"....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!"

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in जनातलं, मनातलं
26 May 2010 - 12:16 pm

एका धाग्याच्या संदर्भात नुकतेच दोन ज्येष्ठ सदस्य "मधुबाला" विषयावर चर्चा करत होते ते मी वाचले आणि एका योगायोगाची आठवण झाली.

मी आज असे म्हणायचे कारण म्हणजे नवी दिल्ली इथून माझ्या एका मित्राने या स्वप्न सुंदरीचा ई-मेल ने पाठविलेला फोटो. तसे आंतरजालावर मधुबालाचे शेकड्यांने फोटो उपलब्ध आहेत, पण त्याला अचानकच तेथील एका व्यक्तीच्या खाजगी संग्रहात हा फोटो मिळाला. वर दिलेला फोटो कुठल्याही चित्रपटातील नसून आपण जसे घरगुती कार्यक्रमासाठी एकत्र जमतो त्यावेळी सहज छंद म्हणून कुणाचे तरी फोटो घेत असतो, त्या धर्तीचा हा एक फोटो. या पेक्षा नक्कीच अधिकचे फोटो त्या व्यक्तीकडे असतील पण तोपर्यंत तरी या फोटोची लज्जत काहीतरी वेगळीच म्हणून त्याने दोनतीन दिवसापूर्वी मला पाठवला. या निमित्ताने अजूनही "हिच्यासम हीच" या उक्तीची आठवण झाली.... आणि मला आठवले की आपण मोठ्या पडद्यावर हिचा एकमेव चित्रपट पाहिला तो म्हणजे "मुघल-ए-आझम" तोही बराच गाजावाजा करून काढलेली "संपूर्ण रंगीत" प्रत म्हणून. त्यावेळीदेखील मित्रांसमवेत केलेली चर्चा आठवली की खरच "ब्लॅक अँड व्हाईट" च्या जमान्यात काय वेड लावले असेल या शुक्राच्या चांदणीने सार्‍या रसिकांना! त्यानंतर डीव्हीडी मिळवून मधुबालाचे गाजलेले जवळपास सर्व चित्रपट आम्ही एकत्रित पाहिले. त्यात अर्थातच "चलती का नाम गाडी". "मिस्टर अँड मिसेस ५५", "काला पानी", "बरसात की रात", "अमर", "संगदिल", "झुमरू". तर क्वचित अचानक टीवी वर एकदा "फागुन" आणि "हावरा ब्रीज" हे चित्रपट पाहायला मिळाले. पण जे कोणत्याही स्वरूपात पाहायला मिळाले नाहीत त्याबद्दल अजूनही वाईट वाटते ~ उदा. "महल", "राजहट", "गेटवे ऑफ इंडिया", "इन्सान जाग उठा" इ. नंतर ज्येष्ठ लोकांच्या बरोबरीतील बोलण्यातून तसेच कोल्हापुरातील "टीएफटी" चर्चा माध्यमातून हिच्याबद्दल बरीचशी माहिती मिळत गेली, लेख, पुस्तकेही वाचनात आली.... अन हळूहळू कळायला लागले की "मधुबाला" ने आपल्या सहजसुंदर हसण्याने, दैवी रूपाने अगदी १९५० पासून भारतीय प्रेक्षकांच्या मनावर कशी प्रकारची मोहिनी घातली होती.

या निमित्ताने आपल्या संस्थळावर तिच्याविषयी थोडीशी माहिती. अर्थात बहुतांशी सदस्यांना या 'सुंदरी' विषयी चांगली/बर्‍यापैकी माहिती असणारच, तरीदेखील एक "नोस्ताल्जिया" स्वरूपात हा एक छोटासा लेख.

