लेख एकटाकी लिहिला आहे. टंकनदोष असल्यास क्षमस्व. खरडीतून कळवल्यास दुरुस्त केले जातील
आफ्रिका म्हटलं की डोळ्यापुढे उभे रहातात ती घनदाट जंगले, प्राणीसृष्टी, काळ्या रंगाचे रहिवासी, साऊथ आफ्रिकेची टिम, इजिप्तचे पिरॅमिड आणि सोमालियासारखे दारिद्र्य... मात्र आफ्रिका इथेच संपते का? तर छे! ती तर इथे सूरु होते. कधीतरी ह्या खंडात भटकायची इच्छा जुनी आहे. मात्र दुधाची तहान ताकावर ह्या न्यायाने आफ्रिका खंडातील विषयांवरचे चित्रपट बघायचे ठरवले. ६ चित्रपट डाऊनलोड केले त्यात एक डॉक्युमेंटरी आणि ५ चित्रपट होते. त्यातल्या चार चित्रपटांची ओळख करण्यासाठी हा लेख.
आफ्रिकेच्या ह्या चित्रपट सफारीची सूरवात करूया १९६६ मधे बनलेल्या "बॅटल ऑफ अल्जिर्स" ह्या अल्जेरियाच्या स्वातंत्र्ययुद्धावरील सिनेमापासून. हा फ्रेंच व अरेबिक भाषेतील सिनेमा कृष्णधवल आहे. ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की ह्याला कोणी एक असा नायक नाहि. अल्जेरियाच्या स्वातंत्र्ययुद्धांचा चलतचित्रमय आढावा आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. आतापर्यंत इंग्रजांविरूद्धचे अनेक लढे आपण चित्रपटात बघितले / पुस्तकांतून वाचले आहेत. सगळ्या खंडात इंग्रजांच्या वसाहतवादाने थैमान घातले होते. मात्र इंग्रजांप्रमाणेच वसाहतवादामधे फ्रेंचही मागे नव्हते. अल्जेरिया हा असाच एक उत्तर आफ्रिकेतील प्रांत. एक फ्रेंच वसाहत. इथली मुळ लोकं अरब. मुसलमान धर्म पाळणारी. ह्या बाहेरच्या फ्रेंच लोकांचं राज्य आलं आणि इंग्रजांप्रमाणे त्यांनीही शासकीय व्यवहार अरबी ऐवजी फ्रेंच भाषेत सूरू केले. गावोगावी मुस्लिमवस्ती आणि फ्रेंच वस्ती असे भाग पडले. तुलनेने फ्रांसला जवळ असल्याने इथे फ्रेंचही मोठ्याप्रमाणात येऊन स्थायिक झाले. कोणत्याही परकीयांप्रमाणे "स्वातंत्र्यप्रिय" फ्रेंच इथल्या अरबांवर अत्याचार करत होतेच. जस जसे अत्याचार, निर्बंध वाढले तसतसे जनमत विरोधात जाऊ लागले. चित्रपटात मुस्लिम पद्धतीने लग्न लावताना देखील लपून छपून लग्न लावताना दाखवून सरकारची वैयक्तिक बाबींमधली ढवळाढवळ स्पष्ट दाखवली आहे.
पुढे FLN ही संघटना तयार होते. याचे म्होरके फ्रेंचांसाठी गुप्त असतात. आणि हा हा म्हणता ते जनमताच्या असंतोषाचे रुपांतर चळवळीत करतात आणि मग येतो १९५७चा गाजलेला संप.. युएन पर्यंत आवाज पोहोचतो.. फ्रेंच पोलिसांना हे सांभाळता न आल्याने फ्रांस आपले सैन्य तिथे धाडते. सैनिक वेगवेगळ्या मार्गांनी अत्याचाराने लोकांना दुकाने उघडायला भाग पाडतात.. पुढे ह्या युद्धाचे काय होते, वेगवेगळे क्रांतीकारक कसे पकडले जातात, FLNचे सगळे नेते कसे समाप्त होतात, त्यांच्या पश्चात काय होते ही अल्जेरियाच्या स्वातंत्र्ययुद्धाची कथा रंजक आहे. चित्रीकरणाचा काळ लक्षात घेता केलेले चित्रणही प्रभावी आहे. कोणताही एकखांबी नेता नसूनही क्रांतीकार्य आणि शांतता याचा योग्यवेळी योग्य वापर करून मिळवलेल्या ही अल्जेरियाची स्वातंत्र्यकथा नक्कीच बघण्याजोगी आहे.
