तुम्ही म्हणाल की अर्धा वर्ल्डकप संपला आणि 'अर्जेंटिना' आता ऑलरेडी शेवटच्या ८ संघात पोहचुन पुढच्या उपांत्य सामन्यात जर्मनीशी लढायला तयार झाली आहे.
मग मी हे अर्जेंटिनाबद्दलचे घोडे आता वरातीमागुन का नाचवत आहे ?
तेच नेहमीचे 'वर्ल्डक्लास प्लेमेकर, अप्रतिम ड्रिब्लिंग स्किल्स, हवेतल्या खेळात सर्वोत्तम, बचावफळीच्या भिंती, गोलपोस्टसमोर पहाडासारखा उभा राहणारा गोली, बचाव भेदणारे मिडफिल्डर्स, बचावपटुंना चकवा देणारा स्ट्रायकर, तेच लेफ्ट बॅक-राईट बॅकचे पुराण .... वगैरे वगैरे' लिहुन आम्हाला बोअर करणार का ?
नाही, अजिबात नाही !
मी ह्या ओळखीत अजिबात काही टेक्निकल लिहणार नाही, नाही म्हणजे नाही, अगदी पुज्य !
बास झाले तिच्यायला तेच नेहमीचे पुराण ...
अर्जेंटिना आहे ती एका राजकीय पक्षासारखी, फार्फार तर एका 'राष्ट्रीय राजकीय पक्षा'सारखी आहे असे म्हणा, त्याने फार फरक पडेल असे नाही पण म्हणा. राष्ट्रवादीला उगाच 'राष्ट्रीय' म्हणल्यावर काय फरक पडतो आणि नाही म्हटले तरी काय फरक पडतो ? काहीच नाही, तसेच आहे आर्जेंटिनाचे, तुम्ही त्यांना काहीही म्हणा ते आपले काम करत राहतात.
आता कसे की एखादा राजकिय पक्ष कशी येईल ती निवडणुक लढवतोच तशी अर्जेंटिनाही बहुतेक सगळ्याच 'विश्वचषक स्पर्धांना' कायदेशीरपणे पात्र झाली आहे आणि लढली आहे. जिंकणे-हरणे हा भाग सोडा पण लढणे हे महत्वाचे. तशी त्यांनी १९७८ साली आणि १९८६ च्या 'मॅराडोनाच्या करिष्म्याच्या लाटेत' चक्क विजेतेपदाला गवसणी घालुन ४-४ वर्षे 'विश्वविजेते' ही खुर्चीही उबवली आहे. ह्यावेळेस पण ते "युवराज लियोनेल मेस्सीच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्पष्ट बहुमताचा दावा" करत आहेत.
ज्याप्रमाणे सर्वच पक्षांची असते तशी अर्जेंटिनाचीही रितसर आघाडीवर लढुन गोल करुन पक्षाची शीट संभाळणार्या स्ट्रायकर्सची फळी आहे,ग्रासरुट लेव्हलवर 'संघ प्रचारकांप्रमाणे एकनिष्ठ आणि गोलांची अपेक्षा न ठेवता प्रामाणिक' काम करुन आपल बालेकिल्ला मजबुत आणि सुरक्षित ठेवणार्या बचावपटुंची बचावफळी आहे, तसेच हायकमांड आणि लोकल कार्यकर्ते ह्यांच्यात जशी स्थानिक नेतेमंडळी , जिल्हाकार्यकारणी ताळमेळ ठेवते तेच काम करणारी आणि आघाडी व बचावफळीचा दुवा साधणारी मधली फळीही आहे, अहो एवढेच काय पण एखादा मतदारसंघ खिशात घालुन फिरणार्या व पक्षाची इमेजला तडा जाऊ न देण्याचे काम करण्यासाठी एकेकाच्या नाड्या बांधुन ठेवणार्या मात्तबर साखरसम्राटाएवढा ताकदवान असा 'गोलरक्षक' पण ह्यांच्याकडे आहे. हे सगळे झाले रितसर फ्रंटवर लढणार्यांचे, हे झाले अॅक्च्युअल लढती जिंकणार्या व हारणार्यांचे.
अहो महाराज पण हे सगळे करण्यासाठी पक्षाला एक 'तात्विक, वैचारिक, नैतिक बैठक देणारा थिंक-टँक किंवा पॉलिट ब्युरो' असतो ना तसाच ह्यांचाही एक कायदेशीर कोच आणि इतर 'कोचिंग स्टाफ' आहे व हेच त्यांच्या पार्टीला ... हे आपलं संघाला लढतीसाठी तयार करत असतात. पडद्यामागुन चाली खेळणारे हे पण ह्यांच्यावर बरेच काही अवलंबुन असते बरं का.
