धनाची पेटी.... ?
`धवल क्रांती' हा शब्द जिथे रूढ झाला, त्या गुजरातेच्या शेजारी, पंजाब, हरियाणामध्ये एक भीषण सामाजिक समस्या केव्हापासून थैमान घालते आहे. ती दूर करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सामाजिक भान असलेल्या संघटना कधीपासून अक्षरश: झगडताहेत. पण होतेय उलटेच. या समस्येचे हातपाय देशभर पसरतायत. यातून एक भयावह भविष्य रुजते आहे, याची जाणीवही सगळ्यांना आहे. या समस्येवर पुरेशी जनजागृती झाली नाही, असेही नाही. कदाचित, ही समस्या इथे कधीतरी डोके वर काढणार, याची चाहूल आपल्या पूर्वजांनाही कित्येक वर्षांपूर्वी लागली असावी, म्हणूनच, तेव्हापासूनच या समस्येच्या जाणीव जागृतीला सुरुवात झाल्याचे पुरावे सापडतात. एकीकडे सामाजिक रूढींचा पगडा, आणि दुसरीकडे जाणीव जागृतीचे प्रयत्न... कदाचित, या संघर्षात, रूढी-विचारांनी प्रयत्नांवर मात केली, आणि अखेर, भूतकाळाने नोंदविलेली ही समस्या वर्तमानात जन्माला आलीच... आता भविष्यातही तिचे ओझे आपल्याला वाहावे लागणार आहे... कदाचित, ते इतके जड असेल, की आपल्याला ते पेलवणारदेखील नाही... आपण कोलमडून जाऊ... विस्कटून जाऊ, आणि नैराश्याचे भूत समाजाच्या मानगुटीवर बसेल...
... असे झाले, की एक स्थिती नक्की असते, हे इतिहासावरूनच वारंवार सिद्ध झाले आहे..
अराजक !...
... माणसांच्या मनावर जंगली, असंस्कृत, पाशवी वृत्तीचा पगडा, आणि, आत्मघात!!
झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं अवघड असतं, असं म्हणतात... इथे तसंच होतंय.
कित्येक वर्षांपासून ह्या भविष्याचे भान द्यायचा प्रयत्न सुरू आहे, तरीही आपण जागे होत नाही, म्हणजे, हे झोपेचं निव्वळ सोंग आहे...
+++ +++ +++
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले... देशभरात सगळ्याच राज्यांची विधिमंडळ अधिवेशनेही याच काळात `संपन्न' झाली. देशाच्या संसदेचे अधिवेशनही नुकतेच संपले...
या दरम्यान, सगळीकडे या समस्येवर `सोपस्कारापुरती' चिंताही व्यक्त झाली, आणि या समस्येचे वास्तव सामोरे आणणारी सरकारी आकडेवारीही जाहीर झाली...
... ह्या आकडेवारीतला तथ्यांश लक्षात घेतला, तर, आज दर हजार पुरुषांमागे जवळपास साडेआठशे स्त्रिया असे प्रमाण आहे.
म्हणजे, आपल्या `विवाहसंस्कृती'ला आव्हान देणारी धोक्याची घंटा अजून वाजतेच आहे...
`माणुसकी'च्या व्याख्येला काळीमा लावणारा भविष्यकाळ यातून डोकावतोच आहे...
उद्याच्या अंधाराचे सावट दाट होते आहे...
... हीच ती समस्या आहे.
आता ही समस्या लपून राहिलेली नाही. तरीही, रूढी-परंपरांचा पगडा आपली मानगूट सोडत नाहीये.
... मेल्यानंतर मुलाने अग्नि दिला नाही, तर आत्म्याला शांति मिळत नाही, असे म्हणतात... आजवर याच समजूतीमुळे अनेक आत्म्यांना स्वर्गप्राप्ती झाली असेल...
पण अनेक घरांच्या `कुलदीपकां'नी ही समजूत खुंटीला टांगली आहे...
म्हणून दक्षिणेकडे, केरळसारख्या श्रीमंत, सुशिक्षित राज्यात, मुलाने `गल्फ'मधून पाठविलेल्या भक्कम पैशांच्या पुंजीवर पश्चिमेकडे झुकलेली असंख्य जोडपी चांगल्या अर्जाच्या वृद्धाश्रमांत दक्षिणेकडे डोळे लावून `बोलावण्या'ची वाट पाहात जगताहेत...
मुलगाच हवा, ह्या समजुतीत, तीन दशकांपूर्वीच्या कुटुंब कल्याणाच्या धडक मोहिमेची भर पडल्यानंतर स्त्री-पुरुष लोकसंख्येतील विषमतेची समस्या आता चटके देऊ लागली आहे.