दुसरा चित्रपट आहे ब्लड डायमंड. एक अतिशय गाजलेला हॉलिवूडपट, बर्याच जणांनी नक्कीच पाहिला असेल. मात्र ह्या चित्रपटाशिवाय आफ्रिकेतील एक काळ्या कृत्याची तिव्रता लक्षात येणें कठीण होतं. लिओनार्डो द काप्रिओच्या सर्वांगसुंदर चित्रपटात याची गणना व्हावी. सिएरा लिओन, पश्चिम आफ्रिकेतील एक छोटा देश. मात्र एका गोष्टीमुळे तो अचानक प्रसिद्धी झोतात आला. त्या देशात घडणारी ती गोष्ट आणि तेथील परिस्थितीवर बेतलेला हा चित्रपट. याच्या कथेची सुरूवात होते सॅलोमन व्हँडीच्या घरून. सॅलोमन हा एक शांतपणे जीवन जगणारा, आपल्या मुलाला सुशिक्षीत बनवण्यासाठी धडपडणारा व मुलावर जीवापाड प्रेम करणारा एक आफ्रिकन तरूण बाप. एक दिवस त्यांच्या गावावर अचानक धाड पडते ती RUF च्या टोळक्याची. ते गावातल्या लोकांना मारतात, स्त्रियांची अब्रु लुटतात. सॅलोमन बायको, व तिन्ही मुलांना सोडवतो मात्र स्वतः RUF च्या तावडीत अडकतो. तेही त्याच्या दणकट शरीरयष्टीकडे बघून त्याला कुप्रसिद्ध "हिर्याच्या खाणीत" कामाला लावतात. चित्रपट पहिले वळण घेतो ते त्याला चांगला सुपारीएवढा गुलाबी हिरा मिळतो तेव्हा. RUF पहारेकर्यांपासून लपवून तो हिरा लपवत असतानाच एक गटप्रमुख त्याला बघतो, मात्र तो त्याला पकडण्याआधीच ब्रिटीश त्या खाणीवर हल्ला करतात आणि सॅलोमन तो हिरा जमिनीत गाडतो. पुढे सॅलोमनला जेलमधे ठेवले असताना तिथे डॅनी आर्चर (लिओनार्डो) हिर्यांची तस्करी करताना पकडला जातो.
आणि इथून चित्रपट जो वेग घेतो तो अखेरपर्यंत प्रेक्षकाला काहि मिनिटेदेखील दम घेऊ देत नाहि. लिओनार्डोचं स्वार्थापायी सॅलोमनला मदत करण, मॅडी (जेनिफर कॉनली) नावाच्या स्त्री-पत्रकारामधे त्याचं गुंतणं, व ह्या हिर्यांच्या तस्करीचा पर्दाफाश होण ही एक कथा, आणि कोवळ्या वयाच्या सॅलोमनच्या मुलाला RUFने पळवणं, त्याला बंदूक चालवायला शिकवणं, त्याचं ब्रेन वॉशिंग, आणि त्याचं एका संपूर्ण "चाइल्ड सोल्जर'मधे केलेलं रुपांतर ही दुसरी कथा एकमेकींना समआंतर धावत असतात. ह्या हिर्यआंपायी मुलांची होणारी परवड, त्यावयात सतत डोळ्यासमोर मुग्यांसारखी माणसं मारून त्यांची झालेळी निबर मनं, ह्या हिर्यांमागचं अर्थकारण, निसर्गाने किती घेशील दो करांने विचारत केलेल्या उधळणीबरोबरच शेकडो माणसआंचा नरसंहार सारं सारं सुन्न करत जातं. डॅनी, मॅडी आणि सॅलोमन यांचे एकापेक्षा एकजबरदस्त संवाद, एक नातं, आफ्रिकन उच्चार सारं काही बेमालूम उतरलं आहे. (जर हा चित्रपट बघोतला नसेल) तर काहिहि करून बघाच.
