काही तालात, सुरात, काही लयीत चुकले
तुझ्या रूपातले राग मनापासून शिकले
रात्री जागवल्या मालकौंस, बागेसरी गात
आर्त विराण्या गाइल्या जोगियाच्या प्रहरात
भल्या पहाटेला भैरवाच्या चरणी झुकले
काळजात कोमेजले मुक्या कळ्यांचे नि:श्वास
तरि ग्रीष्मकहराचा नाही केला रे दुस्वास
सारंगाच्या सुरांत या वेड्या जिवाला जपले
मल्हाराच्या लडिवाळ, मृदू सरी श्रावणात,
आळविले केदाराचे सूर संध्यावंदनात
तुला भूपात गाताना मीच मला हरवले
अखेरच्या मैफलीत विठू लाज माझी राख
ऐक प्राणांतून घुमणारी भैरवीची हाक
दयाघना, भेट आता; आळवून मी थकले
प्रतिक्रिया
26 May 2010 - 4:46 pm | sur_nair
शास्त्रीय संगीत आपले एकदम आवडते तशी कविता हि आवडली. 'बागेसरी' ने थोडा गोंधळ केला. Typo होता का?
एखादं कडवं संध्यारागांवर हवं होता. मिपावर हि कविता आणि यमनचा उल्लेख नाही. जरा चुकल्याचुकल्या सारखं वाटतं.
26 May 2010 - 5:18 pm | ज्ञानेश...
'राग' वगैरे फारसे कळत नाहीत, पण एकंदर कविता आवडली.
शेवटचे कडवे छान आहे.
पुलेशु.
26 May 2010 - 6:54 pm | मनीषा
अखेरच्या मैफलीत विठू लाज माझी राख
ऐक प्राणांतून घुमणारी भैरवीची हाक
सुरेख कविता ..
26 May 2010 - 7:38 pm | राघव
असेच म्हणतो.
कविता तर सुंदर आहेच,
पण या शेवटच्या ओळी अप्रतीम!
खास दाद देण्यासाठी यायला लावणार्या ओळी या. ब्येश्टेश्ट!! :)
राघव