स्वारी गोरखगडावर

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
6 Mar 2010 - 4:19 pm

"अरे ह्या महिन्यात तरी गोरखगडला जायचे का?" कंटाळुन शेवटी मेल माझ्याकडुन सर्व मित्रांना गेला. त्याला कारण असे होते की बर्‍याच दिवसांपासुन गोरखगडचा ट्रेक करायचा विचार होता. पण मुहूर्त काही सापडत नव्हता. या ना त्या कारणांमुळे हा बेत पुढेच ढकलला जात होता. पण हा ट्रेक करायचाच हा बेत मनात पक्का होता. त्यातच गडावरचा सचित्र लेख वाचनात आला आणि बस्स्स ठरविले कि ह्याच महिन्यात गोरखगड सर करायचा. हो ना हो ना करता करता आम्ही १३ जण तयार झालो त्या गोरखगडाला भेटण्यासाठी. शनिवारी आम्हा सगळ्यांना सुट्टी असल्याने २० फेब्रुवारीला जाणे नक्की केले. गोरखगड तसा मुंबईपासुन जवळच असल्याने व आमच्यापैकी बरेचजण कल्याण्-डोंबीवलीला राहणारे असल्याने बाईकनेच जाण्याचे सर्वानुमते ठरले. आम्ही १३जण आणि सात "बायका" (गैरसमज करुन घेऊ नका, "बाईकचे अनेकवचन" लिहिले आहे :)) गोरखगडाकडे कूच करण्याकरीता सज्ज झालो.

सकाळी सात वाजता कल्याणला बिर्ला कॉलेजजवळ सर्वांनी भेटण्याचे ठरले. आमची पिकनिक किंवा ट्रेक काहिहि असो त्यात एकजण तरी यायला उशीर करतोच. यावेळी मात्र आमची पाळी होती :). मी, अभिजीत, वेंकट आणि किशोर फक्त पाऊण तास उशीरा आलो. तेथे आधीच पोहचलेल्या आमच्या इतर मित्रांनी काहिच तक्रार केली नाहि. अर्थात त्याला कारणहि तसेच होते "बिर्ला कॉलेज" ;-) आणि सकाळची कॉलेजची वेळ :). आम्ही अजुन एक तास उशिरा आलो असतो तरी कोणीच काहि बोलले नसते. भेटण्याची हिच जागा जर दुसरी असती तर ???? .................. असो.............:)

आम्ही आल्यानंतर साधारण पावणेआठ वाजता आम्ही मुरबाडच्या दिशेने निघालो. वाटेत गोविली फाट्यावरुन (टिटवाळा) आमचा अजुन एक मित्र प्रशांत आम्हाला सामील झाला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात बाईकवरून जाताना मस्त धम्माल येत होती. कुठेही घाई किंवा अतिउत्साह नव्हता.
देहरी गावात खाण्याची काहि सोय नसल्याने आम्ही मुरबाडला नाश्ता करण्यासाठी थांबलो. हॉटेलमध्येही सगळ्यांची धम्माल चालु होती. काय ऑर्डर करायची ते किती करायची इथपासुनच चर्चा चालु झाल्या. "अरे मी तर गोड शिरा मागवतो. त्यामुळे थोडी एनर्जी येईल गड चढायला. गोड खाल्याने एनर्जी येते (????)" इति अमेय. "अरे अमेयसाठी अर्धा किलो साखर घेऊन चला रे याचे दुपारचे जेवणपण होईल :)" मध्येच एकजण ओरडला. "अरे आटपा लवकर रे उशीर होतोय" इति मी.
नाश्ता वगैरे आटपुन, दुपारच्या खाण्याकरीता काहि सामान घेऊन आम्ही परत प्रवास सुरू केला. एव्हाना सकाळचे साडेनऊ वाजले होते.