आफ्रिका खंडातील साऊथ आफ्रिका हे त्यातल्यात्यात प्रगत राज्य. इंग्रजांची जुनी वसाहत. स्वातंत्र्यानंतरचे तिथले प्रश्नही आपल्यासारखेच आहेत याची जाणीव झाली तो एक ऑस्कर विजेता चित्रपट (परदेशी भाषा विभाग) "त्सोत्सी" बघून. जोहानसबर्ग हे एक संपन्न शहर, मात्र आपल्या मुंबईप्रमाणे त्याच्याही जवळ आहे "स्वोतो" नावाची अतिप्रचंड झोपडपट्टी. ह्या चित्रपटाचा नायक "त्सोत्सी" ह्याच झोपडपट्टीतील एक गुंड... तरूण, अनाथ.. त्याला त्याची अशक्त आजारी आई आणि त्याच्यावर प्रेम करणारा मात्र क्रूर बाप पुसटसे आठवत असतात... पुढे पाईपलाईनमधे लहानाचा मोठा झालेला हा त्सोत्सी, टोळीसोबत लोकांच्या गाड्या पळविणे आणि त्या विकण्याचा धंदा करत असतो. एकदा मात्र ट्रेनमधे मगिंग करताना त्यांच्याकडून एकाचा खून होतो आणि टोळीत फूट पडते. त्या भरात हा त्सोत्सी एकटा चोरी करायला जातो. जोहानसबर्गमधे एका बंगल्याची मालकिण एकटी घरी येताना त्याला दिसते. ती गेट उघडायला गाडीबाहेर पडते तेव्हा तो गाडी पळवू पाहतो, ती त्याला विरोध करते तेव्हा तो तीला गोळी मारून गाडी पळवून नेतो. काही वेळाने त्याला मागे एका बाळाचा आवाज येतो. बघतो तर मागे एक अतिशय तान्हे बाळ असते.
आणि इथे हा चित्रपट पूर्ण १८० अंशात फिरत नाहि तर आपल्यालाही फिरवतो. आईला एड्स असल्याने बाबांनी त्याला तिच्या जवळही येऊ दिलेले नसते त्यामुळे आईशिवाय जगण्याचे दु:ख भोगलेला त्सोत्सी त्या बाळाला वाढवायचे ठरवतो. एका लहान बाळाची आलेली जबाबदारी त्याच्यात काय बदल घडवते त्याचे अप्रतिम चित्रण म्हणजे हा चित्रपट. मोजके परंतू प्रभावी संवाद, अप्रतिम क्यामेरा आणि सगळ्या कलाकारांचा उच्च अभिनय ह्या चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. अतिशय भावगर्भ आणि आफ्रिकेची वेगळ्याच नजरेतून ओळख करून देणारा हा चित्रपट आपल्या आफ्रिकन सफारीत हवाच.
शेवटी आफ्रिका म्हटलं आणि क्रूरकर्मा इदीआमिन दाराचं नाव आलं नाहि असं कसं होईल? युगांडाचा हा शासनकर्ता कसा होता हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर मिळतं त्याच्या पर्सनल डॉक्टरकडूनच "द लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड" ह्या अजून एका गाजलेल्या हॉलिवूडपटातून. अतिशय कर्मठ ख्रिश्चन कुटुंबातून आलेला व नुकताच डॉ. झालेला निकोलस गॅरीगन आपल्या गर्विष्ट वडीलांपासून दूर पळण्यासाठी म्हणून थेट युगांडाला नोकरी धरतो. इथे एका विचित्र प्रसंगामुळे तो थेट बनतो नुकताच युगांडावर बसलेला हुकुमशहा "इदी आमिन दारा" चा वैयक्तीक डॉक्टर. इथून आपल्याला दिसतो तो इदि आमिन चा विषेश स्वभाव. फॉरेस्ट व्हीट्कर यांची अनन्यसाधारण अॅक्टींग आपल्यापुढे साक्षात इदिआमिन उभा करते. त्याचं बालिश वागणं, त्याचा राग, त्याचं प्रेम, त्याचं राष्ट्रप्रेम, त्याची इंग्रजांबद्दलची मतं सारंच टोकाचं..
