मोराच्या चिंचोलीबद्दल बऱ्याच वर्षांपासून ऐकत होतो. एखाद्या गावात जाऊन मोर पाहण्याचं प्रचंड आकर्षण वगैरे नव्हतं. पण मुळात भटकायला, नवीनवी गावं नि रस्ते शोधायला आवडत असल्यानं कधीतरी एकदा तिकडे जाण्याचं डोक्यात होतं. परवाच्या रविवारी हा योग जुळून आला.
गेल्या महिन्यात एका छोट्या ग्रुपला घेऊन मोराच्या चिंचोलीला एक सहल काढायचा बेत केला होता. तो काही कारणांनी साध्य झाला नाही. म्हटलं, वेळ आहे, तर आपणच जाऊन यावं आधी. कार हाताशी होतीच. आनंदराव थोपटे यांच्या वेबसाइटवर जरा टेहळणी केली होती. त्यांच्याशी संपर्क साधून सर्व आलबेल आहे ना, याची चौकशी केली. सकाळी 6 ते 8 आणि सायं. 5 ते 7 ही मोर दिसण्यासाठी उत्तम वेळ. आम्हाला सकाळी लवकर उठून जाणं शक्य नव्हतं, म्हणून दुपारी निघायचं ठरवलं. एक वाजता निघणार होतो, पण सव्वादोनपर्यंत ढकलाढकली सुरू राहिली. मग चिडचीड, वैताग, भांडणांनंतर मनस्वीला काखोटीला मारून कसेबसे पुण्याबाहेर पडलो!
मोराच्या चिंचोलीचा रस्ता शोधायला फारसा अवघड नव्हता. नगर रस्त्यावरून शिक्रापूरपर्यंत जाऊन पुढे पाबळ फाट्याला वळायचं होतं. शिक्रापूरपासून चिंचोली 18 कि.मी. आहे. पुण्यापाहून शिक्रापूर साधारण 48 किमी. पुढचा रस्ता थोडा खराब होता. त्यातून एका अरुंद वळणावर एका टेम्पोमध्ये कोंबून कोंबून भरलेल्या उसाच्या कांड्यांनी आमच्या गाडीच्या अगदी जवळून ठिकठिकाणी पप्प्याही घेतल्या!
दुपारी चारच्या सुमारास मोराच्या चिंचोलीत पोचलो. आनंदराव थोपटेंचा मुलगा आम्हाला न्यायला जरा पुढे आला होता. चिंचोलीत दोन-तीन कृषी पर्यटन केंद्र आहेत. जय मल्हार, माऊली वगैरे नावांची. या थोपटे मंडळींचं कृषी पर्यटन अगदीच घरगुती, पण छान, आकर्षक आणि नीटनेटकं आहे. बाहेर पाटी, बोर्ड वगैरे काही नाही. आम्ही थेट थोपट्यांच्या अंगणातच दाखल झालो. ज्येष्ठ आनंदरावांनी हसतमुखानं स्वागत केलं. नातेवाइकच घरी आल्यासारखी "प्रवासाचा त्रास वगैरे नाही ना झाला,' अशी चौकशी केली. मग चहापान झालं. नंतर आम्ही त्यांच्यासह त्यांचा मळा बघायला निघालो. ज्वारी, वांगी, मका, गवार, गहू, कसली कसली शेती करतात ते! चाळीसेक एकर जमीन नि खाणारी चार माणसं! गावात माणसं मिळत नाहीत म्हणून बरीचशी जमीन तशीच पडीक!
शेतात आम्ही पाऊल टाकलं नि दुसऱ्याच क्षणाला तीन-चार मोर शेतात बागडताना दिसते. आमची चाहूल लागताच पळून गेले. पुढच्याही शेतात कुठेकुठे दडून उभे होते. थोडाफार फेरफटका मारून, चिंचा वगैरे खाऊन आम्ही पुन्हा घराकडे परतलो. तोपर्यंत घराच्या जवळ सत्तरेक फुटांवर झाडांखाली काही मोर दिसत होते. कॅमेरा शक्य तितका झूम करून त्यांची छबी टिपली.
नंतर आनंदराव आम्हाला त्यांच्या हिल-स्टेशनवर म्हणजे चिंचिणीखाली घेऊन जायला निघाले. घराच्या आवारातून बाहेर पडलो आणि शेजारच्याच माळावर चार-पाच मोर मस्त बागडताना अगदी जवळून दिसले. एक मोर आणि लांडोरीचा खेळही (!) चालला होता. त्याचा व्हिडिओ टिपता आला. काही फोटो मिळाले. तिथून मग त्या "हिल स्टेशन'वर पोचलो. रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या चिंचेच्या झाडांखाली त्यांनी खाटाबिटा टाकून बसायची झकास व्यवस्था केली होती. मोठा ग्रुप असेल तेव्हा ही थोपटे मंडळी तिथे सडारांगोळी वगैरे घालून स्वागताचा कार्यक्रम करतात.
संध्याकाळी कृषी पर्यटनच्या बससेवेच्या माध्यमातून एक महिला मंडळ येणार होतं. आनंदरावांची त्यासाठी लगबग चालली होती. आम्ही घरी परत आलो आणि ते तयारीला लागले. दोन किलो पोहे करून ठेवले होते. पण ती पुणेकर सुसंस्कृत मंडळी आल्यावर काय बिनसलं कुणास ठाऊक! अचानक काही मिनिटांत निघून गेली. अन्न-पाण्यावर बहिष्कार घालून! त्यांना म्हणे घरात, दारात, अंगाखांद्यांवर खेळणारे, बागडणारे मोर अपेक्षित होते. "तुमच्या गावातल्या प्रत्येक घरी पाच-पाच मोर पाळलेत, असं ऐकलंय आम्ही. काढा ते बाहेर!' असं सुद्धा दरडावून विचारायला त्यांनी कमी केलं नाही!!
मंडळी पोहे न खाता निघून गेली, तरी आनंदराव मात्र शांत होते. "दोन किलो पोह्यांचं आता करायचं काय? माझं नुकसान कोण भरून देणार?' असा एखाद्या व्यावसायिकाला साजेसा थयथयाट त्यांनी अजिबात केला नाही. "राहू दे. खातील गावातील पोरं. जाऊ देत त्यांना. माणसाचं समाधान महत्त्वाचं,' असं ते पत्नीला आणि मुलाला समजावत होते. मुलाला राहवलं नाही. शेजारच्या दुसऱ्या व्यावसायिक पर्यटन केंद्रात ही मंडळी गेली. पण तिथली 100 रुपये प्रवेश फी ऐकूनच परत फिरली. पुन्हा थोपट्यांकडेच आली आणि पोह्यांवर तुटून पडली.
त्यांच्या निमित्तानं आम्हीही पोहे खाऊन घेतले. रात्री आम्हाला लवकर निघायचं होतं. मोर पोटभर पाहून झाले होते आणि अंधारतल्या अपरिचित रस्त्यावरून फार उशीरा जायला नको, असंही वाटत होतं. थोपटे मंडळींनी ज्वारीची भाकरी, पिठलं, चटण्या, लोणचं, पापड, आमटीभात, असा फर्मास बेत केला होता. आनंदराव स्वतः भाकरीवर बदाबदा तूपही ओतत होते. (मला पुण्यातल्या खाणावळी नि भोजनालयांतल्या "तुपाच्या वाटीचे पैसे वेगळे पडतील,' अशा पाट्यांची आठवण झाली!) "रात्री कमी जेवावे' वगैरे आरोग्यदायी बोधामृताला बासनात गुंडाळून आम्ही त्या जेवणावर यथेच्छ ताव मारला.
जेवल्यानंतर तर "लक्ष्मीनारायणा'चा जोडा म्हणून आनंदरावांनी आणि त्यांच्या अर्धांगिनीनं आमचं औक्षण वगैरे केलं. रीतसर ओटी भरणं, श्रीफळ देणं वगैरे कार्यक्रम झाले. या भल्या मंडळींनी आमच्याकडून थेट पैसेही घेतले नाहीत. "तुम्हाला काय द्यायचे ते देवापुढे ठेवा' म्हणाले. पावणेआठला गावातून निघालो. मुख्य फाट्यापर्यंत सोडायला स्वतः आनंदराव त्यांच्या मोटरसायकलवरून आले होते. तिथून दीड तासांत घरी पोचलो.
"आनंद कृषी पर्यटन केंद्र' नावाने वेबसाइटही चालविणाऱ्या या थोपट्यांच्या पाहुणचाराचा अनुभव अगदी अनपेक्षित होता. त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून त्यांचा साधेपणा दिसत होता, पण प्रत्यक्ष गेल्यावर तो अनुभवायलाही मिळाला.
काही टिप्स ः
अंतर ः मोराची चिंचोली पुण्यापासून 66 कि.मी. अंतरावर आहे. जाण्यासाठी पुणे-नगर रस्त्यावर शिक्रापूरहून पाबळ फाट्याला वळावं लागतं. शिक्रापूर अंतर 50 कि.मी आणि पुढे चिंचोली 18 कि.मी.
वेळ ः मोर दिसण्याची वेळ सकाळी 6 ते 8 आणि सायं. 5 ते 7. सकाळी जास्त मोर दिसतात आणि भाग्यात असेल, तर नाचतानाही पाहायला मिळतात. जास्त जवळून. संध्याकाळी मोर तुलनेनं कमी दिसतात.
जायचं कधी? ः कुठल्याही मोसमात. एक-दोन पाऊस पडून गेल्यानंतर मोर जास्त खुशीत असतात. त्या वेळी त्यांचा नाच आणि पिसारा पाहण्याची सुवर्णसंधी असते. शिरूर तालुक्यात पाऊसही फार नसतो. त्यामुळे त्याचा त्रास होण्याची शक्यता कमी.
पथ्यं कोणती पाळाल? ः कुठलाही वन्य प्राणी त्याच्या मर्जीप्रमाणेच वागत असतो. "माणसं आल्येत, चला त्यांच्यासमोर फोटो काढून घेऊ,' म्हणून आपल्या अंगचटीला येण्याची शक्यता नसते. मोराचंही तसंच. चिंचोलीत मोर भरपूर असले, तरी ते ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी आणि जवळून दिसतीलच, असं सांगता येत नाही. शेवटी त्यांची मर्जी आहे! जास्त जवळ गेलं, तर ते पळून जाण्याची शक्यताच जास्त. झूमची सुविधा असलेला कॅमेराही फोटोसाठी अधिक चांगला. नाहीतर आपल्या डोळ्यांचा कॅमेरा आहेच! ग्रुपनं जायला हे जास्त चांगलं ठिकाण आहे. रात्रीचा मुक्कामही करता येणं शक्य आहे.
----
छायाचित्रे इथे पाहा
प्रतिक्रिया
9 Mar 2010 - 7:02 pm | बिपिन कार्यकर्ते
च्यायला!!! मिष्टर अभिजित... तुम्ही जायच्या आधी वगैरे सांगत जा हो... जमल्यास आम्हीही येऊ की... जाऊन आल्यावर काय सगळेच सांगतात. असो. :)
मस्त प्रकार दिसतोय हा. एखाद्या विकेंडला जमवू... ते फोटो आणि चित्रफीत मिळेल का बघायला?
बिपिन कार्यकर्ते
10 Mar 2010 - 11:02 am | आपला अभिजित
नक्की सांगतो. पण माझं असं आहे, की एकदा ठरवल्यावर मी ते करतोच! भले काहीही होवो. पोटात दुखतंय, संध्याकाळी भाजी आणायला जायचंय, घरी पाहुणे येणारेत, उद्या सकाळी लवकर, ९ ला उठायचं, असली कारणं मला झेपत नाहीत.
