हडसर ऊर्फ पर्वतगड

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
16 Feb 2010 - 10:05 pm

१० दिवस आधी ठरलेली २ दिवसांची नागाव-काशिद-दिवेआगर सहल मित्रांच्या काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाली. पण घेतलेली सुट्टी तर रद्द करता येत नाही मग त्याचा सदुपयोग करण्यासाठी मी आणी माझा आत्येभाऊ असे दोघे जण शनिवार दि. १३ ला पहाटे ५.४५ वाजता हडसर उर्फ पर्वतगड किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो. अर्थात रात्रीच सगळे जाण्याचे नियोजन करुन ठेवले होते.
सकाळी ६.२० ला नाशिकफाट्यावरुन एसटी बस मिळाली. ७.४५ पर्यंत नारायणगाव व तिथून जीपने ८.१५ पर्यंत जुन्नर. वाटेत मानमोडीची लेणी लक्ष वेधून घेत होती. जुन्नरला महाराजांच्या जन्मस्थानाला खालुनच अभिवादन करून आम्ही ९.१५ च्या राजूर नं. १ च्या एसटी बसने निघालो. अर्ध्या तासात हडसर गावी पोहोचलो. वाटेत डावीकडे माणिकडोह धरणाचा जलाशय साथीला होताच.

हडसर हा नाणेघाटाच्या संरक्षक दुर्गचौकडींपैकी एक. सुमारे २००० वर्षांपुर्वी शूर्पारक, कलियान, श्रीस्थानक ते प्रतिष्ठान मार्गे जुण्णनगर यादरम्यान व्यापार करण्यासाठी नाणेघाट बांधण्यात आला. व त्याच्या संरक्षणासाठी जीवधन, हडसर, चावंड, शिवनेरी अश्या तालेवार किल्ल्यांची फळीच उभारण्यात आली. खडा कातळी पहाड व त्यात कोरून काढलेल्या पायर्‍या हे या सर्व किल्ल्यांचे वैशिष्ठ्य.
हडसर बस थांब्यावरून थोडे पुढे जाताच उजवीकडे एक विहीर लागते. इथून १०/१२ मिनिटातच आम्ही डोंगर चढून एका पठारावर पोहोचलो. तिथून शेतातील ठळक पायवाटेने हडसरचा कातळ उजवीकडे ठेवत १० मिनिटातच हडसरच्या दक्षिण बाजूस असलेल्या घळीपाशी पोहोचलो.

घळीतून बुरुजाचे दर्शन होत होते. घळीतून चढत जाउन बुरुजापाशी असलेल्या उजवीकडच्या कातळावरुन सोपे प्रस्तरारोहण करून थेट हडसरच्या खोदीव प्रवेशमार्गापर्यंत पोहोचता येते किंवा घळीच्या पायथ्याच्या असलेल्या मोठ्या प्रस्तरापासून उजवीकडे हळूहळू तिरकसपणे चढत जाणार्‍या पायवाटेने राजमार्गाने गडावर पोहोचता येते.

आम्ही मात्र राजमार्गाने निघालो. हा मार्ग हडसरच्या पश्चिम कड्यास वळसा घालून थेट कातळकड्यास लगटून जातो. वाटेत कड्याच्या पोटातच एक थंडगार पाण्याचे टाके आहे व थोडे अजून पुढे एक ओहोरलेले टाके पण आहे.

२० मिनिटातच हडसरच्या पाठीमागच्या बाजूचा लांबच लांब कातळपट्टा व घळ दिसते. या घळीत पोहोचताच बांधीव पायर्‍या दिसतात. तोच मार्ग पलीकडच्या बाजूने खाली उतरतानाही दिसतो.

उंच उंच अश्या १०० ते १५० पायर्‍या चढून जाताच तट-बुरुज आपली वाट अडवतात व आपण परत कातळकड्याच्या डाव्या बाजूने खोदीव प्रवेशमार्गात प्रवेश करतो. दोन्ही घळी एका अरूंद डोंगरधारेने जोडलेल्या आहेत.

