सुमन कल्याणपुर नुसते नाव जरी उच्चारले तरी निर्मळ शांत, सोज्वळ, सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आठवतो. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली तितक्याच त्या प्रसिद्धिपासुन अलिप्त राहिल्या. अनेक वर्षे अज्ञातवासात असलेल्या सुमनताई "झी गौरव्"च्या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्ताने समोर आल्या.
सध्या बांग्लादेशात असलेल्या ढाका येथे २८ जानेवारी १९३८ साली सुमन हेमाडी यांचा जन्म झाला. १९४३ साली त्यांनी मुंबईत येऊन संगीताचे रितसर प्रशिक्षण घेतले. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी मो. शफी यांनी संगीत दिलेल्या "मंगु" (१९५४) या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले. गाण्याचे बोल होते "कोई पुकारे धीरे से तुझे". त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड हि चालुच राहिली आणि लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या गाण्याचा तारकामंडळात त्यांनी मानाचे स्थान मिळवले.
सुमनताईंच्या आवाजाने एका पिढीला अक्षरशः वेड लावले होते. "जिथे सागरा धरणी मिळते" असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, "घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात" असे म्हणणारी सासुरवाशीण, "निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाहि" हि अंगाई, "कशी गवळण राधा बावरली" हि गवळण, "सांज आली दुरातुनी, क्षितीजाच्या गंधातुनी" हे विरहगीत, "नाविका रे वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे", "केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर" हे भावगीत, "केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा", "जगी ज्यास कोणी नाहि त्यास देव आहे", "देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा" सारखी भक्तीगीते, "उठा उठा चिऊताई", "या लाडक्या मुलांनो या" सारखी बालगीत अशा विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला होता. किंबहुना आजही तितकीच गोड वाटतात. पण दुर्दैव असे की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी हि लता मंगेशकर यांनी गायली आहे असा अनेकांचा समज असतो. सुमनताईंनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त गाणी श्री दशरथ पुजारी यांच्याकडे गायली. किंबहुना दशरथ पुजारी यांच्या गाण्यांमुळेच आज मराठी भावगीतांमध्ये सुमनताईंची गाणी मैलाचा दगड ठरली आहेत.
सुमन कल्याणपुर यांनी मराठी व हिंदी व्यतिरीक्त पंजाबी, गुजराती, बंगाली, असामी, कन्नड, भोजपुरी ओरीया भाषेत सुद्धा गाणी गायली आहे.
"न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया", "ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा", "तुमसे ओ हसीन कभी मोहब्बत न मैने करनी थी", "परबतो के पेडो पर शाम का बसेरा है", "अज हु ना आये बालमा", "तुमने पुकारा और हम चले आये" "मेरे मेहबुब न जा", "नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे", "आपसे हमको बिछडे हुए", "चले जा चले जा....जहां प्यार मिले", "मन गाए वो तराना", "दिल ने फिर याद किया" या आणि अशा असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीहि गाजवली होती. आणि लोकप्रियतेच्या या शिखरावरच असताना त्यांनी एकदम गाणे गायचे सोडुन दिले. काहि अंतर्गत वादामुळे रफी यांनी लतादिदि बरोबर गाण्याचे सोडुन दिल्याने लतादिदिंची काही गाणी सुमनताईंच्या वाटेला आली आणि त्यांनी त्या गाण्याचे अक्षरशः सोने केले. (मनात कधे कधी असा विचार येतो की हा वाद अजुन काहि काळ असता तर सुमनताईं आणि मो. रफी यांची आणखी काहि गाणी ऐकायला मिळाली असती ). कारण काहिहि असो पण त्याकाळच्या स्पर्धेच्या युगात एका चांगल्या गायिकेचा आवाज दबला गेला असे मला वाटते. कधी असेहि वाटते कि त्यांना अजुन संधी मिळाली असती तर त्यांच्या नावने सुद्धा आज एखादा पुरस्कार दिला गेला असता....... असो.......
लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपुर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या "चांद" ह्या हिंदी चित्रपटाकरीता एकत्र गायल्या होत्या. (बहुदा पहिले आणि शेवटचेच) :(. गाण्याचे बोल होते कभी आज कभी कल कभी परसो, ऐसे हि बीते बरसो.
