रोहिडा

sandeepn's picture
sandeepn in जनातलं, मनातलं
17 Jun 2010 - 4:14 pm

मागे एकदा रोहिड्याला गेलो होतो पण खुप पाऊस आणि अंधार यामुळे किल्ला पुर्ण न सर करताच परत आलो होतो. परतलो पण परत येण्याचा निश्चय करुनच.

एकदा कार्यालयातील हौशी लोकांनी रोहिड्याला जाण्याचा प्लॅन बनवल्यानंतर पुन्हा एकदा रोहिडा मला साद घालू लागला व मि जान्याचा निश्चय केला. मग नेहमिप्रमाने इ-मेल्स फ़ॉरवर्ड झाल्या. पण शेवट्याच्या दिवशी त्यातले किति लोक येतिल हे ट्रेक च्या दिवशीच समजते.

शेवटी तो दिवस उजाडला. रात्री जोरात पाऊस झालेला होता. पण सकाळी पुर्ण उजाडले होते. शेवटी आम्हि ६ लोक ३ बाईक घेवून सकाळी ८ ला सातारा महामार्गावरुन निघालो. मधे नारायणपूर फ़ाट्याला मिसळ, वडापाव आणि आणि सोबत चहा अशी न्याहरी केली.मग भोर कडे मार्गस्थ झालो. भोर च्या शिवाजी राजेंच्या पुतळ्यापासुन बाजारवडीला जाणाय्रा रस्त्याने निघालो. मधे एका ठिकाणी थांबलो असता एक मोठा आंबा सापडला.तो पिकुन खाली पडला होता. खरतर तो माझ्या मित्राला सापडला पण तो मि माझ्या बॅग मधे टाकला. नंतर तो मिच फ़स्त केला हे सांगायला नको  . काय गोड चव होति त्याला आहाहा ! आता जास्त स्तुती नको नाहीतर बाकीची मंडळी मला मारायला धावतील :).

असे करत आम्ही ९.४५ पर्यंन पायथ्याशी पोहचलो. दुरुनच रोहिड्याचे बुरुज दिसत होते. त्याला कॅमेर्यात बंद करून व आमच्या दुचाकी पार्क करून आम्ही १० ला किल्ला चढायला सुरू केले.

१. गाड्या पार्क केल्या ती जागा.

चढता चढता माझी पुरती दमछाक झाली.

२. वाटेतुन दिसनारा रोहिडा.

मग मधे मधे विश्रांती घेत घेत ११ ला मुख्य दरवज्यापर्यंत पोहोचलो. मग थोडा फ़ार आराम व फोटोसेशन केले. किल्याचा दरवाजा अजुन तरी शाबुन आहे.

३. दरवाजा.

वरती गेल्यावर तेथीम बुरुजही शाबुत दिसले. बुरुज खरच खुप सुंदर आहेत. मग बरुज एके बुरुज करत अम्हि सगळा किल्ला फ़िरलो.किल्ल्याच्या एका दरवाज्यावर कोरलेला हत्ती व काही शिलालेख दिसले.


४. दरवाज्यावरील हत्ती व शीलालेख.

५. बुरुज.

६. जलकुंड

७. हेच ते चक्र

ह्या किल्ल्याला विचित्रगड असे पण म्हणतात. पण का ? हा एक अजुन अनुत्तरीत प्रश्न . मग आम्ही मंदिराजवळ गेलो.बघतो तर काय ? मंदिरातला कुलुप ! आमची थोडी चिडचिड झाली . नंतर आम्ही भोजन उरकुन घेण्याचे ठरवले. जेवण व पाणी आम्ही बॅग मधे आणले होते. गडावर पिण्यायोग्य पाणी नाही सापडले. तोरण्यावरील जिवंत झय्राची नकळत आठवण आली. जेवणान मसुर भाजी,चपाती,थालीपीठ,पराठे,सॉस,लोणचे,शीरा असा बेत होता.

८. असा होता बेत.

एकाला उपवास होता त्याने सफ़रचंदावर भागवले. आम्ही मात्र दणकुन जेवलो. चढण केल्यामुले दमलो होतो म्हणुन जरा जास्तच जेवण गेले.

थोड्या वेळाने मंदिराचा देखरेख करणारा गावकरी त्याच्या सोबतीला(कुत्रा) घेवुन आला. त्याने मंदिराचे दार उघडले व आम्हाला दर्शन घेता आले. मंदिराची थोडी डागडुजी करण्याचे काम चालू आहे व त्याचे सामान आत आहे म्हणुन कुलुप लावले अशी माहिती त्याने पुरवली. मग आम्ही पन सह्याद्री ट्रेकर्स या नावाने देणगी देवुन थोडाफ़ार हातभार लावण्याचा प्रयत्न केला. त्याला पण विचित्रगड का म्हणतात हे निटसे सांगता आले नाही.

९. मंदिराच्या आत.

मग परत किल्ल्यावर थोडी भ्रमंती केली . मग मस्तपैकी एक जागा शोधुन ताणून दिली. मस्त वारे चालु होते. ए.सी. ला नेहमीप्रमाने २-४ शिव्या हादडल्या . अशा ठिकाणी आलो कि ह्या आपोआप बाहेर पडतात J

किल्ल्यावरून राजगड,रायरेश्वर इ. गडांचे थोडेसे दर्शन होते. मन लगेच तिथल्या गडांना सर करण्याचा निश्चय करते. मग परत फोटोसेशन वगैरे करत दुपारी ३ ला आम्ही परतण्याचे ठरवले. येथील सरड्यांचे एक विशेष आहे. ते फोटो साठी खुप सही पोज देतात J अगदी ट्रेन्ड केलेत असे वाटते.


१०. सरडेराव.

आणी परतीच्या वाटेत ज्या वेगाने वारे आले ते या आधी मि तरी कधी अनुभवले नव्हते.

अशा तर्हेने आम्ही संध्याकाळी ६ पर्यंत घरी पोहोचलो देखील व ह्या पावसाळ्यातील पहिला ट्रेक संपला.

परतताना वाटेत चहा आणि शितपेयांसाठी थांबा हा ओघाने आलाच.

या गडावरील एक गोष्ट नमुद करावी वाटते की,इथे एक स्तुत्य उपक्रम चालु आहे सौर दिव्यांचा. गडावर ठिकठिकानी लावलेले सौरदिवे नक्कीच रात्रीचा ट्रेक करण्यार्यांसठी उपयुक्त ठरेल. ईथे गडावर जाण्यासाठी रस्त्याचे काम चालू आहे. पण त्यामुळे याचा सिंहगड नाही झाला म्हणजे मिळवले. लोकांसाठी इथे काही नियम करणे गरजेचे होईल.

११. सौरदिवा

तसा हा गड पुण्याहुन १ दिवसात व आरामात करण्यासारखा ट्रेक आहे. संपुर्ण पावसाळ्यात तर हा गड बघण्यालायक असतो. सगळीकडे हिरवळच हिरवळ. फ़क्त चिखला मुळे जपुन चढावे. तसा रस्ता तर होतोच आहे ,तेव्हा काळजी करण्याचे काही कारण नाही J

१२. पावसाळयातील रोहीडा.

असा हा ट्रेक तुम्ही लोक पण मस्त इंजॉय करू शकता.

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

jaypal's picture

17 Jun 2010 - 4:24 pm | jaypal

प्रवास वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले. असेच भटकत रहा ही शुभेच्छा
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

जिप्सी's picture

17 Jun 2010 - 4:41 pm | जिप्सी

संदीप, तुम्हाला रोहीडा आवडलेला पाहून फार फार आनंद झाला. पुण्यातली एक संस्था शिवदुर्ग संवर्धन (जिचा मीपण सदस्य आहे) यांनी आणि मानकरवाडी(बाजारवाडी) येथल्या ग्रामस्थांनी किल्ल्याच्या संवर्धनाचे काम केलेले आहे. किल्ल्याला दरवाजा बसवण्यापासून ते टाक्या स्वच्छ करणे, तटांची बुरुजांची डागडुजी करणे इत्यादी कामे केली गेली. हि कामे लोकवर्गणीतून तसेच स्वतः कष्ट करून केली गेली. ३-४ वर्षापूर्वी किल्ल्याची अवस्था अतिशय दयनीय होती पण आता बरीच सुधारलेली आहे. किल्ले संवर्धन हे काम बरेच कष्टाचे आणि खर्चिक आहे. पण येवड्या ढोर कष्टानंतर जेंव्हा तुमच्यासारखे लोक किल्ला आवडला असे म्हणतात तेव्हा खरच कष्टाचे फळ मिळाले असे वाटते.
अवांतर :- रोहीड्याचे अजून एक नाव बिनीचा किल्ला असेसुद्धा आहे.

वेडा कुंभार's picture

17 Jun 2010 - 4:48 pm | वेडा कुंभार

" हेच ते चक्र "...
हे कसले चक्र आहे. त्याचा काय वापर होत असे.

***************************************************************************************************
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

श्रीराजे's picture

17 Jun 2010 - 4:53 pm | श्रीराजे

लई भारी..ट्रेक केलात भौ....!
फूटू बी लई झाक हायत...

