२००९ चा ऑगस्ट महिना. आम्हाला रक्षाबन्धन, स्वातन्त्र्यदिन व त्याला लागून रविवार अशा लागोपाठ तीन सुट्ट्यान्चा दुग्धशर्करा योग जमून आला होता. त्याचा फायदा घेऊन आम्ही दीऊ ला जायचे ठरवले. अहमहदाबादपासून दीऊ साधारण ५०० कि.मी. आहे. अहमदाबाद-भावनगर-उना-दीऊ असा साधारण मार्ग आहे.
१४ तारखेला सकाळी पाच वाजता आम्ही तीन कुटुम्बे निघालो. स्वतःजवळ वाहन असल्यामुळे बस, ट्रेन पकडण्याची कुठचीही गडबड नव्हती. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाचा तडाखा कुठेही जाणवत नव्हता. गाणी गात, ऐकत, गप्पागोष्टी करत , मध्ये दोन ठिकाणी चहा व नाश्त्यासाठी थाम्बून दुपारी साधारण दोन अडीच च्या सुमारास आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. जेवण करून, थोडासा आराम करून आम्ही बाहेर पडलो.
सन्ध्याकाळची वेळ झाली होती. दीऊ अशी जागा आहे की कुठलयाही रस्त्यावरून थोडे अन्तर प्रवास केला की बाजूने समुद्र साथ करायला लागतो. वळणावळणान्चे रस्ते आणि साथीला सागर.
पहिल्यान्दी आम्ही गेलो गन्गेश्वर महादेव या ठिकाणी. येथे थोडेसे खाली उतरून गेले की शन्कराच्या पिन्डी आहेत. बाजूलाच आहे उफाळता सागर. भरतीच्या वेळेला तर ईथे जाताच येत नाही. आम्ही गेलो तेव्हा ओहोटी होती पण लाटा तरीही फेसाळत्याच होत्या. याचे कारण दीऊ मध्ये कुठेही गेले तरी किनार्यापासून थोडे आतमध्ये खडक आहेत. त्यामुळे सागर कायम फेसाळलेला असतो.
तिथेच एका दगडावर दिसला एक खेकडा.
मग तिथून निघालो सनसेट पॉईन्ट बघायला. पावसाळी वातावरण असल्यामुळे मधूनच ढगान्मुळे अन्धारून येत होते तर मधूनच सुर्यप्रकाश ढगान्च्या आडून दोकावत होता.
आम्ही सनसेट पॉईन्टच्या जवळ पोचलो आणि थोड्या वेळापुरता स्वच्छ सुर्यप्रकाश आला. सनसेट पॉईन्ट वरून समोर अथान्ग सागर पसरलेला दिसतो तर उजव्या बाहूला दिसतो चक्रतीर्थ बीच.
आजूबाजूचे सगळा नजारा बघता बघता सुर्यास्ताची वेळ झाली. दररोज सुर्यास्त होत असला तरी आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून तो बघण्यात काही वेगळीच मजा असते. त्यातही समुद्र किनारी तर खासच.
दुसरा दिवस उजाडला. आज दीऊचा किल्ला आणि सेन्ट पॉलचे चर्च बघण्याचे ठरले होते. प्रथम आम्ही भेट दिली चर्चला. हे सेन्ट पॉल चर्च सन १६९१ मध्ये बान्धले गेले. आतमध्ये सुरेख लाकडी कोरीव काम आहे आणि त्यामध्ये आहेतयेशू आणि मदर मेरीच्या सुन्दर मुर्ती.
तिथून आम्ही निघलो व आलो दीऊच्या किल्ल्याला भेट द्यायला. हा किल्ला पोर्तुगीज व गुजरातच्या तत्कालीन राजानी मिळून सन १५३१ ते १५४६ या कालावधीत बान्धला. याच्या तिन्ही बाजूनी अरबी समुद्र आहे . त्यामुळे सुरक्षेच्या द्रुष्टीने याचे विशेष महत्व आहे. किल्ल्यावर अजूनही चान्गल्या अवस्थेतील तोफा आहेत, तोफगोळे आहेत.
सम्पूर्ण किल्ल्यामध्ये पावसाळ्याचा परिणाम म्हणून हिरवेगार दिसत होते. किल्ल्यामध्ये असलेले दीपग्रुह त्या हिरव्यागार पार्श्वभूमीवर छन दिसत होते.
आता उन्हे चान्गलीच वर आली होती. आरामाची पिकनिक असल्यामुळे फारसे कष्ट घ्यायचे नाहीत हे ठरलेच होते. त्यामुळे हॉटेलवर परत येऊन ताणून दिली. सन्ध्याकाळी दीऊच्या प्रसिद्ध नागवा बीचवर समुद्र स्नानाचा आनन्द घेतला आणि तिसरे दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघालो. नजरेसमोर मात्र दिसत होता दीऊच्या सम्पूर्ण ट्रीपमध्ये आमची साथ करणारा सागर.
प्रतिक्रिया
11 Mar 2010 - 10:59 pm | शुचि
छायाचित्रे आवडली विशेषतः - खेकडा आणि चर्च.
एकत्र मित्रांबरोबर (कुटुंबीयां समवेत) खरच मजा येते.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
11 Mar 2010 - 11:11 pm | बज्जु
दररोज सुर्यास्त होत असला तरी आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहून तो बघण्यात काही वेगळीच मजा असते.
हे वाक्य एकदम पट्लं बुवा आपल्याला.
इथे मला कोकणक्ड्यावरुन, रायगडाच्या टकमका वरुन बघितलेला सुर्यास्त आठवतो. बाकी दिऊच्या किल्ल्याला भेट दिलीत हे बर केलतं.
गड्-किल्ले प्रेमी बज्जु
11 Mar 2010 - 11:38 pm | मदनबाण
सर्वच फोटो मस्त आहेत... :)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
11 Mar 2010 - 11:39 pm | डावखुरा
उत्तम छायाचित्रण......"राजे!"
12 Mar 2010 - 12:13 am | विसोबा खेचर
वा!
12 Mar 2010 - 12:24 am | वाटाड्या...
एकदम मज्जाणी लाइफ...
12 Mar 2010 - 2:40 am | बेसनलाडू
मोहक प्रकाशचित्रे. आवडली.
(पर्यटक)बेसनलाडू
12 Mar 2010 - 4:14 am | मेघवेडा
मस्त!!!
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
13 Mar 2010 - 1:22 pm | खादाड
=D>
13 Mar 2010 - 3:11 pm | गणपा
सुंदर :)
13 Mar 2010 - 6:46 pm | प्रियाली
फोटो आणि माहितीचे तुकडे दोन्ही मस्त
13 Mar 2010 - 6:55 pm | सुनील
शाळेत दीव असा उच्चार शिकलो होतो. दीव आहे की दिऊ?
दुसरे म्हणजे, ते बेट आहे असेदेखिल वाचले होते, असे वाटते. तिथे मुख्यभूमीपासून होडीशिवाय जाता येते काय?
फोटो छानच. अजून थोडी माहिती असती तर चांगले झाले असते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.