दिल्ली येथे पठाण कुटुंबात १४.२.१९३३ रोजी जन्म ... मूळ नाव "मुमताज"... एकूण पाच बहिणी... वडिलाचा पोटापाण्याचा खास असा व्यवसाय नसल्याने घरी कायम आर्थिक ओढाताण. त्यामुळे लौकिक अर्थाने मधुबाला कोणत्याही शाळेत गेली नाही, साहजिकच शिक्षण शून्य. (पुढे मुंबईला आल्यानंतर चित्रपट जगतात बर्‍यापैकी जम बसायला लागल्यानंतर खाजगी शिकवणीने वाचनाची सवय करून घ्यावी लागली कारण "संवाद पाठ करणे" जरुरीचे होते. पण "लिखाण" नावाचा प्रकार कधीच हिच्या बोटांना भावाला नाही... चित्रपटांचे करार देखील हिच्यावतीने वडिलच करायचे त्यामुळे हिने आयुष्यात कधी "स्वाक्षरी" तरी केली असेल का नाही ही शंका आहे.) सर्व कुटुंब घेऊन अताऊल्ला खान (वडील) त्या वेळेच्या रिवाजानुसार मुंबईला आले (अर्थात "पोटासाठी मुंबई" हा प्रकार उत्तर भारतात कायमचाच आहे...असो)... कामासाठी स्टुडिओच्या चकरा सुरु झाल्या. त्यावेळी ही पाच वर्षाची अत्यंत देखणी अशी बाल कलाकार म्हणून देविका राणी यांनी तिला "बेबी मुमताज" या नावाने पुढे आणले. पुढे नायिका वयाच्या १४ व्या वर्षीच झाली. नायक होते राज कपूर. "मधुबाला" असे नामकरणदेखील देविका राणी यांनीच केले. मात्र हिंदी सिने जगतात "स्टार" चा दर्जा मिळाला "महल" मुळे. (याच चित्रपटामुळे "मधुबाला" आणि "लता मंगेशकर" घराघरातील नाव झाले ~ "आयेगा आनेवाला" कारणाने.)

मग दिलिपकुमारचे (जो तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा होता...) हिच्या आयुष्यात आगमन.... मग ते बहुचर्चित पण असफल प्रेम प्रकरण.... यशस्वी चित्रपटांची नायिका म्हणून सर्वत्र कौतुक, पण बापाचा घरी प्रचंड दरारा असल्याने मनात असूनदेखील ही आपल्या प्रेमासाठी "टिपिकल हिंदी सिनेमा" धर्तीचे बंड करू शकली नाही.... मग ठरलेले वैफल्याचे जगणे... बाप आणि बहिणी यांच्यासाठी "मधुबाला" म्हणजे नोटा छापण्याचे मशीन असल्याने तिने त्या घरातून निघून जाणे म्हणजे बाकीच्यांनी उपाशी मरणे हेच होणार असल्याने कावेबाज बापाने ती "बिनलग्नाची"च राहील असेच पाहिले. मात्र ज्यावेळी तिने किशोरकुमार बरोबर लग्न केले तो पर्यंत तिचे शरीर ह्रदय विकाराने पोखरले होते व चित्रपटात काम करणेदेखील जवळपास बंद झाले होते. किशोरकुमारच्या अगोदर या ना त्या माध्यमाने तिने दिलीपकुमार समवेत "ते नाते" पुन्हा प्रस्थापित व्हावे असे बरेच प्रयत्न केले, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, याला कारण दिलीपकुमारला "नया दौर" दरम्यान झालेला कोर्ट खटल्याचा ताप व ते सर्व मधुबालाच्या हट्टामुळे झाले ही समजूत घेऊन त्याने तिच्या नावावर मारलेली फुली. किशोरकुमार बरोबरचे लग्न ही बाब दोघासाठी कसेतरी जगण्यासाठी केलेली तडजोड होती जिचे अंतिम रूप त्यांना माहित होते. ह्रदयविकारामुळे ती कधीही आई होऊ शकत नव्हती हे डॉक्टर्सनी सांगितल्यामुळे तो हर्ष देखील तिला कधीच मिळणार नव्हता.

