भिंत

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
1 Mar 2010 - 11:13 am

सूर्य आता हातभर वर आला होता. हवेतला गारवा केव्हाच निघून गेला होता. आणि सावकाशपणे विटा ठेवून त्यावर चुना लिंपणाऱ्या चंद्र्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमलेले मला दिसत होते.
'गावली गं, माज्या जाल्याला मासोली गावली गं.' चंद्र्याचं गाणं उजाडल्यापासनं चालू होतं. भाड्या येऊन गेला तेव्हा थोडा खंड पडला होता तेवढंच. पण आता त्याच्या गाण्यालाही थोड्या कंटाळ्याची झाक आली होती. घोल्याला बहुतेक इतकी वर्षं त्याच्याबरोबर काम करून त्याची सवय झाली असावी. मधनंच चंद्र्या आपल्याला झेपणार नाही एवढी तान घ्यायला गेला की क्षणभर आठी यायची आणि मान थोडीशी हलायची इतकंच. अशाच एका तानेनंतर घोल्या वैतागून म्हणाला.
"आरं जरा भराभर हात मार की. किती नाजूक साजूक काम करतुया! ही काय द्येवळाची भिंत हाय व्हय? आरं ही मुतारी हाय समज मुतारी. म्हयन्याभरान् काम संपलं की पाडून बी टाकायची. चल. आटप.
घोल्या असा करदावलेला बघून चंद्र्याच्या कामात जरा घाई आली. गाणं थोडं मागे पडलं.
"दुपारच्याला कोदंडशेटकडे जायचंय. मगाशी भाड्या काय बोलून गेला आयकलं न्हायस का? काय पण प्रेमाने गिलावा करतुया. अगदी गुलगुलीत. तुझ्या बायकोच्या थानांवरनं तरी इतक्या प्रेमाने हात फिरवत्योस का कदी?" घोल्याचं आपलं चालूच होतं.
भाड्या त्यांचा मुकादम. वाढलेल्या पोटावर घट्ट कंबरपट्टा गुंडाळून तो डुलत डुलत आला होता. कामगारांतूनच नुकतीच बढती मिळालेल्याप्रमाणे त्याने दोघांशीही खेळीमेळीच्या गप्पा करून आपण अजून त्यांच्यातलेच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तंबाखूची फक्की दिली. मात्र त्याचा हात मधून मधून कंबरपट्ट्यात खोचलेल्या चाबकावर फिरत होता हे माझ्या लक्षात आल्यावाचून राह्यलं नव्हतं. त्याच्यापुढे तेही शक्य तितकी नम्रता दाखवून त्याच्या विनोदांना माफक हसत होते. पण तो गेल्यावर "गेला एकदाचा भाड्या" असं म्हणून घोल्या जरा सैलावला होता. मी हे सगळं पाहातोय याची त्यांना फिकीर नव्हती.

सूर्य हळुहळू अव्याहतपणे वर चढत होता. तशीच त्यांची भिंतदेखील हळूहळू वर येत होती, जमिनीतून उगवून बाहेर आल्यासारखी वाढत होती. काम अर्धं झाल्यावर दोघे थोडावेळ निवांत बसले. आपल्या पोतडीतनं पाणी प्यायलं, चकमक झाडून जाळ केला व विड्या शिलगावल्या. मलासुद्धा तलफ आली. माझ्या कमरबंदात नेहेमीचा तंबाखू नव्हता की हस्तीदंती नळी नव्हती. परागंदा माणसाकडे काय असणार? लागला ठसका तर लागला, आत्ता विडीसुद्धा चालेल. मी हाक मारली.
"ओ, चंद्राशेठ... जरा एक विडी मिळेल का?" माझा प्रश्न ऐकून चंद्र्या फिस्स करून हसला. मासोळी क्षणभर जाळ्यातनं सटकली.
"आलाय मोठा इडी मागणारा. अशा सगल्यांना इड्या देन्यासाठी भाड्या द्येतो ना आमाला धा रुप्ये ज्यादा दर म्हयन्याला! इडी पायजे म्हनं."
"आरं असं काय करतुया. सगलेच मागत्यात. वाटतं..." घोल्याने समजुतीने कानावरची विडी काढली आणि आपल्या विडीवरच शिलगवून मला दिली. माझ्या नजरेला त्याची शहाणी नजर दिली, क्षणभर विचार केल्यासारखं केलं, आणि माझ्या हातात दिली. दोनतीन झुरक्यांनतर तो धूर शरीरात भिनला, आणि खूप दिवसांच्या धुमसत्या निखाऱ्यांवर पाणी टाकून गेला.

