आटपाट नगर होतं...

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
12 Feb 2010 - 10:05 am

आटपाट नगर होतं. अतिशय समृद्ध नगर. तिथे चहुकडून लोक येत असत. त्या नगरीत कधी कोणाला काम मिळालं नाहि असं झालंच नाहि. कष्टकरीच नव्हे तर विद्यार्थी, व्यापारी सगळ्यांची ती पंढरीच होती म्हणा ना! तर ही गोष्ट आहे एका चंदूची. चंदू लहानपणापासूनच हुशार. उत्तम शिक्षण घेतलेलं. नोकरीसाठी तो ह्या समृद्ध नगरीत आलेला. अबब! केवढ्या उंच इमारती, केवढा झगमगाट केवढी गर्दी म्हणता म्हणत तो त्या गर्दीचा भाग कधी झाला त्यालाही कळलं नाहि. त्या शहरानेही त्याला कवेत घेतलं होतं. एक दिवशी त्याच्या मित्राने विचारलं काय रे संध्याकाळच्या वेळेत टॅक्सी चालवणार का? उत्तम शिक्षण असलं तरी अजून पैसा मिळाला तर हवाच होता. चंदूने विचार केला चालवू दोन तास रोज झाला तर फायदाच आहे.
***
महिनाभरात आटपाट नगरीच्या रस्त्यावर चंदू टॅक्सी चालवू लागला. शहरातले कधीही न पाहिलेले भाग बघु लागला. जितका तो त्या शहराच्या अंतरंगात शिरू लागला तितकं ते शहर त्याला आवडू लागलं. आता इथेच स्थायिक व्हायचं हे त्याच्या मनात नक्की होऊ लागलं. परत घरी जाऊन लग्न करावं आणि मग बायकोला घेऊन इथेच यावं असं त्याने जवळजवळ निश्चित केलं होतं. पुढल्या आठवड्यात तो परतणार होता... पण....

पण त्या रात्री तसाही उशीर झाला होता. रस्ते थंडावले होते. आता आजचा कोटा संपला असा चंदू विचार करत होता. इतक्यात टॅक्सीवर एक थाप पडली. चार जणांचं टोळकं टॅक्सीबाहेर उभं होतं. बहुदा सगळेच पिऊन झिंगलेले वाटले. एकाने चंदूला प्रश्न केला. पण स्थानिक भाषा फारशी येत नसल्याने तसेच समोरचा प्याललेला असल्याने त्याचं बोलणं अधिकच कळेनासं झालं होतं. चंदूने काहिच उत्तर दिलं नाहि. दुसर्‍या एका दांडगटाने तोच प्रश्न विचारला. चंदू गप्प. ते टोळकं भडकू लागलं. शेवटी याने सांगितलं की तुम्ही आपल्या दोघांना समजेल अश्या भाषेत बोलाल तर मी आपल्याला योग्य स्थळी पोचवू शकेन. झालं!!!!
****
दुसर्‍या दिवशी पेपरात मथळा होता.."अजून एका टॅक्सी ड्रायव्हरला तो स्थानिक नसल्याकारणाने मारहाण!!! ड्रायव्हर अत्यवस्थ!!". सगळा देश अस्वस्थ झाला. आता हे नेहमीचंच झालं होतं. देशात सरळ दोन उभे तट पडले एक स्थानिकांची बाजू मांडणारा तर दूसरा स्थानिकांच्या द्वेषाविरूध बाजू मांडणारा. इतकंच काय तर चंदू जिथला मुळ रहिवासी होता तेथील नेत्यांनीही याप्रकरणात उडी घेतली. बदलत्या राजकारणात त्यांना बराच भावही आला होता. त्यामुळे दूरवर बसून तेही स्थानिक नेत्यांवर दबाव आणत होते. एकूणच समाज स्थानिक वि. बाहेरचे या दूहीमधे विभागला होता.
****
आज हॉस्पिटल बाहेर पत्रकारांची गर्दी होती. कारणच तसे होते. चंदू शुद्धीत आला होता आणि त्याने पत्रकारांशी बोलायचे मान्य केले होते. चंदूला मिडीया रूममधे आणले गेले. चंदू आल्या आल्या गर्दी बघून बावरला त्याला काय बोलावे सुचेना. तो फक्त म्हणाला,
"हाय"
"सर!.. त्या दिवशी नेमकं काय झालं ते सविस्तर सांगाल का?"
हळू हळू चंदूने ती कथा पुन्हा संगितली. त्यादरम्याने लोकांपुढे बोलणं तितकंही कठीण नाहि हे कळल्याने त्याचा आत्मविश्वासही वाढला.
"सरकारने काय करावं असं तुमचं मत आहे?"
"निदान पुढे असं होणार नाहि ते बघावं. मला आभार मानायचे आहेत ते इथल्या काहि स्थानिकांचे जे या परिस्थितीतही माझ्याबरोबर राहिले"
"आता तुम्ही भारतात परतणार का?"
"नाहि मी ऑस्ट्रेलियातच राहिन. इथे मी खरोखर परका आहे. तिथे भारतीय असूनही परकेपणाची वागणूक मिळण्यापेक्षा हे बरं काय?"
यापुढे एकही प्रश्न आला नाहि.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2010 - 10:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आटपाट नगराची कथा चांगलीच आहे. पण,

