दत्तकविधान-७

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
12 Mar 2010 - 3:25 pm

दत्तक मुलासाठी नावनोंदणी केल्यानंतर तब्बल पावणेदोन वर्षांनी आम्हाला
पहिलं बाळ आज पाहायला मिळणार होतं.
लग्नाआधीपासून ठरविलेल्या एका निर्णयाच्या पूर्ततेतला महत्त्वाचा टप्पा
आज पार पडणार होता! त्या निर्णयावर आम्ही ठाम राहिलो होतो, पण मध्यंतरी
परिस्थितीच अशी होती की आशा सोडून द्यायचे विचारही मनात येत होते.
सुदैवानं ती लवकर निवळली आणि आज या महत्त्वाच्या वळणावर आम्ही उभे होतो.
मी सकाळी रत्नागिरीहून पुण्याला आलो आणि 11 वाजता हर्षदासह संस्थेत दाखल झालो. आम्हाला तिथे दिवसभर द्यायचा होता. फॉर्म भरून देताना आमच्या
मुलाखती आणि सविस्तर माहिती घेण्यात आली होती. या टप्प्यावरही आमच्या
अधिक सविस्तर मुलाखती घेतल्या गेल्या. अगदी आमचं लग्न कसं ठरलं, कुणी
ठरवलं, लहानपण कसं होतं, पालकांशी संबंध कसे आहेत, शिक्षण कोणत्या विषयात
घेतलं, त्यात काय अडचणी आल्या, आवडीनिवडी काय आहेत, एकमेकांशी नातं कसं
आहे, भविष्यकाळात काय योजना आहेत, वगैरे वगैरे. आम्ही दत्तक मुलाला
वाढविण्यासाठी वैचारिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत
की नाही, हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न होता. आम्ही अगदी मनमोकळी उत्तरं
दिली. बऱ्याच दिवसांनी कुणापाशी आपलं मन मोकळं केल्यासारखाच अनुभव आला.
खूप बरं वाटलं. लग्नाविषयी, विचारांविषयी तर भरभरून बोलायला मला नेहमीच
आवडतं. आज पुन्हा आणि अगदी निवांत संधी मिळाली होती.
नंतर आम्ही बाळ बघायला गेलो.
शॉपिंग मॉलमध्ये गेल्यासारखं एका स्टॉलवर
बाळं मांडून ठेवल्येत आणि "याचे कान जरा लहान वाटताहेत नाही,' "किंचित
जाड वाटतंय,' "नको. डोक्‍यावर केस कमी आहेत,' "याच्यात अमक्‍या शेडचं
नाही का,' असे प्रश्‍न विचारून चिकीत्सक वृत्तीनं त्यातलं एक "खरेदी'
करण्याचा प्रश्‍नच नव्हता. आमच्या कुटुंबात साजेलसं, आमच्या वर्णाशी
साधर्म्य असणारं आणि उत्तम, निरोगी बाळ आमच्यासाठी संस्थेनं आधीच निवडून
ठेवलं होतं. बाळ घेणाऱ्यांची वाढती यादी आणि तुलनेनं बाळे कमी, हे व्यस्त
प्रमाण हे त्याचं एक कारण होतंच, शिवाय त्याच्याशी जिवाभावाची, नात्याची,
आपुलकीची वीण जोडायची होती. अंगकाठी, रंगसंगती, हे घटक दुय्यम असणंच
अपेक्षित होतं.
"नाही' म्हणण्याचा अधिकार कोणत्याही जोडप्याला असला, तरी त्यानंतर पुन्हा
नव्या बाळाचा पर्याय त्यांना कधी मिळेल, याची शाश्‍वती देता येत नाही. या
बाळाबाबत आम्हाला नाही म्हणण्याजोगं वेगळं काही वाटलं नाही. "तुमच्या
डॉक्‍टरला एकदा दाखवून घ्या,' असा सल्ला संस्थेनं दिला.
आमचं मन आणि घर आता नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी उत्साहानं उचंबळून
वाहू लागलं होतं...
(क्रमश:)
दत्तकविधान-६

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2010 - 3:44 pm | बिपिन कार्यकर्ते

आत्ताच ही लेखमाला नजरेस पडली... राहून गेली होती... वाचतोय...

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

12 Mar 2010 - 5:45 pm | स्वाती दिनेश

आत्ताच ही लेखमाला नजरेस पडली... राहून गेली होती... वाचतोय...
हो ना, ही लेखमाला माझ्याही नजरेतून सुटली होती, वाचते आहे.. तुमचा अनुभव नक्कीच उत्कट असणार आहे ..
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2010 - 3:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)

पुढे?

अदिती

चतुरंग's picture

12 Mar 2010 - 5:32 pm | चतुरंग

चतुरंग

शुचि's picture

12 Mar 2010 - 5:42 pm | शुचि

फार रस आला आहे वाचण्यात. अ-प्र-ति-म.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर