एप्रिल फ़ूल

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
29 Mar 2008 - 9:55 pm

एक एप्रिल. एक जादुई दिनांक. या दिवशी असे काय घडले असेल की आपली बुद्धि गायब होते? याचा संबंध बहुदा कालगणनेशी असावा. ग्रेगोरियन कॅलेंडर आस्तित्त्वात येण्यापूर्वी बहुधा दहाच महिने आस्तित्त्वात होते. मी इतिहासज्ञ नसल्यामुळे मला तपशील अचूक ठाऊक नाही. पण आपल्या संकेतस्थळावर लिहिणारे तज्ञ वस्तुस्थिती लिहितीलच. (प्रियालीताई बोरू सरसावा बरे.) तर नव्या महिन्यापैकी एप्रिल हा एक असावा. आणि दिनांक लिहितांना नवीन महिना ज्ञात नसल्यामुळे किंवा सवईमुळे एक एप्रिल ऐवजी एक मे अशी तारीख लोक लिहीत असवेत. जसे आपण जानेवारीच्या आठदहा तारखेपर्यंत जुनेच वर्ष टाकतो. चूक झाली तर खिल्ली उडविण्याचा लोकांचा हक्कच आहे. खास करून टवाळ जनांचा. पण म्हणून तर रुक्ष आयुष्यात रंग भरतात आणि ताजेपणा येतो.

आपणहि कित्येकांना मोरू बनवितो. कधी आपण आपणच मोरू बनतो. कधी इतर आपल्याला बनवितात. पण हेतु निर्विष असला तर फ़ारच मजा येते. असेच दोन प्रसंग.

आमच्या का-यालयात एक भगिनी आहेत. गुटगुटीत सुखवस्तु देहयष्टि हे त्यांचे वैशिष्ट्य (बलस्थान?). यांना आपण शोभा म्हणू. यावरून त्यांना कांही सज्जनांनी चिडविले तर त्यांना गंमत वाटते. मी त्या भाग्यवंत सज्जनांपैकी एक. एकदा असाच एक एप्रिलच्या दिवशी कार्यालयात येतांना चालत होतो. तर पुढे या महोदया. नेहमीपेक्षा अंमळ जरा जास्तच हळू हळू च आस्ते आस्ते चालल्याहेत.

ओ शोभाताई,जरा लवकर पाय उचला. लवकर चला. कोणाला तरी गि-हाईक करू. पोचेपर्यंत निदान ५० ग्रॅम वजन कमी होऊ द्यात. तिने मागे वळून पाहिले. आणि काय सांगू? धरणी दुभंगून मला गिळून का टाकत नाही असे झाले. ती भलतीच महिला होती. नशीब मी शोभाताई म्हणून हाक मारून बोललो होतो. नाहीतर हाडे मोजत बसलो असतो. मी त्वरित माफ़ी मागितली. ती महिला पण हसू लागली. म्हणाली "मी नेहमी पाहते तुम्हाला. कधी बस स्टॉपवर, कधी या रस्त्यावर." (वा! मी सज्जन आहे हे हिला ठाऊक आहे तर. सुदैवाने मनांत कितीहि खोडसाळ विचार चालू असले तरी माझा चेहरा मी निर्विकार ठेऊ शकतो. रस्त्यात बहुधा निर्विकारच ठेवतो. मुलांच्या शाळेतील सवय. नाहीतर कोणीहि मस्ती केली तर सरांकडून मार पडण्याची शक्यता) "आज एक एप्रिल असल्यामुळे हे असं झालं. तुम्ही अमुक अमुक मध्ये ना?"

म्हटलो "हो. पण तेथील सगळेच असे माझ्यासारखे आंधळे आणि वेंधळे नाहीत."

माझी माणसे ओळखण्यात नेहमी अशीच गल्लत होते. मरता मरता बचावलो खरा. हा झाला माझा मोरू.

आता दुस-याचा मोरू. साल बहुधा १९९९ असावे. आमचा एक अविवाहित मित्र आहे. याला आपण जोशी म्हणू. मद्यप्रेमी आहे. बेवडा नाही हो. घरात तो व आई असे दोघेच. आई असल्यामुळे याला मद्यप्राशन करता येत नाही. आई कधीतरी मुलीकडे म्हणजे याच्या विवाहित बहिणीकडे राहायला गेली की याची सोय होते. त्या वेळी ती अचानक मुलीकडे गेल्यामुळे याला कांही मित्रांची जमवाजमव करता आली नाही. मग एकेकाला दुरध्वनि केले. सगळे कामावर. आमचा एक सगळ्यात सभ्य आणि सज्जन मित्र आहे. अतिशय मृदु आणि ऋजु असा सौजन्यपूर्ण स्वभाव. "हा तुमच्यात शोभत नाही. तुम्हा नाठाळांशी याने कशी मैत्री ठेवली?" असे आमच्या प्रत्येक एक असलेल्या बायका आम्हाला आश्चर्याने विचारतात. "हा हुशार असल्यामुळे आम्ही किती चांगले आणि सभ्य आहोत ते याला ठाऊक आहे." माझे उत्तर. त्यामुळे याचे नाव देत नाही. याला श्री. क्ष म्हणू. हा नोकरी करत नाही. याचा स्वत:चा व्यवसाय आहे. तर हा आपली व्यवसायाची नित्याची कामे लवकर मार्गाला लावून गेला जोशाकडे. दुपारचे सेशन यशस्वी करायला. याची सर्वशक्तिमान बायको फ़ार कडक शिस्तीची आहे व याला नेहमी फ़ैलावर घेत असते असा एक चुकीचा प्रवाद आहे.

तर 'हा श्री. क्ष व जोशीबुवा असे दोघे जोशीबुवांच्या घरी बसलेत. शक्य असेल तर तू पण जा. मी महत्त्वाच्या कामात आहे. जाऊ शकत नाही' असा मला तिस-याचा दुरध्वनि आला.

मग काय? माझ्या सडेल टाळक्यात चक्र चालू झाले. आता काय करावे? 'आधीच मर्कट, तशातचि मद्य नाही' अशी अवस्था (की दुर्दशा) झाली. माझ्यासमोर स्टेनो बसली होती. डिक्टेशन घेत. नाव ओरिना डी'सिल्व्हा. वसईची. ही तशी शालीन आणि सुस्वभावी पण बालिश आणि महाखोडसाळ. पोरकटपणा करण्यात उस्ताद. माझ्या मुखचंद्रावरचे भाव तो निर्विकार न केल्यामुळे तिला कळले.

तारीख आठवली वाटते. कोणाची खेचायचा विचार करताय?

हिची मातृभाषा वसईची मायबोली. कॉन्वेंटमद्ध्ये शिकली तरी शुद्ध मराठी नेहमी कोब्रांच्या अनुनासिक ढंगात बोलते.

माझ्या रिकाम्या कवटीत वीज लखलखली. गौतम बुद्धांना कसा साक्षात्कार झाला असेल ते कळले. (महापुरूष हो क्षमस्व मला तुमच्याबद्दल नितांत आदर आहे) तिला काय बोलायचे, कसे बोलायचे ते पढवले.

जोशीबुवांना फ़ोन लावला. अपेक्षेप्रमाणे जोशीबुवांनीच उचलला. मी काहीहि न बोलता तिच्या हातात रिसिव्हर दिला.

"काय हो? काय चालवलय काय तुम्ही? स्वत: वाह्यात उद्योग करता? दारू पिता? आणि माझ्या नव-याला बिघडवताय? शरम वाटत नाही? आत्ताच्या आत्ता ताबडतोब माझ्या नव-याला घरी पाठवा. नाहीतर तिथे येते. तुमच्या आईला घेऊन. आणि दोघांनाहि बघते. द्या ...... माझ्या नव-याला फ़ोन." आवेशात खडसवायला, खरे म्हणजे खेकसायला तिला मिनिटभरहि लागले नाही.

श्री. क्ष ने घेतल्यावर तिने फ़ोन माझ्याकडे दिला.

"मी सुधीर. जोशाला एप्रिल फ़ूल केले. काय प्रतिक्रिया?" याला हसू आवरेना. अगोदर पोटभर हसून घेतले. "अरे चेहरा साफ़ पडला त्याचा. बेदम मार पडल्यावर पडेल तसा. बेचाळीसला ऑलडाऊन. नाहीतर ० विरुद्ध २५ ने हारलो. अजून सुरुवात पण केली नाही आणि बिचा-याला ऐकून घ्यावे लागले."

