पुणे ते नासिक व्हाया पनवेल हा रेल्वे मार्गाचा प्रवास इतरांसाठी सर्वसाधारणपणे लांबचा (बसमार्गापेक्षा १ तास जास्त) व कंटाळवाणा असला तरी आम्हा सह्याद्रीप्रेमींसाठी खूपच आनंददायक कारण ह्या सबंध प्रवासात सह्यधारेवरील २ घाट व अनेक किल्ले व सुळके यांचे उत्कट व उत्कृष्ट दर्शन होते.
रेल्वेने पुणे सोडताच दापोडी नंतर डावीकडे सिंहगडाचे त्याच्या चिरपरीचित मनोर्यासह दर्शन होते ते थेट देहूरोड पर्यंत. आता उजवीकडे तुकोबारायांच्या वास्तव्याने पावन झालेला भंडारा डोंगर दिसू लागतो व लगेचच डावीकडे घोराडेश्वराची लेणी लक्ष्य वेधून घेतात. थोड्याच वेळात गाडी कामशेत ओलांडते व आता डावीकडे विसापूर किल्ल्याची लांबलचक तटबंदी दिसते विसापूरावरून आपली फिरलेली नजर जाउन स्थिरावते ती थेट लोहगडावरच. लोहगडाला असलेले नेढे, मुख्य किल्ला, विंचू काटा व त्याच्या पायथ्यातील सदाहरीत वन तिथे केलेल्या अनेक सफरींची आठवण करून देते. आपल्याउजवीकडेने कार्ल्याची लेणी साथीने असतातच. आता रेल्वेगाडी घाटमाथ्यावर आलेली असते. खंडाळा सोडताच डावीकडे नागफणीचा भव्य कातळसुळका दर्शन देतो व उजवीकडे राजमाचीचे आवळेजावळे जोडकिल्ले श्रीवर्धन व मनरंजन दिसतात पण ते अगदी थोड्या काळासाठी. अर्थात राजमाची किल्ला त्याच्या जायच्या संपूर्ण मार्गासह बराच वेळ आपली साथ करतो ते मात्र नासिक वरून येतांना कारण हा घाटातील जायचा व यायचा मार्ग हा वेगळा झालाय तो मधील एका डोंगररांगेमुळे.
आता अनेक बोगद्यांमधून गाडी जात असते व बाहेर येताच दर्याखोर्या दिसू लागताच घाटात मधूनच काही लेणी पण दिसतात.(जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा) .गाडी कर्जत ला उतरत असतानाच सोनगिरीचा गोलाकार कातळ लक्ष वेधून घेतो व डावीकडे दूरवर कर्नाळा किल्ला सुळक्यासह मिरवतांना दिसतो. उजवीकडे ढाकचा बहिरी त्याच्या कळकराय सुळक्यासह अतिशय भव्य दिसतो. निरखून पाहिल्यास बहिरीच्या पोटातील त्याची गडदही (गुहा) दिसते.
गाडी आता पनवेलच्या दिशेने निघालेली असते. चौक वरून जातांना डावीकडे माणिकगड त्याची भव्य कातळटोपी घालून बसलेला असतो. आता उजवीकडे इर्शाळचा सुळका प्रबळगडाचे भव्य पठार व त्याला चिकटलेला कलावंतीण सुळका व त्यापाठीमागे माथेरान लक्ष्यवेधी ठरते. पनवेल ओलांडताच आता उजवीकडे चंदेरी, म्हसमाळ व नवरा नवरीची रांग दिसते. हे जातात न जाताच तोच पुढे मलंगगड त्यावरील देवणीच्या उत्तुंग सुळक्यासह सामोरा येतो.
गाडी आता कल्याणपर्यंत आलेली असते. कल्याण खाडीकिनारी असलेला व शहरीकरणामुळे हरवला गेलेला दुर्गाडीचा किल्ला दिसतो. येथेच महारा़जांनी त्यांच्या पहिल्या आरमाराची पायाउभारणी केलेली आहे. कल्याण सोडतांच काही वेळातच डावीकडे माहूली किल्ल्याची एक बाजू नजरेसमोर येते. वजीराचा एकूटवाणा सुळका अतिशय सुंदर दिसतो. वाशिंद वरून गाडी पुढे जाताच आसनगावच्या इथे माहूली त्याच्या अंगावरील अनेक सुळक्यांसह व त्याच्या भंडारदुर्ग व पळसगड ह्या उपकिल्ल्यासह संपूर्ण सामोरा येतो. माहुलीचे ब्रह्मा, विष्णू, शंकर, नवरा, नवरी, करवली, भटोबा आदी उत्तुंग सुळके सहजी ओळखू येतात. बराचा काळ माहुली आपली रेल्वेमार्गाने साथ करतो. गाडी आता कसारा घाटात चढू लागते. आता डावीकडे हरिहर किल्ला त्याच्या विशिष्ट आकारामुळे सहजच ओळखू येतो. त्याच्या शेजारीच ब्रह्मा डोंगर दिसतो.
कसारा घाटातून त्यातील बोगद्यांतून इगतपुरीला वर येताच इतका वेळ उजवीकडे साथ करत असलेली सह्याद्रीतील सर्वोच्च रांग आता ठळकपणे सामोरी येते. कुलंग, मधील मदनगड व त्या शेजारील भव्य अलंगगड हे तिघेहि पावणेपाच हजार फूट उंचीवरील गड आपल्या उत्तुंग कातळभिंतीमुळे लक्ष वेधून घेतात. त्यावरून नजर पुढे सरकताच कळसूबाईच्या सर्वोच्च शिखराचे दर्शन होउन आपली मान आदराने झुकते पण ती थोडाच काळ कारण नजर त्या उत्तुंग पर्वतरांगेचा वेध घेण्यास आसुसलेली असते.
आता रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस गिरिशिखरांचे दर्शन होत राहते. डावीकडे कावनई किल्ला दिसू लागतो व त्यापुढेच ब्रह्मगिरी, अंजनेरी, घारगड त्याच्या जवळील डांग्या सुळक्यासह दृग्गोचर होतात. हे सर्व दिसत असतानाच लहाविट स्टेशनचा उजवीकडे कळसुबाई रांगेच्या पूर्व पट्ट्यांतील किल्ले ठळकपणे नजरेसमोर येतात. बितनगड, लांबच लांब पट्टा उर्फ विश्रामगड किल्ला, त्यापुढे औंढा किल्ला त्याच्या काळ्याकभिन्न सुळ्क्यासह दिसतो व त्यापुढे आडगड, डुबेरगड दिसतात.
देवळाली स्टेशनच्या उजवीकडे बहुल्याची कातळटोपी लक्ष वेधून घेते व गाडी नासिकरोड स्थानकात शिरत असतानाच भरपूर किल्ले बघून पोट भरलेले असतांनाच स्वीट डिश म्हणून डावीकडे पांडवलेण्याचा त्रिकोणी डोंगर सह्याद्रीच्या ह्या अनोख्या मेजवानीची सांगता करतो.
--------------------------------------
(याचसाठी पुन्हा पुन्हा प्रवास केलेला) वल्ली
प्रतिक्रिया
7 May 2010 - 11:39 am | जयंत कुलकर्णी
या दुर्ग दर्शनासाठी मी निश्चितच हा प्रवास करायला तयार आहे. कॉलेज मधे असताना इगतपूरी ते जुन्नर जवळील मढ गावापर्यंत केलेला १० दिवसाचा ट्रेक आठवला.
डॉ. पटवर्धनांबरोबर आणि मिनू बरोबर.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
7 May 2010 - 11:42 am | अमोल केळकर
नाशीक ते पुणे नाही पण या गाडीने पनवेल ते पुणे हाअनोखा प्रवास आठवला.आम्हा नवी मुंबई करांना पनवेलहून पुण्याला जाण्यासाठी एक मस्त गाडी आहे ही. पनवेल ते कर्जत ह्या नवीन मार्गावरुनचा प्रवास मस्तच आहे. माथेरानच्या डोंगर रांगा, नवी मुंबई करांची तहान भागवणारे मोरबे धरण, स्टार प्रवाह वरील 'राजा शिवछत्रपती' मालिकेचा सेट आणि कर्जत जवळचा लांबच लांब बोगदा बघत पनवेल ते कर्जत तासाभराचा प्रवास कधी संपतो ते कळतच नाही
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 May 2010 - 12:12 pm | प्रचेतस
कर्जतच्या त्या लांबच लांब बोगद्यात अनेक झरे आहेत. भर उन्हाळ्यातही त्यांचे पाणी टपटप पडत असते व आपल्या अंगावर खिडकीतून त्यांचे तुषार उडत असतात.
7 May 2010 - 12:18 pm | अमोल नागपूरकर
बरोबर अमोल. ह्या गाडीनी पनवेलवरून पुण्याला जायला आरक्षण कधीही उपलब्ध असते. (ते नसले तरी काही फरक पडत नाही !!!) गर्दी खूप कमी असते. आता पुण्याला जाईन तेव्हा हे सर्व गडकिल्ले नक्किच पाहीन.
7 May 2010 - 6:54 pm | प्रभो
मस्त!! असंही म्हणतात की श्रीवर्धन व मनरंजन वरून मुंबै पुणे रेल्वेमार्गाचे सर्व बोगदे दिसतात....
7 May 2010 - 11:39 pm | डॉ.प्रसाद दाढे
खूप छान वर्णन केलंय. फक्त बरोबर फोटो असते तर
सोने पे सुहागा
8 May 2010 - 1:17 am | शुचि
वेगवान धावतं वर्णन. मस्त. सगळ्यांना जमणार नाही.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
8 May 2010 - 2:00 am | भडकमकर मास्तर
रेल्वेने पुणे सोडताच दापोडी नंतर डावीकडे सिंहगडाचे त्याच्या चिरपरीचित मनोर्यासह दर्शन होते ते थेट देहूरोड पर्यंत.
हे वाक्य काही कळले नाही...
मुंबईकडे जाणार्या ट्रेनमधून डावीकडे सिंहगड बघायचा तर फारच मान वळवून पाठीमागे पाहिले पाहिजे असे वाटते...
8 May 2010 - 8:54 am | प्रचेतस
तुमचे बरोबर आहे. पाठीमागेच मान वळवून बघावे लागते. पण तो देहूरोड पर्यंत हमखास दर्शन देतो.
8 May 2010 - 8:28 am | अप्पा जोगळेकर
कुलंग, मधील मदनगड व त्या शेजारील भव्य अलंगगड हे तिघेहि पावणेपाच हजार फूट उंचीवरील गड आपल्या उत्तुंग कातळभिंतीमुळे लक्ष वेधून घेतात. त्यावरून नजर पुढे सरकताच कळसूबाईच्या सर्वोच्च शिखराचे दर्शन होउन आपली मान आदराने झुकते पण ती थोडाच काळ कारण नजर त्या उत्तुंग पर्वतरांगेचा वेध घेण्यास आसुसलेली असते.
वल्ली, तुम्ही ग्रेट आहात. डिसेंबर -२००९ मधलं सह्यांकन आठवलं. माझा एक स्नेही चंद्रा दामले सुद्धा आम्ही कुठेही ट्रेकला गेलो की असंच पाढे म्हटल्यासारखा 'हं, तो डावीकडे दिसतोय तो अमुक अमुक. त्या तिथे पलीकडे टोपी घातल्यासारखा दिसतोय तो तमुक तमुक ' असं धडाधड सांगत सुटतो. ही डोंगर लोकेट करण्याची कला खूप आनंद देणारी आहे. काही जणांना ते आपोआप जमतं. मला पुर्वी काही पत्ताच लागायचा नाही. पण आता साताठ वर्ष डोंगरात भटकल्यावर आणि मुद्दामून प्रयत्न केल्यावर मलासुद्धा थोडंफार जमायला लागलं आहे.
