स्वर्गसुख

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
26 Mar 2010 - 10:41 am

व.पुं.नी “पार्टनर” मधे स्वर्गसुखाची व्याख्या इतकी सुरेख सांगितलीये ना…!! “ज्यावेळी, जिथे, जे हवं… ते, त्या वेळी….. तिथे मिळणं म्हणजे “स्वर्ग“! पण त्यावेळी ते न मिळणं म्हणजे “नरक” असेल का ? नाही…. कदाचित ही व्याख्या फार हार्श होईल नरकाची. हवी ती गोष्ट न मिळणं म्हणजे अगदीच काही नरक नाही. कदाचित त्याला “समझोता ” असं थोडंसं बरं नाव देता येईल. त्या वेळेशी मनाने केलेला समझोता. असे समझोते बरेच करावे लागतात आयुष्यात. पण मनासारखी नोकरी, बायको, घर, संतती, संपत्ती…… सगळं काही मिळणं म्हणजे स्वर्ग नक्कीच नाही. कितीतरी अशा गोष्टी असतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत. त्या फक्त त्या वेळी हव्या असतात. कधी एक सहानुभूतीची नजर, कधी खांद्यावरचा हलकासा आश्वासक स्पर्श तर कधी नुसतं अस्तित्व ! साध्या साध्या गोष्टी… !! कधी कुणाचं विशिष्ट वेळी जवळ असणं स्वर्गसुख देतं तर कधी कुणाचं त्या वेळी असणंच त्रासदायक होतं.

कधी कधी रस्त्याने जाता जाता सहज कुणी एखादी लकेर गुणगुणतो…. त्यावेळी आपण अशा काही विलक्षण मनस्थितीत असतो की ते गाणं अगदी जवळचं होऊन जातं….आणि मग त्या गाण्याशी वेगळंच नातं तयार होतं आपलं. अशी अखंड नाती जुळत असतात आपली… आपल्याही नकळत. अशी नाती शब्दात बांधता येत नाहीत…..सांगताही येत नाहीत. स्थळाकाळाशीच काय तो संबंध असतो त्यांचा.

कधी खूप बोलायचं असतं….. तेव्हा ऐकायला कुणीतरी हवं असतं. त्याच जाणीवेतून… त्याच मनस्थितीतून ऐकणारा !! असा कुणी भेटला तर तो जीवलग बनतो. कधी कधी न बोलताही संवाद साधायचा असतो. शब्दातून न सांगताही मनातली गोष्ट समोरच्या व्यक्तीला समजणं ह्यासारखं तर दुसरं सुख नसेल. पण प्रत्येक वेळी तुमची मनस्थिती जाणून तसं वागणारा कोणी भेटेलंच असं नाही. जेव्हा भेटतो…..तेव्हा स्वर्ग !!

काही गोष्टी अनुभवायला सुद्धा कुणीतरी हवा असतो….आपल्याच पातळीवरचा. कधी कुठल्याशा डोंगरावरची उतरलेली सांज बघताना, सूर्यबिंब क्षितिजावर वितळताना बघताना… जीव जेव्हा व्याकुळ होतो… तेव्हा कुणीतरी फक्त सोबत हवं असतं….. स्तब्ध….नि:शब्द !! कधी समुद्राच्या पाण्यातून चालताना…. पायाखालची वाळू सरकताना….. कुणाचा तरी हात आधारासाठी हातात असावासा वाटतो. चांदण्या रात्री…चांदणं पांघरायला कुणीतरी हवं असतं. काजळी रात्री कुणीतरी रात्र उजळायला हवं असतं. होरपळणा-या वणव्यात कुणीतरी हलकासा सुखद शिडकावा करणारं हवं असतं. कधी पावसात चिंब भिजताना कुणीतरी इंद्रधनू व्हायला हवं असतं. सर्द रात्री कुणीतरी ऊबदार मखमल बनायला हवं असतं. कधी अधिकार गाजवायला लागतं कुणीतरी…..तर कधी अधिकार गाजवणाराही पाहिजे असतो. कधी नुसतं बोलायला तर कधी ऐकायला, कधी जागायला… कधी जागवायला, कधी आठवायला तर कधी विसरायला. त्या त्या वेळी तशी सोबत मिळाली तर स्वर्गसुख !!

