चुकले माझे
----------------------------
शाळेला वनवास म्हणालो,चुकले माझे..
तासाला मी त्रास म्हणालो,चुकले माझे..
वर्गामध्ये गुरुजींना का वेड लागले..!
केला ना अभ्यास? म्हणालो,चुकले माझे..
तातांनी मज असे फोडले नका विचारु..
मी झालो नापास म्हणालो,चुकले माझे..
रस्त्यावरती राडा झाला,डोकी फुटली .
आयटम अगदी क्लास!!! म्हणालो,चुकले माझे..
कांदेपोहे,चहा पिऊनी किती लाजलो..
ही कॉफि फर्मास! म्हणालो,चुकले माझे..
मैफिलीतला बरा कवी तो भ्रमिष्ठ झाला..
का लिहिले बकवास? म्हणालो,चुकले माझे..
घोडादेखील त्या नवर्याचा जाम बिथरला..
तव घोडी झक्कास! म्हणालो,चुकले माझे..
भार्या माझी रोज तिंबते मला अताशा..
का देशी मज त्रास? म्हणालो,चुकले माझे..
दुर्दैव ही मग माझे अगदी चौताळुन गेले..
निवांत का बसलास म्हणालो,चुकले माझे..
तिथे लुडकलो आणि बरळलो असेच काहीबाही..
बस,शेवटचा ग्लास म्हणालो,चुकले माझे..
- योगेश जोशी
स्पष्टीकरणः
वरील कवितेतील अलामत (..आस) आणि रदीफ (म्हणालो चुकले माझे) हे इलाही जमादारांच्या एका गझलेवरुन प्रेरित आहेत.
परंतु ही स्वतंत्र रचना आहे.विडंबन म्हणता येईल का नाही याबद्दल मी साशंक आहे.
वाड्.मयचौर्याचा आरोप होवु नये म्हणुन हे स्पष्टीकरण देत आहे.
प्रतिक्रिया
4 Apr 2010 - 11:20 am | राजेश घासकडवी
मस्त...
7 Apr 2010 - 8:01 am | sur_nair
झकास. न चुकता सारं जमलंय बरं.
7 Apr 2010 - 8:13 am | प्रमोद देव
इलाहींच्या गजलेत...प्रश्न आहे...चुकले का हो? तुम्ही इथे निर्णय दिलाय..चुकले माझे....अर्थात इलाहींची अजून दुसरी कोणती(चुकले माझे...म्हणणारी) गजल असल्यास कल्पना नाही.
आकाशाला भास म्हणालो,चुकले का हो?
धरतीला आभास म्हणालो,चुकले का हो?
7 Apr 2010 - 1:15 pm | बेसनलाडू
(आस्वादक)बेसनलाडू