दत्तकविधान-५

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
12 Mar 2010 - 3:19 pm

मनस्वीला आम्ही दुसऱ्या बाळाविषयी अगदी सहजपणे सांगितलं. "तुला घरात एकटं
वाटतं ना, कंटाळा येतो ना, मग घरात एखादं बाळ असेल तर किती छान,' हा
तिच्या मानसिक तयारीचा मूळ गाभा होता. तिनंही ते सहज मान्य केलं. पण लहान
बाळ म्हणून मावसबहिणीलाच तिनं जवळून पाहिलं होतं. त्यामुळं बाळ आणायचं ते
मुलगीच, अशी तिची ठाम धारणा होती. मग आपल्या घरात आधीच तुम्ही दोन मुली
(आई आणि ती) आहात ना, मग आणखी एक मुलगी आणली तर कशी चालेल? त्यापेक्षा
मुलगा आणला, तर दोन मुलगे-दोन मुली (आई-बाबा व मनस्वी आणि तिचा भाऊ)
होतील, असं तिला पटवून दिलं. तिलाही ते पटलं.
शेजारी कळलं तरी हरकत नाही, अशी वेळ आली, तेव्हाच आम्ही मनस्वीला
सांगितलं. त्यामुळं तिनं शेजारीपाजारी जाहिरात केलीच. अपेक्षेप्रमाणे
"बाळ कधी आणायचं,' असं टुमणंही सुरू केलं. पण अनपेक्षितरीत्या, त्यासाठी
हात धुवून मागे लागली नाही. हे सुखद आणि धक्कादायक होतं.
शाळेत मात्र काही सांगू नको, आपण बाळ आणल्यावरच सगळ्यांना "सरप्राइज'
देऊ, असं आम्ही तिला बजावलं होतं. तिनं कसाबसा तीन-चार दिवस तग धरला.
नंतर एके दुपारी शाळेतून घरी आल्यावर मला म्हणाली, ""बाबा, मी बाळ आणायचं
हे फक्त आर्याला सांगितलंय.''
"कशाला सांगितलंस,' असं मी गुरगुरल्यावर मला म्हणते, ""पण तिला सांगितलंय
मी, कुणाला सांगू नकोस म्हणून!''
दुसऱ्या दिवशी "कुणाला सांगू नकोस' हे वाक्‍य आणि आमचं गुपीत एका
मित्राला सांगून झालं होतं. वर्गात शेजारी जो बसेल, त्याला तिच्या
मर्जीनुसार हे रहस्योद्‌घाटन करण्याचं तंत्र तिनं अवलंबलं होतं. तरीही,
गती एवढी नव्हती.
आणखी एक-दोनच मैत्रिणींना पुढच्या आठ दिवसांत सांगून झालं. सुदैवानं
बाईंना मात्र सांगितलं नाही.
घरात बाळ आणायचं मग ते कुठून, कधी, कसं आणायचं, याविषयी तिनं फार खोदून
विचारण्याचा प्रयत्न केला नाही, हे आमच्या पथ्यावरच पडलं. आई, तुझ्या
पोटात बाळ आहे का, ते कधी बाहेर काढायचं, वगैरे बालसुलभ प्रश्‍नही तिला
पडले नाहीत. घरात बाळ येण्याशी तिला मतलब होता. मग ते कुठून का येईना!
...आमची विचारसरणी तिनं वेगळ्या प्रकारे कशी काय आत्मसात केली, याचंच
आश्‍चर्य वाटत होतं!
शिबिरात सहभागी झालेल्या आमच्या त्या मित्राचा फोन आला. त्याला
दुसऱ्या दिवशी मुलगी मिळणार होता. त्याचं अभिनंदन केलं. अर्थातच, मुलगी
हवी असल्यानं त्याचा नंबर आधी लागला होता. मुलांसाठीची वेटिंग लिस्ट आणखी
मोठी होती! मग काही दिवसांनी त्याच्या घरी जाऊन त्याची मुलगी पाहून आलो.
तो या नव्या पाहुण्यात छान रमला होता. त्यालाही आधीचा मुलगा होता. त्या
मुलानंही आपल्या बहिणीला सहज स्वीकारलं होतं...
(क्रमश:)
दत्तकविधान-४

मुक्तकप्रकटन