेव्ह द बेबी गर्ल डॉट कॉम या वेबसाईटला ही सर्व सोनोग्राफी केंद्र जोडली आहेत. जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना स्वतंत्र युजर नेम व पासवर्ड देण्यात आला आहे. सोनोग्राफी करण्यासाठी येणार्या प्रत्येक रुग्णाची माहिती दररोज वेबसाईटवर अपलोड करण्याची सक्ती सोनोग्राफी केंद्रांना करण्यात आली. त्यामुळे नियंत्रण कक्षाला दररोज जिल्ह्यात किती रुग्ण सोनोग्राफी करवून घेतात याची माहिती तर मिळू लागली, शिवाय किती गरोदर महिलांची सोनोग्राफी करण्यात आली याचीही माहिती नियंत्रण कक्षास कळत असल्यामुळे लिंग निदान करण्याचे धाडस कमी होऊ लागले आहे.
गेल्या काही महिन्यातच मुलींच्या जन्माचे प्रमाण सुधारत असल्याचे आढळून आले आहे. या उपक्रमाची दखल नॅसकॉम फौंडेशनने घेतली आहे. सेव्ह द बेबी गर्ल डॉट कॉम ही वेबसाईट देशात सर्वोत्कृष्ठ वेबसाईट ठरली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक तर केलेच शिवाय हा उपक्रम देशभर राबविला जावा असे सांगितले. विधानपरिषदेमध्ये आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करुन राज्यस्तरावर हा उपक्रम राबविण्याचे सुतोवाच केले.
या उपक्रमाचाच पुढचा टप्पा म्हणजे सायलेंट ऑब्झर्व्हर... हा सायलेंट ऑब्झर्व्हर गर्भलिंग चिकित्सा करणार्या डॉक्टरांवर पाळत ठेवण्याबरोबरच त्यांच्या हातून नकळत जरी चोरी झाली तरी त्याची सचित्र नोंद आपल्या मेमरीमध्ये साठवून ठेवणार आहे.
सायलेंट ऑब्झर्व्हर एकदा सोनोग्राफी मशीनला जोडला की, या यंत्राचे काम सुरु होते. त्याचा मेंदू अगदी चोवीस तास सतर्क राहतो. डॉक्टराने सोनोग्राफी मशीन ऑन केल्यानंतर ते कसे वापरले, याच्या सर्व चलचित्रासह नोंदी सायलेंट ऑब्झर्व्हरमध्ये रेकॉर्ड होतात. मातेच्या गर्भातील मुलगा आहे की, मुलगी हे पाहण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याचे चलचित्र मेमरीत रेकॉर्ड होते. यामुळे कोणीही डॉक्टर कितीही मोठय़ा रकमेची ऑफर मिळाली तरी लिंग चिकीत्सा करण्याचे धाडस मात्र करु शकणार नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील २३२ सोनोग्राफी केंद्रांना सायलेंट ऑब्झर्व्हर हे यंत्र बसविण्यात येणार आहे. पन्हाळा तालुक्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांत सायलेंट ऑब्झर्व्हर कार्यान्वित झाले असून एव्हाना जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांमध्ये सायलेंट ऑब्झर्व्हर कार्यान्वित झालेली असतील. पुढील पाच वर्षात या उपक्रमामुळे मुलींचे प्रमाण नैसर्गिक पातळीवर येण्यास मदत होईल, असा जिल्हा प्रशासनाचा विश्वास आहे... महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या पोर्टलवर याची अधिक माहिती आहे.
प्रतिक्रिया
16 Jul 2010 - 12:00 pm | सहज
चांगला उपक्रम.
17 Jul 2010 - 8:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>पुढील पाच वर्षात या उपक्रमामुळे मुलींचे प्रमाण नैसर्गिक पातळीवर येण्यास मदत होईल, असा जिल्हा प्रशासनाचा विश्वास आहे
व्वा ! वरील उद्देश असलेला प्रशासनाचा उपक्रम महाराष्ट्रभर प्रामाणिकपणे राबविण्यात यावा.
माहितीबद्दल धन्यू.....!
-दिलीप बिरुटे
16 Jul 2010 - 12:02 pm | मनिष
चांगला उपक्रम असे मला तरी म्हणवत नाही. ह्या 'सायलेंट ऑब्झर्व्हर' ची गरजच काय असे वाटेल तो सुदिन! बाकी ह्या विषयावर माझी शाही चिडचिड होते, त्यामुळे जास्त बोलत नाही.
16 Jul 2010 - 12:07 pm | सहज
गेल्या काही महिन्यातच मुलींच्या जन्माचे प्रमाण सुधारत असल्याचे आढळून आले आहे.