आजही इतक्या वर्षांनीहि सुमनताईंची गाणी परत परत ऐकावीशी वाटतात. तेंव्हा सुमनताई तुम्ही परत एकदा या, सारे काहि विसरून पुन्हा मनमोकळेपणाने गा. आम्ही सर्व रसिक, तुमचे चाहते या क्षणांची आतुरतेने वाट पाहत आहे.
सुमनताईंनी गायलेली काहि मराठी गाणी:
आई सारखे दैवत सार्या जगतात नाहि
अक्रुरा नेऊ नको माधवा
आकाश पांघरून जग शांत झोपलेले
आली बघ गाई गाई
केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर
वाट इथे स्वप्नातील संपली जणु
अरे संसार संसार
असावे घर ते आपुले छान
चल उठ रे मुकुंदा
देवा दया तुझी
दिपक मांडले
एक तारे सुर जाणे
एकदाच यावे सखया
गेला सोडुनी मजसी कान्हा
घाल घाल पिंगा वार्या
हाले हा नंदाघरी पाळणा
हि नव्हे चांदणी हि तर मीरा गाते
जिथे सागरा धरणी मिळते
जगी ज्यास कोणी नाहि
जुळल्या सुरेल तारा
का मोगरा फुलेना
कुणी निंदावे वा वंदावे
कशी गवळण राधा बावरली
कशी करू स्वागता
केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा
क्षणी या दुभंगुनी
मज नकोत अश्रु घाम हवा
मस्त हि हवा नभी
मी बोलले काहि
मी चंचल होऊनी आले
मृदुल करांनी छेडित तारा
नकळत सारे घडले
नंदाघरी नंदनवन फुलले
नाविका रे वार वाहे रे
निंबोनीच्या झाडाखाले
ओंकार प्रधान रूप गणेशाचे
पहिलीच भेट झाले
पाखरा जा दुर देशी
पैलतीरी रानामाजी
पक्षिणी प्रभाती चारीयासी जाय
पाण्यातली परी मी
पिवळी पिवळी हळद लागली
प्रीत हि डोळ्यात माझ्या
प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे
रिमझिम झरती श्रावणधारा
सांग कधी कळणार तुला
सहज तुला गुपित एक
सावळ्या विठ्ठला
शब्द शब्द जपुन ठेव
श्रीरामाचे चरण धरावे
लिंबलोण उतरता
जाग रे यादव
ते नयन बोलले काहि
तुझ्या बोटाला कृष्णा
तुझ्या कांतीसम
तुला ते आठवले
उघडले एक चंदनी दार
उर्मिला मी
उठा उठा चिऊताई
वार्यावरती घेत लकेरी
विसरशील तु सारे
या झोपल्या जगात
या कळ्यांनो या फुलांनो (मंत्र वंदे मातरम)
या लाडक्या मुलांनो
असे हे जगचे फिरे चक्र बाळा
वल्हव वल्हव रे वल्हव रे होडी
गणाधिपा हो उठा लवकरी
ओम नमो हा सुर
जो त्रिगुणांची मुर्त जाहला
पार्वती वेचिती बिल्वदळे
देवगृही या भक्तजनांना गौरीनंदन पावला
प्रतिक्रिया
24 Apr 2010 - 10:14 pm | जयंत कुलकर्णी
या गाण्याचे काव्यही थोर आहे, पण आवाज त्या भावनांशी अत्यंत प्रामाणिक. सुमन बाईंचा आवाज दिव्य नाही पण मनुष्यांच्या भावना व्यक्त करणारा असा अत्यंत नैसर्गीक असा आहे. आणि म्हणूनच मला तो आपला वाटतो. यातच त्या आवाजाचे मोठेपण आहे.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
25 Apr 2010 - 7:30 am | विसोबा खेचर
सहमत आहे.. जयंतरावांनी अगदी नेमके शब्द वापरले आहेत.. सुमनताईंच्या आवाजात आणि गायकीत खूप हळवेपणा आहे, आपलेपणा आहे..
योगेशराव, सुंदर लेख..
