आज अचानक जागी झाली
कधीतरी निजलेली गाणी
सांजवात होऊन तेवली
मनातली विझलेली गाणी ||
दबले, बुजले, घुसमटलेले
सूर विजेसम लख्ख चमकले,
घन बरसावे तशी बरसली
कंठातच थिजलेली गाणी ||
भुरभुरता पाऊस कोवळा
संध्यारंगातून झिरपला,
किरणांच्या छायेत उतरली
थेंबांवर सजलेली गाणी ||
नवथर मातीच्या ओलेत्या
देहाच्या परिमलात घुमली,
दरवळली अन तिच्या कुशीतुन
कोंबांसह रुजलेली गाणी ||
निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||
असाच अवखळ पाउस होता,
अन उडणारी एकच छत्री,
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?
प्रतिक्रिया
12 Jul 2010 - 7:26 pm | प्रभो
मस्त!!!!!
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?
12 Jul 2010 - 7:32 pm | स्पंदना
रचनेची मांडणी बदलली तर चक्क गझल होते .
फारच छान. शब्द कसे चपखल बसलेत.
भाव सुद्धा सुन्दर (प्यार हुवा..इकरार हुवा ची आठवण होते शेवटच्या कडव्यात)
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
12 Jul 2010 - 7:41 pm | चतुरंग
कितीतरी दिवसांनी एक सुंदर कविता आली.
क्रांतीताई बर्याच दिवसांनी लिहिलेत, वाट बघण्याचे सार्थक झाले!
चतुरंग
12 Jul 2010 - 9:40 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
खूप दिवसांनी तुमची सुंदर कविता आली.
नितिन थत्ते
12 Jul 2010 - 7:53 pm | तिमा
सुंदर कविता. शब्द, भावना,...... सर्वांनाच समतोल न्याय.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
12 Jul 2010 - 11:56 pm | घाटावरचे भट
फारच छान!! खूप दिवसांनी चांगली कविता वाचायला मिळाली.
13 Jul 2010 - 3:00 am | राजेश घासकडवी
अशीच, पाहुन वाट युगांची
सुकल्या कानां, मिठि घालूनी
मंत्रस्वर स्रवणारी यावी
चिंब चिंब भिजलेली गाणी
13 Jul 2010 - 8:57 am | निरन्जन वहालेकर
निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||
पुर्ण कविताच अतिशय छान !
13 Jul 2010 - 9:12 am | sur_nair
खूपच छान. तुमच्या कवितेत इंदिराबाईंच्या कवितेतला हळुवार पण जाणवला.
13 Jul 2010 - 10:27 am | राघव
नेहमीप्रमाणेच जबरदस्त!
केवळ क्लास लिहिलंय! संपूर्ण गझलच अप्रतीम. :)
(प्यार हुवा..इकरार हुवा ची आठवण होते शेवटच्या कडव्यात)
सहमत!
बाकी मी विचारून विचारून थकलो.. पुस्तक कधी काढतांय??? :?
राघव
13 Jul 2010 - 12:25 pm | पक्या
येस्स्...मलाही तेच म्हणायचं आहे. ..पुस्तक कधी काढताय?
मिपावरील सदस्यांत प्राजू ताईंनंतर आता तुमचे पुस्तक लवकर वाचावयास मिळो. तुमच्या आतापर्यंत वाचलेल्या बहुतेक सर्वच कविता खास होत्या. ही पण सुंदर.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
13 Jul 2010 - 1:20 pm | जागु
खुप छान.
13 Jul 2010 - 8:59 pm | मनीषा
कधीतरी निजलेली गाणी
सांजवात होऊन तेवली ... सुरेख !
छान आहे कविता ...
13 Jul 2010 - 11:12 pm | प्राजु
व्वा!! व्वा!! फार फार सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/