निम्मी, नादिरा आणि संगीतकार नौशाद अशी तीन चार मंडळीच तिला मित्र म्हणून लाभले होते. लग्नानंतर अधेमध्ये केव्हातरी नौशाद यांच्या घरी ती ये-जा करायची. अशाच एके दिवशी नौशाद पतीपत्नींनी तिला नैराश्याने रडताना पाहिल्यावर किशोर बरोबर फारकत घेण्याचा सल्ला दिला व पुनश्च नव्या जोमाने चित्रपटात येण्याचा आग्रह केला, पण फुलात तो जोम आता राहिला नव्हता. नौशादना उत्तर म्हणून तिने फक्त एक "शेर" ऐकीवला :

"जब कश्ती साबित-ओ-सालीम थी
साहिल कि तमन्ना किसको थी ?
अब ऐसी शिकस्त कश्ती में
साहिल कि तमन्ना कौन करे ?..."

खरं आहे, शेवटपर्यंत मधुबालेला "किनारा" मिळालाच नाही आणि वादळार नाव भरकटतच राहिली....आणि दि. २३.२.१९६९ ला वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी या "शुक्राच्या चांदणीचा" लोप झाला.

काही गोष्टीबाबत म्हणताना, वाचताना आपण अनुभवतो की "होतील बहु, असतील बहु... पण हिच्यासम हीच..." ~ मधुबालाला हे वर्णन अचूक लागू होते. जितकी वर्षे सिनेमाच्या मायावी दुनियेत ती होती, तितकी वर्षे तिने "घर ते स्टुडिओ व काम संपल्यानंतर परत घरी...." हाच दिनक्रम अंगिकारला होता. कोणत्याही सभा समारंभाला जाणे नाही. फिल्मी पार्ट्यात सामील नाही....मुलाखती, फोटो सेशन नाही. चित्रपटांच्या "प्रिमियर" ना हजेरी नाही. (अपवाद फक्त "इंसानियत" चा. ~~ बाकीचे राहू दे पण "मुघले आझम" च्या प्रिमियरला झाडून सारी हिंदी सिनेसृष्टी हजर होती, पण ही "अनारकली" ने मात्र घरीच राहणे स्वीकारले); सीने मॅगेझिन्स पासून दूर... त्यामुळे कोणत्याही "सो-कॉल्ड अ‍ॅवॉर्डस" देणार्‍या संघटनांनी तिला अवार्डससाठी कधीच "पात्र" मानले नाही. 'फिल्म फेअर' ने तर "मुघले आझम" देशभर गाजत असताना आणि मधुबालेच्या अनारकलीला जनतेने डोक्यावर घेतले असतानाही जाणीवपूर्वक "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री" चा त्या वर्षीचा पुरस्कार "बिना रॉय" या अभिनेत्रीला "घुंघट" या चित्रपटासाठी दिला होता. पण याचे वैषम्य वाटण्याच्या पलीकडे मधुबाला गेली होती. तिला एवढेच माहित होते की सारा देश तिच्यावर प्रेम करतो....आणि त्यांचे प्रेम हाच तिच्या नजरेत सर्वोच्च सन्मान होता.

भारतच काय पण हॉलीवुडपर्यंत हिच्या "दैवी सौंदर्य" ची कीर्ती गेली होती. जगप्रसिद्ध दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांनी भारतात येऊन तिला हॉलीवुडमधील चित्रपटात चमकविण्याचे प्रयत्न केले होते...पण इथेही तिचा तो बाप आडवा आलाच. काप्रामुळे तिच्याबद्दल तेथील माध्यमांनी यामुळे खूप लिखाण केले. १९५२ च्या तेथील एका नियतकालिकात असे म्हटले गेले की, "Madhubala ~~ The biggest star in the world and she is not in Beverlie Hills."

नर्गिसनंतर भारतीय टपाल खात्याने "तिकीटा" चा मान दिला तो केवळ "मधुबाला" या खर्‍याखुर्‍या अप्सरेला !! ते हे तिकीट ~~

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

26 May 2010 - 12:52 pm | आनंदयात्री

इस्किलार साहेब. अत्यंत सुंदर लेख. खुप आवडला.

इन्द्र्राज पवार's picture

26 May 2010 - 6:09 pm | इन्द्र्राज पवार

"....लेख खुप आवडला.