त्यांना एका चांगल्या व आनंददायी सेशनच्या शुभेच्च्हा दिला आणि हे जोशाच्या 'फ़' चे शुभवर्तमान इतर मित्रांना कळविण्याचे पवित्र कार्य पार पाडले.

आपणहि असेच आपले एप्रिल फूल चे अनुभव कळवा.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

1 Apr 2008 - 2:31 pm | प्रमोद देव

सुधीरराव तुमचे दोन्हीही किस्से मस्तच आहेत.

आता माझा एक किस्सा सांगतो.
आमचा एक मद्रासी साहेब(मसा) नेहमी बोलताना "आय से" हे पालूपद लावत असे. उदा. कम आय से! गो आय से! वगैरे.
आमचा एक सहकारी टन्ना आडनावाचा गुजराथी होता. शिवराळ तोंडाचा आणि एक नंबरचा कामचोर माणूस होता.
ह्या टन्नावर मसा दात ठेवून होता. नेहमी त्याला त्याच्या खास आवाजात "ट्यन्नाऽऽऽऽऽ" असे म्हणून टोकायचा आणि टन्ना मग त्याला त्याच्या पाठी भरपूर शिव्या घालायचा. असे अहिनकुलाचे नाते होते त्या दोघांचे.
एकदा एका वर्षी एक एप्रिलला मी टन्नाची गंमत करायचे ठरवले. आधी इतर सहकार्‍यांशी संगनमत करून मी कार्यालयातल्या एका खोलीतून टन्नाला इंटरकॉमवर "ट्यन्नाऽऽऽऽऽ कम आय से" असे जोरात सांगून पुढे काय होतेय हे पाहायला मित्रांच्यात सामील झालो.
टन्ना कावरा बावरा होऊन उठला. उठता उठता म्हणाला, "क्या ये मसा पागल है क्या? साला मेरेको बुलाता है! अभी क्या लफडा होनेवाला मालूम नही! लेकिन क्या करे? वक्त आनेपे गधेके सामनेभी झुकना पडता है!" आणि गेला साहेबाकडे.
पाच मिनिटातच पडलेल्या चेहर्‍याने आणि अक्षरश: धुसफुसत आला . मी साळसूदपणे विचारले, "टन्ना! क्या हुवा?"
"वो साला सुवरका बच्चा मुझे बोलता है की मैने कब बुलाया? इसने नही तो क्या इसके बापने बुलाया? साला लगता है पागल कुत्तेने काटा होगा गधेको!"
इतके बोलून आपल्या जागेवर जाण्यासाठी त्याची पाठ वळली आणि मी ओरडलो, "ट्यन्नाऽऽऽऽऽ कम आय से!"
टन्नाने घाबरून मागे पाहिले तेव्हा आम्ही सगळे खळखळून हसत होतो....
हे पाहिले मात्र , आपली फजिती ह्याच लोकांनी केलेय हे त्याच्या लक्षात आले. आणि मग टन्नाने अशा काही शिव्या दिल्यात की काही विचारू नका. आम्ही त्या ऐकून अजूनच चेकाळलो.

विसोबा खेचर's picture

1 Apr 2008 - 2:38 pm | विसोबा खेचर

सुधीरराव तुमचे दोन्हीही किस्से मस्तच आहेत.

प्रमोदकाकांसारखेच म्हणतो! :)

आपला,
तात्यामोरू

मनस्वी's picture

1 Apr 2008 - 4:57 pm | मनस्वी

सुधीरकाका मस्तच एकदम.
प्रमोदकाकांचा पण किस्सा छान.

सुधीर कांदळकर's picture

2 Apr 2008 - 8:02 pm | सुधीर कांदळकर

वाचकांचे, प्रतिसाद न दिलेल्यांना देखील धन्यवाद.
देवसाहेब मज्जा आली. पण हा किस्सा आपल्या तोंडून ऐकल्यानंतरहि पुन्हा वाचायलाहि मज्जा आली.

सुधीर कांदळकर.

प्राजु's picture

2 Apr 2008 - 8:33 pm | प्राजु

दोन्हि किस्से छान.
प्रमोदकाका,
तुम्ही ही काही कमी नाही आहात... :)))
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com