हडसरचा हा खोदीव प्रवेशमार्ग हा सातवाहनांच्या स्थापत्यकलेतून निघालेला एक चमत्कारच आहे. अतिशय भक्कम पायर्‍या, दरवाजांची जोडगोळी, गोमुखी प्रवेशद्वारे त्यातील पहारेकर्‍यांच्या देवड्या हे सर्व एकाच अखंड कातळात कोरलेले आहे.

आपल्या पूर्वजांनी केलेला हा चमत्कार पाहातच आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. थोडे पुढे जाताच शेवाळलेले पाण्याचे टाके आहे. आम्ही तसेच डावीकडच्या बाजूने आमचा मार्ग न्याहाळत निघालो.

पुढे कातळातच खोदून काढलेल्या अंधारकोठड्या बहुधा धान्यकोठारे आहेत. त्याची रचना अगदी जीवधनावरील धान्यकोठांरासारखीच आहे. फरक एवढाच कि जीवधनावरील सपाटिवरून आत खोदलेली आहेत तर हडसरावरील कातळ जमीनीत खाली खोदून केलेली आहेत. एकात एक अश्या ह्या कोठड्या खोदलेल्या आहेत. विजेरीशिवाय आत काहीही दिसत नाही.

वरून चौफेर दृश्य दिसते. मावळतीकडे धाकोबा आपली कातळी टोपी घालून व नानाचा अंगठा आपला फडा उभारून जीवधनास मधे घेउन बसलेले दिसतात. त्याला लागूनच वर्‍हाडाचे सुळके व निमगिरी व शेजारीच हटकेश्वर पसरलेले दिसतात. दक्षिणेकडे चावंड व त्या पाठीमागे शिवनेरी दिसतात.

ते बघून आम्ही परत किल्ल्यावरील महादेव मंदिरापाशी आलो. वाटेत टाक्यांचा समूह तसेच एक तलाव आहे. पन पाणी पिण्यायोग्य नाही.

शिवाचे दर्शन घेउन आम्ही हडसरची पूर्व बाजू पाहण्यास निघालो. पूर्व कड्याजवळ पण पाण्याची टाकी तसेच एक पडझड झालेले मंदीर आहे. पूर्व तट बांधून काढला आहे. तटावरुन खाली डोकावताच गडावर येण्यार्‍या अवघड वाटेचे दर्शन होते. गावकर्‍यांनी त्यांच्या सोयीसाठी उभ्या कातळात खोबणी व गज ठोकून वाट तयार केली आहे. जवळ जवळ १००/१५० फूटांचा हा कातळारोहण टप्पा अतीशय अवघड आहे. फोटोवरून त्याची खोली लक्षात येत नाही.

आम्ही वरुनच हा नजारा न्याहाळतच धन्यता मानत होतो. इथून डावीकडे कारकाई डोंगर व शिंदोळ्या दिसत होता व अगदी समोरचाच मांगीन डोंगर थेट सप्तशृंगीवरून दिसणार्‍या मार्कंडेयाचीच आठवण करून देत होता.

हे सर्व अद्भूत डोळ्यांत साठवून आम्ही परत त्याच खोदीव पायर्‍यांच्या मार्गाने खाली उतरायला सुरुवात केली.

वाटेतील टाक्यांचे पाणी पिवून तासाभरातच गडाला वळसा मारत खाली उतरून आम्ही गावात आलो.

तिथून २.१५ च्या बस ने २.४५ ला जुन्नर-नारायणगाव-नाशिकफाटामार्गे ५ वाजता पिंपरीत पोहोचलो ते पुढच्या रविवारी रोहिडा उर्फ विचित्रगड ला जाण्याचा संकल्प करुनच.

प्रवास

प्रतिक्रिया

योगेश२४'s picture

16 Feb 2010 - 10:38 pm | योगेश२४

वल्ली छानच वर्णन आणि फोटो!!!!
विचित्रगडच्या फोटोची आणी माहितीची वाट बघतोय.
पुढिल ट्रेकसाठी शुभेच्छा!!!!

योगेश२४'s picture

16 Feb 2010 - 10:38 pm | योगेश२४

वल्ली छानच वर्णन आणि फोटो!!!!
विचित्रगडच्या फोटोची आणी माहितीची वाट बघतोय.
पुढिल ट्रेकसाठी शुभेच्छा!!!!