आपली प्रतिक्रियाही मला अशीच आवडली. वास्तविक तसा लेख खूपच मोठा झाला होता, पण जागाभयास्तव बरीच काटछाट करावी लागली... अर्थात एखाद्या व्यक्तीबद्दल, प्रसंगाबद्दल लिहिताना भावुक झालो की मग जागेची मर्यादा लक्षात येत नाही. पण जो काही मजकूर येतो तो जर तुमच्यासारख्यांना पसंत पडला तर आनंद हा होतोच होतो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

शानबा५१२'s picture

26 May 2010 - 1:04 pm | शानबा५१२

राग मानु नका व मनावरही घेउ नका(प्रतिक्रियेचा नी आपला संबधच नाही अस म्हणा हव तर).................पण जरा ह्या प्रतिक्रियेतुन थोड मनातल लिहतोय......
एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यामुळे त्याची/तीची प्रशंसा करणे ,त्याला/तिला ईतरांपेक्षा वेगळी वागणुक देणे म्हणजे शुद्र विचार होय........असे माझे मत.
अहो शारीरीक सुंदरता कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??मग एखाद्या व्यक्तीची त्यासाठी प्रशंसा का??
बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुसकी आणि तत्सम "गुण" हे "कमवावे" लागतात,आणि ते असणा-यांची प्रशंसा करणे,तशा व्यक्ती आवडण म्हणजे ख-या गुणांची कदर करने होय.
आज शारीरीक सौदर्याला महत्व देणा-या जगात ही विधानच 'चुं'गीरीची वाटतात पण ती तेवढीच खरी आहेत.
एखादा सुंदर पोरीशी कसा बोलतो,वागतो आणि त्याच जागी एखादी काळी पोर आली की कसा त्याचा स्वभाव बदलतो हे आपणही पाहीलच असेल कधीतरी.
असल्या लो़कांना आपण कधी काडीची कींमत दीली नाही/देणार नाही.

आणि त्या कोण त्याने हे असे ती़कीट काढल ना त्याचा धिक्कार!!च्यायला तिला काय scientists च्या रांगेत बसवता का??

कोणी म्हणू नका की चांगल्या गोष्टीची प्रशंसा केली पाहीजे म्हणुन आहो हो खर आहे पण म्हणुन काय दुस-यांना हीनवायच....हो.मग.........तुम्ही हीनवताच अस करुन!!

*************************************************
टीव्हीसारख्या छोट्या डब्यात ती एवढी मोठी माणस घुसतात तरी कशी??

चेतन's picture

26 May 2010 - 4:09 pm | चेतन

>>बुद्धीमता,चांगला स्वभाव्,बोलण्,चातुर्य,मानुसकी आणि तत्सम "गुण" हे "कमवावे" लागतात,आणि ते असणा-यांची प्रशंसा करणे,तशा व्यक्ती आवडण म्हणजे ख-या गुणांची कदर करने होय.

वर दिलेल्या गोष्टी कोणी स्वबळावर,मेहनतीवर कमवत का??
उत्तर जर हो असेल तर शारीरीक सुंदरता स्वबळावर,मेहनतीवर कमवतात

>>आज शारीरीक सौदर्याला महत्व देणा-या जगात ही विधानच 'चुं'गीरीची वाटतात पण ती तेवढीच खरी आहेत.

खरी आहेत हे महत्वाचे

असो लेख मस्त झालाय

चेतन

आवशीचो घोव्'s picture

26 May 2010 - 6:55 pm | आवशीचो घोव्

आयला कोणी कोणाला हिणवलं आहे इथे? तुमचं आपलं काहीतरीच. तिकीट किती सुंदर दिसतय ते पहा.

इन्द्र्राज पवार's picture

26 May 2010 - 7:55 pm | इन्द्र्राज पवार

तुमच्या प्रतिक्रियेला स्वतंत्र उत्तर तुम्ही याच संदर्भात लिहिलेल्या धाग्यावर दिले आहे, कृपया ते उत्तरच इथेदेखील आहे असे समजावे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 May 2010 - 1:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर लेख! मधुबालेला घरी मिळालेल्या वागणूकीबद्दल आणि तिच्या अकाली निधनाबद्दल नेहेमीच वाईट वाटतं.

अदिती

(अगदी अवांतर निरिक्षणः या खोलीतली बटणं, रेग्युलेटर्स, दिसली आणि आत्ताची बटणं पाहिली की "नॅनो टेक्नॉलॉजीचा" प्रभाव लगेच जाणवतो.)