चित्रपटात एका क्रूरकर्म्याची ओळख इतक्या संयतपणे करून दिली आहे, की एखाद्या नशेप्रमाणे त्याच्याबद्दची किळस आपल्यात भिनत जाते. त्याचे अत्याचार बराच वेळ न दाखवताही आपल्याला होताहेत हे जाणवतं. चित्रपट संपतो तेव्हा आपण फक्त विचार करत असतो.. आणि लक्षात रहाते त्याच्या अश्लाघ्य कृत्यांपेक्षा त्यांच्यातली सत्तालोलूपता आणि त्यामुळे झालेला नरसंहार. आफ्रिकन इतिहासातील आणखी एक काळंकुट्ट पान लिहिणार्या इदि आमिनबद्दल बरंच वाचायला मिळत, मात्र ह्या चित्रपटाचा ढंग सत्य अतिशय वेगळ्याच वळणाने आपल्यापुढे आणतं.
याव्यतिरिक्त निर्गेन्द्वो इन आफ्रिका ह्या पाचव्या चित्रपटाविषयी इथे वाचता येईलच
थोडक्यात काय तर पर्यटन करण्याबरोबरच ह्या आफ्रिकेत बरंच काहि चालु असतं. तिथेही माणसंच रहातात आणि त्यांचे प्रश्न तुमच्या आमच्यापेक्षा अतिशय गंभीर आहेत हे दिसतं. तेथील गरीबी, अत्याचार, चाईल्ड सोल्जर्स वगैरे आतडं पिळवटवतात आणि तेथील निसर्गसौंदर्य वेड लावते.. मात्र लक्षात रहातात ती तिथली माणसं! ह्या वेगळ्या विश्वाला प्रत्यक्ष जाऊन अनुभवु तेव्हाचं तेव्हा बघु, मात्र तो पर्यंत ह्या चित्रपटांची मजा घ्यालला काय हरकत आहे?
प्रतिक्रिया
30 May 2010 - 12:05 am | Pain
१) Black Hawk Down
२) Tears of the Sun
1 Jun 2010 - 7:05 pm | sagarparadkar
मी "लॉस्ट इन आफ्रिका" हा चित्रपट १९९९ मधे पाहिला होता ...
पर्यटकांची एक टीम अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असते, त्यातील हिरो-हिरोइन सुटका करून घेण्यात यशस्वी होतात. पण पाठलाग करणारा आफ्रिकन तरूण त्यांना अगदी शेवटी बसमधे बसताना गाठतो, पण मग तो त्यांना सोडून देतो ... असं काहिसं कथानक होतं ...
मी हा चित्रपट इन्टरनेटवर खूप शोधला, पण अजून तरी मिळाला नाहिये . कुणाला सापडल्यास कळवावे.
धन्यवाद,
सागर पराडकर
30 May 2010 - 12:09 am | मी-सौरभ
-----
सौरभ :)
30 May 2010 - 8:04 am | भय्या
आणि होटेल रवांडा
30 May 2010 - 11:03 am | टारझन
येस्स मॅण ... हाऊ कॅन फर्गेट "हॉटेल र्'वांडा"...
ब्लड डायमंड आणि द लास्ट किंग ... आणि "हॉटेल र'वांडा" हे चित्रपट पाहिल्यावर अगदी "जगल्यासारखे" वाटतात .... चार दिवस अगदी त्याचाच विचार ... अप्रतिम .. अप्रतिम ... शब्द खुंटले ..