असो. आता आपण ह्या पक्षाच्या बांधणीचा एक धावता आढावा घेऊ ...
१. 'लियोनेल'रावचंद्रजी 'मेस्सी'साहेब :
जसे काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही सभेची किंवा बातमीची सुरवात 'गांधी घराण्याच्या जयजयकाराशिवाय होत नाही' तसेच आजकाल अर्जेंटिनाचा कुठेही उल्लेख आला की आधी आपण 'लियोनेलरावचंद्रजी मेस्सीसाहेब यांचा विजय असो ...' ही घोषणा देऊन टाकावी. अर्जेंटिना पक्षाचे हे युवराज आणि शेंडेफळ, पहिल्यापासुन राजेशाही थाटात आपली कारकिर्द घडवायला घेतली. पक्षाची ही धडाडती तोफ, अगदी राज ठाकरेसारखी. जिकडे जाईल तिकडे मैदान मारुनच येईल.
प्रतिपक्षाने अगदी जीवाचे रान करत जनमत आपल्या बाजुने वळवत आणावे, प्रचाराचे रान व्यवस्थित पेटले असावे, चाली-शह ह्यांना उत आला असावा व अशात मेस्सीयुवराजांची एन्ट्री व्हावी. ह्यांनी लगबगीत मध्यफळी आणि बचावफळीच्या दरम्यान 'रोड शो' करावा, काही वेळा पेनल्टी कॉर्नरच्या 'कोपरा सभा' घ्याव्यात व बोलत-चालत एक असा टोला लगावावी की डायरेक्ट प्रतिपक्ष भुईसपाट. शरदकाका पवारांच्या 'रात्रीत मतदान फिरवले' च्या आख्यायीका आपण जर नुसत्याच ऐकल्या असतील तर मेस्सीसाहेबांचा 'एका चालीत गेम पलटवला' हा खेळ पाहणे ही आपल्यासाठी नक्कीच पर्वणी असेल.
कुठल्याही पक्षाला हवा असणारा हा'फायरब्रँड, तडाखेबंद, धडाडी'चा १० नंबरची जर्सी घालणारा नेता .... लियोनेलरावचंद्रजी मेस्सीसाहेब !
२. 'कार्लोस'दादा तवेझ :
अर्जंटिना ह्या पक्षाच्या 'दादा' ह्या पदाला १००% पात्र अशी ही असामी 'कार्लोस'दादा तवेझ, अगदी शेम टु शेम आपल्या नारायणदादा राण्यांसारखी. तसाच बेघडकपणा, तोच तेजतर्रारपणा, तीच भेदक चाल आणि तसेच देवाला ओवाळुन टाकल्यासारखे प्रतिपक्षाच्या टेरिटरीत बेगुमान हुंदडणे. कार्लोसदादा ह्या पक्षाचे आघाडीच्या फळीचे नेते, रोज उठुन प्रतिपक्षाला फैलावर घेणे, त्यांच्याशी झुंबडी घेणे, उगाच हाणामार्या होण्याची परिस्थीती निर्माण कारणे, आपल्या व्यक्तिमत्व व माणसे जोडायच्या कसबीवर एखादी अवघड असणारी जागा सहज जिंकुन आणणारे आमचे कार्लोसदादा. हळुहळु कार्यकर्ते जोडत हे स्वतःच कधी बेगुमानपणे प्रतिस्पर्धी पक्षात घुसुन त्यांची गोलकिपरच्या डायरेक्ट धोतराला हात घालुन व गोल डागुन कधी त्याची इज्जत चव्हाट्याला मांडतील ह्याचा नेम नाही.
तशी वेळ आलीच तर थेट प्रतिस्पर्ध्यांची टाळकी फोडण्यासाठी ख्याती असलेले (गेल्या चॅम्पियन्स लीगला मॅन-यु कडुन खेळताना त्यांनी असाच राडा केली व त्याला तोंड देण्यासाठी चेल्सीला आपला ड्रोग्बा शहिद करावा लागला ) कार्लोसदादा आपल्या पक्षातली 'अत्यंत फटकळ तोंडाचे' म्हणुन प्रसिद्ध आहेत.
पण एकदा का जीव टाकला जी पक्षासाठी एक तर स्वतःचा जीव देतील किंवा समोरच्याचा जीव घेतील असे मिस्टर डेपेंडिबल .... कार्लोसदादा तवेझ !
