अजून अंधार पडायला खूपच वेळ होता पण उन्हं कलायला लागली होतीच. तशात थंडीचे दिवस म्हणजे अंधार लवकर आणि हवेतला गारठा वाढत जाणारा... टेकून बसल्यामुळं आणि हवेतल्या गारव्यामुळं तिला हलकीशी डुलकी लागलीच.
तेवढ्यात हळूवार पण अगदी ताकदीने मारलेल्या दोन तीन लाथा तिच्या पोटात बसल्या. दुर्लक्ष करावं असं वाटता वाटता अजून एक लाथ बसली आणि आता हे टाळणे शक्य नाही हे समजून तिने डोळे उघडले. समोरच, तो हसत हसत मस्त पहुडला होता मांडीत. तिला एकदम हसूच आलं. एवढंसं कार्टं पण बरोब्बर सगळं मनासारखं करून घेतं... एकदम लबाड पण गोड आहे. कायम हिच्याच कडेवर. तिने सारखं याच्याशी खेळायचं. मस्ती करायची... तिलाही ते खेळणं आवडलंच होतं.
तो यायच्या आधी तिला एकटीला खूप कंटाळा यायचा.
आत्ता सुद्धा जवळ एक चांदी पडली होती... तीच पकडायचा प्रयत्न चालला होता त्याचा. ते जमत नव्हतं... म्हणूनच मग त्या लाथा आणि ढुशा. मस्त वार्याच्या झुळकीमुळे छान वाटत होतं. तिने त्याला थोडं घट्ट जवळ ओढून घेतलं. टोपडं नीट केलं. पण सराईतासारखी तिची नजर आजूबाजूला भिरभिरतच होती. वेळ चुकवून चालत नाही हे तिला माहित होतं... शिवाय आत्ताशी कुठे चालू होत होता तिचा दिवस. अजून आख्खी संध्याकाळ जायची आहे.
तशात, एकदम बाजूला वेगाने पळणार्या गाड्या मंदावल्या... त्यासरशी ती उठलीच... सिग्नल पिवळा... ती भक्ष्यावर झडप घालताना शेवटच्या क्षणी संपूर्ण अंग ताठ करणार्या वाघासारखी पूर्ण फोकस्ड... पुढच्या सगळ्या अॅक्शन्स ठरलेल्या... किती वेळात सिग्नल लाल होणार... गाड्या थांबे थांबे पर्यंत किती सेकंद लागणार... सगळं सरावाचं...
सिग्नल लाल... तिने पूर्ण ताकदीने त्याच्या ढुंगणावर चिमटा काढला... तो कळवळला... आकांत सुरू...
त्याला काखेला मारून ती पहिल्याच गाडीसमोर तोंड वेंगाडून हात पसरून उभी राहिली...
प्रतिक्रिया
13 Feb 2010 - 3:05 am | योगी९००
काळजाला चटका लावणारा लेख...
शेवट वाचून रागही आला..वाईटही वाटले..कीव पण आली...बरेच काही वाटले..
खादाडमाऊ
13 Feb 2010 - 3:07 am | सुमीत भातखंडे
काय बोलू? :(
13 Feb 2010 - 3:16 am | रेवती
काय हो बिका, तुम्ही नेहमी असं लहान मुलांना (त्यामुळे मोठ्यांना)त्रास होणारं लिहिता?
रेवती
13 Feb 2010 - 10:33 am | विंजिनेर
हेच म्हणतो. आजिबात आवडलं नाही. वास्तववादी म्हटल तरी खुपच अंगावर येतंय हे.
असो. पुढचे भाग वाचिन की नाही शंकाच आहे.
13 Feb 2010 - 11:13 am | टारझन
हेच्च्च ... काल कथा टाकण्याआधीच दिलेल्या प्रतिसादात हेच्च बोललो होतो ~!~
13 Feb 2010 - 7:06 pm | स्वाती२
+१
13 Feb 2010 - 8:40 am | अक्षय पुर्णपात्रे
बिपिन, हा खरा अनुभव असल्यास हा प्रतिसाद अप्रस्तुत समजावा.