धन्यवाद ऋष्या !!
31 May 2010 - 9:44 am | ऋषिकेश
अरे हो की!.. हा ही एक 'भयंकर' चांगला चित्रपट.. काहि महिन्यांपूर्वी बघितला होता..
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
30 May 2010 - 10:39 am | सहज
ब्लड डायमन्ड्स - द ट्रू स्टोरी हा जालावर उपलब्ध असलेला माहीतीपट जरुर पहा.
ऋ लेख आवडला.
30 May 2010 - 12:34 pm | ऋषिकेश
हा माहितीपट छान आहेच. त्याच बरोबर क्राय फ्रीटाऊन ही डॉक्यूमेंटरी डाऊनलोड केली होती.. ती बघून डोके सुन्न होऊनही थकले होते.
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
30 May 2010 - 1:01 pm | सहज
क्राय फ्रीटाऊन ही डॉक्यूमेंटरी डाऊनलोड केली होती.. ती बघून डोके सुन्न होऊनही थकले होते.
:-(
31 May 2010 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्राय फ्रीटाऊन ही डॉक्यूमेंटरी डाऊनलोड केली होती.. ती बघून डोके सुन्न होऊनही थकले होते.
सहमत आहे.
बाकी, आफ्रीकन सफारीबद्दल धन्यु....!
-दिलीप बिरुटे
30 May 2010 - 12:28 pm | बद्दु
" ६ चित्रपट डाऊनलोड केले त्यात एक डॉक्युमेंटरी आणि ५ चित्रपट होते "
ऋषिकेश -( फ्री ?) डाउनलोडिन्ग चि लिन्क मिळेल काय? जरा डोळ्याना व्यायाम देयिल म्हणतो...कसे?
बद्दु
30 May 2010 - 12:31 pm | ऋषिकेश
मी टोरेंटवरून डाऊनलोड करतो. साधारणतः टोरेंट आयएसओहन्ट वरून डाऊनलोड करतो, अजूनतरी वायरस प्रॉब्लेम नाहि
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
31 May 2010 - 7:11 pm | राजेश घासकडवी
स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द इतिहासावर कोरून ठेवणारे फ्रेन्च ते केवळ फ्रेन्चांसाठीच आहेत हे दाखवून देतात. शेवटी सम आर मोअर इक्वल हेच खरं...
आफ्रिका म्हणजे जंगलं, या पलिकडे जाऊन तिथल्या माणसांची, त्यांच्या संघर्षाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
31 May 2010 - 7:29 pm | सुनील
चांगल्या चित्रपटांची उत्तम ओळख.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
31 May 2010 - 8:36 pm | मस्त कलंदर
ऋ, मस्त ओळख करून दिलीस रे.. यातला ब्लड डायमंड आहेच माझ्याकडे.. राहिलेले पण उतरवून घेईन..
बाकी, आफ्रिका म्हणजे जंगला पलिकडेही काही आहे हे जाणवून दिल्याबद्दल धन्यवाद.
अवांतर: मला आफ्रिका म्हटलं की गॉडस मस्ट बी क्रेझी च आठवतो!!! =)) =)) =))
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
1 Jun 2010 - 3:54 pm | ऋषिकेश
सर्व वाचून प्रतिसाद देणार्यांचे / न देणार्यांचे, तसेच न वाचता प्रतिसाद देणार्यांचे/ न देणार्यांचे असे सर्वांचे आभार!
मक, गॉड मस्ट बी क्रेझी आअठवून मीदेखील =))
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
1 Jun 2010 - 4:02 pm | नील_गंधार
सुंदर परिचय.
नील.
6 Jun 2010 - 11:41 pm | शैलेश देशमुख
चांगला चित्रपट आणि खरी घटनेवर आधारित. जरुर पाहावा.
The Ghost and the Darkness
Directed by Stephen Hopkins
Starring : Val Kilmer, Michael Douglas, John Kani
Release date(s) : October 11 1996