भारतीय असूनही परकेपणाची वागणूक मिळण्यापेक्षा हे बरं काय?"’

हम्म, स्थानिक,बाहेरचे, हिंदी,मराठी, असा वैरभाव नकोच. अखंड भारत, समृद्ध भारत,विविधतेने नटलेला भारत. अशा प्रतिमेत भर घालायची असेल तर काही संकुचित विचाराच्या पलिकडे पाहण्याची गरज आहे, असे वाटते.

”माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन”

-दिलीप बिरुटे
[समजदार]

Dhananjay Borgaonkar's picture

12 Feb 2010 - 12:18 pm | Dhananjay Borgaonkar

बिरुटे साहेब तुम्ही म्हणताय ते खर आहे. संकुचित विचारसरणी नको.
पण प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात तसच ईथेही आहेच की..
आपल्या विभागच मुळात भाषेच्या आधारावर पडले आहेत.
प्रत्येक प्रदेशामधे त्या त्या लोकांना प्राधान्य हा जर क विचार असेल तर चुक तरी काय?

”माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन”

अगदी मान्य..पण हेच सर्वाना लागु व्हायला पहिजे..हा विचार फक्त महाराष्ट्रापुरता का? नियम केलेत तर सर्वांसाठी..
पुर्ण देशानेच असा विचार केला पहिजे.
उत्तरेतील लोक इकडे येउन माज करतात. साउथ वाले आपल्या लुंग्या सोडायला तयार नाहीत.तिकडे त्यांना हिन्दी येत असेल तरी सुद्धा फक्त त्यांचाच भाषेत बोलतात.
पी.चिदंबरम एकत्मतेची भाषा करतो मग स्वतः का नाही हिंदीतुन बोलत (जर का आपण हिंदी राष्ट्रभाषा मानली तर)..
कोणाला उगाच भांडण करायही हौस आहे जर सगयांनीच जर घालुन दिलेले नियम पाळले तर??
पण तस होत नाहीये..मग असे वाद चव्हाट्यावर येतात.
आज पुण्या मुंबईत असंख्य अमराठी लोक रहातात त्यापैकी किती मराठीत बोलतात? जर आपण एखाद्या प्रदेशात बरीच वर्ष रहातो तर तिकडशी भाषा, संस्क्रुती का नाही शिकली जात?

आपल्या घरात पाहुणा आला आणी स्वैराचार कारायला लागल तर तुम्ही किती दिवस ऐकुन घ्याल?
तुम्ही जर का त्याला तुमच्या घरचे नियम सांगितलेत तर तुमच वागण हे संकुचित झाल का?