असं स्वर्गसुख देणारी व्यक्ती बनता आलं तर ….. तर आयुष्य सार्थकी लागलं म्हणावं लागेल :)

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

शुचि's picture

26 Mar 2010 - 11:07 am | शुचि

सहजीवन - किती सुंदर शब्द आहे सहजीवन.

मला या वेळेस ट्रेन ने परत येताना एका तळ्यात २ गोजीरवाणे हंस दिसले. दोघं परस्परांपासून अंतर ठेऊन होते पण जोडी होती. एकाच लाटेवर आरुढ होत होते, तरंगत होते, पण स्वातंत्र्य देऊन होते एकामेकांना. मला खात्री आहे एक उडाला असता तर दुसर्‍याने ताबडतोब त्याच्यामागे प्रयाण केले असते.

असाच एक सुंदर शब्द वाचला सहवेदना.

सह च्या पुढे येणारा प्रत्येक शब्द मला अनुभवासा वाटतो, असं वाटतं एक जन्म अपुरा पडेल. याला कारण माझ्या कुंडलीतील ७ व्या (जोडीदाराच्या) घरातील सूर्य, गुरु, राहू हे असू शकतील. गुरु जिथे पडतो *excess* देतो तर राहू न मिटणारी तृष्णा.

लेख अतिशय सुंदर आहे. मी वाचनखूण ठेवत आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||

जयवी's picture

28 Mar 2010 - 1:30 pm | जयवी

शुची.......वाचनखूण ठेवलीस..... खूप खूप धन्यवाद :)

उपास's picture

29 Mar 2010 - 12:51 am | उपास

सहानुभूती हा अजून एक 'सह' सह आलेला आवडता शब्द..
उपास मार आणि उपासमार

जयावी.. नेहमीप्रमाणेच तरल आणि थेट आतून आलेलं.. आवडलं :)

समंजस's picture

26 Mar 2010 - 11:35 am | समंजस

सुरेख प्रकटन!!!

अप्पा जोगळेकर's picture

26 Mar 2010 - 1:23 pm | अप्पा जोगळेकर

शाहरूख खान पण असंच बोलतो पडद्यावर हिंदी भाषेत. तरल संवेदनाक्षम की काय ते. पण वाचताना मौज वाटत होती. शुभेच्छा.

दिपाली पाटिल's picture

26 Mar 2010 - 1:53 pm | दिपाली पाटिल

तुम्ही जे लिहीता ते अगदी अंगावर चमचमणारं गार-गार चांदणं पडल्यासारखं वाटतं... अगदी स्वप्नातल्यासारखं...

दिपाली :)

विसोबा खेचर's picture

26 Mar 2010 - 7:12 pm | विसोबा खेचर

जयू, नेहमीप्रमाणेच सुरेख लिहिलं आहेस..

तात्या.

मेघवेडा's picture

26 Mar 2010 - 9:17 pm | मेघवेडा

मस्त वाटलं वाचून!! एकदम खास लेख!! सुंदर!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अनिल हटेला's picture

26 Mar 2010 - 9:55 pm | अनिल हटेला

छान वाटलं वाचुन....

:)
बैलोबा चायनीजकर !!!
:D

चित्रा's picture

27 Mar 2010 - 4:00 am | चित्रा

लेख आवडला.

जयवी's picture

28 Mar 2010 - 1:32 pm | जयवी

समंजस, अप्पा, दिपाली, तात्या, मेघवेडा, अनिल, चित्रा.......मनापासून आभार :)

अभिशेक गानु's picture

28 Mar 2010 - 8:16 pm | अभिशेक गानु

फारच सुन्दर चित्रण केले आहे स्वर्ग सुखाचे! धन्यवाद

जयवी's picture

29 Mar 2010 - 11:18 am | जयवी

उपास, अभिषेक..... तहे दिल से शुक्रिया :)