३. गोंझालोजी हायग्वेन-महाजन :
अर्जेंटिना ह्या पक्षाचा सर्वात सभ्य, सुसंस्कॄत, प्रामाणिक, कष्टाळु , स्वतःची एक खैळिक बैठक असणारा 'पक्षाचा चेहरा'. मी ह्यांची तुलना डायरेक्ट प्रमोदजी महाजनांशी करत असल्याने आपल्याला गोंझालोजींच्या व्यक्तिमत्वाचा बर्यापैकी अंदाज आला असेलच. आपल्या पक्षासाठी अत्यंत शिस्तबद्ध चाली व कार्यक्रम रचुन ते जातीने लक्ष घालुन व 'गोल'रुपाने ते राष्ट्राला अर्पण करुन एक 'कामसु, हमखास काम करणारा, देशाचे प्रेरणास्थान' वगैरे विषेशणाला गोंझालोजी हायग्वेन पुरेपुर उतरतात.
संघापुढे कसलीही समस्या असु देत, गोंझालोजी आपली सर्व ताकद पणाला लाऊन बाजी पलटवणार हे निश्चित. भाजपाचे हायकमांड जसे सगळे काही प्रमोदजी महाजनांच्या खांद्यावर सोपवुन स्वतः झोपा काढत तसे अर्जेंटिनाने केली तर हे महाशय २-३ मिडफिल्डर्स हाताशी धरुन यशाचा झेंडा नक्कीच नाचवतील असे खुद्द त्यांचे प्रतिस्पधी बोलुन दाखववतात.
कसल्याही घोटाळे, राडे, कट-कारस्थानं, षडयंत्र, चिखलफेक ह्यापासुन स्वतःला दुर ठेऊन आपले काम प्रामाणिकपणे करुन सदैव पक्षाच्या भल्यासाठे झटणारे व नेहमीच विजयश्रीची भेट देणारे हे .... गोंझालोजी हायग्वेन-महाजन !
४. ज्युआन'दादा' वेरॉन-पवार :
आम्ही त्यांच्या नावात 'दादा' व 'पवार' हे दोन्ही शब्द वापरले त्यावरुन हा असामी नक्की काय असेल ह्याचा आपल्याला अंदाज आलाच असेल. ;)
जसे महाराष्ट्रात 'सकाळी सकाळी उठुन दादांच्या भेटीला जाऊ नये' हा अलिखित संकेत आहे त्याप्रमाणे फुटबॉलमध्येसुद्धा 'शक्यतो वेरॉनदादांच्या नादी लागु नये' असा अलिखित संकेत आहे, मग काय हो उगाच खेळता खेळता ' काय रे *डव्या, मस्ती आली का तुला ? ' अशी मुक्ताफळे कोण ऐकुन घेईल ? एकदा का भांडणे लागली की वेरॉनदादा असा तोंडाचा पट्टा सोडतात की त्यासमोर "वाटले तर अजुन ४ गोल करा पण वेरॉनदादांचे तोंड आणि हात आवरा' असेच प्रतिपक्ष म्हणतो.
तसे म्हणले तर पक्षाच्या 'मध्यफळी' ह्या पक्षबांधणीच्या कामाला जुंपलेले हे वेरॉनदादा उगाच कधी 'आघाडी'त घुसुन दांडगाई चालु करुन एखादा गोल करतील ह्याचा काही काही भरोसा नाही.
आपल्या अजितदादांच्या 'फटाफट फायली क्लियर करण्याच्या' स्टाईलप्रमाणेच ह्यांची 'फटाफट पासेस कंप्लिट करुन कधी एकदा गोल मारतो, कधी एकदा सामना संपतो व मी कधी एकदा डाकबंगल्यावर जाऊन पडतो' हीच शैली असते. ह्यांच्या 'पासेस्'च्या सुसाट वेगाच्या कामासमोर प्रतिपक्षाची सोडाच पण अहो स्वतःच्या पक्षाच्या नेतेमंडळी व नोकरशहांची फे-फे उडते.
पण कसेही असले तरी वेरॉनदादांचा एक दरारा आहे, त्यांच्यामुळे कामे होतात, प्रतिपक्ष टरकुन वागतो हे सत्य आहे !
५. झेव्हियर'आबा' मॅशेरानो-पाटील :
एक जुना-जाणता, कष्टाळु, शुन्यापासुन सुरवात करुन कठोर मेहनतीने जुन्या जमान्यातल्या एक उत्तम पक्षबांधणी करणारा व पक्षाचे स्थान मजबुत करणारा 'मध्यफळी'तला नेता अशी ख्याती असलेल्या झेव्हियर'आबां'ना आता उतारवयात हायकमांडने 'कर्णधार पदाचे बक्षिस देऊन' त्यांच्या कार्याची योग्य किंमत केली असेच आम्हाला वाटते.
ही त्यांची शेवटचीच निवडणुक व आपल्या कारकिर्दीत पक्षाला 'निर्विवाद बहुमत' मिळवुन देण्याची ते इच्छा ठेवतात व आपल्या वयाचे जास्त कौतुक करुन न घेता अजुन 'मध्यफळी'त जिवाचे रान करतात.
आपल्या पक्षातल्या आघाडीच्या फायरब्रँड नेत्यांना योग्य कुमक पुरवणे, सर्व ठिकाणी पक्षनिधीची विनियोग उत्तम होतो आहे का ह्याची जातीने पहाणी करणे, कधी ग्रासरुटलेव्हलवरच्या बचावफळीतल्या 'भेगा बुजवणे' व त्यांना चुचकारुन पुन्हा उभे करणे आदी सर्व प्रकारची कामे झेव्हियरा'आबा' अगदी सराईतपणे करतात.
अनेक उन्हा-पावसात अनेक देशातल्या अनेक फिल्डवर खेळण्याचा रग्गड अनुभव पाठिशी असणारे जुने-जाणते झेव्हियर'आबा' मॅशेरानो-पाटील हे पक्षाच्या ह्या निवडणुकेच्या मोहिमेसाठी एक घटक आणि एक नेता म्हणुन अत्यंत महत्वाची असामी !
६. मार्टिन'भाई' डिमिचेलिस :
महाराष्ट्राच्या राजकारणात 'भाई' एकच ... छगनभाई भुजबळ !
अर्जेंटिनाच्या संघातही "भाई" एकच ... मार्टिन'भाई' डिमिचेलिस !
मार्टिन'भाई' काय करत नाहीत म्हणुन तुम्हाला सांगु ? अहो सर्वगुणसंपन्न असे पक्षाचे आशास्थान आहे हे. तसे म्हणले तर हे "बचावफळी"च्या 'सेंटर-बॅक" ह्या पोझिशनला खेळतात.
छगनभाई जसे जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेचे एकटेच आमदार असतानासुद्धा सरकारी पक्षाच्या मंत्र्यांना सळो की पळो करुन सोडायचे तसेच आमचे मार्टिन'भाई' जरी कर्मयोगाने आपल्या गोलक्षेत्रात बचावासाठी एकटेच उरले तरी प्रतिपक्षाच्या 'आघाडीच्या नेत्याचे' एक चालु देत नाहीत, अगदी त्याच्या मुसक्या बांधुन त्याला परत पाठवतात व वर हल्ला परतवल्यावर आपल्या गोलपोस्टचे 'शुद्धीकरण' करुन घेतात, आता बोला !
गेल्या चॅम्पियन्स लीगमध्ये ह्यांच्या धडाधड टॅकल्ससमोर मॅन-युचे भले भले खंदे वीर साफ शरणागती पत्करुन कपाळमोक्ष करुन घेऊन गेले व ह्यांनी प्रतिपक्षाचा मोर्चा काही आपल्या 'बालेकिल्ल्यात' घुसु दिला नाही.
छगनभाईंप्रमाणे प्रतिपक्षाच्या क्षेत्रात ह्यांचा एकदा पेनल्टीवेळी उड्यांचा पट्टा सुरु झाला भल्याभल्यांची फे-फे उडते व त्या घोळात हे कधी गोल मारुन नाचत, वाजतगाजत, मिरवणुकीने आपल्या गोलक्षेत्रात परत येतात हे कुणालाच कळत नाही.
असे हे पक्षाची ताकद आणि बचाव दोन्ही असलेले .... मार्टिन'भाई' डिमिचेलिस !
And last but Not the least ...
कुठल्याही पक्षात किंवा एकंदर राजकारणतच "साहेब" ह्या उपाधीला फार मोठ्ठे महत्व आहे, आज गल्लीबोळात जरी अनेक स्वयंघोषीत साहेब दिवसागणीक निर्माण होत असले तरी खरे साहेब दोनच ... बाळासाहेब आणि पवारसाहेब.
अर्जेंटिना ह्या पक्षाचे 'साहेब' मात्र दुसर्या साहेबांच्या जराश्या जवळ जाणारे ... दिएगो मॅराडोनासाहेब !
'साहेब' हा विषेशणाला पात्र ठरण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते, रस्त्यावर उतरुन रक्त आटवावे लागते, विरोधकांच्या 'फायली' तयार कराव्या लागतात व वेळ येईत तशा त्या एक तर दडपाव्या लागतात किंवा खोलाव्या लागतात, पक्षाचे नेतृत्व करावे लागते, आघाडीवर लढुन विजयश्री खेचुन आणावी लागते, पराजय झाल्यास प्रांजळपणे तो स्विकारुन वर आपल्या सहकार्यांचे मनोधैर्य टिकवावे लागते व पुढच्या संघर्षासाठी जोमाने पुन्हा उभे रहावे लागते.
साहेब होणे ही की काही चेष्टीची बाब नाही गुरु, बहुत पापड पेलने पडते है आणि छोटी छोटी गल्तीया टाळाव्या लागतात.
मात्र 'मॅराडोना'साहेब ह्यासाठी अगदी अचुक पात्र ठरतात, त्यांचे व्यक्तिमत्वच तसे आहे.
त्यांनी पद स्विकारले व लिजंडरी 'पेले' ने त्यांच्यावर "पैशासाठी हा प्रशिक्षक झाला" असा बॉंम्ब टाकला, ह्यापेक्षा अजुन तुम्हाला वेगळा काय पुरावा हवा मॅराडोना "साहेब" असण्याचा ?
स्वतःच्या उमेदीच्या काळात "हँड ऑफ गॉड" ने का होईना १९८६ साली स्वबळावर सरकार स्थापन करुन दाखवण्याची किमया मॅराडोनासाहेबांनी केली.
ऐन भरात असताना प्रतिपक्षाच्या मैदानावर आपल्या पायांतुन निघणार्या फटक्यांनी व मैदानाबाहेर तोंडातुन निघणार्या मुक्ताफळांनी पार वाताहत करुन टाकली, स्वतःच्या पक्षाला अनेक सन्मान मिळवुन दिले.
आजही त्यांचे वय झाले असले तरी फुटबॉल विश्वात त्यांच्या शब्दाला किंमत आहे व अजुनही त्यांचे ह्या 'वर्तुळा'त स्वतःचे असे खास स्थान आहे.
असे आहेत अर्जेंटिना पक्षाचे प्रशिक्षक .... दिएगो मॅराडोना साहेब !
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता तुम्ही म्हणाल की अर्जेंटिना पक्षाची ताकद व कच्चे दुवे काय आहेत ?
अहो वर जे लिहले ती सगळी ताकद आहे वे तेच कच्चे दुवे आहेत.
अहो जिकडे हात घालीन तिकडे सोने काढणारे अनेक पाटील-देशमुख-पवार हे जशी काँग्रेस-राष्ट्रवादीची नेहमीची विश्वासाची ताकद असते तसे तेच सगळे 'दादा-भाई-काका-राव' वगैरे ग्रह फिरले की कच्चे दुवे बनतात.
ह्यालाच राजकारण व ह्यालाच खेळ म्हणतात.
अहो राजकारण हासुद्धा एक खेळ आहे आणि खेळसुद्धा राजकारणापासुन अजिबात अलिप्त नाही.
मग त्यांचे नियम कसे बदलतील ?
आता तुम्ही विचाराल आमचा अंदाज काय ?
अहो समोर आपला कंप्लिट बाजार उठणार हे शिवसेनेतल्या नेत्यांना माहित असतानासुद्धा ते 'स्वबळावर सत्ता' हा दावा करतातच की. तर महत्व आहे ते लढण्याला, खेळात आणि राजकारणात हार-जीत चालतच असते.
मुंबईत काँग्रेसच्या ऐन भरात असणार्या स.का. पाटलांची माती करणार्या शिवसेनेच्या ढाण्यावाघासारखीच भल्याभल्यांना धुळ चारण्याची ताकद अर्जेंटिनात नक्कीच आहे व ह्याच शिवसेनेने अविचारात किंवा अतिआत्मविश्वासात ह्यावेळी माहिममध्ये 'वहिनीसाहेब बांधेकरांसारखा' कच्चा उमेदवार देऊन जी स्वतःची माती करुन घेतली तीच मानसिकता आणि तोच अतिआत्मविश्वास ह्या अर्जेंटिना संघात आहे.
पुढचा सामना आहे तो लढावय्य जर्मनीशी, जो व्यवस्थित खेळेल तो त्यादिवशीची गेम जिंकेल, सो सिंपल !
पण अर्जेंटिनामध्ये ह्यावेळी "स्वबळावर सरकार स्थापन करण्याची पात्रता नक्कीच आहे" असे सांगतो व मी माझे ४ शब्द संपवतो.
तर ....
विचार करा पक्का आणि अर्जेंटिनाच्या चिन्हावर मारा शिक्का !
अरे येऊन येऊन येणार कोण ? अर्जेंटिनाशिवाय आहेच कोण ? बघतोयस काय रागाने ? कच्चा खाल्ला अर्जेंटिनाने !
प्रतिक्रिया
1 Jul 2010 - 2:16 am | प्रभो
लै हुच्च.......आवडला.........
जे पी चा ब्राझीलचा लेख आणी हा आजचा लेख......ही या फिफा उपविभागातली माणकं आहेत डॉन्राव.........
(शहराध्यक्ष) प्रभो
1 Jul 2010 - 7:14 pm | टारझन
ह्या विष्वचषकाआधी मला फुड्बॉलचे काही नियम आणि वर्ल्डक्लास इंटरनॅशनल प्लेयर्स इतकीच माहिती होती ... फार फार तर फुटबॉलात कोणता संघ डावा उजवा आहे अशी ढोबळ माहिती होती ... पण डाण्या-मेव्या-मॉर्ग्या-प्रभ्या मुळे बरीच टेक्निकल माहिती मिळाली ... आणि खेळात अजुन विंटरेस्ट णिर्माण झाला !!
जियो डाणब्या जियो !!
1 Jul 2010 - 2:23 am | गणपा
खर सांगु का डॉण्राव गेल्या विश्वचषका पर्यंत म्हणशील तर मी अर्जेंटीनालाच सपोर्ट करायचो.
यंदा झेंडा बदलाला आहे.
लेख बाकी मस्तच जमुन आलाय.
अर्जेंटीनाचा रांगडा विरुद्ध जर्मनीचा शिस्तबद्ध खेळ .
या शणवारी पेश्शल मजा येणार हे खास.
1 Jul 2010 - 2:33 am | भडकमकर मास्तर
अगदी मस्त लेख
व्यक्तिमत्त्वं उदाहरणासहित जमून आलाय...
काही माहित नसलेली माणसं आता म्याच पाहताना लक्षात राहतील
1 Jul 2010 - 3:14 am | रामपुरी
जर्मनी वि ब्राझील
1 Jul 2010 - 9:41 am | ऋषिकेश
मस्त रे डॉन्या.. फक्कड जमलाय लेख
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
1 Jul 2010 - 9:46 am | दिपक
काय लिहलयं जबरदस्त!!
हाण तिच्च्या !!
1 Jul 2010 - 9:53 am | रामदास
मी बार मध्ये जाणार नाही .शिंचे ...शांतपणे पिऊ देत नाहीत.
त्या दिवशी घरीच ...
मॅच बघीन म्हणतो.
अवांतर : डॉन ,निखील ,प्रभो, संजय अभ्यंकर, मॉर्गन ,गणपा,टारझन आणि मंडळी
विश्वचषकाच्या खास दालनाचा प्रयोग यशस्वी केल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन.मिपा समृध्द करायला अशाच नवनविन चळवळींची आवश्यकता आहे.
धन्यवाद.
1 Jul 2010 - 10:01 am | प्रभो
११ तारखेला आहे फायनल....
काका, वरच्या यादीत दोन नावे वाढवतो ज्यांच्याशिवाय हे दालन यशस्वी झालं नसतं.... मेघवेडा आणी लास्ट बट नॉट द लीस्ट आयडियाकार बिपिनदा.
बिपिनदा आणी डॉन्याने ही आयडीया आमच्यासमोर ठेवली त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.
1 Jul 2010 - 10:04 am | सहज
विश्वचषकाच्या खास दालनाचा प्रयोग यशस्वी केल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन.मिपा समृध्द करायला अशाच नवनविन चळवळींची आवश्यकता आहे.
रामदास सरांशी सहमत!
1 Jul 2010 - 9:56 am | सहज
माझ्यामते फिफा २०१० मालीकेतला हुच्च विश्लेषण.
थिंक ग्लोबल अॅक्ट लोकलचा उत्कृष्ट नमुना!!
जियो डॉनराव!
=D>
1 Jul 2010 - 9:59 am | वेताळ
कच्चा कोण कुणाला खातोय हे कळेलच....... :D
वेताळ
1 Jul 2010 - 11:39 am | छोटा डॉन
मोठ्ठ्या हौसेने आणि जोशाने आम्ही हे खास "मिपा फ़िफ़ा विश्वचषक सदर" सुरु करुन चालवायला घेतले.
सुरु करताना हे अवजड शिवधनुष्य पेलेल की त्याच्या ओझ्याखाली आमचेच प्राण कंठाशी येतील अशी धाकधुक होती.
पण आज ह्या घडीला हे सदर उत्तमपणे चालु आहे ह्याचे आम्हाला वैयक्तिकरित्या खुप समाधान वाटते आहे.
ह्या सदराच्या निमित्ताने मेघ्या, प्रभो, जेपी सारखे आमच्या इतकेच खेळावर प्रेम करणारी मंडळी भरभरुन लिहु लागली. बिपिनदांचा तर अगदी सुरवातीपासुन, पहिल्या क्षणापासुन पाठिंबा आणि हवी ती मदत होतीच आणि आजही आहे.
