रखमा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
11 Feb 2010 - 9:06 pm

रखमा
--------------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ६
काय मेला बघूं र्‍हायलाय निसता. सक्काळी सक्काळी बोलीवलं मला त्या भाड्या शेटनं अन म्हनतू कसा की 'ए रखमे पानी मारलं का नाही त्या कालच्या भिंतींवर ते?'. आता मी सांगते तुमाला. माला काय ह्ये नविन हाय का ह्ये. दहा वर्स झाली या लायनीत राहून. तुमाला सांगते बिगार्‍याच आयुक्श लई खराब. त्यात माझ्यासारक्या बायामान्सांच्या हालाचं तर ईचारूच नका. आता तुमीच बगाना त्या भाड्या बिल्डर शेटच यवढ्या सक्काळी सक्काळी इथं पालात येवूनशान भिताडावर पानी मारायला सांगायच काय काम व्हतं का? आन त्ये बी माझं मालक पालात नसतांना? बरं मी काय त्या भाड्याला वळखीत नाय का त्ये? लुभ्रा मेला. त्याची नजर काय बरूबर नाय. मागला शेट लई चांगला व्हता. त्याच्याबरूबर आमी सात आट बिल्डींगी केल्या नव्ह का? मग. व्हताच तसा त्यो. लय दयाळू. दोन वर्साच्या ऐन दिवाळीच्या दिशी माझं तान्ह लेकरू आजारी पल्डं तवा त्यानं त्याच्या गाडीत घालूनशान दवाकान्यात डागदरकडं घ्येवून गेला. आन माझ्या हातावर २०० रुपयं द्येवून 'काय लागलं तर सांग रखमे. दोन दिस रोजी नगं करू. आन तुझ्या नवर्‍याला पन सांग की दोन दिस ताडी न प्येता काम कर आन त्या पैशानं आवशीद आन पोराला.' त्याची नजर काय या शेटसारकी वाईट नवती. मालाच नाय तर बाकीच्या रोजंदारीच्या बायांनाबी त्यो लय दयाळू लागायचा. त्याला दोन मोट्या पोरी आसल्यानं जगात काय चालतं त्ये समजत आसल. आसत्यात आशी मान्स. आन हा भाड्या. सदाअनकदा घिरट्या घालतू माझ्या पालात. मागल्या येळंला यांना म्हनतो कसा ' रमेश, आता नव्या बिल्डींगचा तिसरा स्लॅब पडतोया तवा तू तुज्यावालं बिर्‍हाड आता पयल्या मजल्याच्या यका फिल्याटमदी टाक. माझं मालकं बी लय भोळसट येडं. लागलीच फशी पडाया लागलं. म्या शेटला म्हनलं की, 'आमी गरीब मान्सं. आमी हायेत तितंच ठिक हायेत. आमी ही बिलडींग व्हयीपत्तूर पालातच राहू. आन खाली राहूनशान बिलडींग ची राकनदारीपन व्हती. त्येवढ्येच दोन पैसं तुमी त्यामूळं आमाला त्याचे द्येत्यात नव्हं का.'
बिलडींग ची राकनदारीचा इशय निगाला तवा त्या मेल्या शेटनं आपला नाद टाकला. आन आत्ता सक्काळी सक्काळी इथं हजर कामं सांगाया.

आन आत्ता पंदरा मिन्टांत लाईट जातील. तवा म्या कशी मोटार सुरू करू आन कशी पानी मारू त्या भिताडावर सांगा तुमी. हा नवा शेट माझ्या मालकाला दुसरं कायबी काम सांगतो आन मी एकली आसतांना न्येमका हतं येत्यो. मागल्या येळंला माझा नवरा गावाकडं यवतमाळला ग्येला व्हता तवा तर माज्या जिवात जिव नव्हता. मालाच आता पुढं व्हवूनशान दुसरीकडं काम पाहायला लागल.

मी तुमच्याशी काय बोलूनं राह्यले इथं. तिकड माझा चाहा वोतू जाईल.