यामुळे मी हा सॉफ्टवेअर, प्रकल्पाला चांगले म्हणले आहे.
बाकी चिडचीड होतेच पण त्यावर आपला प्रत्यक्ष कंट्रोल नाही. :-(
16 Jul 2010 - 12:10 pm | मनिष
खरय! :(
16 Jul 2010 - 12:13 pm | पांथस्थ
परवाच सकाळ मधे बातमी होती - भारतात दररोज १६०० (स्त्री) भृणहत्या होतात.
हे एकदम मान्य. मानसिकतेमधे बदल हाच योग्य उपाय आहे.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
16 Jul 2010 - 1:11 pm | ज्ञानेश...
'सेव्ह द बेबी गर्ल' ऐकून होतो.
सायलेंट ऑब्जर्व्हर ची नवी माहिती कळली. स्तुत्य उपक्रम आहे.
16 Jul 2010 - 1:42 pm | यशोधरा
जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना स्वतंत्र युजर नेम व पासवर्ड देण्यात आला आहे. सोनोग्राफी करण्यासाठी येणार्या प्रत्येक रुग्णाची माहिती दररोज वेबसाईटवर अपलोड करण्याची सक्ती सोनोग्राफी केंद्रांना करण्यात आली.
हे खरोखरच नियमाने केले जाते का? ह्यातूनही पळवाट शोधणारे असतीलच ना?
:(
16 Jul 2010 - 1:47 pm | समंजस
उपयोगी उपक्रम =D>
हा उपक्रम संपुर्ण देशातच राबवला गेला पाहीजे काटेकोरपणे.
17 Jul 2010 - 7:48 pm | क्रेमर
उपक्रमाचा उद्देश चांगला आहे. नजिकच्या काळात उपयुक्तही ठरावा. पण दीर्घकालिन परिणामांसाठी लोकशिक्षण आवश्यक आहे.
_________________
बाकी चालू द्या.
16 Jul 2010 - 1:54 pm | विसुनाना
साधेच सोपे तंत्रज्ञान वापरून बनवलेला हा सायलेंट ऑब्जरव्हर
उत्तम उपाय आहे. निदान कोणी नजर ठेवून आहे या जाणीवेने स्त्री-भ्रूण हत्येचे प्रकार कमी होतील.
पण 'एनिमी ऑफ द स्टेट' मध्ये विल स्मिथ म्हणतो त्याप्रमाणे - "Well, who is going to monitor the monitors of the monitors?"-हा प्रश्न उरतोच!
16 Jul 2010 - 3:06 pm | स्वाती२
चांगला उपक्रम. पण या नको असताना जन्माला येणार्या मुली नंतर आबाळ करुन मारणार नाहित कशावरुन?
16 Jul 2010 - 5:36 pm | अरुंधती
सायलेन्ट ऑब्जर्व्हरविषयी मध्यंतरी वृत्तपत्रात बातमी वाचली होती (बहुतेक सकाळमध्ये!) आणि वाचून जरा बरे वाटले होते.
त्यानंतर सोनोग्राफी क्लिनिक्स मधील गर्भलिंग चाचणी न घेताही गर्भलिंग निदान करण्याची व ते निदान त्या मात्यापित्यांना सांकेतिक पध्दतीने कळविण्याची डॉक्टरांची रीतही कळली आणि मग हे सर्व कोठवर चालणार हा विचारही आला....
ती पध्दत अशी : जर गर्भ मुलाचा असेल तर एका रंगाची शाई डॉक्टर आपली सही करायला रिपोर्ट वर वापरतात आणि गर्भ मुलीचा असेल तर दुसर्या रंगाची शाई. निदान करणार्याला व करवून घेणार्याला दोघांनाही त्या शाईचे संकेतार्थ माहीत असतात. आणि ही प्रॅक्टीस सर्रास चालते! :(
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
16 Jul 2010 - 6:18 pm | चतुरंग
कोणा खाजगी संस्थेने किंवा एन्जीओने करण्यापेक्षा प्रशासन ह्यामागे उभे आहे ही गोष्ट मला जास्त मोलाची वाटते.
एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाबद्दल लेख लिहिल्याबद्दल दिनेश५७ यांचे आभार!
वरती 'लोकांच्या अधिकारावर अतिक्रमण' असा काही मुद्दा चर्चेत आला आहे. ज्यावेळी स्त्रीभ्रूणहत्त्येसारखा गंभीर विषय ऐरणीवर येतो त्यावेळी व्यक्तिस्वातंत्र्य्/लोकांचे अधिकार ह्याला एका मर्यादेतूनच बघणे भाग पडते. तुम्ही महत्त्व कशाला देणार आहात? तुम्हाला नक्की कोणता प्रश्न सोडवायचा आहे हे कळीचे ठरते.