बघा बुवा!!
10 Mar 2010 - 12:14 pm | श्रावण मोडक
फट्टाक!!!
10 Mar 2010 - 2:29 pm | दिपक
=))
छान माहिती दिलीत अभिजीतराव. मोराचा व्हिडियो ज्याम आवडला.
10 Mar 2010 - 3:09 pm | बिपिन कार्यकर्ते
पण माझं असं आहे, की एकदा ठरवल्यावर मी ते करतोच
हॅहॅहॅ!!! अहो मग प्रस्ताव विचाराधीन असताना कळवा.. फायनल व्हायच्या आधी. :)
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2010 - 7:15 pm | प्रचेतस
अभिजीत राव,
एक सूचना करायल तुम्ही विसरलात. मोराची चिंचोली पाहायाला जातांना साधे(गावकर्यांसारखे) कपडे घालणे अत्यंत जरूरीचे. त्याने मोर न बुजता जास्त जवळ येतात.
----
(मोरप्रेमी) वल्ली
9 Mar 2010 - 8:04 pm | रेवती
वा!! मोरांबद्दल तर आपण सांगितलेच पण श्री.थोपट्यांनी केलेल्या पाहुणचाराचं कौतुक वाटलं. छान अनुभव!
रेवती
9 Mar 2010 - 8:06 pm | सनविवि
वा! जायला पाहिजे कधीतरी. फोटू टाका की राव!
9 Mar 2010 - 8:09 pm | रेवती
वेबसाईटवर छान व्हिडिओ आहे मोराचा.
रेवती
9 Mar 2010 - 8:16 pm | आपला अभिजित
फोटोची लिंक दिल्येय की पिकासाची!
यू ट्यूबवर व्हिडिओ पण टाकलाय. उद्या त्याची लिंक देतो. हापिसात बंदी आहे यू ट्यूबवर!!
peacock and peahen dancing @ morachi chincholi असा सर्च देऊन तुम्ही बघू शकता!!
9 Mar 2010 - 8:25 pm | बिपिन कार्यकर्ते
फटू बघितले. छान आहेत. :)
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2010 - 9:23 pm | श्रावण मोडक
हेच म्हणतो.
लेखाच्या शेवटी दिलेल्या सूचना अत्यंत आवश्यक.
9 Mar 2010 - 8:54 pm | अविनाशकुलकर्णी
एक मोर आणि लांडोरीचा खेळही (!) चालला होता. त्याचा व्हिडिओ टिपता आला
हा व्हिडिओ इथे अप लोद करा उत्सुकता आहे...खेळ बघण्याची
9 Mar 2010 - 9:03 pm | चतुरंग
नगर-पुणे रस्त्यावर प्रत्येकवेळी 'मोराच्या चिंचोलीकडे' अशी पाटी दिसते आणि पुढल्यावेळी नक्की जाऊ असं म्हणतो पण ती पुढली वेळ काही अजून उगवली नाहीये! पाहू कधी जमते?
गतवर्षी सॅनडिएगो झू मध्ये मोराने सुखद दर्शन दिले होते त्याची आठवण झाली.
चतुरंग
10 Mar 2010 - 11:04 am | आपला अभिजित
चतुरंगराव. वाट वाकडी करा तेवढ्यासाठी.
9 Mar 2010 - 9:35 pm | मदनबाण
ह्म्म... मोर पाहण्यास नक्कीच आवडेल. :)
(मोरु) ;)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
9 Mar 2010 - 10:34 pm | मस्तानी
फारच सुरेख वर्णन ...
9 Mar 2010 - 10:45 pm | विसोबा खेचर
मस्तच! :)
9 Mar 2010 - 11:10 pm | प्राजु
सुरेख वर्णन आणि फोटो.
भारत दौर्यामध्ये एकदा भेट द्यायला हवी चिंचोलीला.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
9 Mar 2010 - 11:44 pm | पक्या
छान वर्णन.