मस्त कलंदर's picture

26 May 2010 - 2:25 pm | मस्त कलंदर

अवांतरासह सर्व गोष्टींशी अगदी सहमत...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

इन्द्र्राज पवार's picture

26 May 2010 - 3:15 pm | इन्द्र्राज पवार

"...सुंदर लेख! ..

हे भगवान तुझे शतशः आभार बाबा ! निदान या फोटोत तरी "वि.अ" ना "मधुबाला" तिरळी वाटली नाही...! (का यांचे लक्ष तिच्या चेहर्‍यापेक्षा खोलीतली बटणं, रेग्युलेटर्स यांच्याकडे ज्यादा होते???)

श्रामो.ना देखील आनंद होईल.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2010 - 4:34 pm | परिकथेतील राजकुमार

मालक, अतिशय उत्कॄष्ट लेखन हो.

लेख उघडल्या उघडल्या आधी १० मिनिटे डोळे भरुन फोटु पाहुन घेतला आणी मग डोळे निवल्यावर लेख वाचायला घेतला.

धन्यवाद.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

इन्द्र्राज पवार's picture

26 May 2010 - 5:04 pm | इन्द्र्राज पवार

"....डोळे निवल्यावर लेख वाचायला घेतला...."

धन्यवाद ! "डोळे निवले..." यापेक्षा अधिक चांगली दाद ती कुठली?

लेख खूप मोठा होत होता... पण कशीबशी काटछाट करून योग्य त्या प्रमाणात बसविण्याची कसरत केली... तरीही तुम्हाला आवडला हे पाहुन केलेल्या कपातीचे वैषम्य वाटत नाही.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2010 - 4:45 pm | बिपिन कार्यकर्ते

लेख चांगलाच झालाय... सौंदर्याला नेहमीच काय शाप असतो कळत नाही. मधुबालाबद्दल खूप म्हणजे खूपच वाईट वाटत आलंय.

बिपिन कार्यकर्ते

इन्द्र्राज पवार's picture

26 May 2010 - 11:42 pm | इन्द्र्राज पवार

"...मधुबालाबद्दल खूप म्हणजे खूपच वाईट वाटत आलंय...

तुम्हाला वाईट वाटत आलंय हीच तुमच्यातील रसिकत्वाची खूण होय.... नाहीतर या मायावी दुनियेत किती आले अन् किती गेले त्यांची फिकीर कोण करतेय? एखादीच "मधुबाला" जिच्या अकाली जाण्याने रसिकांचा जीव हळहळला होता.

नाहीतर एकदोन वर्षापूर्वी ती कोण ती "परवीन बाबी" गेली... ज्या दिवशी गेली त्याच दिवशी एकदोन ठिकाणी कायबाय छापून आले ... आणि दुसर्‍या दिवसापासून ती इतिहासजमा !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भडकमकर मास्तर's picture

26 May 2010 - 5:54 pm | भडकमकर मास्तर

फोटो उत्तम्..लेख ही छान
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

ज्ञानेश...'s picture

26 May 2010 - 6:21 pm | ज्ञानेश...

तुमचा लेख अतिशय आवडला. =D>
फोटोबद्दल- पराशी सहमत.

आवशीचो घोव्'s picture

26 May 2010 - 6:48 pm | आवशीचो घोव्

तुमचा लेख वाचून द्वारकानाथ संझगिरींचं एक वाक्य आठवलं. सचिन इतकचं मधुबालेवर पण त्यांच प्रेम आहे. ते एकदा म्हणाले की "बरं झालं मधुबाला ३६ वर्षाची असताना गेली. त्यामुळे तिचा तो सुंदर चेहेरा मनात कायम आहे. चिरतरूण!!!. वृद्ध मधुबालेचा चेहेरा बघवला नसता."

मर्लिन मन्रो च्या बाबतीत सुध्द्दा हेच म्हटलं जातं.

इन्द्र्राज पवार's picture

26 May 2010 - 11:36 pm | इन्द्र्राज पवार

"....वृद्ध मधुबालेचा चेहेरा बघवला नसता."