चंद्र्याला आपल्या साथीदाराच्या औदार्याचं आश्चर्य वाटलेलं दिसलं. घोल्याने त्याच्या कानात कुजबुजून काहीतरी सांगितलं. आणि समोरच्या गढीकडे बोट दाखवलं. चंद्र्याने माझ्याकडे बघितलं, एक वेळ त्या देखण्या पण बलात्कारित वास्तूकडे बघितलं. पुन्हा डोळे मोठे करून आणि जबडा सैलावून माझ्याकडे बघितलं. "आणि हितंच..." असं काहीतरी तो म्हणाला असावा. घोल्याने मान डोलावली. चंद्र्याने काहीतरी अगाध ज्ञान झाल्यासारखी मान हलवली, माझ्यावरची नजर न काढताच. मी शांतपणे विडी ओढत होतो. इतका वेळ माझी फिकीर न करणाऱ्या घोल्याने या बाबतीत तरी माझ्या भावनांची कदर केली हा विचार सुखावून गेल्याशिवाय राहिला नाही. घोल्याने काय सांगितलं हे अर्थातच मला समजलं होतं. ती गढी माझीच आहे...होती. विडी ओढून झाल्यावर मी थोटूक खांबावर ठेवलं.

सूर्य अजून डोक्यावर आलेला नव्हता. तरी अंगाला चटके जाणवत होते. मला त्यांचं आता काही वाटेनासं झालं होतं. वरून एक घार उडत गेली. इतक्या खालून घारीला जाताना मी कधी बघितलं नव्हतं. तिची डौलदार भरारी बघून एखाद्या राजाधिराजाचं स्मृतिचिह्न म्हणून शोभेल अशी वाटली. ती दिसेनाशी होईपर्यंत मी तिच्याकडे पाहात राहिलो. मग लक्ष पुन्हा गढीकडे गेलंच. भव्य प्रवेशद्वार होतं तसंच दिमाखात उभं होतं. बाजूच्या भिंती फुटल्या होत्या. आघाताचे व्रण दिसत होते. समोरच्या उत्तुंग माळाकडे, उंचावरून अभिमानाने बघत असताना तिच्यावर बाजूने, अगदी अनपेक्षित दिशेने हल्ला झाला होता. अजून ती कणखरपणे उभी असली तरी तिच्या भावना मात्र विश्वासघाताने दुखावल्या होत्या. तिचे आतले भव्य शिसवी खांब अचानक खचल्यासारखे झाले होते. शुंभकेतूसारखा तिचा इतक्या वर्षाचा लाडाचा पाहुणा गद्दारी करेल असं तिला वाटलंसुद्धा नव्हतं.

