ढोलकी गळ्यात नि डोक्यावर देव्हारा
आधार नसुनही सावरते डोलारा
विटलेले हिरवे लुगडे, मळवट भाळी,
अंगात खणाची ठिगळांची काचोळी
काखेत पिरपिरे एक, एक धरि हाती,
अन् अंश आणखी एक उपाशी पोटी
सावळ्या मुखावर गर्भतेज सुकलेले,
ओढीत चालते माय पाय थकलेले
पदपथी सावली हेरुन बसली खाली,
टेकले देव, पोरांना खाऊ घाली
तो तिचा सोबती, राकट, कभिन्न काळा
हळदीचा मळवट, टिळा तांबडा भाळा
कमरेस झोळणा चिंध्यांचा कसलेला,
केसांचा बुचडा मानेवर रुळलेला
चाबूक वाजवी, गळा कवडिची माळ,
अनवाणी पायी छमछमणारे चाळ
दगडांचा मांडुन खेळ चिमुरडी रमली,
लक्ष्मीच्या हाती तशी ढोलकी घुमली
हातीचा चाबुक पुजुन सज्ज तो झाला,
घातले साकडे, कौल लावि देवाला
हातात उतरली कडकलक्षुमी नियती,
आसूड ओढते उघड्या पाठीवरती
क्षण एक गर्दिचे काळिज लक्कन हलले
जणु फटक्यांचे वळ मनामनावर उठले
संपता खेळ त्याचा, गर्दी हळहळली,
पसरता हात त्याने, माघारी वळली!
प्रतिक्रिया
13 Feb 2010 - 11:17 pm | विसोबा खेचर
.......!
तात्या.
14 Feb 2010 - 1:17 am | चतुरंग
साधे सोपे शब्द आणि काळजाला भिडणारा आशय!
चतुरंग
14 Feb 2010 - 1:49 am | प्राजु
+१
हेच म्हणते. चित्रदर्शी तर आहेच. पण काळजात कालवाकालव ही झाली कविता वाचून.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
14 Feb 2010 - 2:22 am | बिपिन कार्यकर्ते
+२
बिपिन कार्यकर्ते
14 Feb 2010 - 3:22 am | शुचि
क्रांती सुंदर अॅज युज्वल :)
<< पसरता हात त्याने, माघारी वळली!<<
खिन्न ! केलं या ओळीनी.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
14 Feb 2010 - 9:30 am | मनीषा
अशा प्रथा बंद व्हाव्यात असे वाटते ...
शब्दरचना चांगली आहे .