मराठी - हिंदी जुगलबंदी!

रेवती's picture
रेवती in जनातलं, मनातलं
23 Mar 2010 - 7:24 pm

सुलीमामीच्या मुलीनं, स्नेहानं परप्रांतीय मुलाबरोबर जमवलं आणि घरात हलकल्लोळ अजिबात झाला नाही. स्नेहा घरात लगेच जाहीर करणारच नव्हती पण 'अखिल पाचवी गल्ली गणपती मंडळा'तर्फे घेतल्या गेलेल्या कांदा बारिक चिरण्याच्या स्पर्धेत कांदा चिरताना उंब्रेकरकाकूंनी स्नेहाच्या चेहर्‍यावर लज्जेचा लालिमा कि कायसे पाहून सुलीमामीकडे जास्त चौकशीची मागणी केली आणि प्रकरण उजेडात आलं (उगीच नाही उंब्रेकरांना सगळेजण न्युजब्रेकर म्हणत!) त्याबद्दल स्नेहानं वरणभात डॉट कॉम वर 'शेजार्‍यांची वैयक्तिक आयुष्यात घुसखोरी' असा लेख लिहून आपला निषेध नोंदवला होता.

मंडळी, तशीही गेल्या दहा वर्षात सगळ्यांना सवयच झाली होती. आमच्याकडे स्वभाषिक परप्रांतीय, परभाषिक स्वप्रांतीय, वयाने खूप लहान तर खूप महान असे सगळ्या प्रकारचे 'रिश्ते' झाले. सुदैवाने 'सक्सेस्फुल्ल'ही झाले. ओळखा कारण? म्हणजे त्याचं काय आहे ना, मराठी भाषा सोडली तर महिलावर्गाला दुसरी भाषाच बोलता येत नाही. आजी आजोबांच्या 'चांगले तेच्च ऐका, पहा आणि बोला' या धाकामुळे 'मै तुम्हारे बच्चे कि माँ' असं काहिसं ऐकल्याबरोबर टी. व्ही. बंद होत असत. त्यातून जवळजवळ सगळा महिलावृंद हा पुणे ३० ........आता यामध्ये प्रॉब्लेम तो कोणता? हिंदी भाषा येत नसलेल्या जणीच जास्त....म्हणजे सगळ्या! घरी जावई आणि सुनांशी वाद संवाद होण्याचा मोठा प्रश्न मिटला! पण म्हणतात ना.........'आई तारी त्याचे लग्न ठरी'. आमच्या आईला उत्तर प्रदेशात राहण्याचा तब्बल ११ महिन्यांचा अनुभव गेल्या १० वर्षात कामी आला. लग्नाच्या बैठका तर आईशिवाय पार पडेनाश्या झाल्या. हिंदी बोलताना 'आप' हा शब्द मात्र तिच्या शब्दकोषात नव्हता त्याला ती तरी काय करणार?..... तर सुलीमामीचं पान आईशिवाय अक्षरश: हालेनासं झालं. "वन्सं, आज तिकडच्या मंडळींना बैठकीला बोलावलय' म्हटलं कि हिची धावपळ सुरू! "ये पुरणपोळी हय, तुमको खानीही पडेंगी."

होताहोता साखरपुड्याचा दिवस उजाडला.......सुलीमामी अगतिक तर आई झाशीची राणी झाली. 'लडकेवाले' मध्यप्रदेशातून पुण्यात दाखल झाल्यावर त्यांचा फोन आला. मित्रमैत्रिणींनो, आपल्याकडे जसे,"आलात ना? प्रवास कसा झाला? त्रास वगैरे नाही ना झाला?" असं विचारतात त्याचा तसाच्या तसा हिंदी अनुवाद करत हिने'"आ गये क्या?............" अशी सुरुवात केली. एक बरं, कि सुलीमामीकडे हसणारं कोणी नव्हतं. पमामावशीला आपल्या बहिणीचं फाऽर आधीपासून कौतुक्.....हिंदी बोलते म्हणून! त्याचं काय झालं,प्रभाआत्या व तिच्या यजमानांनी एकदा आईला गळच घातली. "अहो वहिनी, त्या दोघी डच बायका येतायत्.......भारतीय शेतकरी व शेतीचा अभ्यास करायला. आल्या दिवशी तुमच्याकडे जेवायला येउ द्या म्हणजे त्यांची फ्यामिली व्हिजिट होउन जाइल; मग पुढे आम्ही फिरवतो त्यांना!" त्यांच्याशी मराठी बोलून चालणार नाही हे आम्ही आमच्या हुषारीनं आधीच ओळखलं. त्यादिवशी आपलं पाककौशल्य पणाला लावत आईनं बासुंदी पुरीचा साग्रसंगीत स्वयंपाक केला..........त्यांचं जेवण चालू असताना 'मराठी नको तर नको' म्हणून हिनं हिंदी चालू केलं. "जेवण सावकाश होने दो" म्हणाली.पण ते जाऊ दे, विषयांतर फार झालं!

......तर,नवर्‍यामुलीला म्हणजे स्नेहाला कुठल्याही तयारीमध्ये लुडबुडायची परवानगी नव्हती. दोनच दिवसांची रजा असल्याने तिलाही काही फरक पडत नव्हता. संध्याकाळी साखरपुडा झाल्यावर स्नेहाच्या सासूबाईंना मातोश्रींनी जाउन गोदभराईची 'रस्म' कधी करायची असे विचारताच त्यांचे डोळे पांढरे झाले. आपल्या मुलांनी इतकी प्रगती करून प्रकरण 'गोदभराई'पर्यंत आणून ठेवलय हे त्यांना माहितच नव्हतं. "इश्श्य, वैसा नही बाई." सांसकी गोदभराई.......सासूबाईंनी काहीतरी भाषिक गोंधळ समजून ओटी भरून घेतली. पाच फळांनी ओटी भरताना इंप्रेस करायला फणसापेक्षा लहान (फणसाच्या चिकाने साडी खराब होइल म्हणून) अशी पाच फळं आणली होती. लग्न मध्यप्रदेशात असल्याने जी काही हौस करायची ती आत्ताच! सासूमाँनी 'इतकं कश्याला करताय?' असे (हिंदीतून) विचारताच आईने चपळाईने पुढे होवून,"हम कुछ कमी नही रखना चाहते, बादमे लडकीको सुनना ना पडे!" मग सुलीमामीकडे वळून,"नै काहो वहिनी?" असं विचारलं. आता सुलीमामीला जर एवढं हिंदी कळत असतं तर तिथे नणंद कशाला हवी होती? पण आपली मुलीची (पडेल )बाजू ओळखून तिनं 'हो' म्हणून टाकलं. त्यानंतर लग्नही सुसंवादानं पार पडलं असं कानावर आलं!

सुलीमामीच्या दुसर्‍या मुलीच्या, मोनीच्या लग्नात अमराठी असूनही तिकडच्या लोकांना मराठी बरं येत असल्याने आईचा तसा विरसच झाला (किंवा वीररस नाहीसा झाला.). मोनीच्या लग्नाआधी दोन दिवस म.प्र. वाले क्र. एक 'जमाईराजा' अमेरिकेतून आले व जेटलॅगमुळे पहाटे साडेचार वाजता (आदल्या दिवशीचे)वर्तमानपत्र वाचत बसले. पाच वाजता दूधवाल्याने ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या घेउन स्वयंपाकघरात ठेवल्या. सुलीमामी व इतर नातेवाईक चहा करावा म्हणून उठून पाहतात तर दारात दूध नाही.......मग कुठं गेलं बाई? तेवढ्यात जमाईराजा म्हणाले,"वहीं बगल में दूधके पॅकेट रख्खे हैं." हे समजण्यासाठी हिंदी येण्याची आवश्यकता नव्हती. पदर तोंडाला लावत सगळ्या जणी आत पळाल्या. जमाईराजा क्वश्चनार्थक चेहेरा करून बघत राहीले.