डोंबिवली ते दादर एक महिना प्रवास करुन बघा (केला नसेल तर).
मी अस का म्हणतो आहे हे लक्षात येईल तुमच्या.

(तुम्ही म्हणजे शब्दशः तुम्ही नव्हे. मी फक्त उद्देशुन बोलतो आहे. क्रुपया वैयक्तिक समजु नये)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2010 - 12:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आपल्या विभागच मुळात भाषेच्या आधारावर पडले आहेत.

प्रादेशिक भाषेमधून ती ती सरकारे आपले कामकाज चालवतील. भाषेमुळे एकात्मतेची भावना निर्माण होईल. राष्ट्रीयत्वाची भावना रुजू लागेल. असा तो उद्देश होता. परंतू भाषावार रचनेच्या ज्याकाही चर्चा आपल्याला वाचायला मिळतात त्यात अशा भाषावार रचनेमधून मध्ययुगीन संस्थानाप्रमाणे वाद होतील, एकमेकांचे शत्रु होतील असा विचार केलेलाच होता, आणि दुर्दैवाने आपली वाटचाल त्या दिशेने सुरु झालेली आहे, असे वाटायला लागते. आणि ते योग्य नव्हे. म्हणूनच राष्ट्राची भाषा एकच हिंदी असावी असे म्हटलेले होते.

बाकी, आटपाट नगरीच्या कथेत अवांतर होईल म्हणून थांबतो...!

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

12 Feb 2010 - 10:39 am | प्रकाश घाटपांडे

बोधकथा आवडली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 10:44 am | विसोबा खेचर

भारताबद्दल बोलायचं झालं तर मुंबैतील कष्टकरी उत्तर भारतीयांबद्दल आमचं काहीच म्हण्णं नाही. परंतु त्यांच्या आडून महाराष्ट्रात बसलेले अबु आझमी सारखे भिकारचोट नेते आणि महाराष्ट्राबाहेर बसलेले मुंबै आणि महाराष्ट्र द्वेष्टे नेते जे राजकारण खेळतात त्यामुळे उत्तर भारतीय जनता मुंबैत मार खाते!

"नाहि मी ऑस्ट्रेलियातच राहिन. इथे मी खरोखर परका आहे. तिथे भारतीय असूनही परकेपणाची वागणूक मिळण्यापेक्षा हे बरं काय?"

माझ्या मते भारत कसाही असला तरी ती आपली मातृभूमी आहे.. परक्या देशात राहून अपमान/अवमान/मारहाण का सहन करा?

असो..मी आपलं माझं मत मांडलं रे ऋष्या! धागा बाकी छान काढला आहेस आणि छान, मोजक्या शब्दात कथारूप मांडला आहेस!

तात्या.

स्वाती दिनेश's picture

12 Feb 2010 - 11:17 am | स्वाती दिनेश

प्रकटन आवडले,
स्वाती

प्रमोद देव's picture

12 Feb 2010 - 11:36 am | प्रमोद देव

जिथे राहतो तिथली भाषा,संस्कृती जाणून घेऊन त्यात मिसळून राहणे जमत नसेल तर आपला गाव गाठावा हे बरे. इतरात मिसळूनही आपले स्वत्व टिकवता येतेच.
पण आपले स्वत्व टिकवण्यासाठी परदेशात/परप्रांतात तिथल्या स्थानिकांशी,त्यांच्या भाषेशी फटकून वागलात तर फटके मिळणारच आणि ते तसे मिळाले की मग गळे काढण्यात काय हंशील आहे?
कुणी तरी म्हणून गेलाय ना...बी रोमन व्हेन इन रोम....अगदी, तसे वागणार्‍याला कधी त्रास होण्याची शक्यता जवळपास कमीच असते.
मिळून मिसळून वागण्याला पर्याय नाही.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

टारझन's picture

12 Feb 2010 - 12:48 pm | टारझन

त्या नगरीत कधी कोणाला काम मिळालं नाहि असं झालंच नाहि. कष्टकरीच नव्हे तर विद्यार्थी, व्यापारी सगळ्यांची ती पंढरीच होती म्हणा ना!