'तो यायच्या आधी तिला एकटीला खूप कंटाळा यायचा.' मग ती कुठल्या वेदनेचे प्रदर्शन करून भीक मागत असे? तुमच्या कल्पनेची भरारी 'माती'शी निगडीत वाटली नाही.
13 Feb 2010 - 10:26 am | पिवळा डांबिस
श्री. कार्यकर्ते,
"ती" पुढे संपादिका होणार बघा!!!
:)
13 Feb 2010 - 10:37 am | विसोबा खेचर
अरे बिका ही कॉमन गोष्ट आहे.. पोरांना रडायला लावून भिका मागण्याचे धंदे सर्रास चालतात..
तात्या.
13 Feb 2010 - 11:09 am | शुचि
आवाडली. वाइट वाटलं वाचून.
पण पुढचे भाग वाचायची उत्सुकता वाढली.
अनेक जणांनी मत व्यक्त केलाय की "डिस्टर्बिंग". पण बिका कुठेशी मी वाक्य वाचलेला होत - आर्ट इस नॉट आर्ट टिल्ल इट दिस्टर्ब्स यु.
त्यामुळे छान!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
13 Feb 2010 - 11:14 am | आनंदयात्री
शेवटापेक्षा तिचे भावविश्व रंगवण्याचा प्रयत्न आवडला. ते अजुनही रंगवता आले असते असे वाटले, घाईत प्रसिद्ध केलेस का ?
13 Feb 2010 - 1:39 pm | ऋषिकेश
कथा आवडली
(याला पुढचा भाग आहे? माझ्या मते नसावा)
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
13 Feb 2010 - 4:09 pm | वर्षा म्हसकर-नायर
आsssssई गंssssss. अंगावर काटा आला वाचुन. वास्तववादी एकदम. तात्या म्हणतात त्याप्रमाणे हे अगदी सर्रास, राजरोसपणे चालते भारतात.
रिक्षात असु आपण तर अगदी अंगाला हाथ लावणार. गाडीची काच बंद केली तरी अगदी काचेला ओठ, नाक चिकटवुन टकटक करणार. सोनेरी रंगांचे केस(ह्या मुलांना बहुतेक वेळा एका व्हिटॅमिनच्या deficiency मुळे त्यांचे केस सोनेरी असतात.) असलेली हि बाळं अंगावर घेउन ४-५ वर्षांची मुले भीक मागतात. वाईट वाटतं त्यांच्यासाठी, पण काय करणार? रोज पुन्हा त्याच सिग्नल वर उभं राहुन आपल्या संवेदना देखिल बोथट होत जातात.
13 Feb 2010 - 5:06 pm | सुनील
प्रसंगकथा छान. वर आनंदयात्री म्हणतात त्याप्रमाणे अजून थोडी फुलवता आली असती.
अवांतर - परंतु पूर्णतः वास्तववादी म्हणता येणार नाही. कारण प्रत्यक्षात, ते रडके, विद्रुप (केलेले) मूल आणि त्याला घेऊन जाणारी स्त्री, हे माय-लेक असतीलच असे नाही (बहुघा नाहीच). त्यांच्याकडून भीका मागवून घेणारा वेगळाच असतो!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Feb 2010 - 7:20 pm | रामदास
उभे करण्याची तुमची ताकद गुलामांवरचा लेख वाचला होता तेव्हाच कळली होती.
पण आजची गोष्ट एखाद्या डायरीतल्या नोंदीसारखी वाटली.
येऊ द्या आणखी काही पानं .
13 Feb 2010 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिका, मस्त हं...!
-दिलीप बिरुटे
14 Feb 2010 - 1:57 am | प्राजु
गुड वन!! आवडली.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
14 Feb 2010 - 3:44 pm | धनंजय
तीच आई बाळाच्या खिदळण्याने सुखावते, आणि (दोघांची) पोटे भरण्याकरिता प्रसंगी बाळाला बळेच रडवते. माणसाच्या वागण्यातला हा विरोधाभास की खराखुरा अंतर्गत विरोध? विचार करायला लावणारा अनुभव आहे.
22 Mar 2010 - 1:06 pm | अरुंधती
हे चित्र पुढच्या ५० वर्षांत तरी बदलेल???
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
28 Mar 2024 - 11:11 am | अहिरावण
जबर !