सरदारकी मिळाल्यावर पहिल्याच वर्षात मी ही गढी बांधायला घेतली. या भागात सुमेर राहायचा. इथला आधीचा सरदार. त्याचा वाडा म्हणजे एक आरसेमहाल होते. आक्रमणात त्यातले किती फुटले किती शिपाईगड्यांनी पळवून नेले, महालातल्याच त्याच्या बायकांबरोबर, याची गणती नाही. सुखरूप असता तरी त्याच्या महालात राहायला मला आवडलं नसतंच. इतका गोंडस गुलछबू वाडा मला माझा वाटलाच नसता. मला हवा होता शक्तीशाली, बळकट किल्ला. वेळ पडली तर दोन महिने शत्रूला थोपवून धरेल असा. भोवताली छोटा का होईना पण खंदक हवा. भक्कम बुरूज हवे, आणि बुरजांवर सतत जागत्या तोफांची दूरगामी धाकाची नजर. बांधकाम वर्षभर चाललं. पैसा पाण्यासारखा वाहावला. शेकडो गवंडी, मजूर अहोरात्र काम करत होते. कदाचित हा घोल्या आणि त्याच्याबरोबर नुकताच मिसरूड फुटलेला चंद्र्यासुद्धा त्यांच्यात असेल, कोणास ठाऊक. आठ वर्षांपूर्वी बांधकाम पुरं झालं तेव्हा बाबांना मी दाखवायला घेऊन आलो तेव्हा त्यांना भरून आलं होतं. मला मिठीत घेतल्यावर मात्र त्यांचा बांध फुटला होता. त्यांचं गेलेलं वैभव मी दसपटीने परत आणलं होतं. त्यांच्या आयुष्यातला इतक्या वर्षांचा कलंक पुसून टाकला होता. मोडलेला कणा थोडा पुन्हा सांधला होता. तोसुद्धा मी. संभद्राने नाही की सुधांशूने नाही. मी. त्यावेळी मला जो अभिमान वाटला होता, त्याची धुगधुगी अजून शिल्लक आहे. कालच्या रात्रीच्या थंडीत तिनेच माझी साथ दिली.

मी शिपाईगिरीला सुरूवात केली तेव्हा त्यांचं मन द्विधा होतं. दुसऱ्या आईचं मात्र नव्हतं. तिचा ठाम विरोध होता. व्यापारी घरातली असल्याने तिला आमच्या परंपरांविषयी फारशी कदर नव्हती. आई मात्र जुन्या मान्यवर सरदार घराण्यातली होती. तिने खस्ता खाल्ल्या होत्या, शत्रूंपासून लपून गुहांमध्ये जगली होती, ऐन जवानीतला एक मुलगा युद्धात घालवला होता. तिने मला पाठिंबाच दिला असता याची खात्री होती. दुसऱ्या आईचं तसं नव्हतं. इतका बक्कळ पैसा असताना मैदानं मारण्याची काय हौस आलीय, असं म्हणायची. तिच्या माहेरची गलबतं पूर्वेकडच्या देशात व्यापाराला जायची. हिरे, जडजवाहीर, मसाले, सुवासिक द्रव्यं भरून न्यायची आणि तिकडून शेतात राबायला गुलाम आणि श्रीमंतांचे चोचले पुरवायला पौर्वात्य बायका घेऊन यायची. संभद्राला ती व्यापारात गुंतवत्ये हे आईला आवडलेलं नव्हतं. पण नवा जमाना होता, मुलांना आपण काय करावं याचे विचार होते. आणि तोपर्यंत आईची तब्येतही खालावली होती. तिची घरातली सत्ता संपत आली होती. पण संभद्रासारखं पुष्ट आयुष्य जगण्यापेक्षा हरहरासारखं, तिच्या मोठ्या मुलासारखं मर्दुमकीने मरावं असं तिला वाटायचं. तिने ते कधी बोलून दाखवलं नव्हतं. तेवढे संस्कार होते तिचे. पण संभद्र ज्या लोकांत वावरायचा त्यांच्याविषयी जुजबी चांगलं बोलताना नजरेतून आणि तोललेल्या शब्दांतून खूप काही सांगायची. हरहराचे जुने मित्र आले की त्यांना मात्र मुलांसारखं वागवायची. मंचकावर पडल्या पडल्यासुद्धा त्यांच्याशी बोलताना, त्यांच्या मोहिमांविषयी ऐकताना तिचे डोळे उजळून उठायचे. हरहराकडून अशाच गोष्टी ऐकायला तिला नक्की आवडलं असतं. बाबांना मात्र तिने कधीच माफ केलेलं नव्हतं. जीव वाचवून पळून आल्यापासून त्यांच्यामध्ये एक भिंत निर्माण झाली होती.

दुरून घोड्यांच्या टापा ऐकू आल्या, चंद्र्या आणि घोल्या दोघेही कोण येतंय म्हणून बघायला आले. मला थोडीफार कल्पना होतीच पण अग्रस्वारांच्या हातात तोलून धरलेला फडकता झेंडा पाहिला आणि खात्रीच झाली. टापा जवळ आल्या, आणि जणू काही गढीत जात असताना विचार बदलल्याप्रमाणे घोडे वळले, आणि शुंभकेतू खाली उतरला.
"तुला इथे बघून आश्चर्य वाटलं" छद्मी टोचून बोलत तो म्हणाला. मी काही बोललो नाही हे बघून तोच पुढे म्हणाला.
"आवडली माझी नवीन गढी? थोडी डागडुजी करून घ्यावी लागेल. काम चालू आहे. दोन आठवड्यांनी कर्तार यायचे आहेत - त्याच्या स्वागतासाठी ही नवीन बांधकामं पण चालू आहेत...." चंद्र्या आणि घोल्याच्या कलाकृतीकडे बोट दाखवत तो पुन्हा हसला.
"तू इतका हरामखोर असशील असं वाटलं नव्हतं." या क्षणी मला त्याच्यावर तुटून पडावं असं वाटत होतं. पण ते शक्य नव्हतं. शुंभकेतूच्या मागे बल्लव आपली नंगी तलवार घेऊन उभा होता. बल्लवाला मीच हुडकून शिक्षण दिलं होतं. शुंभकेतूकडे कामाला मीच लावलं होतं. तो खाल्ल्या मिठाला जागणारा होता. एका घावात तिघांची खांडोळी करताना पाह्यलं होतं, शाबासकीही दिली होती. त्याचा निर्वकार चेहेऱ्यावरून आत काही वादळ चाललं होतं की नाही याची कल्पना येत नव्हती.
"मी हरामखोर? महाराज, मी तुमच्या बाजूला होतो तेव्हा तुम्ही असं कधी म्हणाल्याचं आठवत नाही."
ते खरं होतं. आमची जोडी होती. मी सरदार, तलवारबहाद्दर तर तो मुत्सद्दी, राजकारणी. मी युद्धं खेळावीत व त्याने तह करावे. माझ्या छोट्याश्या राज्याचा तो प्रधान होता. माझा उजवा हात होता. कोणाला सहकार्य करायचं, कोणाला कोणाविरुद्ध खेळवायचं यात वाकबगार होता. त्याच्याशिवाय मी इथपर्यंत पोचलो नसतो. पण आता त्याच्यामुळेच मी या अवस्थेला पोचलो होतो.
"तू जो काही आहेस तो माझ्यामुळे, केतू." मी म्हणालो. तेही खरंच होतं. शुंभकेतु श्रीमंत बापाचा वाया गेलेला पोरगा. त्याला मी हाताशी धरला तेव्हा तो फक्त वीस वर्षांचा होता. माझ्या सगळ्यात फायद्याचा गुण म्हणजे त्याचे बऱ्याच सरदार घराण्यांशी घनिष्ठ संबंध होते - काही बापाच्या पुण्याईने आलेले तर काही त्याने स्वत: सरदार स्त्रिया व त्यांच्या मुलींशी जोडलेले, मजबूत केलेले. अनेक मोहिमांमध्ये त्याच्या साथीमुळे मला फायदा झाला होता. पण एक गुलछबू ऐशोआरामात राहाणारा तरुण यापलिकडे राजकारणात त्याला काही स्थान नव्हतं. कर्तारासारख्याने त्याला दारापुढेही उभं केलं नसतं. कर्तारशी टक्कर द्यायची माझी आकांक्षा जुन्या काळपासून होती. शुंभकेतूसारखे साथीदार वाढवूनच ते मला शक्य होतं.
"त्याने काही फरक पडत नाही." काहीतरी आठवल्यासारखं तो म्हणाला "या गढीचं मी काय करणार आहे माहित्ये?"
"काय?"
"अर्थातच तुम्हाला काही फरक पडणार नाही म्हणा, तुम्ही उद्यापासून या शहराच्या वेशीत दिसणार नाही याची सोय मी केलेली आहे." तो पुन्हा स्वत:शी हसला आणि म्हणाला, "मी इथे राज्यातलं सर्वात मोठं गणिकागृह करणार आहे. विशेष ग्राहकांसाठी. फार सुंदर शय्यागृहं आहेत, आणि तळघरं सुद्धा आहेत...."
"तुझ्यासारखा हलकट माणूस शोधून सापडायचा नाही."
"हलकट? तुम्ही माझ्यापेक्षा वेगळं काय केलं? तुम्ही सरदारकी केली, इतकी माणसं मारली - बुद्धीबळातल्या पटाप्रमाणे युद्धाच्या चाली रचून. आणि मला हलकट म्हणता?"
"मी माझ्या मित्राच्या पाठीत सुरा खुपसत नाही."
"महाराज, हा धंदा आहे. इथे कोणी मित्र नसतो की शत्रू नसतो. फक्त फायदा आणि तोटा असतो. मला शिव्या देण्याआधी तुम्ही चंद्रवर्म्याला काय सांगितलं होतं ते आठवा. असो. मला निघायला हवं." धूळ उडवत घोड्यांचा ताफा निघून देखील गेला. घोडे वळले तरी बल्लवाची नजर माझ्यावर काही काळ स्थिर होती. त्याने आवंढा गिळून हताश मान हलवली की मला भास झाला हे कळलं नाही. त्याचा निर्विकार चेहेरा पुन्हा घोड्यांच्या मार्गाकडे करत, टाच मारून इतरांना गाठायला तोही निघून गेला. चंद्र्या व घोल्या पुन्हा कामाला लागले.