देहरी हे गाव गडाच्या पायथ्याशी वसले आहे आणि तेथुनच गोरखगडाकडे जाणारी वाट असल्याने आम्ही देहरीगावाकडे निघालो. म्हसामार्गे देहरीला जाता येते हे माहित नसल्याने आम्ही धसई मार्गे निघालो यातच अजुन अर्धा तास वाया गेला. पण बाईकवरुन जात असल्याने त्याचे काहि वाटले नाहि. पण ह्याच लाँगकटमुळे पुढे आम्हाला एक शॉर्टकट मिळाला :) आणि त्याचा आम्हाला फायदाहि झाला. धसई गाव सोडल्यानंतर आम्ही देहरीच्या वाटेवर निघालो. वाटेत "खोपीवली" गावात आम्ही जात आहोत ती वाट बरोबर आहे का हे विचारण्यासाठी थांबलो असता तेथील गावकर्‍यांनी आम्हाला देहरीवरून न जाता त्याच गावातुन जाणार्‍या वाटेबद्दल सांगितले. देहरीमार्गे गोरखगडला जाणार्‍या वाटेपेक्षा हि वाट लवकर जाते असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. मग काय! आम्ही सगळ्यांनी आमच्या "बायका" (पुन्हा "बाईकचेच अनेकवचन हां :)) गावाकडे वळवल्या. गावातील एका घरासमोरील अंगणात गाड्या पार्क करुन त्या घरातील आज्जीची परवानगी घेत हेल्मेट, काहि बॅग्स घरातच ठेऊन दिल्या. एका गावकर्‍याकडुन गडाकडे जाणार्‍या वाटेची माहिती घेऊन आम्ही निघालो. एव्हाना सकाळचे अकरा वाजले होते. शेतातली वाट संपुन आता गर्द जंगलातील वाट सुरु झाली होती. गोरखगडच्या आजुबाजुचा परिसर हा हा प्रसिद्ध आहे तो तेथील घनदाट अभयारण्यामुळे. त्यामुळे उन्हाचा तडाखा जास्त जाणवत नव्हता. ह्या संपूर्ण प्रवासात आमची साथ करत होता तो मच्छिंद्रगड, पण गोरखगड काहि दिसत नव्हता.


एव्हाना दुपारचे बारा वाजत आले होते. काहिजणांनी तर मस्करीत "मला जाऊ द्या ना घरी आता वाजले कि बारा...." म्हणायला सुरूवातहि केली. साधारण एक तास चालल्यानंतर मच्छिंद्रगडाच्या मागे असलेला गोरखगडाने अचानक दर्शन दिले आणि सर्वांना परत एकदा उत्साहित केले. मात्र तो स्मितहास्य करत नव्हता तर आमच्याकडे बघत खदखदा हसत होता. दुपारचे पाऊन वाजले होते आणि कडक ऊन डोक्यावर आले होते. भर दुपारी गड चढणार्‍या आमच्याकडे बघुन तो हसत होता. थोडे पुढे जाताच भवानी मातेचे मंदिर दिसले. तेथे थोडावेळ आम्ही विसावलो. मंदिर जुने असुन त्यावर पत्र्याची शेड लावण्यात आली होती. दर शनिवार-रविवारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातुन आलेल्या काहि लोकांनी आपुलकीने आमची चौकशी केली आणि थंडगार व मधुर पाणी आम्हाला आणुन दिले. त्यातल्याच एकाने आम्हाला गोरखनाथ व त्या मंदिराची कथा ऐकवली.

खरंतर तेथुन जायचे मनच होत नव्हते पण अजुन बराच पल्ला गाठायचा होता. आता कुठे आम्ही गोरखगडाच्या पायथ्याशी आलो होतो. पायथ्यापाशी अजुन एक छोटेसे मंदिर होते. त्या मंदिराच्या मागच्या बाजुने येणारी वाट हि देहरी गावाकडुन येणारी होती. मंदिराच्या आवारातच शंकराच्या पिंडीसारखा आकार असलेले होकायंत्र दिसले.


आता मात्र येथुन खड्या चढणीला सुरुवात झाले. दुपारचे कडकडीत ऊन आणी त्यात हे रॉक पॅच!!!!!! जबरदस्त आव्हान वाटत होते आणि तेच सगळ्यांचा उत्साहहि वाढवत होते. भर दुपारची वेळ असल्याने दगड तापले होते व हातांना चटके बसत होते पण आमचा उत्साह मात्र कमी होत नव्हत. थोड्या वेळात आम्ही फोटोत दिसतो आहे त्या केशरी रंगाच्या चौकटीजवळ पोहचलो.