नंतर ऐकिवात आलेल्या बातमीनुसार मोनीच्या लग्नात क्र. एक जमाईराजा सगळ्यांना 'पाय लागू' असे म्हणत होते तर क्र. दोनचे 'वणक्कम' 'वणक्कम' म्हणत ओळखी करून घेत होते. नवर्‍यामुलीचे 'मोनिका' हे नाव बदलून 'लक्ष्मीप्रभा' असे ठेवायचे ऐनवेळी ठरले म्हणून मोनीनं चिडचिड (मनातल्यामनात) केली. 'सासूअम्मांनी' हौसेनं सुनेच्या चार इंच केशसंभाराला स्वीच किंवा गंगावन लावून त्यावर बरेच गजरे माळायला (ब्युटिशियनला) सांगितले. नमस्कार करताना गजर्‍याच्या ओझ्याने 'स्वीच ऑफ' झाला आणि सासूअम्मांच्या पायावर पडला. अश्या किरकोळ गोष्टी वगळता लग्न चांगलं पार पडलं.ताईचा अनुभव लक्षात घेउन मोनीनं म्हणे गणपती उत्सवापर्यंत आपलं प्रकरण गुप्त ठेवायला नकार दिला होता! उंब्रेकर काकूंची बातमी फोडायची संधी हुकली. तसं झालं असतं तर मात्र वरणभात डॉट कॉमवर आपल्याला 'घुसखोरीबद्दल' अजून एक लेख वाचायला मिळाला असता.
(कथासूत्र व पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत)

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

भिडू's picture

23 Mar 2010 - 7:52 pm | भिडू

हाहाहाहा.... मस्त

संदीप चित्रे's picture

23 Mar 2010 - 8:05 pm | संदीप चित्रे

आवडला रेवती.
>> संध्याकाळी साखरपुडा झाल्यावर स्नेहाच्या सासूबाईंना मातोश्रींनी जाउन गोदभराईची 'रस्म' कधी करायची असे विचारताच त्यांचे डोळे पांढरे झाले. आपल्या मुलांनी इतकी प्रगती करून प्रकरण 'गोदभराई'पर्यंत आणून ठेवलय हे त्यांना माहितच नव्हतं.
=D>
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

मराठे's picture

23 Mar 2010 - 8:13 pm | मराठे

हस हस के पोट दुख्या!

अनामिक's picture

23 Mar 2010 - 8:16 pm | अनामिक

खुसखुशीत लेख आवडला.

-अनामिक

मदनबाण's picture

23 Mar 2010 - 8:40 pm | मदनबाण

हेच की वो... :)

मदनबाण.....

अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ?
http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/artic...

मुक्तसुनीत's picture

23 Mar 2010 - 8:42 pm | मुक्तसुनीत

हेच बोल्तो ! :-)

धनंजय's picture

23 Mar 2010 - 10:02 pm | धनंजय

हेच्च कहतो.

Nile's picture

24 Mar 2010 - 7:36 am | Nile

हम भी वहीच बोलतो.
काकु तुमने तो एकदम चौके-छक्के मा-या, सदाशिव पेठसे पार एकदम नदीमेच गि-या!

रेवती ताई बाकी लेख एकदम खुमासदार !!
माझ्या आईची मैत्रिण आठवली , वत्सला (केळकर) मावशी घरी आली की असं च काही अफलातून हिंदी बोलायची हसून हसून हम सबकी मु़रकूंडीच वळने की ... मग तीचे ते आवर्जून - 'तू कोब्रा से शादी करीच मुर्गि माहेर में आकर सुधारस के साथ खा ' वगैरे गोड बोलायची
रेवती ताई, माझ्याही जिवलग मावशी ची आठवण ताजी केलीत . धन्यवाद !! या रविवारी तिला भेटायला जातेच आता मी ...
~ वाहीदा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2010 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैखन शैली एकदम झकास...!
और भी आने दो.