१००% सहमत.... तिची जादू पिढ्यानपिढ्या समाजमनावर यासाठीच आहे की ती आपल्यातून योग्य त्या वयात गेली. खरं तर ही समजूत म्हणजे आपला "स्वार्थीपणा" स्पष्टपणे दर्शवितो, असे असले तरी हा दृष्टीकोण तिच्याविषयी आपणाला किती प्रेम वाटते हेच दर्शविते.

"साधना" चे उदाहरण "मेरे मेहबूब" पिढीतील रसिकापुढे आहेच. चेहरा आता अत्यंत खराब झाला म्हणून रसिकांच्या नजरेतून आपण उतरू नये म्हणून साधनाने हाँगकाँग येथे कायमचे वास्तव्य केले आहे ते या भूमिकेतूनच !

मागील कालखंडातील आशा पारेख, राखी, झीनत अमान या एक काळ गाजविलेल्या रूपगर्वितांना आता समोर फोटोग्राफर नको वाटतो तो याच एका कारणासाठी.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

स्वाती२'s picture

26 May 2010 - 8:21 pm | स्वाती२

फोटो आणि लेख दोन्ही खास!

भारद्वाज's picture

26 May 2010 - 9:17 pm | भारद्वाज

लेख एकदम मस्त झालाय. अतिशय आवडला. मीसुद्धा परासारखेच केले.

रामदास's picture

26 May 2010 - 9:35 pm | रामदास

http://www.misalpav.com/node/6074 धाग्याची आठवण झाली.

शिल्पा ब's picture

26 May 2010 - 10:07 pm | शिल्पा ब

मधुबालेचा काळा पांढरा फोटो अतिशय छान आहे....सध्या घरातल्या वेशातही किती निरागस आणि छान दिसते...लेख आवडला.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मदनबाण's picture

26 May 2010 - 10:36 pm | मदनबाण

छान लेख...
खालील चित्र मला इ-पत्रातुनच आली आहेत...

(सौंदर्यभोक्ता)... ;)
मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

शिल्पा ब's picture

26 May 2010 - 10:45 pm | शिल्पा ब

फोटो मस्तच आहेत ...साधी, सुंदर आणि निरागस मधुबाला...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

इन्द्र्राज पवार's picture

27 May 2010 - 12:47 am | इन्द्र्राज पवार

होय. हे सर्व फोटो मलाही आले आहेत...तथापि मी उत्सुक आहे तो दिल्लीच्या पहाडगंज भागात एक किरकोळ कापडाच्या दुकानदाराकडे असलेल्या मधुबाला कुटुंबाच्या फोटो आल्बमबाबत. त्या मित्राने मोठ्या मिनतवारीने त्या दुकानदाराच्या दाढीला हात लावून निदान ही माहिती तरी मिळविली आहे की, त्या आल्बममध्ये मधुबालाच्या अन्य चार बहिणींचे तिच्या समवेत फोटो आहेत. साधारणतः तिची "चंचल" ही एकच बहिण सिनेजगताला माहित आहे, पण अन्य तिघींची काहीच वास्तपूस्त नाही.... म्हणूनच मी थोडा उत्सुक आहे की वरील फोटोसारखाच अचानकपणे तोही लॉट हाती यावा. लेट अस सी.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अविनाशकुलकर्णी's picture

27 May 2010 - 12:29 am | अविनाशकुलकर्णी

बाकि चर्चेत रस नाहि..मधुबाला सुंदर होति दिसायला.व आता ओनली माधुरी

प्राजु's picture

27 May 2010 - 12:55 am | प्राजु

मलाही हे फोटो आले होते इपत्रातून.

लेखा आवड्ला.
मागे एकदा, बेसनलाडू ने मधुबाला वर लेख लिहिला होता. बेला, लिंक दे रे त्याची. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

बेसनलाडू's picture

27 May 2010 - 3:13 am | बेसनलाडू

..'परी' हिच्यासम हीच असे त्या लेखाचे शीर्षक होते. तो लेख सध्या येथे आहे. मिसळपाववरून काही वैयक्तिक कारणामुळे मी तो काढून टाकला होता.
(वैयक्तिक)बेसनलाडू

इन्द्र्राज पवार's picture

27 May 2010 - 10:55 am | इन्द्र्राज पवार

"....तो लेख सध्या येथे आहे...."