थोडाफार संकोच व्यक्तिस्वातंत्र्याचा जरुर होईल. परंतु व्यापक जनमानसाच्या बदलाबरोबर आणि भ्रूणहत्त्येच्या प्रश्नाच्या सोडवणुकीबरोबर त्याची तुलना करुन कोणते पारडे जास्त जड हे ठरवणे तितके अवघड नसावे.
हे प्रकार फक्त अशिक्षितच करतात असे नाहीसुशिक्षित लोकांमधे ह्या लिंगनिदानाचे प्रमाण भरपूर आहे. माझा स्वतःचा मावसभाऊ हा अल्ट्रासोनॉलॉजिस्ट आहे त्याने मला सांगितले की लोक विचारतात पण मी नकार देतो. बाळाचे लिंग सांगत नाही. सुशिक्षितांमध्येही हे प्रमाण भरपूर आहे.
------------------------
एक थोडे वेगळे पण समांतर उदाहरण -
मी जिथे राहतो त्या मॅसॅच्यूसेट्स भागात रेडिओवर परवा एक चर्चा ऐकली. लहान मुलांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर त्यांच्या पालकांनी किती बंधने घालावीत ह्याबद्दल ती होती. चर्चेत अनेक पैलू असे आले की ज्यात अविचाराने वागल्याने मुलांना नीट वळण लागलेले नाही आणि मानसोपचारांची गरज पडली आहे तसेच अति धाकानेही दुसरे टोक गाठले जाऊन पुन्हा मानसोपचारांची गरज पडली आहे. तेव्हा पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण संकोच ह्याच्या मधे कुठेतरी स्थिती असायला हवी असे मत बनले. मुले ही स्वतंत्र व्यक्ती असली तरी त्या स्वातंत्र्याचा नक्की अर्थ आणि जबाबदारी ओळखण्याची परिपक्वता त्यांच्यात अजून आलेली नसते त्यामुळे पालकांचा थोडा धाक, थोडी समजावणूक, थोडे प्रेम अशा मिश्रणातून त्यांना सज्ञानतेपर्यंत नेणे गरजेचे ठरते. अन्यथा व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून त्यांना काहीही करु देणे किंवा त्यांना काहीच समजत नाही अशा भावनेतून अतिरेकी बंधने लादणे हे अंतिमतः त्यांच्या आणि पर्यायाने संबंधित सगळ्यांच्या वैयक्तिक आणी सामाजिक प्रश्नांचे मूळ होऊन बसते.
चतुरंग
17 Jul 2010 - 1:10 am | शिल्पा ब
उत्तम उपक्रम... =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
मानसिकताच बदलली पाहिजे त्याशिवाय नुसतेच कायदे करून कितपत फायदा होणार? करणारे त्यातही पळवाटा शोधणार.
आणि नुसतेच मुलगे जन्माला घालून त्यांच्या लग्नाच्या वेळेस काय? मुलगी नको का? नाहीतर परत समलिंगी संबंध असणारे मुलगे होतात म्हणून मुलगे मारायची
प्रथा चालू व्हायची...हे नाहीतर ते ...कायम चालूच...
आईलाच सर्वाधिकार हवेत बाळाला जन्माला घालायचं कि नाही ते ठरवायचे...
आणि सुशिक्षित घरांमध्ये मुलींची (बहुतेक वेळी) तुलनेने अधिक काळजी घेतली जाते.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
17 Jul 2010 - 7:14 am | अश्विनीका
>>आईलाच सर्वाधिकार हवेत बाळाला जन्माला घालायचं कि नाही ते ठरवायचे...
सर्वाधिकार 'हवेत' नाही तर आईचा तो हक्कच आहे.
मूल आई बाबा दोघांचेही असले तरी मूल जन्माला घालायचे की नाही हा हक्क फक्त आईचा आहे. कारण ज्या शरीरात मूल वाढत आहे ते तिचे आहे . राहिलेल्या गर्भाने आईला काही त्रास होत असेल्..शारिरीक / मानसिक , मूल जन्माला घालून पुढे त्याला वाढवायची तिची तयारी नसेल ...वगैरे परिस्थितीत रहिलेला गर्भ पुढे वाढवायचा की नाही हे ठरवायचा हक्क फक्त आईचा आहे.
17 Jul 2010 - 5:09 pm | प्रकाश घाटपांडे
काही वर्षांपुर्वी शिरुर च्या मतिमंद मुलींच्या शाळेत /वसतिगृहात गर्भपाताचा विषय चर्चेला मिडियाने भरपुर प्रसिद्धी दिली होती. त्यावेळी अशाच चर्चा झडल्या होत्या. मातृत्व हा स्त्रीचा हक्क आहे. मतिमंद मुलगी असली तरी तिला तो हक्क आहे इथपर्यंत चर्चा झाल्या होत्या. अशा मुलींच्या पालकांना या चर्चा असह्य झाल्या होत्या. एकतर अब्रु चव्हाट्यावर आल्याचे दु:ख. त्यातुन गर्भपातास कायदेशीर परवानगी आहे कि नाही हा वाद.
