संस्थेत आमची प्राथमिक मुलाखत झाली. आमचं मूल दत्तक घेण्याचं कारण, त्यामागची मानसिकता, आमची मानसिक-आर्थिक तयारी, दत्तक मुलाची प्रक्रिया, त्यासाठीची कागदपत्रे, सगळी माहिती देण्यात आली. जवळपास दोन तासांचं ते मार्गदर्शन होतं. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं - दत्तक मूल मिळण्यास किमान दीड वर्षाचा कालावधी लागतो. दत्तक घेऊ इच्छिणारे पालक "वेटिंग लिस्ट'वर आहेत!
दीड वर्षं हा कालावधी आमच्यासाठी अगदीच अनपेक्षित, प्रदीर्घ होता. आमचं दोन मुलांमधल्या अंतराचं नियोजन बोंबललं होतं. म्हणजे मनस्वी साडेचार वर्षांची होईपर्यंत तरी तिला भाऊ मिळणार नव्हता. तोपर्यंत गावभर बोंब करून कुणाला सांगणंही योग्य नव्हतं. लोकांच्या प्रश्नार्थक नजरा झेलणं परवडणारं नव्हतं.
कागदपत्रांची जमवाजमव हे देखील एक अवघड लक्ष्य होतं. भलामोठा अर्ज, त्यासह मूल दत्तक घेण्याबद्दलच्या भूमिकेचा पुरवणी अर्ज मनापासून भरून दिला. त्यात माझ्या लेखनाची, शैलीची खुमखुमी पुरेपूर जिरवता आली. ते लिखाण वाचून आम्हालाच प्राधान्यानं मूल द्यावं असं संस्थाचालकांना वाटलं पाहिजे, असा एक हेतू त्यामागे होता. प्रत्यक्षात तसं काही होणार नव्हतं.
आमचे राहण्याच्या ठिकाणचे पुरावे, फोन, लाइटची बिलं, पॅन कार्डांच्या झेरॉक्स, गुंतवणुकीची कागदपत्रं, त्यांचे तपशील, इत्यादी इत्यादी सुपूर्द करायचं होतं. तेदेखील सर्व अटेस्टेड कागदपत्रांसह आणि तीन सेटमध्ये. एवढे कागद अटेस्टेड कुठून करून घ्यायचे आणि त्याला किती पैसे जाणार, याचीच विवंचना होती. बरीच भटकंती केल्यानंतर आमच्या घराशेजारीच सर्व काही फुकटात करून देणारे एक गृहस्थ भेटले. त्यांच्याकडून ती कागदपत्रं घाऊकमध्ये अटेस्टेड करून घेतल्यानंतर सुटकेचा निःश्वास टाकला.
पासपोर्टला लागतो, तसा एक पोलिसांचा "नो ऑब्जेक्शन रिपोर्ट'ही हवा होता. त्यासाठी पोलिस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागणार होत्या. पहिल्यांदाच तेथे गेलो, तेव्हा कुठल्या तरी गुन्हेगाराला "आत' घेऊन पट्ट्यानं बडवत होते. त्याच्या जागी काही काळ मी स्वतःला पाहिलं! सुदैवानं तो रिपोर्ट मिळवायला फार कष्ट पडले नाहीत.
आम्ही सर्व कागदपत्रं सुपूर्द केली. अँड अवर टाइम स्टार्टेट देन...
(क्रमशः)