निखिलने तर त्याला ही आयडिया सांगितल्यावर अक्षरशः दिवसभर राबुन एक सुंदर आणि मनमोहक असे मिपापान बनवुन दिले.
नीलकांताला नुसते फोनवर ही आयडिया सांगताच त्याने आपल्या बिझी वेळापत्रकातुन वेळात वेळ काढुन आम्हाला जी आवश्यक ती मद्त केली व एक खास वेगळा विभाग बनवुन दिला.
वेगवेगळ्या धाग्यात व खुन्नसवाल्या चर्चेत टार्या, धमु, टिंग्या, गणपशेठ आणि इतर अनेकजण पुर्ण जोशात सहभागी झाले व "ये मैफिल रंगीन बनायी...".
त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार ...
तुमच्याशिवाय हे सगळे शक्य नव्हते एवढेच म्हणतो ...
आम्ही केवळ निमित्तमात्र !
ह्या सदराचे जे काही यश आहे, त्याबद्दल जे काही होनाणे कौतुक आहे त्याला आमचे लिखाणात साथ देणारे मित्र, बाकीच्या आयडिया आणि पाठिंबा देणारे मित्र, आलेल्या लेखांचे कौतुक करुन ते आवडीने वाचणारे मिपाकर, चर्चेत सहभारी होणारे फुटबॉलप्रेमी मिपाकर आणि तमाम वाचक तसेच ह्या संकल्पनेच्या पाठिशी ठाम उभे राहणारे 'मिपा व्यवस्थापन' हे सगळेच ह्या कौतुकाला, स्तुतीला अगदी पुर्णतः पात्र आहेत. आज जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे असे आम्ही स्पष्टपणे सांगतो, तुमच्याशिवाय ही मैफिल बसली नसती आणि रंगीन तर मुळीच झाली नसती.
ह्या सदराचा जो काही निष्काळजीपणा, आळशीपणा, काहीतरी कमी पडले, अपेक्षांना उतरलो नाही वगैरे बाबी आहेत त्या सर्व "अपयशा"ची जबाबदारी मी अगदी प्रांजळपणे स्विकारतो व जे काही द्यायला आम्ही कमी पडलो त्याबद्दल सर्वांची माफीही मागतो व त्यासबोत भविष्यात ही काळजी जरुर घेतली जाईल ह्याचे आश्वासन देतो...
धन्यवाद दोस्तांनो !
असो, स्पर्धा अजुन चालुच आहे, ऐन भरात आहे, अजुन बरेच काही घडणार आहे आणि आम्हीही अजुन बरेच काही लिहणार आहोत.
फक्त आपला पाठिंबा आणि लोभ असु द्यावा किंबहुना सध्या आहे तसाच रहावा ही विनंती ...
------
(आभारी)छोटा डॉन
1 Jul 2010 - 12:10 pm | स्वाती दिनेश
जर्मनी वि अर्जेंटिना चा सामना आम्ही जर्मन मित्रांबरोबर पाहणार असल्याने.......................
(पुढे काही लिहायची गरज आहे?)
स्वाती
1 Jul 2010 - 6:05 pm | घाशीराम कोतवाल १.२
जर्मनी वि अर्जेंटिना चा सामना आम्ही जर्मन मित्रांबरोबर पाहणार असल्याने.......................
(पुढे काही लिहायची गरज आहे?)
जर्मनी जिंकणार स्वाती ताई ;) आणि अर्जेटिणा ईमाणात बसुन घरला जाणार नक्कीच हि भविष्यवाणी आहे आठ पायाच्या ऑक्टोपस भविष्यवेत्याची
जर्मणी जिंकणार आर्जेटिणा हारणार >:) >:) >:) >:)
______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम
1 Jul 2010 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
डॉन्राव हुच्च लेखन केले आहेत. ओळख आवडली :)
आम्ही खरेतर क्रिकेटप्रेमी, कानावर जे काय पडेल अथवा ज्या चार ओळी वाचल्या जातील तितपतच आमचा फुटबॉल मध्ये रस. पण तुमच्या ह्या खास दालनामुळे आता आम्हाला देखील थोडीफार फुटबॉलची गोडी लागली आहे :)
हे दालन सुरु करणार्या आणि यशस्वीपणे राबवणार्या सगळ्यांचेच आभार.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
1 Jul 2010 - 12:28 pm | नंदन
--- असेच म्हणतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
1 Jul 2010 - 8:43 pm | घाटावरचे भट
असेच म्हणतो...