चीनमध्ये, लोकसंख्या नियंत्रणाच्या अशाच धडक मोहिमांनंतर आता युवकांपेक्षा वृद्धांची संख्या तिथे वाढली आहे, असे तेथील आकडेवारी सांगते...
भारतात, या मोहिमेला समजूत, रूढींची जोड मिळाल्याने, मुलगा झाला, की कुटुंब परिपूर्ण झाल्याचे समाधान लाखो कुटुंबानी मिरविले...
आता तेच समाधान समस्येच्या रूपने थैमान घालू लागले आहे...
... पण, कोणत्याही चुकीची दुरुस्ती होऊ शकते, असे प्रगत विद्न्यान आज अस्तित्वात आहे.
म्हणजे, संगणकाच्या भाषेत, एखादी कृती `अन-डू' केली, की त्याची दुरुस्ती होते.
मुलगा हवाच, अशी समजूत रूढ करणार्या आपल्या संस्कृतीलादेखील आपल्या या चुकीची जाणीव झाली होती.
म्हणूनच, `बेटी म्हणजे धनाची पेटी' असा समजही रूढ करण्याचा प्रयत्न संस्कृतीने केला असावा. पण तो रुळला नाही...
हे आपल्या संस्कृतीचे कदाचित अपयश असेल...
+++ +++ +++
दोन वर्षांपूर्वी, ८ मार्च २००८ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमिताने आखलेल्या एका सप्ताहाच्या समारोपाला, दिल्लीत महिला -बालकल्याण मंत्रालयाने स्त्री-भ्रूणहत्या या विषयावर एक परिषद आयोजित केली होती. स्त्री भ्रूणहत्येचे चिंताजनक वाढते प्रकार समाजाला कुठे घेऊन जातील, याचे एक भयंकर चित्र या परिषदेत पुन्हा मांडण्यात आले, आणि देशव्यापी जनजागृती करण्याचे पुन्हा एका ठरले. स्वयंसेवी संस्था, प्रसार माध्यमे, करमणूक क्षेत्र, धार्मिक-अध्यात्मिक गुरू, वैद्यकीय व्यावसायिक, सर्वांनी या मोहिमेत झोकून द्यावे, अशी गरज तेथे पुन्हा उच्चारली गेली...
+ ग्रामीण भागापेक्षा, शहरी, सुशिक्षित भागात गर्भलिंग चाचणीचे प्रकार अधिक असल्याचे या परिषदेत अधिकृतपणे स्पष्ट झाले...
+ पंजाब, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली येथे स्त्री-पुरुष प्रमाणातील विषमता सर्वाधिक असल्याची माहितीही पुन्हा सामोरी आली...
+ अगोदर एक मुलगी असेल, तर दुसरी मुलगी होऊ देण्याची मानसिकता ४४ टक्के लोकांमध्ये नाही, हेही स्पष्ट झाले...
+ झपाट्याने घटत्या स्त्री-पुरुष प्रमाणातून, महिलांचा लैंगिक छळ, शोषण, अत्याचार, बलात्कार, छेडछाड, महिलांची तस्करी, आणि, महिलांना अनैतिक व्यवसायात `ढकलले' जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली...
... या सर्वांतून, एक धोका पुन्हा समोर आला आहे.
समजा, देशात, दर एक हजार पुरुषांमागे सुमारे साडेआठशे स्त्रिया असे विषम प्रमाण राहिले, तर त्याचा अर्थ, दर एक हजार पुरुषांमागे, दीडशे पुरुषांना विवाह नाकारला जाईल...
... भारताची लोकसंख्या अब्जावधी असल्याने, विवाह नाकारल्या गेलेल्यांची संख्या काही कोटींमध्ये असेल...
कदाचित, या समस्येतून मानसिक आजार, विकार बळावतील, आणि संस्कृतीच्या चौकटीत त्यावर कोणताच उपाय नसेल... मग अनैतिकता हीच संस्कृती होईल...(?)
... या भविष्याची चाहूल आजच लागली आहे, तरीही आपण निर्धास्त आहोत..
का?
+++ +++ +++
... परवाच्या एका बातमीमुळे हे सगळं डोक्यात भिणभिणायला लागलं...
अहिंसेचे उपासक महात्मा गांधीजींच्या गुजरातेत, `धवल क्रांती'चा नारा घुमला, आणि दुग्धोत्पादनातून राज्याला समृद्धी येते, याचा सक्षात्कारही झाला. आता, दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी गुजरात झपाटले आहे...
त्यासाठी गायींची संख्या वाढविली पाहिजे... म्हणजे, गायींची पैदास वाढविली पाहिजे...
त्यावर सरकारने एक उपाय शोधलाय.
गायींची गर्भलिंग चाचणी करण्याचा!!
यापुढे, गायीच्या पोटात मादीचा गर्भ असेल, तरच तो गर्भ जन्म घेईल...
नाहीतर?...
.... मागे, निवडणुकीच्या निमित्ताने रिपोर्टींग करण्यासाठी मी विदर्भात खेडोपाडी फिरलो... आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांच्या व्यथा ऐकल्या, अनुभवल्या...
पंतप्रधान पॆकेजमधून गायींचे वाटप झाले, तेव्हा `यंत्रणे'ने कालवडी काढून घेतल्या, आणि नर जातीची वासरे दुभत्या गायींसोबत वाटली...
आपल्या पोटचा जीव पैशाच्या लोभापायी हिरावून घेतल्या गेलेल्या त्या गाय़ीनी परकी बाळे जवळ केलीच नाहीत, आणि दूध द्यायचे नाकारले...
यातून दोन संकटे ओढवली...
एक म्हणजे, आत्म्हत्याग्रस्तांची कुटुंबे उपाशीच राहिली,
दुसरे, कित्येक गायी आपल्या पोटच्या बछड्यांपासून दुरावल्या...
यातून दुसरे काय होणार?...
तर, गुजरातेत आता गाय-बैलांच्या जन्मदरातही जाणीवपूर्वक विषमता आणण्याचा प्रयोग होणार आहे...
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच राज्यात, माणसांच्या मुलींचा जन्म नाकारण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे...
इथे माणसाच्या मुलींना बंदी, आणि जनावरांच्या नरांना बंदी...
म्हणजे, जिथे गायी स्वीकरल्या, तिथे मुली मात्र नाकारल्या जातायत..
हा दुटप्पीपणा आला कुठून?
पैसा !!
माणसाने `बेटी ही धनाची पेटी' हा समज माणसाच्या बाबतीत नाकारला, आणि जनावरांच्या बाबतीत स्वीकारला...
खरे?
-----------------------
http://zulelal.blogspot.com
---------------------------------------------------------
प्रतिक्रिया
17 May 2010 - 9:36 am | सहज
बघु किमान मागणी पुरवठा असमतोलामुळे स्त्रियांना(मताला/ इच्छेला/ चॉईसला) जास्त भाव येइल.
पण यावर युयुत्सु यांचे विवेचन वाचायला मजा येईल. -)
17 May 2010 - 9:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जिथे इच्छेविरुद्ध पाच पुरूषांशी लग्न करणार्या द्रौपदीच्या गोष्टी सांगितल्या जातात त्या देशात हे खरंच होईल??
अदिती
17 May 2010 - 9:44 am | सहज
बघु (होपफुली) शब्द राहीला म्हणता ?
17 May 2010 - 2:21 pm | राजेश घासकडवी
या विधानाला पुष्टी देणारे संदर्भ द्याल का? आत्तापर्यंतच्या सेन्सस सर्वेक्षणात ते प्रमाण हजारामागे नउशेपन्नासच्या आसपास दिसून आलेलं आहे. प्रगत देशांपेक्षा हे फारसं वेगळं नाही. प्रश्न नाकारायचा नाही, फक्त आकडेवारी तपासून पाहायची आहे.
एकंदरीत लेख थोडा भडक वाटला, व चुकीच्या आकडेवारीने प्रश्न फारच भीषण आहे असं वाटण्याची शक्यता आहे.
17 May 2010 - 5:46 pm | वेताळ
आकडेवारी खरी आहे. महाराष्ट्रात तर हे प्रमाण दर हजारी ८३० असे आहे.कोल्हापुर मध्ये हेच प्रमाण दर हजारी ७४० इतके आहे.
वेताळ
17 May 2010 - 2:44 pm | अरुंधती
लेख नेहमीप्रमाणेच प्रभावी व वास्तवदर्शी....
कालच मी एका बातमीत भारतात हजार पुरुषांमागे ८६१ स्त्रिया हे प्रमाण वाचले! आणि ही आकडेवारी तर सरकारी आहे. मला तर वाटतं हे सर्व एक विषचक्र आहे! मुली का नकोत तर त्या वंशाचे नाव पुढे चालवत नाहीत व त्यांच्या लग्नात हुंडा द्यावा लागतो. त्या हुंड्याची रक्कम गोळा करण्यासाठी कर्जे काढली जातात, जमीनी - दागिने गहाण पडतात, लाच घेतली जाते, भ्रष्टाचार फोफावयला अजून संधी मिळते. मग ही खर्च केलेली रक्कम वसूल करण्यासाठी मुलाचाच अट्टाहास, त्याच्या लग्नात पुन्हा हुंडा....