चंद्रवर्मांचा उल्लेख कुठेतरी आत लागला. ते बाबांच्या जुन्या मित्रांपैकी. सरदारी शान व इभ्रतीचा नमुना. त्यांचा परगणा लुटला हे बाबांना आवडलं नव्हतं. चंद्रवर्मांना जिवंत सोडलं हे त्यांच्या दृष्टीने पुरेसं नव्हतं. पण माझाही इलाज नव्हता. कर्तारशी टक्कर द्यायची तर मला नव्या मैत्र्या जोडून ठेवणं भाग होतं. चंद्रवर्मांनी मला जखमी आवाजात प्रश्न विचारल्यावर मी शिपाईगिरी, सरदारी विषयी ज्ञानाचे डोस पाजले हे तर त्यांना बिलकुल आवडलेलं नव्हतं. थरथरत्या हातात चषक धरून तितक्याच थरथरत्या आवाजात त्यांनी मला बोल लावला होता. "मीही राजकारणं खेळलेली आहेत. पण काही मित्र हे शेवटी मित्र असतात. या सगळ्याच्या पलिकडे असतात." मी मुकाट्याने ऐकून घेतलं. पण तेव्हाच लक्षात आलं बाबा पळून का आले ते. त्यांना लोकांनी केलेले मुजरे आवडत होते पण त्याची खरी किंमत द्यायची त्यांची तयारी नव्हती. रात्रीच्या वेळी खूप वेळा मी त्यांना मेजावर जुना नकाशा उलगडून बसलेलं पाह्यलं होतं. मद्याचे चषक एकामागोमाग एक संपवत ते लाकडी घोडे, सैनिक त्यावर ठेवत. जास्त प्यायलेले असले की स्वत:शीच बरळायचे "अरे, ही रंगसेनाची तुकडी मी नंतर पाठवली. जरा दोन तास आधी पोचले असते तर इथे तुळंगेच्या खोऱ्यात आख्खी सुलतानी फौज खाली सापडली असती." मग लाकडी घोड्याने सैनिक पाडत त्यांचं केवळ दोन तासांनी हरलेलं युद्ध पुन्हा पुन्हा लढत. युद्ध रणांगणांत जिंकतात तितकीच मैत्री जोडण्याने जिंकली जातात हे त्यांना कळलेलंच नव्हतं. सुलतान त्यांच्याविरुद्ध उभा राहाण्याचीच मुळात गरज नव्हती. पण मित्राचा अपमान सहन न होऊन त्यांनी सुलतानाचाही अपमान केला होता. सुलतान ते विसरला नव्हता. आणि इतर वेळी या भानगडीत न पडता आपण बरं की आपला परगणा करणारा सुलतान शत्रूला मिळाला. एकदा मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना ते पटलं नव्हतं. त्यांचं स्वत:चं युद्धकौशल्यही फारसं वाखाणण्यासारखं नव्हतं हे मात्र मी त्यांना सांगितलं नव्हतं. माझ्यात बहुधा माझ्या आजोबांचं रक्त आलं होतं. त्यांचा गरीबीतला जन्म. फक्त लूटमार करून पैसा कमवणं आणि हव्या तितक्या बायका भोगणं यासाठी शिपाईगिरी पत्करली. त्यांची मजल हजार स्वारांच्या प्रमुखापर्यंत गेली होती. आपल्या मुलाने जास्त काही करावं अशी खूप इच्छा होती. पण आमच्या बाबांनी जेमतेम त्यांना मिळालं ते टिकवलं. आजोबांचा उजवा हात कोपरापासून गेला होता, तरी शेवटपर्यंत त्यांची खुमखुमी गेली नव्हती. मृत्यूशय्येला खिळलेले असताना वातात बडबडायचे, मला उद्देशून म्हणायचे "अरे मोहीम मारली की मजा असते. महिनाभर दुष्काळ, पण नंतर हव्या तितक्या बायका हव्या तिथून घेता येतात. पण या बायकांच्या बाबतीत सांभाळून हं... मी सांगतो तुला मजा कर, पण फक्त कुलीन पोरी पकड. बाकीच्यांपासून उगाच रोगबिग व्हायचा. आणि अगदी तरुण - आजकाल कुलीन पोरींचा पण भरवसा नाही...हा बघ माझा हात ... दिसत नाही, पण अजून शिवशिवतो मांसात रुतायला...तुला काही व्यवस्था करता येईल काय रे?... हात गेला रे, नाही तर पंचहजारी झालो असतो" त्यांचं आयुष्य सोपं होतं, काय हवं ते माहीत होतं. किंमत द्यायची तयारी होती. दिलेलीही होती. बाबांचं तसं नव्हतं. त्यांची झेप छोटीशीच होती, स्वप्नं मोठी होती - आणि किंमत द्यायची मात्र तयारी नव्हती. हरहराने किंमत दिली ती आपल्या प्राणाची. बाबांना प्राण व मित्र दोन्ही प्रिय होतं. अशाने सरदारकी कशी होणार? पण चंद्रवर्मांच्या प्रकाराने आमच्यात भिंत उभी राहिली ती कायमचीच. गढी पहिल्यांदा बघताना आलेल्या अश्रूंना तिने चोख बांध घातला होता.

