प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला

अर्धवट's picture
अर्धवट in जनातलं, मनातलं
30 Jun 2010 - 12:38 am

एका महाविद्यालयाचं आवार. प्राचार्य गाडीतुन उतरतात, पांढरा शर्ट, लेंगा आणि काळं जाकीट, सुरकुतलेला पण उत्साही प्रसन्न चेहेरा, आणि त्यांचे पेटंट मिश्कील हास्य, इमारतीच्या पायर्‍या चढुन येताना, त्यांच्याच व्याख्यानाचा बोर्ड समोर लावला आहे, त्याकडे क्षणभर कटाक्ष टाकुन पुन्हा त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तरातरा चालत, हॉल मधे येतात. हॉल काठोकाठ भरलेला. समोरच्या तांब्याभंड्यातुन थोडे पाणी पीउन प्राचार्य सुरुवात करतात.

"आत्ताच येताना खाली मी व्याख्यानाचा बोर्ड बघितला. त्यावर विषय लिहीलेला नाही. तो लिहायचा राहायलाय असं नव्हे. पण हल्ली कुणी व्यक्त्याला विषय देत नाही, दिला तर आम्ही तो घेत नाही, अणि घेतलाच तर विषयाला धरुन कुणी बोलत नाही. तेव्हा कुठल्याही एका विषयावर न बोलता तुमच्या आणि माझ्या तारा जुळेपर्यंत मी बोलणार आहे...."

आणि त्यानंतर सतत १ तास अखंड, शांत आणि कल्लोळी, शीतल आणि दाहक असा विचारप्रवाह, सतत संवाद साधणारा, काहीतरी हितगुज करणारा, अंतर्बाह्य निर्मळ असा ओघवता प्रवाह. आपलं कर्तव्य, आपलं समाजातलं एक जबाबदार अस्तित्व. अभियंता या शब्दाबरोबर येणारी एक थोरलेपणाची जाणीव हे सगळं सगळं...

काही वेळापुर्वी मित्राचा फोन आला 'प्राचार्य गेले'.. एवढं एक वाक्य बोलुन फोन ठेवावा लागला. आणि त्यानंतर पहिल्यांदा मनात दाटला तो वर उल्लेखलेला प्रसंग. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातलं त्यांचं हे व्याख्यान. मी पहिल्या वर्षाला असताना ऐकलेलं. अगदी जसंच्या तसं माझ्या समोर अगदी काल घडल्यासारखं दिसतंय ऐकु येतंय..
नंतर अशी अनेक व्याख्यानं आठवत गेली. प्राचार्यांना मी अगदी माझ्या शाळेपासुनच ऐकतोय.. सहा आठ महिन्यातुन एकतरी व्याख्यान शाळेत व्हायचंच. शाळेत अगदी सोप्या सोप्या विषयांवर बोलायचे, खुलवुन सांगायचे. नंतर त्यांना ऐकतच गेलो, समृद्ध होतच गेलो सतत. नुसती विषयांची जंत्री द्यायची झाली तरी त्यांच्या व्यासंगाचा आवाका लक्षात येतो. विवेकानंद, शिवछत्रपती, संतसाहित्य, समर्थ रामदासांचे विचार, मुक्तचिंतने, समाजाभिमुख विषय आणि बरेच काही.
अर्थात आमच्या वाट्याला प्राचार्य नेहेमीच जास्त आले. एकतर फलटणपासुन जवळ आणि सातार्‍यालाच त्यांचे शिक्षण झाल्यामुळे त्यांना वाटणारी आपुलकी. मनात अनेक भाषणं दाटुन आली आहेत आत्ता. शाळेतली, कॉलेजातली, समर्थ सदन मधली, गांधी मैदानावरच विराट जनसमुदयापुढे केलेलं भाषण, आमच्या नगरवाचनालयाच्या छोटेखानी हॉलमधे होणारी छोटी भाषणं.

एक मोठा अविस्मरणीय प्रसंग आठवतो तो म्हणजे.. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या हस्ते शाहुकलामंदीर मधे झालेला त्यांचा सत्कार. आणि त्यावेळेला अत्यंत आदराने बाबासाहेबांनी काढलेले.. " हा साक्षात सरस्वतीपुत्र आहे" हे उद्गार

खुप समृद्ध केलं ह्या माणसानं, संतसाहित्याची गोडी लावली, महाराजांचा, विवेकानंदांचा वारसा शिकवला. खुप लहान वयात आयुष्याचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केला, विचार शिकवला.. जबाबदारीची जाणिव करुन दिली... जागल्या बनुन राहिला मनाच्या कोपर्‍यात.. सतत, ह्या अंधार्‍या जगात..

खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो..

जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..

मुक्तकसद्भावना

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

30 Jun 2010 - 12:41 am | यशोधरा

:(

चित्रा's picture

30 Jun 2010 - 1:03 am | चित्रा

लेख भारावून लिहीला आहे हे जाणवते, प्रा. भोसले यांना आदरांजली.

(फक्त बातमी वाचण्याआधी नक्की कोणाचे निधन झाले हे कळले नाही, मी अभियंता या शब्दावरच अडकून पडले).

अर्धवट's picture

30 Jun 2010 - 8:42 am | अर्धवट

ह्म्म्म्म.. 'प्राचार्य' हे संबोधन दुसर्या कुणासाठी असुच शकत नाही, असाच भाव निर्माण झाला आहे... आमच्या सगळ्यांमधे प्राचार्य असाच उल्लेख व्हायचा..मला आत्ता तुमची प्रतिक्रीया वाचल्यावर जाणवतय कि मी लेखात त्यांचे नावच लिहीलेले नाही..

कानडाऊ योगेशु's picture

30 Jun 2010 - 9:53 am | कानडाऊ योगेशु

'प्राचार्य' हे संबोधन दुसर्या कुणासाठी असुच शकत नाही.

अगदी हेच म्हणतो.
लेख वाचताना गलबलुन आले.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

चित्रा's picture

1 Jul 2010 - 8:14 am | चित्रा

मला माहिती नव्हते..

रेवती's picture

30 Jun 2010 - 1:42 am | रेवती

प्राचार्यांना अगदी मनापासून श्रद्धांजली वाहिली आहे आपण!
मी कधी त्यांचं व्याख्यान ऐकलेलं नाही पण खूपच छान बोलायचे असं ऐकलं होतं.

रेवती

अमोल केळकर's picture

30 Jun 2010 - 8:59 am | अमोल केळकर

प्राचार्य. शिवाजीराव भोसले यांना विनम्र श्रध्दांजली.

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

एकलव्य's picture

30 Jun 2010 - 9:15 am | एकलव्य

एका संथ लयीत आणि एकातून एक उलगडणार्‍या वाक्यांची मालिका तासोनतास चालू ठेवणार्‍या प्राचार्यांचे भाषण ऐकायची संधी काहीवेळा मिळाली. मनावर कायमचा ठसा उमटविणार्‍या ह्या सरस्वतीसुतास श्रद्धांजली.

आंबोळी's picture

30 Jun 2010 - 10:03 am | आंबोळी

ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं
हे वाक्य सर्वार्थाने सार्थ करणार व्यक्तिमत्व.....
प्राचार्यांना श्रद्धांजली!

आंबोळी

विजुभाऊ's picture

30 Jun 2010 - 10:53 am | विजुभाऊ

वक्ता कसा असावा तर प्राचार्यांसारखा.
उगाच कसलाही अभिनिवेश न आणता जे पोचवायचे ते थेट श्रोत्यापर्यन्त पोहिचवणार. त्यांच्या व्यक्तीमत्वातील साधेपण आअणि भाषेवरचे प्रभूत्व हे त्यांच्या व्याख्यानाचे हायलाईट्स असते.
अनुप्रास साधणार्‍या कोट्या त्यातून होणारे विनोद आणि त्याचबरोबर श्रोत्यांना दिलेजाणारे बौद्धीक ...एकूणच वातावरण मंत्रमुग्ध होऊनजात असे.
उदा: गर्दी मध्ये दर्दी असू शकतात पण दर्दींची गर्दी असणे हे आगळेच ....

व्याख्यानाचा एकदीड तास आणि त्यानन्तरचे दोनतीन दिवस अक्षरशः भारलेल्या अवस्थेत जायचा. व्याख्यानाची गुंगी उतरूच नये असे वाटायचे

स्मिता चावरे's picture

30 Jun 2010 - 11:21 am | स्मिता चावरे

लेख वाचताना गलबलुन आले......... योगेश म्हणाले तशीच अवस्था झाली.

जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला...अगदी खरंय!

रानी १३'s picture

30 Jun 2010 - 11:37 am | रानी १३

डोळ्यात पाणी आले.......:(

प्राचार्य. शिवाजीराव भोसले यांना विनम्र श्रध्दांजली.
मी सध्या त्यानी लिहलेले दीपस्तंभ हे पुस्तकच वाचत आहे, मी त्यांची बरिच ध्वनी मुद्रीत असलेली व्याख्याने एकली आहेत. फार सुंदर बोलायचे .

पुन्हा एकदा विनम्र श्रध्दांजली.

सहज's picture

30 Jun 2010 - 11:43 am | सहज

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना विनम्र श्रध्दांजली.

पाषाणभेद's picture

30 Jun 2010 - 12:08 pm | पाषाणभेद

समाजाला वळण लावणारे वडिलकिचा अधिकारी व्यक्ति गेले.
आदरांजली.

कोदरकर's picture

30 Jun 2010 - 5:19 pm | कोदरकर

त्यांचे "शिवशाही आणि लोकशाही" विषयावरील व्याख्यान ऐकुन भारावलो होतो.. आमचा मित्र ब्रिजेश मुळे असा श्रवण भक्तीयोग अभियांत्रिकी च्या काळात औरंगाबाद्च्या संत एकनाथ रंग मंदिरात आला..
ओजस्वी वक्त्यास श्रद्धांजली!

प्रभो's picture

30 Jun 2010 - 6:19 pm | प्रभो

प्राचार्यांना विनम्र श्रध्दांजली.

विसोबा खेचर's picture

30 Jun 2010 - 8:01 pm | विसोबा खेचर

खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो..
जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..

खूपच सुंदर लिहिलंत साहेब..जियो..!

प्राचार्यांना आदरांजली..

धमाल मुलगा's picture

30 Jun 2010 - 9:31 pm | धमाल मुलगा

किती मनाच्या गाभ्यापासुन लिहिलंय ते शब्दाशब्दात जाणवतंय.
फार फार व्यासंगी व्यक्तिमत्व हरपलं. फार वाईट वाटलं.

आनंदयात्री's picture

1 Jul 2010 - 10:23 am | आनंदयात्री

हेच म्हणतो.

प्राचार्यांना श्रद्धांजली. त्यांच्या व्याख्यानाचे ध्वनीमुद्रण कोणाकडे असल्यास कृपया उपलब्ध करुन द्यावे.

क्रेमर's picture

1 Jul 2010 - 8:22 am | क्रेमर

अनेक व्याख्याने ऐकण्याचा योग आला. इतके ओघवते वक्तृत्व पुन्हा प्रत्यक्ष ऐकायला मिळेल असे वाटत नाही. विवेकानंदांवर ते खूप समरसून बोलत असत. त्यांच्या अभ्यास वादातीत आहे. परंतु त्यांचे योगी अरविंदावरचे पुस्तक फारसे आवडले नव्हते. त्यांची अध्यात्माची आवड वाखाणण्यासारखीच होती पण अध्यात्माचे त्यांनी केलेले उदात्तीकरण मला फारसे पटत नाही.

अर्धवट's picture

1 Jul 2010 - 8:42 am | अर्धवट

>> ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..

माझ्या वरच्या लेखातील शेवटचे हे वाक्य, पुलंच्या एका लेखातील आहे, त्यावेळेला आठवेल तसं भावनेच्या आवेगात लिहुन गेलो. भाईंचा उल्लेख राहीला, क्षमस्व.

विसोबा खेचर's picture

1 Jul 2010 - 10:56 am | विसोबा खेचर

http://tatya7.blogspot.com/2010/07/blog-post.html

धन्यवाद अर्धवटराव..

तात्या.

सागर's picture

2 Jul 2010 - 2:27 pm | सागर

पुढील दुव्यावरुन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची एमपी थ्री स्वरुपातील ३ व्याख्याने उतरवून घेता येतील

१. योगी अरविंद
२. स्वामी विवेकानंद
३. छत्रपति शिवाजी महाराज

http://www.4shared.com/dir/19sXzgYL/Vyakhyane.html

आनंदयात्री's picture

3 Aug 2010 - 11:01 am | आनंदयात्री

धन्यवाद सागर !!