अगदि क्षणभर विश्रांती घेतली व परत चढाईला सुरुवात केली. दुसरा टप्पा हा पहिल्यापेक्षा थोडा कठिण होता. तीहि चढाई यशस्वी करुन आम्ही एकदाचे गोरखगडाच्या गुहेजवळ पोहचलो. वरती पोहचल्यावर समोर दिसणारा निसर्ग आणि त्यात कलशात ठेवलेल्या नारळासारखा दिसणार्‍या मच्छिंद्रगडाचे दर्शन होताच थकवा कुठच्या कुठे पळाला. कातळात खोदलेली गुहा प्रशस्त असुन २०-२५ जण तेथे आरामात राहु शकतील. गुहेच्याच प्रांगणात असलेले व खोल दरीत झुकलेले दोन चाफ्याचे झाड लक्ष वेधुन घेत होते.

आमचे काहि मित्र शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकीतुन पाणवनस्पती बाजुला काढुन पाणी काढण्याच्या प्रयत्नाला लागले. फ्रेश झाल्यावर परत गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी निघालो. गुहेच्या उजव्या बाजुने जाणारा रस्ता पाहिला आणि काहि जणांनी वरती येण्यास साफ नकार दिला :) आणि ज्यांना वरती जाऊन यायचे आहे त्यांनी जाऊन या आम्ही गुहेतच थांबतो असे फर्मान काढले.


शेवटचा टप्पा हा थोडा अधिक कठिण असुन या मार्गावर जपुनच चालावे लागते. गडाचा माथा लहान असुन तेथे केशरी रंगात रंगवलेले शंकराचे मंदिर व समोर एक नंदी आहे.

माथ्यावरून मच्छिंद्रगड, सिद्धगड, जीवधन असा रमणीय परिसर न्याहाळता येतो. गुहेचा घेरा लहान असल्याने लवकरच संपूर्ण गड पाहुन झाला आणि गुहेजवळ थोडा वेळ विसावलो. फोटोसेशन झाल्यानंतर तेथेच ठेवलेल्या झाडुने परिसर स्वच्छ करुन कचरा बॅगेत भरुन परतीच्या वाटेकडे निघालो.

गड उतरताना आता खरी कसोटी लागत होती. बाजुला खोल दरी असल्याने कातळात एक एक पाऊल जपुन टाकावे लागत होते. प्रत्येकजन एकमेकांना सांभाळुन उतरा, जपुन उतरा म्हणुन बजावत होता (अर्थात येथे काळजीपेक्षा जर आपल्या आधीचा गडगडला तर आपणपण कोसळु हि भिती जास्त होती :)).

थोड्याच वेळात आम्ही सर्वजण सुखरुप पायथ्यापाशी आलो. परतीच्या प्रवासात पुन्हा भवानी देवीच्या मंदिरात थोडावेळ विसावलो. तेथील मंडळींनी आम्हाला चहाबद्दल विचारले पण त्यांना त्रास नको म्हणुन इच्छा असुनहि सगळेजण नाहि म्हणाले :(. संध्याकाळचे पाच वाजले होते आणि अंधार पडण्याच्या आत त्या जंगलातुन गावात परतायचे असल्याने आभार मानुन त्यांचा निरोप घेतला. एव्हाना ती पायवाट चांगलीच परिचयाची झाली असल्याने गावात पोहचण्यास थोडा कमी वेळ लागला. ज्या घरी आम्ही गाड्या ठेवल्या होत्या त्या घरच्या आजीने मोठ्या प्रेमाने आम्हाला कलिंगड आणि काकड्या खायला दिल्या. त्यावर यथेच्छ ताव मारुन आम्ही निघालो. जाताना काहि रक्कम दिली असता ती घेण्यास आजीने नकार दिला. "तुम्ही आमच्या गावचे पाहुणे असुन तुमच्याकडुन पैसे घेणे बरं नाहि". असे त्या म्हणाल्या. शहरातल्या लोकांप्रमाणे "काहि देण्याच्या बदल्यात काहितरी मिळविणे" हि वृत्ती अजुनतरी त्या गावात आली नव्हती हे त्या घरच्या लोकांना, भवानी देवीच्या मंदिरात भेटलेल्या व्यक्तीना पाहुन वाटले. किंबहुना त्यांची हि निस्वार्थी वृत्ती व "अस्सल गावपण" असेच टिकुन रहावे हिच त्या गोरक्षनाथाचरणी प्रार्थना. त्यांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जसजसा अंधार होत होता तसतसा गोरखगड व त्याच्या पायथ्याशी विसावलेले खोपीवली गाव नजरेआड होत होते पण हा संपूर्ण ट्रेक व गावातील माणसे हि कायमची मनात घर करून राहिली होती.