जिप्सी's picture

17 Jun 2010 - 5:18 pm | जिप्सी

हेच ते चक्र :-
अहो संदीप आणि वेडा कुंभार,अहो हे कसलेही चक्र नाही हि चुन्याची घाणी आहे. किल्ल्यांवरच्या बांधकामाला लागणारा चुना तयार करायसाठी याचा उपयोग करायचे. अशाच चुन्याची घाणी तुम्हाला भरपूर किल्ल्यांवर दिसतील.

वेडा कुंभार's picture

18 Jun 2010 - 11:12 am | वेडा कुंभार

माहिती बद्दल धन्यवाद ...........

***************************************************************************************************
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

धमाल मुलगा's picture

17 Jun 2010 - 5:28 pm | धमाल मुलगा

मस्त ट्रेक झाला की! :)

च्यायला...पावसाळा चालु झाला, दुनया लागली गडकिल्ले पालथे घालत हिंडायला :) आणी आम्ही बसलोय कळफलक बडवत!

अरे दोस्ताहोऽऽऽ..
अरेऽऽ चला रे...लवकर एखाद्या गडाचा भेट द्यायचा कार्यक्रम आखुया रे! :)

प्रियाली's picture

17 Jun 2010 - 5:33 pm | प्रियाली

ते चक्र आणि त्या सभोवती असणारा चक्राकार मंडप पाहून काही तांत्रिक विधींसाठी त्याचा उपयोग होत असावा अशी शंका आली.

तो शिलालेख वाचता येत नाही. तुम्ही वाचला असल्यास येथे लिहिता येईल का?

वेताळ's picture

17 Jun 2010 - 6:11 pm | वेताळ

तो चुन्याचा घाणा आहे.त्यात वाळु व चुना एकत्र करुन टाकतात व बैल जोडुन ते चक्र फिरवतात. साधारणता २५ ते ४० फेर्‍यानंतर बांधकामासाठी उपयुक्त असणारा चुना त्यात तयात होतो. साधारण: २० वर्षापुर्वी जेव्हा सिंमेट खुप महाग होते व लवकर मिळत नसे त्याकाळी घर किंवा विहिर बांधण्यासाठी चुन्याच्या ह्या मिश्रणाचा वापर केला जात असे.आमचे घर व विहिर असल्या घाण्यात चुना मळुन ,तो वापरुन बांधले आहे.
आजकाल सिंमेट सहज उपलब्द होते त्यामुळे असले घाणे हद्दपार झाले आहेत.

वेताळ

प्रियाली's picture

17 Jun 2010 - 6:12 pm | प्रियाली

इतके साधे स्पष्टीकरण आहे होय. :) धन्यवाद!

sandeepn's picture

17 Jun 2010 - 6:22 pm | sandeepn

धन्यवाद मित्रांनो.
माझी पहिली पोस्ट तुम्हाला आवडली याचा मला आनंद आहे. तुम्ही पुरवलेल्या माहितीबद्दल पण धन्यवाद.

आणि प्रियाली, त्या शिलालेखवरील सर्व काही वाचता येत नाही. पण तरीही " हजरत सुलताना.. मुदकपाकशाला.. "असे काहीतरी लिहले आहे.
आणि जिप्सि यांनी पन ते चक्र " चुन्याची घाणी " आहे अशी माहिती वर पुरवलेलीच आहे.

याला विचित्रगड का म्हणतात हे कुणाला माहीत आहे का ? असेल तर क्रुपया सांगा.

तुमचाच,
संदिप

प्रभो's picture

17 Jun 2010 - 8:04 pm | प्रभो

मस्त रे...

जिप्सी's picture

30 Jul 2010 - 7:42 pm | जिप्सी

खालील लिंक बघा.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=899...

एका महिन्यातली हि दुसरी बातमी मागच्या महिन्यातच विजयदुर्गाचा बुरुज ढासळला आणि आता रोहीडा. आणि आपण फार काहीही करू शकत नाही. :-(((

या गड किल्ल्यांनी आपल्याला किती किती आनंदाचे क्षण दिलेले आहेत, त्याची थोडीशी भरपाई म्हणून मि.पा. वरचे आपण दुर्गप्रेमी लोक येऊन काही किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तरी नक्की प्रयत्न करू शकतो. मी स्वत: राजगड संवर्धनासाठी काम करत आहे, आणि या दुर्ग संवर्धनाच्या कामासाठी मदतीच्या हातांची खरच फार फार गरज आहे.

(व्यथित) जिप्सी

sandeepn's picture

2 Aug 2010 - 5:06 pm | sandeepn

फारच वाईट गोष्ट आहे.