सखा...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Jun 2010 - 2:45 pm

तसा तो मला नेहमीच भेटायचा....
कधी परसातल्या कडुनिंबावरून हलकेच ओघळताना.
कधी अंगणात फुललेल्या निशिगंधेला रडवताना....
तर कधी घराच्या छतावर जोराजोरात थापा मारुन मी आलोय रे...., म्हणून सांगताना !
लहानपणी शाळेत जातानाच्या पाऊलवाटेवर आपोआपच उगवून आलेल्या दगडफुलांना गोंजारताना...
उघड्या पायांनी (पादत्राणाशिवाय) रस्त्यावरच्या डबर्‍यात साचलेले पाणी
एकमेकांच्या अंगावर उडवीत सवंगड्यांबरोबर मस्ती करताना...
तो नेहमीच भेटायचा....
सख्ख्या मित्राप्रमाणे...., सख्ख्या मित्रासारखा ...
डोळ्यातली आसवे लपवताना....
तो माझ्यासवे बोलायचा, खेळायचा, बागडायचा क्वचित रडायचाही...
पण रडू नको म्हणून नाही सांगायचा, तर स्वतःच माझ्याबरोबर रडायचा...
मग त्याच्या रडण्यात माझी आसवेही लपून जायची..., धुवून जायची...
ती तशी धुवून गेली की तो हलकेच मिस्कील हसायचा...
एखाद्या खोडकर पण समंजस मित्रासारखा !
त्या दिवशी शेजारच्या काकुंनी सांगितले...
चल आपल्याला आईकडे जायचेय दवाखान्यात, तुला छोटा भाऊ झालाय...
केवढा आनंद झाला होता त्याला...
एखाद्या नाचर्‍या मोरासारखा, किं माझ्या मनमोरासारखा?
.........पण तो बेभान होवून नाचला...!
आमची दोस्ती तेव्हापासूनची.. कीं त्याही आधीची....
आई सांगायची तिला म्हणे एकाच वेळी दोन दोन लेकरे सांभाळावी लागली होती..
माझ्या जन्माच्याही आधी...
आत 'मी' आणि बाहेर 'तो'....
तो खुप जुना आहे, आदि आहे, अनंत आहे.. पुरातन तर आहेच पण चिरंतनदेखील आहे...
पण मी मात्र त्याला बरोबरीचाच मानतो.... जुळं भावंडच जणू..!
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा बोलका साक्षीदार....
सांगितलं ना...! तो बोलतो माझ्याबरोबर..., मग....?
कुठल्याही सच्च्या मित्रासारखा तो रुसतो देखील खुप लवकर...
मित्रांचा अधिकारच असतो तो.., मग कुठेतरी दडून बसायचा...
त्या वेड्याला कुठे माहीत होतं...
अरे राजा.., तू कुठेही लपलास, कितीही लपलास...
तरी माझ्यापासुन कसा लपणार आहेस?
आपल्याच सावलीपासुन कधी लपता येतं का? वेडा कुठला....
तो कायम मनातच असायचा...
असला लपाछपीचा खेळ त्याच्या अगदीच आवडीचा...
पण माझ्याबरोबर खेळताना नेहमीच हरायचा...
मग कधी माझ्या डोळ्यांतून तर कधी कवितेतून बरसायचा...!
तो असाच अमनधपक्याने कधीही यायचा...
मग हळुहळु धरा सारी धुरकट व्हायला लागायची...
त्याच्या येण्यानं तिच्या शरीराला सुटलेला तो मादक गंध ....
हलकेच गात्रा गात्राला भिजवत वेडंपिसं करायचा...
मला भेटायचा तो नेहमीच...
नदीतीरावर संथ लाटांशी खेळताना...
पाण्याशी खेळणार्‍या लाजर्‍या लव्हाळ्याशी बोलताना...
वेशीबाहेरच्या मंदीरात ....
तिच्या नजरेत हलकेच हरवून जाताना...
तो कधी बराचसा लाजरा वाटायचा ...
तिच्या बटेवर रेंगाळताना हळुवारपणे ओघळून जायचा...
मी हलकेच त्याला स्पर्श करायचा...
आणि तो लाजाळूच्या झाडासारखा लाजुन बसायचा...
मला भेटायचा तो...
आईच्या कुशीत हलकेच विसावताना...
तिच्या डोळ्यातली ममता शोषताना...
कधी बरसायचा बेभान..., उन्मुक्त समीरासारखा...
हलकेच स्पर्शायचा ...
अंगांगावर उठलेल्या गारेगार शिरशिरीसारखा...
मग मी वेड्यासारखा त्याला वेचू पाहायचा...
गात्रा गात्रातून मनसोक्त साठवू पाहायचा...
तो मला नेहमीच भेटायचा...
तो मला नेहमीच भेटतो ...
आमच्या भेटीला ॠतूंची बंधने नसतात...
आम्हाला भेटायला काळाच्या चौकटी नसतात...
तो कधी आईच्या वात्सल्यात भेटतो...
कधी प्रियेच्या केशसंभारात भेटतो ...
कधी कधी नकळत माझ्याच कवितेत हरवतो ....
............
.............
...............
पाऊस... माझा सखा !

विशाल.

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

पक्या's picture

11 Jun 2010 - 9:53 pm | पक्या

आवडले स्फूट. छान लिहीले आहे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

शुचि's picture

11 Jun 2010 - 10:55 pm | शुचि

काव्यमय अतिशय सुंदर!!!!

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मीनल's picture

12 Jun 2010 - 3:10 am | मीनल

खूप आवडले.
तूटक लिहूनही खूपच जुळलेले आहे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

14 Jun 2010 - 1:45 pm | विसोबा खेचर

सहमत आहे..

तात्या.

पुष्करिणी's picture

12 Jun 2010 - 4:05 am | पुष्करिणी

आवडल्..काव्यमय !

पुष्करिणी

विशाल कुलकर्णी's picture

12 Jun 2010 - 6:49 pm | विशाल कुलकर्णी

धन्स मित्रहो :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2010 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाऊस आवडला......!

-दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी's picture

14 Jun 2010 - 9:56 am | विशाल कुलकर्णी

आभार डॉक्टर साहेब .

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

क्रान्ति's picture

14 Jun 2010 - 9:44 pm | क्रान्ति

खासच लिहिलंय. :)

क्रान्ति
अग्निसखा

विशाल कुलकर्णी's picture

16 Jun 2010 - 12:04 pm | विशाल कुलकर्णी

लै लै भारी .. आपलं आभारी क्रांतीतै ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

धमाल मुलगा's picture

16 Jun 2010 - 3:35 pm | धमाल मुलगा

कोणी इतकं मस्त लिहुच कसं शकतं?

आवडलं रे भावा! :)
साला आपण सगळॅ पाऊसवेडेच!

विशाल कुलकर्णी's picture

17 Jun 2010 - 10:01 am | विशाल कुलकर्णी

:-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पाषाणभेद's picture

17 Jun 2010 - 10:15 am | पाषाणभेद

एकदम हायक्लास! जबरा! मस्त! एखांदी कविताचे की काय आसं वाटलं बगा व्ही. के. सायेब!

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही