आयुष्य म्हणजे काय असतं
देवाने जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं....?
खरं तर.... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं
माणूसपण जोपासायचं असतं
दुसर्यांना हसवत स्वतःही फुलायचं असतं
पहाटेच्या दवबिंदूत नहायचं असतं
प्राजक्ताच्या मोत्यांना टिपायचं असतं
रातराणीच्या झुळुकांनी मोहरायचं असतं
चंद्राच्या साक्षीनं बहरायचं असतं
निसर्गाच्या श्रीमंतीत वावरायचं असतं
स्वतःचं राजेपण स्वतःच घडवायचं असतं
मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं
त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं
आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं
प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं
अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं.
जयश्री अंबासकर
प्रतिक्रिया
1 Apr 2008 - 10:15 am | बेसनलाडू
खरं तर.... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं
माणूसपण जोपासायचं असतं
मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं
त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं.
हे विशेष आवडले.
(दमदार)बेसनलाडू
1 Apr 2008 - 11:48 am | विसोबा खेचर
स्वतःचं राजेपण स्वतःच घडवायचं असतं
मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं
त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं
आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं
प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं
अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं.
वा जयू! अप्रतिम कविता...! अगदी भैरवीसारखीच दमदार, दर्जेदार!
मनोगत सोडल्यापासनं आज खूप दिवसांनी तुझी एक उत्तम कविता वाचनात आली आणि खूप बरं वाटलं!
त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं
आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं
क्या बात है!
आपला,
(मित्रांची सुखदु:ख वाटणारा आणि आपल्याच मस्तीत मजेत जगणारा!) तात्या.
2 Apr 2008 - 3:41 am | llपुण्याचे पेशवेll
कविता मस्त आहे पण मला माझ्या बालपणी बालपण मिरवायचे म्हणजे काय ते माहीतीच नव्हते हो
त्यामुळे 'खरं तर.... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असत' या शब्दांचा अर्थ खरा मला उमगलाच नाही. :(
माझ्या लहानपणी सारखे वाटायचे कधी एकदा मोठा होतोय. पण या शब्दांचा अर्थ आपण मोठे असलो तरी लहान किंवा नम्र होऊन रहायचे असा असेल तर मात्र ते खरोखरच फार सुंदर आहे. खरोखर एखादा माणूस खूप मोठा असेल वयाने, मानाने, अनुभवाने पण तरीहि तो चारचौघात नम्रपणाने मिळून मिसळून राहत असेल तर ते खरोखर 'लहानपणा मिरवल्यासारखेच' नाही का!
पुण्याचे पेशवे
2 Apr 2008 - 6:22 am | प्राजु
जयवी ताई,
खूपच छान आहे गं कविता.
आयुष्या दमदार भैरवीने संपवण्याची कल्पना खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
2 Apr 2008 - 7:48 am | मीनल
बोधात्मक कविता आहे.
कवितेची सुरवात होते ती प्रश्नाने.
जरा रागाचा स्वर दिसतो.आयुष्याबद्दलच्या नकारात्मक विधानाबद्दलचा राग असेल तो.
मग तो राग जातो आणि खर तर आयुष्य कस जगायच याबद्दल बोलण केले आहे.
उदाहरणातून उपदेश आहेत.सल्ले म्हणा हव तर.
थोडक्यात आयुष्यात काय काय करायला हव ते सांगितले आहे.
ब-याचदा स्वतः जगलेल्या आयष्याच्या अनुभवाची हलकिशी किनार आहे अस वाटत.
Philosophical ,idealistic` विचार मांडले आहेत.
त्यात रात्र आहे ,पहाट आहे ,
सुख आहे ,दु:ख आहे ,हसायच आहे ,रडायच आहे.
सर्व ठिकाणी पॉझिटिव्ह विचार.
नकाराच `न` ही नाही आहे कवितेत.
constuctive & objective oriented advices!
अस सर्व छान छान स्वप्नवत असल तरी ,आयुष्याचा अंत अटळ आहे या वास्तवाच ही भान आहे कवियित्रेला.
तो `शेवट` असला तरी दमदार असावा असा ठासून आग्रह आहे.
आयुष्याच कस जगाव याच उत्तम मार्गदर्शन क्रेले आहे.
कवितेचा ठराविक अस काही स्ट्र्कचर नाही .तरी ही यमक जुळत कविता सहज वाहत जाते.
लहान मोठी गद्दासारखी वाक्य असली तरी ही उपमान ,उपमेय अलंकारिक शब्दांमुळे सुंदर काव्य झाले आहे.
2 Apr 2008 - 10:12 pm | सर्किट (not verified)
सुंदर कविता.
आयुष्याच्या अखेरच्या दमदार भैरवी वरून संजोपरावांच्या "मरणा काय तुझा तेगार" ची आठवण झाली.
- सर्किट
17 Apr 2008 - 5:11 pm | जयवी
बेसन लाडू...... धन्यवाद !!
तात्या....अहो सध्या जरा कामात असल्यामुळे नियमित लिखाण करता येत नाहीये. पण अगदी नेहेमीसारख्याच तुमच्या मनापासून आलेल्या प्रतिसादासाठी भरपूर आभार :)
पुण्याचे पेशवे.... प्रत्येकाची बालपण मिरवायची कल्पना वेगवेगळी असू शकते. मस्तपैकी लाड करुन घ्यायचे.......सगळं लेवून मिरवून घ्यायचं.... कशाची चिंता करायची नसते लहानपणी....!! माझं लहानपण देवकृपेने असंच गेलं :)
प्राजु..... धन्यवाद..... मला पण आवडते ती ओळ :)
मीनल किती छान उकल करुन सांगितलंस गं....... खूप खूप धन्यवाद !!
सर्किट्.....तहे दिल से शुक्रिया !!
17 Apr 2008 - 5:35 pm | शितल
वा! काय छान अर्थ आहे कवितेचा, जगवे तर असेच. मी तर ही कविता स॑ग्रहित करून ठेवणार आणि माझ्या मित्र्-मैत्रिणी॑नाही पाठ्वणार.
17 Apr 2008 - 6:52 pm | विदेश
तुमच्या काव्य-लेखनातून किती सहज-सुलभतेने शब्द अर्थासकट उतरतात! फारच छान.
(तरी पण-
आयुष्य म्हणजे काय असतं
मिसळपाव खात-खातच जगायचं असतं)
17 Apr 2008 - 6:57 pm | मनस्वी
खूप आवडली.
17 Apr 2008 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतंप्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतंअंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतंआणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं.
सही !!!
18 Apr 2008 - 2:52 am | संदीप चित्रे
तुझी कविता छान आहे असं म्हणणं म्हणजे द्विरूक्ती होते, नाही का जयश्री ? :)
----------------------------------
आणि कवितेत हरवायचं असतं
गाव स्वप्नातलं जपायचं असतं
----------------------------------
18 Apr 2008 - 10:18 pm | जयवी
शितल.... दिल खुष कर दिया तुमने :)
विदेश...... एकदम मान्य !!
मनस्वी, मनस्वी, डॉ.दिलीप...... तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं.
संदीप.... क्या बात है......!!