चंद्र्याचं गाणं आता उन्हाने विरघळत चाललं होतं. आणि मुकाट्याने तो भराभर विटा चढवत होता. सूर्य आता जवळपास डोक्यावर आला होता, चार अंगुळं खाली. आता त्याच्याकडे बघवत नव्हतं - पण त्याच्याभोवती मंडलं घालणारी घार मात्र दिसली. डोळे दिपून मी समोर बघितलं. माझी गढी - सहज दिसणाऱ्या तिच्या शिखराकडे लक्ष केंद्रित केलं. झेंडा तोच होता, फक्त शुंभकेतूच्या नावे तो फडकत होता. आता काय राहिलं गढीचं? ते विस्तीर्ण आवार, त्यातली झाडं, राजेशाही हिरवळ - सगळं आता नाहीसं झालं होतं. आपलं आता काय आहे?...सुलेखा आणि संजय संभद्राकडे सुरक्षित आहेत एवढंच समाधान मानायचं. संजयला तलवारीचे धडे दिलेले होते - पण ते त्याच्या रक्तात नाही असं लवकरच जाणवलं. आपल्या काकावर - सुधांशूवर गेलाय तो. कविता करतो, कळणार नाही अशा भाषेत आणि कशालाच काही अर्थ नाही असं तत्वज्ञान सांगतो. तिकडे आणखीन एक भिंत. सुधांशूबरोबर होती, हुबेहुब तशीच. बाबांनी बोलणं टाकण्यापर्यंत त्यांची भिंत माजली. सुलेखाच्या बाबतीत तर ती मुळातची कधी तुटली नाही. हरहर मला त्याच्या तैलचित्रातूनच दिसला. आईचा सहवास फार थोडा घडला. तिने काय संस्कार केले लक्षात नाही. मी जो काय झालो तो तिच्यामुळेच याची खात्री आहे, पण काही तुटक चित्रांपलिकडे हातात काही नाही. ती गेल्यानंतर या आठवणींना पुन्हा बांधच आले. या सर्व भिंती मला घेराव घालताहेत. माझा श्वास कोंडताहेत. मला चिणताहेत.