बाकी कळसूबाई दिसलं असेल तर रतनगड,कात्राबाई आणि कुमशेतवाला भैरव पण दिसायला हरकत नाही. आज्या मात्र नाही दिसणार.
8 May 2010 - 9:09 am | प्रचेतस
रतनगड,कात्राबाई आणि कुमशेतवाला भैरव या मार्गाने दिसत नाहीत कारण कळसुबाई रांगेच्या पश्चिम(अलंग, कुलंग, मदन, कळसुबाई) आणी पूर्व(आड, औंढा, पट्टा, बितनगड) पट्ट्यांमुळे हे रतनगड,कात्राबाई आणि कुमशेतवाला भैरव
झाकले जातात.
8 May 2010 - 10:48 am | शैलेन्द्र
बरोबर, रतनगड, कात्राबाई बघायला कळसुबाईच्या धारेच्या मागे यावे लागते.
आणी तिथे आलो की आजोबा दिसतोस.
8 May 2010 - 9:44 pm | Dipankar
अहो पेब आणी चंदेरी विसरलात
10 May 2010 - 8:46 am | प्रचेतस
चंदेरीचा उल्लेख केला आहे.
>>पनवेल ओलांडताच आता उजवीकडे चंदेरी, म्हसमाळ व नवरा नवरीची रांग दिसते.
पेब मात्र दिसला नाही वा दिसूनही ओळखू आला नाही.
23 Apr 2012 - 12:32 pm | स्पा
झकास :)
23 Apr 2012 - 1:10 pm | कवितानागेश
मस्त. :)
23 Apr 2012 - 1:31 pm | शरभ
माथेरानच्या डावीकडचा डोंगर पेबचा. थोडासा आयताकॄती. ह्या दोघांमधील V लगेच दिसतो. पेबवरुन माथेरानला जायची वाट देखील आहे. अर्थात, पनवेल ते कर्जत प्रवासात तो दिसेल कि नाही ते माहित नाही. कदाचीत प्रबळगडाच्या मागे लपतही असेल. कल्याण कर्जत प्रवासात मात्र हमखास दिसतो पेब्..पण माथेरानच्या उजवीकडे.
आणि इगतपुरीच्या उजवीकडचा (नाशिकला जाताना) किल्ले मोरधन राहिला की हो वल्ली शेठ. अत्यंत विस्तीर्ण पठाराच्या ह्या किल्ल्याचा परिसर पावसाळ्यात खुप सुंदर दिसतो.
23 Apr 2012 - 1:46 pm | शरभ
23 Apr 2012 - 1:52 pm | स्पा
शरभ लई भारी
23 Apr 2012 - 1:52 pm | प्रचेतस
धन्स शरभ.
सुंदर फोटो.
पनवेल-कर्जत प्रवासात पेबची झलक दिसतेच.
बाकी आम्ही कधीकाळी लिहिलेला धागा वर काढल्याबद्दल फेणेकाकाचे आभार.
23 Apr 2012 - 3:06 pm | चौकटराजा
वल्ली नक्की काय म्हणतो ? ते या लेखात मस्त आले आहे. मी या मार्गावरून गेलो की मग डब्यात कोण पेंगते आहे कोण वडा खात आहे हे पहातच नाही. माहुलीचे दर्शन घेता घेता बाजू बदलून दुसर्या बाजूची दुनिया बघायची हा एक अनोखा आनंदच आहे.हे सगळे दुर्ग गुगल अर्थमधे दिशा , कोन बदलत पहाणे हाही एक वेगळाच प्रवास आहे. वल्ली, यातील एका तरी किल्यावर आपल्याबरोबर यायचे झाले तर ( जिथे दोर वगैरे लावून वर जाणे नसेल तिथे ) आपली तय्यारी हाय !
24 Apr 2012 - 1:10 am | पाषाणभेद
या ट्रॅकवर बर्याचदा प्रवास केलाय. आता मात्र बारकाईने पहावं लागेल. छान लेखन.
(आपण किल्ले/ लेणी या विषयावर पीएचडी कराच.)