"काय रं सुंदर्‍या, कवापासून त्वांड घासतो? चाहाच्या आधनाला उकळी आली का बघ की जरा. आन तुला साळा हाय ना आत्ता साडेसातला? आन तुज्या बाला बलीव चाहा प्यायला. सक्काळी सक्काळी ग्येला दुसर्‍या सायटीवर."
-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ८

चला आता दुसर्‍या मजल्यावरच्या सल्याबवर ईटा पोचवायच्या हायेत. तुमाला सांगते या बिलडींगच्या पायर्‍या जास्तीच हायेत. आन त्याच्यात दुसरा सल्याब म्हंजी पायात गोळं यायचंच काम. डोक्यावर बारा बारा ईटांचं वझं घ्येवूनशान चढायच म्हंजे मरवणूकच हाय जनू. नाय आता एखांद्या तासात बाकीच्या रोजंदारीच्या बाया येतील हात लावायला तवा थोडी मदत व्ह्यईल कामाला पन म्या इथंच राहातू राखनदार म्हनून तर जास्तीचं काम करावा लागतं. आन दोन पैसं जास्तीचे मिळून सौंसारालाबी हातभार लागतू.

-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ९

आज ज्येवायला पिठलं भाकरी करत्ये. त्योच आता न्याहारीला व्ह्यईल. आमी आताच कायबायी आसल त्ये आताच्या येळला न्याहारीला खावून घ्येतो. दुपारच्या १ वाजंपर्यंत बुड ट्येकायलाबी सवड राहात नायी मग. कामाच्या रगाड्यात आंग पिळून निघतं. घ्या ! त्येलाला आत्ताच संपाया पायजे व्हतं का? कोपर्‍यावरच्या शेटच्या दुकानीत जाया पायजे. कालच संद्याकाळी त्येल संपल्याच माज्या घ्यानात व्हतं पन रातीला ईसरून ग्येले आन आता घाईच्या वक्ताला आशी फजिता व्हती.

'शेट, १० रुपायाचं त्येल आन ५ रुपायाचं डाळीचं पिठ द्या.'

'काल संध्याकाळी तुज्या नवर्‍यानं २ रुपायाच्या इड्या आन १ रुपायाचं फुटानं न्येलं. त्ये घरून आता उधारी ७३ रुपये झाली बघ. कवा देशील?'

'शेट आता ह्ये सामान द्या आन म्होरल्या बुधवारी रोजी भरली का द्येतो की पैसं.'

'बरं बरं. लक्षात ठिव म्हंजे झालं'
-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ११

आता त्या मिस्तरीच्या हाताखाली कामं करावी लागतील बया. आज त्यो वरच्या मजल्यातल्या भिती चढवलं. बाकीच्या बाया काय काम करीत नाय बघा. नुसत्या कुजुकुचु करत टायम खोटी करतात. त्या रानीला तर काय कामच कराया नगो. आता माला सांगा, मिस्तरीला वर माल कालवाया वाळू लागल का नायी? पन या रानीला खाली वाळू गाळाया ठ्येवलं तर तिच आपलं बोलनं चालूच हाय बाकीच्या बिगार्‍यांशी. मेली. हा शेट आंगाखाली घ्येईल तवा समजलं तिला काय आसतं त्ये. मरो आपल्याला काय करायचं दुसर्‍यांचं. आपन आपलं काम करावं ह्येच बरं.