पण पराभवच कशाला उगाळत बसायचं? हा चंद्र्या शिपाईगिरी न करता बारा तास राबून दोन तास जगतो. मी गेली वीस वर्षं झंझावात जगलो. अनेक बायका भोगल्या, उंची मद्यं प्यायली, युद्धांत पराक्रम केले, हजारो लोकांवर हुकूमत गाजवली, माझ्यासाठी प्राण द्यायला ते तयार झाले, मी ज्यांच्यासाठी प्राण देईन असे मित्र मिळाले, काही हरवले.... या चंद्र्याच्या शंभर पट मी जगलो. मग या भिंतींची चिंता का?

आता त्या दोघांचं बांधकाम पूर्ण झालं होतं. इतका वेळ बांधत असलेली चौथी भिंत बांधून झाल्यावर त्यांनी त्या दोन हात रुंद सहा हात लांब विटाळ चौकोनावर लाकडी फळीची तुळई टाकून तो बंद केला. आतमध्ये अंधार झाला. दोघेही जेवायला लांब गेले असावे. चंद्र्याचं गाणं आता विरलं होतं. तुळईवर कसला तरी आवाज झाला - ती घार तर बसली नसेल? तुळईला मध्यभागी भोक होतं, श्वास घेता यावा, मरण लांबावं म्हणून ठेवतात. तितून डोक्यावर आलेल्या सूर्याच्या प्रकाशाचा एक किरण भाल्यासारखा शिरून, माझे हात साखळदंडाने ज्या खांबाला बांधले होते त्यावर ठेवलेल्या विडीच्या थोटकाला विद्ध करत होता.

कथावाङ्मय

प्रतिक्रिया

Pain's picture

1 Mar 2010 - 11:32 am | Pain

छान आहे.

प्राजु's picture

1 Mar 2010 - 11:12 pm | प्राजु

मस्त.
जे लिहिले आहे हे खूप आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

अक्षय पुर्णपात्रे's picture

2 Mar 2010 - 1:23 am | अक्षय पुर्णपात्रे

काही तासातच सर्व घडते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये आयुष्याचा हिशोब खूपच एककल्ली वाटला. पण कथेचे शब्दांकन आवडले.

पाषाणभेद's picture

2 Mar 2010 - 3:31 am | पाषाणभेद

+१
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

शुचि's picture

2 Mar 2010 - 4:07 am | शुचि

खूप छान आहे

घार हे कशाचं प्रतीक आहे या कथेत? मला वाटतं नायकावर सावट पडलेल्या मृत्युच्या छायेचं असावं. आणि तो मृत्यूही घारीसारखा खूपसा राजाला शोभणारा आहे...... लेचापेचा नाही.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

अर्धवटराव's picture

2 Mar 2010 - 4:58 am | अर्धवटराव

विचार करतोय...

अर्धवटराव
-रेडि टु थिन्क

Nile's picture

2 Mar 2010 - 4:58 am | Nile

छान! शेवट पर्यंत बांधत असलेल्या भिंतीचं कुतुहल मनात राहतं, कथा आवडली.