1 Jul 2010 - 12:32 pm | दिपक
खरच! आमचे (म्हणजे माझे) फुटबॉलप्रेम फक्त फ़िफा वर्ल्डकपलाच बाहेर येते. वर्ल्डकपनंतर लगेच प्रिमियर लीगचा सीजन सुरु होतो मग त्यातल्या सुरुवातीच्या काही मॅचेस बघीतल्या की हळु हळु ते बघणेही बंद होते. मला वाटते वर्ल्डकप संपल्यानंतरही तुम्ही फुटबॉलवरील लेखन चालु ठेवावे.
+११११
1 Jul 2010 - 2:26 pm | मेघवेडा
डॉन्या मेल्या कसला लिहिलायस च्यामायला.. एकदम जब्बार! ;)
हा लेख म्हणजे कळस आहे कळस अगदी! सुपर.
कौतुक फक्त हा लेख लिहिणार्या आमच्या डानरावांचं, अर्जेंटिनाचं नाही! ;)
1 Jul 2010 - 2:40 pm | llपुण्याचे पेशवेll
छान लेख. वर्णनाची पद्धत आवडली. बाकी मेव्याशी सहमत आहे.
पुण्याचे पेशवे
Phoenix
1 Jul 2010 - 3:36 pm | मोहन
मीपाचे हे फीफा दालन माझ्या सारख्या फुटबॉल न समजणार्यां करता छान गाईड आहे.
सर्व संबंधीत मंडळींनी प्रचंड मेहनत घेतलेली स्पष्ट दिसते आहे. त्या सर्वांचेच मनापासून आभार.
मोहन
1 Jul 2010 - 8:20 pm | वेताळ
अर्जेटिना विरुध्द आरामात जिंकेल असे भाकित केले आहे.
वेताळ
1 Jul 2010 - 8:47 pm | संजय अभ्यंकर
डॉनरावांनी अर्जेंटीनाची ओळख खास मराठी स्टाईल मध्ये करून दीली.
अर्जेंटिनाच्या ह्या संघा बद्दल ममत्व निर्माण झाले ते त्यांचे ह्या विश्वचषकातले सामने पाहून. अन्यथा आम्ही खंदे ब्राझिलप्रेमी.
ब्राझिल हरला तरी त्या संघावर प्रेम, जिंकला तरी प्रेम.
ब्राझिलच्या संघवरचे प्रेम जडले ते झिको, सॉक्रेटसच्या काळापासून.
परंतु, प्रत्येक विश्वषकात, एखादा संघ तुम्हाला भुलवतो (संगीतातली एखादि धुन भुलवते तशी). ह्यावेळी अर्जेंटीनाने असेच गारूड केले आहे.
१९९० साली बेकनबॉरच्या जर्मन संघाने असेच भुलवले होते.
मध्यक्षेत्रात लोतहुर मथेयुस, आघाडीला रुदि फोलर, युर्गन क्लिंसमान व बचावाला हान्स पिटर ब्रीगल. तसेच बचावपटू असुनही प्रसंगी आघाडीवर धडका मारणारा आंन्द्रेयास ब्रेहमे (ह्या पठ्ठ्याने उपांत्य फेरीत फ्रान्सचा गोली जोएल बॅट्सला चुत्या बनवून मारलेला गोल आजही डोळ्या समोर आहे). त्या जर्मन संघाचे सामने पाहून हाच संघ विश्वचषक घेऊन जाणार असे वाटत होते आणी तसेच झाले.
ह्या वेळीही दिल कहे अर्जेंटीना, दिमाग कहे जर्मनी अशी अवस्था आहे.
पाहूया ३जुलैला काय होतेय ते.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
1 Jul 2010 - 9:00 pm | टारझन
किती वेळा बदलता हो प्रतिसाद ? :)
1 Jul 2010 - 9:14 pm | मेघवेडा
पण तू का लगेच पाचर लॉक लावलंस?
1 Jul 2010 - 11:08 pm | संजय अभ्यंकर
स्पेलींग मिश्टेक मुळे बदलावा लागला.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
1 Jul 2010 - 8:50 pm | स्वप्निल..
एकदम डॉनराव स्टाइल .. मजा आलीय वाचायला :)
पण या मॅचसाठी आपले घोडे जर्मनीवरच !!
1 Jul 2010 - 11:18 pm | अनिल हटेला
अगदी सहमत !!
मस्त टीमवर्क आहे त्यांचं !!
(गर्मणीयाप्रेमी):)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
1 Jul 2010 - 9:31 pm | ब्रिटिश टिंग्या
छान लेख रे!
- स्पॅनिश टिंग्या