मदनबाण's picture

16 Feb 2010 - 11:50 pm | मदनबाण

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

चंडोल's picture

17 Feb 2010 - 7:07 am | चंडोल

छान माहिती आणि फोटो

विसोबा खेचर's picture

17 Feb 2010 - 10:00 am | विसोबा खेचर

सुंदर, मस्त, आल्हाददायक!

जियो...!

तात्या.

दत्ता काळे's picture

17 Feb 2010 - 1:01 pm | दत्ता काळे

मी ३१ जानेवारीला हडसरचा ट्रेक केला. आम्ही सातजण शिगेच्या वाटेने हडसर चढून गेलो नंतर येताना घळीच्या वाटेने ( फोटो नं. ३ ) उतरलो.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Feb 2010 - 1:03 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सही आहेत फोटो.

गणपा's picture

17 Feb 2010 - 2:59 pm | गणपा

फोटो आणि माहिती दोन्ही मस्त.

अमोल केळकर's picture

17 Feb 2010 - 4:21 pm | अमोल केळकर

खुप छान फोटो आणि माहिती

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुमीत भातखंडे's picture

18 Feb 2010 - 4:58 am | सुमीत भातखंडे

सहीये एकदम.

जातीवंत भटका's picture

19 Aug 2011 - 8:34 pm | जातीवंत भटका

उन्हाळ्यातले ट्रेक एक वेगळीच मजा देऊन जातात ....

अन्या दातार's picture

23 Aug 2011 - 1:16 pm | अन्या दातार

सुंदर फोटो. अजुन काही फोटो पाहिजे होते असे वाटले.

स्पंदना's picture

23 Aug 2011 - 6:57 pm | स्पंदना

बरीच माहीती असते तुम्हाला वल्ली.
आम्ही नुसते भिर्भिरत फिरायचो, चालुन चालुन तंगड्या वैतागल्या तरी आम्ही त्याम्ना रखडवत फिरायचो. माहिती देणार कुणी विशेष अस नव्हत्च आमच्यात्.असो.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

पल्लवी's picture

23 Aug 2011 - 8:32 pm | पल्लवी

किती आखिव रेखीव काम आहे ! सुंदर !

(आणि तुम्ही पिंपरीत राहता ? )

प्रचेतस's picture

23 Aug 2011 - 10:10 pm | प्रचेतस

पिंपरीतच राहतो मी. रादर चिंचवडला.

पैसा's picture

23 Aug 2011 - 9:44 pm | पैसा

आजूबाजूच्या सगळ्या गडांची माहिती आणि फोटो खूप छान आलेत. विचित्रगड झाला का परवा?

प्रचेतस's picture

23 Aug 2011 - 10:13 pm | प्रचेतस

हा धागा मागच्या वर्षीचा आहे.
बिचित्रगड त्यानंतर केला होता. त्याची माहिती इथे पहा.

http://www.misalpav.com/node/12843

मन१'s picture

23 Jan 2012 - 2:09 pm | मन१

आम्हीही परवाच, २१ जानेवारीला जाउन आलोत इथे हडसरला.
तिसर्‍या फोटोमध्ये जी घळ दिसते ना तिथून चढलो व राजमार्गाने उतरलो.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2014 - 11:09 am | अत्रुप्त आत्मा

माहिती आणी फोटो ... १ नंबर http://www.pic4ever.com/images/square.gif

वासु's picture

2 Jan 2014 - 11:31 am | वासु

खरच तिथे कधी जाऊ अस झालय.

लईच्च्च्च्च्च भारी आहेत फोटो आणि वर्णन सुद्धा !!!!
एक दोन स्पॉट्स मी मिस केले हे जाणून वाईट वाटतंय यार....

गोरगावलेकर's picture

14 Mar 2021 - 4:33 pm | गोरगावलेकर

फोटो व लेख दोन्हीही आवडले.

मुक्त विहारि's picture

14 Mar 2021 - 7:23 pm | मुक्त विहारि

गड वगैरे पण बघतात हे वाचून आनंद झाला ....

वेरूळची लेणी आणि देवगिरी, तुमच्या शिवाय पाहणार नाही...