मोराच्या चिंचोली ला जाउन आले पाहिजे एकदा.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
10 Mar 2010 - 11:08 am | आपला अभिजित
प्राजु, मदनबाण आणि पक्या,
जरूर भेट द्या चिंचोलीला. आणि तुमचा अनुभवही सांगा.
आणि हा पाहा मोर-लांडोरीचा व्हिडिओ.
10 Mar 2010 - 11:41 am | स्मिता श्रीपाद
खुप छान लेख...
लगेच जायची इच्छा झाली आहे...
आणि श्री.थोपट्यांनी केलेल्या पाहुणचार तर मस्तच...
इतकं आपुलकीनं करणारी लोकं आजकाल दुर्मिळचं म्हणायची..
-स्मिता
10 Mar 2010 - 11:42 am | झकासराव
त्यांना म्हणे घरात, दारात, अंगाखांद्यांवर खेळणारे, बागडणारे मोर अपेक्षित होते>>>>>>> =))
त्यानी मोराची चोच आणि त्याचे पाय हे कधी नीट बघितलेल दिसत नाही. :D
सुशिक्षीत मंडळी असतील तर त्यानी अवचटांची मोर ही कथादेखील वाचलेली दिसत नाहिये.
चांगली माहिती लिहिली आहे. :)
फोटोही उत्तम. झुमच्या कॅमेर्याची खरच गरज आहे.
10 Mar 2010 - 11:56 am | आपला अभिजित
झुमच्या कॅमेर्याची खरच गरज आहे.
कुणाला? मला, तुम्हाला की जगाला?
10 Mar 2010 - 11:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अभिजित-इस्टाईल वर्णनाने मजा आलीच, पण या चिंचोलीला गेलं पाहिजेच.
अदिती
10 Mar 2010 - 11:59 am | आपला अभिजित
झुमच्या कॅमेर्याची खरच गरज आहे.
कुणाला? मला, तुम्हाला की जगाला?
10 Mar 2010 - 2:13 pm | स्वाती दिनेश
मस्त! तुमचा अनुभव वाचून आनंदराव थोपट्यांच्या चिंचोलीला जावसं वाटतय.. बघू कधी आणि कसे जमते ते..
व्हिडीओ टिपला आहे म्हणता तो दावा की, तूर्त त्याच्यावर समाधान मानू..
स्वाती
अवांतरः तुमचे मोर बघून नारातली हरणे आठवली..
10 Mar 2010 - 7:01 pm | युयुत्सु
वेबसाईट कुठे आहे?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
10 Mar 2010 - 8:45 pm | चतुरंग
"काही टिप्स" असं लिहिलंय ना शेवटी, त्याच्या आधीच्या ओळीत "आनंद कृषी पर्यटन केंद्र" असे शब्द आहेत ती लिंक आहे!
चतुरंग
10 Mar 2010 - 11:11 pm | आपला अभिजित
यू ट्यूबचीही दिलेय वेगळी!!
11 Mar 2010 - 2:32 am | संदीप चित्रे
बर्याच वर्षांपूर्वी इकडे वेस्ट व्हर्जिनियाच्या इस्कॉन मंदिरात गेलो होतो. पावसाळी कुंद हवा होती आणि आम्ही इकडे तिकडे चालत फिरताना आमच्यासमोर अक्षरशः दहा पावलांच्या अंतरावर उभ्या असलेल्या मोराने त्याचा पिसारा फुलवला ! आम्ही म्हणजे मंत्रमुग्ध झाल्यासारखे बघतच राहिलो होतो !!
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
11 Mar 2010 - 4:10 am | रेवती
मीही सॅन डिएगोच्या झूमध्ये बरेच (म्हणजे चार पाच) मोर पिसारा फुलवून/ न फुलवता असलेले पाहिले. मस्त वाटले. एक मोर रस्त्यावर उभा होता.....तशी भितीच वाटली जवळ जाउन फोटो काढायची!

रेवती