तात्य.
25 Apr 2010 - 10:49 am | तिमा
सुमन कल्याणपूरांची गाणी आवडतात पण आमचे कान फार नाठाळ आणि परखड आहेत हो, जरा कुठे बेसूर झाल्या किंवा आभास तान घेतली की कानात टोचू लागते आणि मग त्या दिव्य आवाजाशी नकळत तुलना होते.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
25 Apr 2010 - 10:58 am | प्रमोद देव
जरा कुठे बेसूर झाल्या किंवा आभास तान घेतली की कानात टोचू लागते आणि मग त्या दिव्य आवाजाशी नकळत तुलना होते.
सुमन कल्याणपूर ह्यांच्याबद्दल चांगलं बोलतांना उगाच त्यांच्याशी इतरांची तुलना कशाला? आणि करायचीच असेल तर खुल्या दिलाने करा..उगाच एकाला महान म्हणण्यासाठी दुसर्याला लहान ठरवण्याची काहीच जरूर नाही...प्रत्येकाचा बाज वेगळाच असतो...आणि तो ज्याचा त्यालाच शोभतो.
त्या दिव्य आवाजाचे आम्हीही चाहते आहोत...पण त्याही कैक वेळा बेसूर झालेत...
हल्लीची गाणी तर ऐकवत नाहीत असं म्हटलं तर ते कितपत आवडेल तुम्हाला? :(
25 Apr 2010 - 11:23 am | तिमा
आमचे कान त्यांनाही माफ करत नाहीत. हल्लीची गाणी भयानक बेसूर असतातच त्यांची! आमचा संबंध फक्त सच्च्या सुरांशी आहे. व्यक्तिपूजा आम्हाला वर्ज्य आहे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
25 Apr 2010 - 11:53 am | जयंत कुलकर्णी
एखादे चांगले गाणे जन्माला येते म्हणजे काय होत असावे ?
१ पहिल्यांदा गाण्याचे शब्द.
२ त्या गाण्याचा अर्थ व त्या गाण्याचा विषय, व शब्दांचा अभ्यास.
३ त्या गाण्यातल्या भावनांचा अभ्यास
४ त्या भावना व शब्दाला न्याय देणारी चाल व संगीत
५ त्या गाण्यातील भावंनाना, शब्दांना व आता संगीताला योग्य अशा आवाजाची निवड व गाणार्याने ते ह्रदयातून गाणे
६ या सगळ्याचा चांगला मेळ घालण्यासाठी योग्य काळ सराव.
७ पेशकश.
यातल्या एखाद्या पायरीला अवास्त्व महत्व दिले किंवा ते गाणे सुमधूर झाले तरी ह्र्दयाला भिडणारे होत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. नुसत्या दिव्यस्वरापेक्षा या सगळ्याचे महत्व नाकारता येत नाही. येणार्या काळात कॉम्प्युटरपण दिव्यस्वर काढू शकेल, पण चांगले गाणे...........
माझे मत !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
24 Apr 2010 - 6:38 pm | अविनाशकुलकर्णी
सुमन ताई प्रथम एन्ट्री गाणे ओ.पी नय्यर च्या साठी गायल्या ..मला एक कोडे उलगडत नाहि..जेंव्हा आशा ने ओ.पी. साठी गाणे सोडले तेंव्हा तो सुमन ताईना अप्रोच होण्या ऐवजी उत्तरा केळ्कर्,कल्ले ह्या सारख्या दुय्यम गायिकेना का अप्रोच झाला.?..सुमन ताई व ओ.पी म्हण्जे डेडली कोमबिनेशन झाले असते...पण रसीकांचे दुर्दैव...मी कणेकरांना विचारले होते..पण त्यांनी हि माहित नाहि असे उतर दिले..सुमन ताई वर अन्याय झाला असे नेहमी वाटते,,त्यांचे <पहिलिच भेट झाली पण ओढ हि युगाची> हे माझे आवडते गीत आहे....
24 Apr 2010 - 9:38 pm | मदनबाण
खरचं त्यांच्या गाण्याचा आस्वाद घ्यावा तितका कमीच...