सुर्दैवानं असं आमच्या आटपाट नगरात होत असतं तर कोणाला हाकलायचा ही संबंध नव्हता .. :) शिवाय वरून नॉर्थ वाल्यांचं राजकारण ? ते ऋषी सारख्या उपर्‍यांचा "पुळका" असणार्‍यांना दिसतंच कुठे ?

जेंव्हा हातची वेळ निघुन जाईल नी आपल्यालाच आपल्या जागी नोकर्‍या न घरे मिळणार नाहीत तेंव्हा पुन्हा "अर्रे .. आमच्याच जागी आम्ही कधी परके झालो ?" अशा आशयाचा लेख येऊन दे भावा

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Feb 2010 - 8:59 pm | बिपिन कार्यकर्ते

ऋषि... तुला काय म्हणायचंय... साम्य दाखवायचंय ते कळलं... पण बरेचवेळा अश्या विचारांमधे एक स्वप्नाळू भोळसटपणा असतो... तेवढा टाळला तरच असे विचार प्रॅक्टिकल ठरतात. नाही तर त्यांचा '६२ मधला नेहरू होतो.

बिपिन कार्यकर्ते

अभिज्ञ's picture

12 Feb 2010 - 9:20 pm | अभिज्ञ

ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेल्या व सध्या भारतवारीला आलेल्या काही मराठी माणसांची मध्यंतरी गाठ पडली होती.
बोलता बोलता तिथे भारतीयांवर होणारे हल्ले ह्यावर चर्चेची गाडी आली.
त्यांच्याकडून मिळालेली माहिती काहितरी भलतीच होती.
त्यांच्या अनुभवानुसार भारतीयांवर होणारे हल्ले हे स्थानिक वा मुळ ऑस्ट्रेलियन लोकांकडून होत नसून भारतीयांसारखेच तिथे स्थायिक झालेल्या व ऑस्ट्रेलियन नागरिकत्व मिळालेल्या इतर विदेशी मुळाच्या नागरिकांकडून भारतीयांना "टारगेट" बनवले जात आहे.
त्यातही मुख्य भरणा हा इजिप्त,लेबॉनन वगैरे मुळ नागरीकत्व असलेल्या नागरीकांचा आहे.
मला वाटते हि नाण्याची तिसरी बाजु असावी.

अभिज्ञ.

ऋषिकेश's picture

13 Feb 2010 - 10:06 am | ऋषिकेश

सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्दल आभार. बर्‍याचशा प्रतिक्रीया अपेक्षेप्रमाणेच आहेत. सर्वप्रथम ही कथा प्रातिनिधिक नव्हे. आता मला यातून काय सांगायचंय?

इथे मला स्थानिकांचे हक्क वगैरे नाकारायचे नाहियेत. मात्र तो मिळविण्याचा मार्ग दिसेल त्याला बदडणे असा जर असेल तर त्याला विरोध आहे. आपल्या प्रांताचा, भाषेचा वगैरे अभिमान सकारात्मक असावा असे वाटते. सध्या दिसतो आहे तो स्वभाषेचा अभिमान नव्हे तर इतरांबद्दलचा द्वेष. माझ्या देशाबद्दलच्या अभिमानाआड प्रांताचा/भाषेचा अभिमान येता कामा नये. माझ्या स्थानिकत्त्वात माझं राष्ट्रीयत्त्व लोप पाऊ शकत नाहि.
आणि असं काहि ठिकाणी होऊ लागलंय हेच दाखवायचं होतं

असेही म्हणता येईल की (कदाचित सध्या नाहि पण निदान भविष्यात) माझ्या राज्यातही जितका मान मराठीला असेल तितकाच अन्य भाषांना मिळालेला दिसला तरच माझं मराठीपण, माझ्या राज्यांचं पुरोगामित्त्व, इतरभाषांवर आधारीत राज्यांच्या संकूचित दृष्टीकोनापेक्षा वेगळं दिसेल.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.