नंदन यांची अप्रतिम गाथा वाचल्यावर त्यावर केशवसुमारांचे विडंबन येण्याची वाट पाहिली. ते न दिसल्यामुळे स्वतःच एक प्रयत्न करायचे ठरवले. ही महिला दहा बारा वर्षांनी मोठी आहे. तिची लेकरे आता कॉलेजात जातात, आर्थिक परिस्थिती सुधारली आहे आणि तिचे स्टेटसही उंचावले आहे. वि़डंबन म्हणजे विनोद म्हणजेच विसंगती अधिक अतीशयोक्ती हे होणारच. त्यातून माझा पहिलाच प्रयत्न. तेंव्हा ह.घ्या. आणि चू.भू.द्या.घ्या.
सकाळी उठून । आळस देऊन । दाबावे बटन । टीव्ही सेट्चे ।।
नवरा उठेल । दूध तापवेल । चहाही करेल । दोघांसाठी ।।
पोरांना झोपू दे । सुस्तीत लोळू दे । बायांना येऊ दे । कामासाठी ।।
बाया त्या येतील । भांडी घासतील । डबे करतील । सर्वांसाठी ।।
मुले उठतील । तयार होतील । कॉलेजा जातील । आपापल्या ।।
ब्रेडला बटर । लावा वरवर । जामचा वापर । कमी ठेवा ।।
सकाळी न्याहारी । एवढीच पुरी । ठेवाया कॅलरी । आटोक्यात ।।
करोनिया स्नान । नखे रंगवून । भुवया रेखून । न्याहाळाव्या ।।
नवरा निघेल । गाडीत बसेल । हॉर्न वाजवेल । एक दोन ।।
असाल तयार । निघावे बाहेर । हात नाहीतर । दाखवावा ।।
घाईत असेल । तो नाही थांबेल । निघून जाईल । जाऊ द्यावा ।।
काढा गाडी दुजी । एकादे दिवशी । नाही तर टॅक्सी । बोलवावी ।।
ऑफीसा जाऊन । केबिन गाठून । उचलावा फोन । पहिल्यांदा ।।
कामाचा डोंगर । टेबलाच्या वर । असो निरंतर । त्याचे काय ।।
मालिका अनंत । त्यात गुंतागुंत । नवर्याला खंत । त्यांची कोठे ।।
नायिका बिचारी । सारे घर वैरी । तिला ना कैवारी । कोणी भेटे ।।
चिंता तिची कैसी । जाळिते मनासी । परी नवर्यासी । नाही कांही ।।
मैत्रिणींशी चार । बोला फोनवर । करावा निचर । भावनांचा ।।
फोन झाल्यावर । मन थार्यावर । कामाचा विचार । करा आता ।।
सुटीचा दिवस । नको मुळी त्रास । भोगावा आळस । मनसोक्त ।।
नळाचे गळीत । दिवा ना पेटत । तक्रारी समस्त । साठवाव्या ।।
पतीला सांगावे । कामाला लावावे । आपण सुस्तावे । मस्तपैकी ।।
बाईला सांगावे । सामोसे तळावे । आणि मागवावे । खमण पात्रा ।।
मनसोक्त खावे । पार्लर गांठावे । आणि करवावे । फेशियल ।।
होता संध्याकाळ । गाठूनिया मॉल । करावी धमाल । सर्वांनीही ।।
उन्हाळ्याची सुटी । गोळा येई पोटी । घरी ही कारटी । अख्खा दिन ।।
शोधा आसपास । उदंड ते क्लास । द्यावे त्या सर्वांस । पाठवून ।।
शास्त्रीय गायन । पाश्चात्य नर्तन । चित्रकला छान । कांही असो ।।
असेल आवड । अथवा नावड । एक नाही धड । चिंता नको ।।
त्याला ना महत्व । हेच असो तत्व । जाई वेळ सर्व । शांततेत ।।
छानसे पाहून । एकादे ठिकाण । चार पाच दिन । जावे तेथे ।।
साईट सीइंग । करावे बोटिंग । आणिक शूटिंग । कॅमेर्याने ।।
आल्बम करावा । सर्वां दाखवावा । जपून ठेवावा । कपाटात ।।
सुट्याही संपता । नाही मुळी चिंता । पूर्वीचाच आता । दिनक्रम ।।
गाथा ही सांगावी । आणिक ऐकावी । तृप्ती मिळवावी । संसारी या ।।
प्रतिक्रिया
5 Jul 2010 - 7:25 pm | पाषाणभेद
ती कशी गाडी चालवते याचे वर्णन आले असते तर बहार आली असती.

एकदम मस्त वर्णन. दिनक्रम डोळ्यासमोर आला.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
5 Jul 2010 - 8:21 pm | sur_nair
चांगला प्रयत्न. पण अजून थोडेसे तिचे भावनाविश्व दाखवले असते तर आणखी मनाला भावली असती.
5 Jul 2010 - 8:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घारे साहेब, अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
5 Jul 2010 - 10:09 pm | केशवसुमार
मस्त विडंबन..
(वाचक)केशवसुमार
नंदन शेठची कविता ' तिचे अभंग तिची गाथा'.. २००८ मध्ये प्रकाशित झालेली आहे तेव्हाच आम्ही माझे अभंग माझी गाथाप्रकाशित केले होते..
(स्मरणशील)केशवसुमार
आवर्जून आमची आठवण काढल्या बद्दल धन्यवाद..
(आभारी)केशवसुमार
6 Jul 2010 - 7:48 am | टारझन
लाडु खाऊन दिलेला प्रतिसाद :)
(सुपरवायझर) टारलाडु
घारे काका मस्त ट्राय ;)
(सुपररिडर) बुंदीलाडु
6 Jul 2010 - 6:26 am | आनंद घारे
मी नंदनची कविता वाचली तेंव्हा तारीख पाहिलीच नव्हती. मला वाटले की ती नवीनच आहे. अर्थातच त्यावरचे विडंबनही वाचले नव्हते. मी खूप काही मिस करतो आहे.
(अवाचक) आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
6 Jul 2010 - 7:01 am | सहज
छान विडंबन घारेसर!
अजुन येउ दे!
6 Jul 2010 - 9:01 am | नंदन
विडंबन मस्त जमलंय. यशवंत देवांचं 'पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा' हे विडंबन आठवलं :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Jul 2010 - 9:29 am | प्रकाश घाटपांडे
यखांद्या मराठी शिरियल मदी नायिकेचे वर्नन हाये का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
6 Jul 2010 - 3:12 pm | स्पंदना
गुरुवारची पोथी वाचल्या सारख वाटतय.
एकदम सुरात.
सिरियल चा विचार मात्र खरच खुप बायका करताना दिसतात.
पोथी-कथा उत्तम!
6 Jul 2010 - 3:35 pm | अवलिया
छान !
चला घारेकाकांना १०+ प्रतिसादाचे गणित मिळाले तर... ;)
--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||