एकदा होवोनी पक्षी
वाटे एकदा होवोनी पक्षी
पहावी शेते डोंगर नद्यांची नक्षी
उंचच उंच जावे वरती वरती
अलगद उतरावे धरणीवरती
हळूच आपले पंख पसरूनी
घास शोधावा हिरव्या रानी
शोधावा पाणवठा निर्मळ शितल
प्यावे पाणी थंडगार नितळ
मध्येच एखाद्या झाडावर थांबावे
विश्रांती घ्यावी पंख झाडावे
चोचीने फळ एखादे तोडावे
मनात येईल तेव्हा उडावे
दिवसभर असेच फिरावे
सायंकाळी पुन्हा माघारी यावे
घरचे सारे पुन्हा भेटावे
काय घडले दिवसभरात ते सांगावे
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०७/२०१०
प्रतिक्रिया
5 Jul 2010 - 11:14 pm | पक्या
कविता छान आहे. बालकविता म्हणून मस्त वाटते आहे. बालभारती पुस्तकात असतात ना अशा कविता.
शेवटच्या कवितात यमक गंडले आहे असे वाचताना वाटते. यावे माघारी च्या ऐवजी माघारी यावे आणी दिवसभरात ते सांगेल च्या ऐवजी
दिवसभरात ते सांगावे असे केले तर?
जय महाराष्ट्र , जय मराठी !