श्रीरामाचे चरण धरावे... हे त्यांच्या आवाजतल गाण जालावर कुठे मिळेल का ? मागे एकदा शोधण्याचा प्रयत्न केला होता पण मिळाले नाही...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
30 Apr 2010 - 8:56 pm | संजय अभ्यंकर
गाणे पाठवतो (शक्य तितक्या लवकर)
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
25 Apr 2010 - 4:58 am | शुचि
खूप छान वाटला लेख ... माहीतीपूर्ण आणि भावनाही ओतलेल्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
25 Apr 2010 - 8:27 am | प्रमोद देव
सुमनताईंची पूर्वार्धात जशी दशरथ पुजारींशी जोडी जमली होती तशीच जोडी उतरार्धात अशोक पत्कींशी जमली होती. अशोक पत्कींच्या संगीत दिग्दर्शनात गायलेली गाणीही तितकीच गाजली.
एकदाच यावे सखया
कुणी निंदावे वा वंदावे
केतकीच्या बनी तिथे
नाविका रे....वगैरे कैक अवीट गोडीची गाणी ह्या जोडीनेही दिलेत.
25 Apr 2010 - 12:42 pm | योगेश२४
हा कुणावरही टिका करण्यासाठी लिहिला नसुन फक्त सुमनताईंच्या गायन कारकिर्दीबद्दल सांगण्यासाठी आहे. त्यांच्या गाण्याची तुलनाहि कोणाबरोबर केली नाहि. लतादीदी, आशा भोसले, किशोर कुमार, मुकेश , रफीसाहेब यांनी तर आपले अढळ पद निर्माण केले आहे. त्यांची तुलना करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे.
जर प्रस्तुत लेखामधुन कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर चु भु द्या घ्या. :)
सुमन कल्याणपूर ह्यांच्याबद्दल चांगलं बोलतांना उगाच त्यांच्याशी इतरांची तुलना कशाला? आणि करायचीच असेल तर खुल्या दिलाने करा..उगाच एकाला महान म्हणण्यासाठी दुसर्याला लहान ठरवण्याची काहीच जरूर नाही...प्रत्येकाचा बाज वेगळाच असतो...आणि तो ज्याचा त्यालाच शोभतो.>>>> प्रमोद अगदी मनातल लिहिलंय
30 Apr 2010 - 11:02 am | अमोल नागपूरकर
काल मुम्बई दूरदर्शन्च्या 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमामध्ये मन्गला खाडिलकर ह्यानी घेतलेली सुमनताईन्ची मुलाखत पाहिली. अत्यन्त सुन्दर कार्यक्रम झाला. ताई त्यान्चे बालपन, सन्गीत शिक्षणाची सुरुवात, चित्रपट प्रवेश आणि पुढील प्रवास, चित्रपट स्रुष्टीतील सहकारी, नदाजीन्शी (कल्याणपूर)भेट आणि लग्न ह्या विषयान्वर मन मोकळेपणानी बोलल्या. 'झिमझिम झरती श्रावणधारा', 'कशी करु स्वागता' ह्या गीतान्च्या सुरेल आठवणी सान्गितल्या. 'झिमझिम....' गाणे जूनच्या शेवटी रेकॉर्ड झाले. तो पर्यन्त काही पाऊस आला नव्हता. पण रेकॉर्डिन्ग झाल्यावर हरिप्रसाद चौरसियान्नी खिडकी उघडली तर आभाळ ढगानी भरून गेले होते. त्यान्च्या स्वभाव आणि आवाजातील सात्विक गोडवा, घरन्दाजपणा , हळवेपणा पूर्ण कार्यक्रमामध्ये जाणवत होता. घरातीलच एखादी आजी, मावशी बोलत असावी इतके त्यान्चे बोलणे साधे आणि घरगुती होते. चित्रपट्स्रुष्टित इतके वर्षे काम करुन जो 'बनचुकेपणा' येतो त्याचा कसलाही लवलेश नव्हता. इतका छान कार्यक्रम दिल्याबद्दल मुम्बई दूरदर्शनला धन्यवाद. देवघरातील नन्दादीपासारखा ताईन्चा आवाज असाच तेवत रहो, हिच शुभकामना !!!