प्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

बज्जु's picture

6 Mar 2010 - 11:19 pm | बज्जु

सुरेख फोटो तसेच छान वर्णन. बर्‍याच वर्षात गोरखगडाला पुन्हा भेट देण्याचा योग आलेला नाही. ती कसर तुम्ही भरुन काढ्लीत त्याबद्दल धन्यवाद. गोरखगडावर निवासी ट्रेक करणं हा देखील एक सुखद अनुभव होऊ शकतो. असो पुढल्या भट्कंतीसाठी शुभेच्छा.

गडप्रेमी बज्जु

विसोबा खेचर's picture

6 Mar 2010 - 11:20 pm | विसोबा खेचर

क्लास...!

तात्या.

प्रभो's picture

6 Mar 2010 - 11:24 pm | प्रभो

एक नंबर

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

सनविवि's picture

6 Mar 2010 - 11:34 pm | सनविवि

+ १

योगेश२४'s picture

6 Mar 2010 - 11:44 pm | योगेश२४

प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे धन्यवाद!!!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2010 - 11:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो आणि वर्णन भारी.

-दिलीप बिरुटे

स्वतन्त्र's picture

7 Mar 2010 - 12:47 am | स्वतन्त्र

मस्तच !

मेघवेडा's picture

7 Mar 2010 - 1:14 am | मेघवेडा

एकदम जबरा!! फोटोज तर केवळ अप्रतिम!!

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेड्याचे वेडे विचार!!

प्रचेतस's picture

8 Mar 2010 - 9:30 am | प्रचेतस

सुंदर फोटो व प्रवाही लिखाण.
तुम्ही गोरखगडावरुन दिसणार्‍या सिद्धगडाचा फोटो टाकायला हवा होता राव. सिद्धांचा कसदार गड तिथून खूपच भेदक दिसतो.

-----
(सह्याद्रीप्रेमी) वल्ली

साईली's picture

8 Mar 2010 - 4:59 pm | साईली

छान लिहिलेस ...

आम्ही १३जण आणि सात "बायका" (गैरसमज करुन घेऊ नका, "बाईकचे अनेकवचन" लिहिले आहे )
===============================
अफलातुन... बाईकचे अनेकचन
खुपच आवड्ले.

साईली's picture

8 Mar 2010 - 5:00 pm | साईली

छान लिहिलेस ...

आम्ही १३जण आणि सात "बायका" (गैरसमज करुन घेऊ नका, "बाईकचे अनेकवचन" लिहिले आहे )
===============================
अफलातुन... बाईकचे अनेकचन
खुपच आवड्ले.

साईली's picture

8 Mar 2010 - 5:01 pm | साईली

छान लिहिलेस ...

आम्ही १३जण आणि सात "बायका" (गैरसमज करुन घेऊ नका, "बाईकचे अनेकवचन" लिहिले आहे )
===============================
अफलातुन... बाईकचे अनेकचन
खुपच आवड्ले.

अमोल केळकर's picture

8 Mar 2010 - 6:21 pm | अमोल केळकर

खुप छान माहिती, चित्रे, निसर्ग ही

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विशाल कुलकर्णी's picture

10 Mar 2010 - 6:23 pm | विशाल कुलकर्णी

मस्तच !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"