विसोबा खेचर's picture

3 Mar 2010 - 7:07 pm | विसोबा खेचर

सुंदर लेखन..!

धनंजय's picture

3 Mar 2010 - 10:45 pm | धनंजय

वेगवेगळ्या भिंतीची कथासूत्रे गोवणारी कथा आवडली.

- - -
(मला जी.एं.च्या कथांमधली कल्पकता आवडते, पण काही कथांमध्ये मुद्दामून वापरलेल्या संकृताळलेल्या शब्दावलीवर माझे प्रेम नाही. त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोनही माझ्यावर फारसा परिणाम करू शकलेला नाही. असतो माझ्यासारखा असा एखाद-दुसरा करंटा वाचक.)

मुक्तसुनीत's picture

5 Mar 2010 - 12:57 am | मुक्तसुनीत

कथानक रोचक आहे.
मात्र , भाषेच्या बाबतीत एकंदर कालखंडाच्या संदर्भात एकात्मता राखली गेली नाही असे मला वाटले. काही नावे ग्रामीण ढंगाची, काही नावे कर्तार-सुमेर सारखी गारद्यांची. कुठे दंतकथेत शोभतील असे शुंभकेतू चंद्रवर्मा येतात तर कुठे सुलतानच आहे. जी गोष्ट व्यक्तिरेखांची तीच मग बाकीच्या पर्यावरणाची. मजूर विड्या ओढतात, कृतक-ग्रामीण भाषेत बोलतात. एकीकडे मुसलमानी संस्कृतीचे धागेदोरे येतात तर दुसरीकडे "गणिका" "चषक" सारखे , दंतकथा, पौराणिककथा सदृष सेट-अप चे प्रॉप्स. बरे , वेगवेगळ्या काळातून किंवा मिथक-वास्तववादी विश्वाच्या सीमारेषा क्रॉस होत आहेत असे मानण्यासारखे कथानक गुंतागुंतीचे किंवा काही मेटा-लेव्हलचे आहे असेही दिसत नाही.
मात्र नवे काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे हे प्रशस्तीपर.

आणि हो , ते अक्षराचे विसरत होतो ;-)

राजेश घासकडवी's picture

5 Mar 2010 - 3:36 am | राजेश घासकडवी

या कथेची भाषा काय असावी याचा विचार केला होता. जीएंसारखी चित्राळलेली घ्यायची नव्हती (आणि ती झेपतेय कोणाला...) किंवा भागवती (हे रत्नप्रतिमा वाले) कृत्रिम करायची नव्हती. त्यामुळे बखरीतला वृत्तांत आजच्या 'भाषेत' भाषांतर केला अशी कल्पना करून लिहिली. इंग्लिश शब्द टाळायचे एवढंच बंधन ठेवलेलं होतं -ऐतिहासिकतेच्या आभासासाठी. आधुनिक नाही, पण पहिल्या अठराशे वर्षांपर्यंत कधीही असेल असा...

लेबलं टाळण्याच्या, व स्थळ काळ धूसर करण्याच्या दृष्टीने जी सरमिसळ केली त्याने लेबल काय हाच जर प्रश्न उपस्थित होत असेल तर मूळचा प्रयत्न फसला असंच म्हणावं लागेल. शेवटाच्या परिणामासाठी विडीशिवाय पर्याय नव्हता. असो. मागे वळून बघताना कुठल्यातरी एका शैलीशी लग्न लावलं असतं तर कथेच्या व्यक्तीमत्वात स्वैराचाराचा अनाठायी विचार झाला नसता हे तुमचं म्हणणं पटलं.

(आता हलक्याने घ्यायचा भाग)
राहाता राहिला अक्षराचा विचार. मुळात मी जी टिप्पणी तुमच्या रचनेवर केली होती ती काहीतरी चांगला भाग अधोरेखित करण्यासाठी होती. ती मनावर घेऊ नये. हस्ताक्षर सुंदर आहे म्हटलं होतं, पण शेवटी ते त्या पार्श्वभूमीवरच घ्यावं. सुधारणेला वाव कायमच असतो....

राजेश