--------------------------------------------------------------------------------------
दुपारचं १
आरं ए सुंदर, तुजं ज्येवन झालं आसंल तर तुज्या बा ला बलीव ज्येवन करायला. त्येंला काय कामामधी सुद नसती बग. तरी म्या सांगत आसत्ये की ह्ये बिगार्‍याच काम सोडून मिस्तरीचं काम शिकून घ्या. पन नायी. आपन काय परगती करायची नाय आन आपली गाडी अधोगतीकडं न्यायची. आन तू पन मुडदा म्येला त्येच्याच लायनीला जानार. शाळंतून आल्यापास्न बगत्ये हाये मी निसता मातीतच उंडारू र्‍हायलाय तू. जा तुज्या बा ला हाक मार ज्येवायला.
--------------------------------------------------------------------------------------
दुपारचं ५
आज काम करूंनशान लय थकाया झालं. मगाशी चा पिवून थोडं बरं वाटलं. आता त्या मुकडदमला हातचं काम सोडून माला पलास्टर च्या कामाला लावायचं काय काम व्हतं का? तुमाला सांगत्ये हा मानूस लई डांबीस हाय बगा. काम करून घ्येतो आन पैसं पन येळवारी देत नाय. आता सा वाजल्यानंतर सुट्टी करून माला उद्याच्यासाटी एखांदी भाजी आनाया बाजारात जायाच हाय तवा हातात धा ईस रुपयं नगो का? आपन आप्लं येळवारी पैसं मागून घ्यायला पायजे त्याच्याकडून.
------------------------------------------------------------------------------------------
रातीचं ७

'आव म्या काय म्हंते, तुमी एका दिसाचं औशीद नका प्येवू पन रेडीवोच्या बॅटरीक संपल्यात. त्या आनायच्या हायीत. झालंच तर सुंदरचे आंगांवरचे कापडं बी आनायचे हायीत. ढुंगनावर सगळ्या चड्या ग्येल्या त्येच्या. या बुधवारच्या सुट्टीत आपन बाजाराला जावू आन सगळं सामान घ्येवून येवू.'

'बरं बरं जावू आपन या बुधवारला. पन म्या काय म्हंतो ज्येवान झालं का? माला भुक लागलीया.'

'ह्ये काय ज्येवन तयार हाय. सुंदर्‍याचं झालं का तुमी बसा, म्या गरमागरम भाकरी थापती.'
----------------------------------------------------------------------------------------
राती १०

'आगं ए रकमे सुंदर लई लवकर झोपला आज.'

'तर वो. निस्ता वाळू आन मातीत खेळतो. मग दमूनशान लवकर झोपनार नायी तर काय?'

'आता तू काय करती तिकडं. ईकडं ये झोपाया. दिसभर लांब आस्तो आपन. ह्या बुधवारला तुलापन एक पातळ घ्येवून टाकू. कधीचं फाटकंच पातळ शिवून घालू राहीली. माला दिसत नाय का व्हय?'

'आत्ता आटवली का रकमा, माझ्या भोळ्या सांबाला.'

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

शुचि's picture

11 Feb 2010 - 9:46 pm | शुचि

मजूर बाई च्या दैनंदिनीतील एक दिवस. चांगली आहे कल्पना.

>>२ रुपायाच्या इड्या आन १ रुपायाचं फुटान>>>>
फुटाणे चखना म्हणून असावेत.

हा प्रयोग आवडला.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मीनल's picture

12 Feb 2010 - 4:05 am | मीनल

अरे व्वा. म्या बी लिवते हाय येका `रखमे`वर.
पन इश्टोरी शेम नाय बगा.
टाकेनच बिगी बिगी मिपावर.
कस्स?
मीनल.

मदनबाण's picture

12 Feb 2010 - 8:31 am | मदनबाण

काही लोकांच अख्ख आयुष्य दुसर्‍यांची घर बांधण्यात निघुन जात...पण स्वतःच असं घर मात्र कधीच होत नाही. :(
दफो छान लिहल आहेस रे...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 9:43 am | विसोबा खेचर

रखमाचा दिनक्रम शब्दबद्ध करायची कल्पना मस्तच!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Feb 2010 - 11:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रखमाचा दिनक्रम शब्दबद्ध करायची कल्पना मस्तच!

क्रान्ति's picture

12 Feb 2010 - 11:37 am | क्रान्ति

अगदी सही लिहिलंय. :)

क्रान्ति
अग्निसखा

प्रकाश घाटपांडे's picture

12 Feb 2010 - 11:50 am | प्रकाश घाटपांडे

दैनंदिन क्रम अगदी वास्तवस्पर्शी
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.