हे दुष्टचक्र फक्त आणि फक्त लोकशिक्षणाने, समाजजागृतीने व कायद्याच्या कडक अंमलबजावणीनेच संपुष्टात येऊ शकते!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
17 May 2010 - 4:45 pm | ज्ञानेश...
http://www.savethebabygirl.com/newsdetails.aspx?id=21
17 May 2010 - 5:08 pm | स्वाती२
हम्म!
17 May 2010 - 5:49 pm | युयुत्सु
एकदम touching argument...
माणसांमध्ये असते तशी वंश ही कल्पना जनावरांमध्ये नसते. काही पाळीव जनावरांवर आपण ती लादली आहे हा भाग अलाहिदा (उदा घोडे, कुत्री). कारण तिथे उत्तम प्रजेचे/वाणाचे (माणसाचे) खूळ आड येते. पण मागे एका चर्चेत म्हटल्या प्रमाणे मुली/स्त्रीया या स्त्री वंश निर्माण करण्यात अपयशी ठरल्या आहेत. आज स्त्री वंश चालवते तो पुरुषाचा. शिवाय ती (पारंपरिक दृष्टीकोनातून आणि कायद्याच्या नजरेतून) भरणपोषणाची वस्तू (object of maintenance) म्हणून बघितली जाते. संपत्तीच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याने साहजिकच ती सामाजिक उतरंडीत दुय्यम स्थानावर गेली आहे.
ही स्थिती गायींच्या बाबतीत नसल्यामुळे तिथे माद्यांचे महत्त्व नरांच्या तुलनेत जास्त आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
17 May 2010 - 7:10 pm | नितिन थत्ते
>>संपत्तीच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याने साहजिकच ती सामाजिक उतरंडीत दुय्यम स्थानावर गेली आहे.
१. येथे संपत्तीच्या निर्मितीमध्ये सहभागी होण्याची पुरेपूर संधी स्त्रीला आहे पण तीच (स्वतःहून) त्याला तयार नाही असे खोडसाळपणे सूचित केले आहे.
२. ज्या (मध्यमवर्गीय) समाजात मुलींनी नोकरी करणे वगैरे थोडेफार स्वीकारले जात आहे तेथेही अनेकदा कुटुंब आणि करिअर या द्वंद्वात स्त्रीनेच करिअरचा बळी देणे अपेक्षित असते. आपली मुले पाळणाघरात वाढलेली आवडणार नाहीत असे नवर्याने म्हटले की प्रश्न संपला.
३.जेथे स्त्रियाच कमावत्या आहेत (नवरा काही कमावत नाही अशा घरांत) तेथेही स्त्रीला फार मानाचे स्थान आहेच असे नाही.
स्त्रीने वंश निर्माण करणे म्हणजे काय ते कळत नाही. युयुत्सुंनी हे वाक्य पूर्वीही कुठेतरी लिहिले होते. एखाद्या स्त्रीने आपल्या मुलीला शाळेत घालताना बापाचे नाव सांगण्यास नकार दिला आणि मुलीपुढे माझेच नाव लावा असे सांगितले तर समाज ते स्वीकारणार आहे का? त्यामुलीला मूल झाल्यावर पुन्हा समाज तसेच करू देईल का? अर्थात मला मुद्दाच नीट कळलेला नाही.
नितिन थत्ते
17 May 2010 - 8:36 pm | अरुंधती
<< एखाद्या स्त्रीने आपल्या मुलीला शाळेत घालताना बापाचे नाव सांगण्यास नकार दिला आणि मुलीपुढे माझेच नाव लावा असे सांगितले तर समाज ते स्वीकारणार आहे का? त्यामुलीला मूल झाल्यावर पुन्हा समाज तसेच करू देईल का?>>
सध्या शहरांतील अनेक शाळांमधून सिंगल पेरन्ट्सची मुले असतात. मुलांच्या बापाच्या नावा ऐवजी अनेकदा आईचे नाव लिहिल्याचे दिसून येते. तसेच त्या मुलांना, त्यांच्या दोस्तांना,टीचर्सना व दोस्तांच्या पालकांनाही त्यात फार वेगळे वाटत नाही. त्यांनी ते एक वास्तव म्हणून स्वीकारलेले दिसते. त्यामुळे ह्या पिढीतील मुलामुलींना त्यांनी आपल्या नावापुढे आईचे नाव लावले तरी समाजात प्रॉब्लेम येणार नाही आणि आला तरी ती त्याला तोंड देण्याइतपत खमकी असतील असे वाटते.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
17 May 2010 - 5:50 pm | अमोल केळकर
विचार करायला लावणारा लेख
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
17 May 2010 - 8:40 pm | स्पंदना
लेख अतिशय आवडला!!
आणि तेव्हढाच अस्वस्थ ही करुन गेला!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.