-दिलीप बिरुटे

प्रमोद देव's picture

23 Mar 2010 - 8:26 pm | प्रमोद देव

इतक्या लवकर संपवल्याबद्दल त्रिवार निषेध.
रेवतीतै,लिहा हो...जरा सढळ हाताने.

प्रभो's picture

23 Mar 2010 - 8:31 pm | प्रभो

हॅहॅहॅ.. मला वाटलं कोणता जिवंत प्रसंग सांगताय....काल्पनीक आहे असे वाचल्यावर .................असो..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

प्राजु's picture

23 Mar 2010 - 8:50 pm | प्राजु

मस्त लिहिलं आहेस..
जबरदस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

अरुंधती's picture

23 Mar 2010 - 9:15 pm | अरुंधती

मस्त गं मस्त! मला आमच्या नात्यातील समस्त मावशा-काकवा-माम्यांच्या अफाट हिंदीची व वाक्चातुर्याची आठवण करून दिलीस! लई हसले!! :)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

गोगोल's picture

23 Mar 2010 - 9:25 pm | गोगोल

एकदम धमाल लिहिलय..आता पुढच्या भागात खर्याखुर्‍या गोदभराईला काय झाल ते लिहा

मेघवेडा's picture

23 Mar 2010 - 9:54 pm | मेघवेडा

एकदम कडक लिख्या हय!! सबको ताली बजानाईच पडेंगा!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Mar 2010 - 10:16 pm | बिपिन कार्यकर्ते

हॅहॅहॅ!!! भगवान विष्णूंनीच का म्हणून दर वेळी ब्याटिंग करायची? आता आमच्या लक्षुम्बाई पण आल्या ब्वॉ क्रीजवर... आणि ब्याटिंगला आल्या आल्या सिक्सरच मारली... विष्णूबुवा, घरातच कांपिटिशन आली आता.

मस्त लिहिलं आहे, रेवती.

"वहीं बगल में दूधके पॅकेट रख्खे हैं." हे समजण्यासाठी हिंदी येण्याची आवश्यकता नव्हती. पदर तोंडाला लावत सगळ्या जणी आत पळाल्या.

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

23 Mar 2010 - 11:42 pm | विसोबा खेचर

झक्कास लेख... :)

तात्या.

सन्जोप राव's picture

24 Mar 2010 - 5:46 am | सन्जोप राव

छान, चिमटेदार, रंजक लेख. मजा आली.
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

चित्रा's picture

24 Mar 2010 - 6:00 am | चित्रा

मस्त! छानच लेख.

दिपक's picture

24 Mar 2010 - 9:27 am | दिपक

धम्माल लिहलयं.. मजा आली वाचुन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Mar 2010 - 9:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच! रेवतीताई, तुम ने लेख आणखी मोठा क्यूं नहीं लिख्या?

अदिती

महेश हतोळकर's picture

24 Mar 2010 - 10:28 am | महेश हतोळकर

वो पंगतमे लडकीने लडकेको घास भरवाया के नही? और वो नाम लेना तो भूलही गये ना!

झकासराव's picture

24 Mar 2010 - 11:01 am | झकासराव

:)) :)) :))

टुकुल's picture

24 Mar 2010 - 11:34 am | टुकुल

मजा आली वाचुन, आधी वाटल कि खराच अनुभव आहे

--टुकुल

समंजस's picture

24 Mar 2010 - 12:11 pm | समंजस

व्वा!!! एकदम कडक कथा!! :D
रेवतीतै, लिखाणाचा हाथ थोडा आणखी सैल करा :)

