मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हडसर ऊर्फ पर्वतगड

प्रचेतस · · कलादालन
१० दिवस आधी ठरलेली २ दिवसांची नागाव-काशिद-दिवेआगर सहल मित्रांच्या काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाली. पण घेतलेली सुट्टी तर रद्द करता येत नाही मग त्याचा सदुपयोग करण्यासाठी मी आणी माझा आत्येभाऊ असे दोघे जण शनिवार दि. १३ ला पहाटे ५.४५ वाजता हडसर उर्फ पर्वतगड किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो. अर्थात रात्रीच सगळे जाण्याचे नियोजन करुन ठेवले होते. सकाळी ६.२० ला नाशिकफाट्यावरुन एसटी बस मिळाली. ७.४५ पर्यंत नारायणगाव व तिथून जीपने ८.१५ पर्यंत जुन्नर. वाटेत मानमोडीची लेणी लक्ष वेधून घेत होती. जुन्नरला महाराजांच्या जन्मस्थानाला खालुनच अभिवादन करून आम्ही ९.१५ च्या राजूर नं. १ च्या एसटी बसने निघालो. अर्ध्या तासात हडसर गावी पोहोचलो. वाटेत डावीकडे माणिकडोह धरणाचा जलाशय साथीला होताच. Image removed. हडसर हा नाणेघाटाच्या संरक्षक दुर्गचौकडींपैकी एक. सुमारे २००० वर्षांपुर्वी शूर्पारक, कलियान, श्रीस्थानक ते प्रतिष्ठान मार्गे जुण्णनगर यादरम्यान व्यापार करण्यासाठी नाणेघाट बांधण्यात आला. व त्याच्या संरक्षणासाठी जीवधन, हडसर, चावंड, शिवनेरी अश्या तालेवार किल्ल्यांची फळीच उभारण्यात आली. खडा कातळी पहाड व त्यात कोरून काढलेल्या पायर्‍या हे या सर्व किल्ल्यांचे वैशिष्ठ्य. हडसर बस थांब्यावरून थोडे पुढे जाताच उजवीकडे एक विहीर लागते. इथून १०/१२ मिनिटातच आम्ही डोंगर चढून एका पठारावर पोहोचलो. तिथून शेतातील ठळक पायवाटेने हडसरचा कातळ उजवीकडे ठेवत १० मिनिटातच हडसरच्या दक्षिण बाजूस असलेल्या घळीपाशी पोहोचलो. Image removed. घळीतून बुरुजाचे दर्शन होत होते. घळीतून चढत जाउन बुरुजापाशी असलेल्या उजवीकडच्या कातळावरुन सोपे प्रस्तरारोहण करून थेट हडसरच्या खोदीव प्रवेशमार्गापर्यंत पोहोचता येते किंवा घळीच्या पायथ्याच्या असलेल्या मोठ्या प्रस्तरापासून उजवीकडे हळूहळू तिरकसपणे चढत जाणार्‍या पायवाटेने राजमार्गाने गडावर पोहोचता येते. Image removed. आम्ही मात्र राजमार्गाने निघालो. हा मार्ग हडसरच्या पश्चिम कड्यास वळसा घालून थेट कातळकड्यास लगटून जातो. वाटेत कड्याच्या पोटातच एक थंडगार पाण्याचे टाके आहे व थोडे अजून पुढे एक ओहोरलेले टाके पण आहे. Image removed. Image removed. २० मिनिटातच हडसरच्या पाठीमागच्या बाजूचा लांबच लांब कातळपट्टा व घळ दिसते. या घळीत पोहोचताच बांधीव पायर्‍या दिसतात. तोच मार्ग पलीकडच्या बाजूने खाली उतरतानाही दिसतो. Image removed. Image removed. Image removed. उंच उंच अश्या १०० ते १५० पायर्‍या चढून जाताच तट-बुरुज आपली वाट अडवतात व आपण परत कातळकड्याच्या डाव्या बाजूने खोदीव प्रवेशमार्गात प्रवेश करतो. दोन्ही घळी एका अरूंद डोंगरधारेने जोडलेल्या आहेत. Image removed. हडसरचा हा खोदीव प्रवेशमार्ग हा सातवाहनांच्या स्थापत्यकलेतून निघालेला एक चमत्कारच आहे. अतिशय भक्कम पायर्‍या, दरवाजांची जोडगोळी, गोमुखी प्रवेशद्वारे त्यातील पहारेकर्‍यांच्या देवड्या हे सर्व एकाच अखंड कातळात कोरलेले आहे. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. आपल्या पूर्वजांनी केलेला हा चमत्कार पाहातच आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. थोडे पुढे जाताच शेवाळलेले पाण्याचे टाके आहे. आम्ही तसेच डावीकडच्या बाजूने आमचा मार्ग न्याहाळत निघालो. Image removed. पुढे कातळातच खोदून काढलेल्या अंधारकोठड्या बहुधा धान्यकोठारे आहेत. त्याची रचना अगदी जीवधनावरील धान्यकोठांरासारखीच आहे. फरक एवढाच कि जीवधनावरील सपाटिवरून आत खोदलेली आहेत तर हडसरावरील कातळ जमीनीत खाली खोदून केलेली आहेत. एकात एक अश्या ह्या कोठड्या खोदलेल्या आहेत. विजेरीशिवाय आत काहीही दिसत नाही. Image removed. Image removed. वरून चौफेर दृश्य दिसते. मावळतीकडे धाकोबा आपली कातळी टोपी घालून व नानाचा अंगठा आपला फडा उभारून जीवधनास मधे घेउन बसलेले दिसतात. त्याला लागूनच वर्‍हाडाचे सुळके व निमगिरी व शेजारीच हटकेश्वर पसरलेले दिसतात. दक्षिणेकडे चावंड व त्या पाठीमागे शिवनेरी दिसतात. Image removed. Image removed. ते बघून आम्ही परत किल्ल्यावरील महादेव मंदिरापाशी आलो. वाटेत टाक्यांचा समूह तसेच एक तलाव आहे. पन पाणी पिण्यायोग्य नाही. Image removed. शिवाचे दर्शन घेउन आम्ही हडसरची पूर्व बाजू पाहण्यास निघालो. पूर्व कड्याजवळ पण पाण्याची टाकी तसेच एक पडझड झालेले मंदीर आहे. पूर्व तट बांधून काढला आहे. तटावरुन खाली डोकावताच गडावर येण्यार्‍या अवघड वाटेचे दर्शन होते. गावकर्‍यांनी त्यांच्या सोयीसाठी उभ्या कातळात खोबणी व गज ठोकून वाट तयार केली आहे. जवळ जवळ १००/१५० फूटांचा हा कातळारोहण टप्पा अतीशय अवघड आहे. फोटोवरून त्याची खोली लक्षात येत नाही. Image removed. आम्ही वरुनच हा नजारा न्याहाळतच धन्यता मानत होतो. इथून डावीकडे कारकाई डोंगर व शिंदोळ्या दिसत होता व अगदी समोरचाच मांगीन डोंगर थेट सप्तशृंगीवरून दिसणार्‍या मार्कंडेयाचीच आठवण करून देत होता. Image removed. हे सर्व अद्भूत डोळ्यांत साठवून आम्ही परत त्याच खोदीव पायर्‍यांच्या मार्गाने खाली उतरायला सुरुवात केली. Image removed. Image removed. वाटेतील टाक्यांचे पाणी पिवून तासाभरातच गडाला वळसा मारत खाली उतरून आम्ही गावात आलो. Image removed. तिथून २.१५ च्या बस ने २.४५ ला जुन्नर-नारायणगाव-नाशिकफाटामार्गे ५ वाजता पिंपरीत पोहोचलो ते पुढच्या रविवारी रोहिडा उर्फ विचित्रगड ला जाण्याचा संकल्प करुनच.
लेखनविषय:

वाचन 15375 प्रतिक्रिया 0