"तो" लेख आताच वाचून पूर्ण केला.... इतका सुरेख, आवश्यक त्या माहितीसह वाचकांना दिला होता तर तो का काढून टाकला याच्या कारणमीमांसेत न जाता इतकेच म्हणतो की तो लेख मला इथे पाहायला मिळाला असता तर मी माझा वरील लेख लिहायलाच घेतला नसता. असो.

फक्त एकच शंका आहे.... आपण त्या लेखात दिलिपकुमार्+मधुबाला संबंधात "ज्वार भाटा" चा उल्लेख केला आहे. "मधुबाला" विषय संदर्भात मला कुठेच या चित्रपटाचा वा दोघांच्या ओळखीचा धागा आढळला नाही... शिवाय ज्वार भाटा हा १९४४ चा चित्रपट, म्हणजेच मधुबाला त्या वर्षी केवळ अकरा वर्षाची होती. दिलिपकुमारसमवेत तिचा पहिला चित्रपट होता "तराना".... आणि इथूनच ती दोघे एका गुलाबी प्रवासाला लागले होते ज्याचा शेवट निराशजनक झाला.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

बेसनलाडू's picture

27 May 2010 - 11:21 am | बेसनलाडू

दिलीपकुमारशी तिची पहिली भेट 'ज्वार भाटा'च्या सेट वर झाली होती. गुलाबी प्रवास तुम्ही म्हणताय तसे 'तराना'पासून चालू झाला, असे वाटते. 'टीनेज क्रश' वगैरेचे खरोखर(च) प्रेमात रुपांतर झाल्यासारखे :) चू. भू. द्या. घ्या.
(अंदाजपंचे)बेसनलाडू

स्पंदना's picture

27 May 2010 - 9:08 am | स्पंदना

कित्ती खळाळुन हसायची ती!! तुम्ही तिला कशीही पहा, हाच अँगल पाहिजे, कॅमेरा असाच लावला पाहिजे, काही नाही. लेख सुंदर. पण प्रतिक्रीयेत दिलेले फोटो निव्वळ अप्रतिम .

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

पैसा's picture

14 Feb 2013 - 6:37 pm | पैसा

आज मधुबालाचा वाढदिवस!

आबा's picture

14 Feb 2013 - 6:50 pm | आबा

हे फोटोज जेम्स ब्रुक ने काढले होते लाईफ मासिका साठी. ते फारसे दुर्मिळ नाहित, मदनबाण यांनी या सिरिज मधले काही फोटोज वर दिलेलेच आहेत.

सुनील's picture

14 Feb 2013 - 7:23 pm | सुनील

पवारसाहेब कुठे गायबलेत?

सध्याचे काही धागे बघून. ते असते तर प्रतिसादांची बहार आली असती, असे वाटते!

सोत्रि's picture

15 Feb 2013 - 12:27 pm | सोत्रि

अगदी मनापासून सहमत!
-(पवारसाहेब कुठे गायबलेत ह्या विचारात बुडालेला) सोकाजी

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Feb 2013 - 12:31 pm | बिपिन कार्यकर्ते

;)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2013 - 1:08 pm | परिकथेतील राजकुमार

बिकांच्या प्रतिक्रियेचे शिर्षक '(No subject)' असे आले आहे. ते खरेतर '(No comments)' असे हवे आहे.

हो का नाही हो बिका ? ;)

पैसा's picture

15 Feb 2013 - 1:53 pm | पैसा

तुम्ही दोघे असे बोलताय की तुम्हाला इन्द्राचा ठावाठिकाणा माहित आहे!

दत्ता काळे's picture

15 Feb 2013 - 2:17 pm | दत्ता काळे

लेख आवडला.

bharti chandanshive१'s picture

15 Feb 2013 - 4:56 pm | bharti chandanshive१

अत्यंत सुंदर लेख आणि फोटो मस्तच आहेत ...साधी, सुंदर आणि निरागस मधुबाला...