Dhananjay Borgaonkar's picture

24 Mar 2010 - 12:43 pm | Dhananjay Borgaonkar

झकास लिखाण :D :D
हस हसके मेलो. :P :P

स्वाती दिनेश's picture

24 Mar 2010 - 6:55 pm | स्वाती दिनेश

मस्तच ग रेवती...
स्वाती

शुचि's picture

24 Mar 2010 - 7:18 pm | शुचि

मस्त
>>,"आलात ना? प्रवास कसा झाला? त्रास वगैरे नाही ना झाला?" असं विचारतात त्याचा तसाच्या तसा हिंदी अनुवाद करत हिने'"आ गये क्या?............" अशी सुरुवात केली. एक बरं, कि सुलीमामीकडे हसणारं कोणी नव्हतं.>>
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

पक्या's picture

24 Mar 2010 - 10:23 pm | पक्या

हा हा हा , मस्त. छान झालाय लेख , रेवती ताई.
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे नाव घेणे ह्यावरून पण काही विनोदी लिहायला हवे होते.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

रेवती's picture

24 Mar 2010 - 11:15 pm | रेवती

धन्यवाद मंडळी!
पहिलेच काल्पनिक लेखन होते म्हणून जरा साशंक होते. आपल्या प्रतिसादांमुळे छान वाटले. आजकाल बरेच किस्से कुठुनतरी कानावर येतात त्यातून हे लेखन जुळून आले.
देवकाका, आपले प्रतिसाद नेहमी आपुलकी दाखवणारे असतात. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद!:)

रेवती

इंटरनेटस्नेही's picture

21 Dec 2010 - 1:44 am | इंटरनेटस्नेही

रेवती ताई,मस्तच आहे लेखन! हसुन हसुन पोट दुखायला लागले! =)) =))

वरणभात.कॉम तर खासच!

"मराठी लोकांचे हिंदी" यावर अनेक किस्से वाचले आहेत आज त्यात नवीन भर पडली.

नरेशकुमार's picture

22 Dec 2010 - 9:24 am | नरेशकुमार

"वहीं बगल में दूधके पॅकेट रख्खे हैं."

ब्रा,

मन१'s picture

24 Jul 2012 - 10:08 pm | मन१

आपका लेख वाचके खूप मजा आया |

स्मिता.'s picture

24 Jul 2012 - 10:22 pm | स्मिता.

अरे, ये लेख नजरसे सूट गया था... अब मनोबाने वर लाया तो वाचा. और लिहो रेवतीआजी.

>> संध्याकाळी साखरपुडा झाल्यावर स्नेहाच्या सासूबाईंना मातोश्रींनी जाउन गोदभराईची 'रस्म' कधी करायची असे विचारताच त्यांचे डोळे पांढरे झाले. आपल्या मुलांनी इतकी प्रगती करून प्रकरण 'गोदभराई'पर्यंत आणून ठेवलय हे त्यांना माहितच नव्हतं. "इश्श्य, वैसा नही बाई." सांसकी गोदभराई
हे वाचून वेड्यागत हसतोय. मस्तच !!

जाई.'s picture

24 Jul 2012 - 10:37 pm | जाई.

खुसखुशीत लेखन

चिगो's picture

24 Jul 2012 - 11:44 pm | चिगो

खुशखूशीत लेख.. एकदम भारी.

वही बगलमे दूध के पॅकेट रख्खे हैं |

"जब्रा" पयोश्लेष ;)

चैतन्य दीक्षित's picture

25 Jul 2012 - 12:55 am | चैतन्य दीक्षित

लेख लई म्हणजे लईच आवड्या :)
असेच और भी लिहो

आजकल ये जुने धागे कौन और कायकू वर काढरेला?

मस्तच लेख. जेंव्हा नवीन लेख येत नसतील तेंव्हा कोणीतरी असे जुने चांगले, मजेशिर लेख काढले तर खरच मजा येईल. कितीतरी असे जुने चांगले लेखक आणि लेख असतील असतील जे आत्ताच मिसळपाव वाचायला सुरवात केलेल्याना माहित नसतील. असे लेख वाचायला मिळाले तर मजा येईल.