लिंगनिश्चितीत स्त्री लिंग निश्चित झाल्यावर गर्भाच्या प्रकृतीचे काहीतरी कारण काढुन डॊक्टरशी संगनमत करुन गर्भ पाडण्याचे प्रमाण सुशिक्षितांमधेही कमी नाही. यांना मुलगाच हवा ना वंशाचा दिवा. नंतर घालतोय लाथा मोठा झाल्यावर.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
17 Jul 2010 - 7:42 pm | मिलिंद
साध्या सुशिक्षितांचं जाऊद्या मला तर काही अशी डॉक्टर मंडळी माहिती आहेत की जी मुलगा मुलगी यात भेदभाव करतात. तसेच स्वतःची(डॉक्टर स्त्री असेल तर)/स्वतःच्या पत्नीची गर्भलिंग चाचणी करुन स्त्रीभ्रूण हत्या करतात, तसेच खात्रीने मुलगा होण्यासाठी सर्व पॅथींचे डॉक्टर सरसावलेले असतातच. या लोकांचेच समुपदेशन प्रथम घ्यावे मग इतर सुशिक्षितांचे.
20 Jul 2010 - 3:11 pm | कवितानागेश
सुशिक्षितांमधे 'शहाणपण' असेलच असे म्हणता येणार नाही.
अनेक उच्च्शिक्षित घरांमध्ये 'मुलगाच हवा' आणी 'बाईची खरी जागा स्वैपाकघर'...वगरै प्रकार दिस्तात.
उलट आदिवासींमध्ये, मुलगी झाली तरी आनंदच असतो! ( माझ्या माहितीप्रमाणे)
मुलीचे 'शील'रक्षण आणी हुंडा या २ महत्त्वाच्या प्रश्नांमूळे 'मुलगी नको' अशी परिस्थिती येते, त्यावर उपाय करणे आवश्यक आहे.
मला वाटते, खरा प्रगत समाज म्हणजे ज्यात एखाद्या 'व्यक्ती'ला, फक्त महिन्याचे ४ दिवसच आठवेल, की 'मी स्त्री आहे', एरवी फरक पडणार नाही!
============
माउ
20 Jul 2010 - 3:54 pm | ज्ञानेश...
अदिती, घासकडवी, चतुरंग यांच्याशी सहमत.
टोना, पंगाशी असहमत. :)
इंग्रजांच्या काळात सती जाण्यावर बंदी घालण्यात आली. तिथेही असा तर्क करता आला असता की 'स्त्रीयांना हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे आणि या कायद्यामुळे त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो आहे' वगैरे वगैरे.. (सुदैवाने) तेव्हा अशी बुलंद आणि प्रगल्भ लोकशाही नव्हती, त्यामुळे फार कटकट न होता एक अनिष्ट प्रथा कायद्याच्या माध्यमातून हद्दपार झाली.
प्रत्येक प्रश्नाला दुसरी बाजू असायलाच हवी, हा दुराग्रह कशाला?
20 Jul 2010 - 6:03 pm | छत्रपति
नमस्कार मन्डळिहो,
इतके दिवस गुल्दस्त्यात होतो त्याच कारण हेच होत॑.
"सेव्ह द बेबी गर्ल... आणि, सायलेंट ऑब्झर्वर!! "
ही जी काहि चर्चा तुम्ही करताय, ती होण्याच॑ श्रेय माझ्या मास्तरला आहे. कारण ह्या कल्पनेचा जनक तो आहे.आणि हे सगळ॑ अस्तित्वात आणण्याच॑ श्रेय काही प्रमाणात कोल्हापूर च्या जिल्हधिकारर्या॑ना आहे. मी देखील ह्याच्यावर काम केलेल॑ आहे आणि तुमची ही चर्चा वाचून बर॑ही वाटल॑.
तुम्हाला या सगळ्या उपक्रमाबद्दल काही श॑का असतील तर मला विचारायला हरकत नाही. मी यथाशक्ती त्या॑च॑ निरसन करण्याचा प्रयत्न करीन.
आपलाच विश्वासू
छत्रपति.
21 Jul 2010 - 1:59 am | संदीप चित्रे
योगायोगाने आजच मी लोकप्रभाच्या वेबसाईटवर डॉ. सतीश पत्कींवरचा हा छान लेख वाचला.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com