जोशीबाई

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
11 Feb 2010 - 12:44 pm

सर्वात वरच्या मजल्यावरच्या कोपर्‍यातल्या आठवीच्या वर्गात आम्ही वाट पाहत होतो, आता कोण येणार तासाला? जोशीबाई जिना चढताना दिसल्यावरच एकच गलका सुरु झाला,
" बाई.. गोष्ट, बाई गोष्ट.."
" अरे, अरे मला वर्गात तरी येऊ द्याल की नाही?"
"परवाच्या ऑफ तासाला अर्धवट राहिलेली कार्व्हरची गोष्ट आधी पूर्ण करा, मग अभ्यास..."
बाई हसतच बरं म्हणाल्या आणि धडा शिकवायचे बाजूला ठेवून कार्व्हरचा अनोखा जीवन झगडा विलक्षण प्रभावीपणे सांगू लागल्या ...

साधारण सव्वापाच फुटाच्या आसपास उंची, शेलाटा बांधा आणि शांत,सात्विक चेहरा! बाईंना आवाज चढवून बोलताना कधी पाहिले नव्हते, तशी त्यांना गरजही लागत नसावी. अगदी अव्वल नंबरी कार्ट्यांनाही बाईंबद्दल अतीव आदरच होता. त्या आम्हाला शिकवायला कधी येणार ह्याची सारेजण वाट पाहत होतो आणि त्या आठवीपासून आम्हाला मराठी शिकवणार म्हटल्यावर आम्ही सारेच फार आनंदलो होतो कारण आतापर्यंत बाईंची ओळख आम्हाला पर्यवेक्षिका म्हणून होती.. एकदोनदा खूप शिक्षक आले नव्हते तेव्हा आमच्या वर्गात येऊन बाईंनी ग्रंथालयातली गोष्टीची पुस्तके वाचायला दिली होती आणि पुढच्या वेळी कोणी काय वाचले, काय आवडले हे सुध्दा विचारले होते. शनिवारी शाळा सुटल्यावर तासभर वाचलेल्या चांगल्या पुस्तकांवर बाई बोलतात असे ६वी, ७वीत असताना समजले होते. त्यावेळी मराठी साहित्य, मराठी वाङ्मय वगैरे शब्दसुध्दा माहित नव्हते पण छान गोष्टी ऐकायला मिळतील ह्या नादात आम्ही काहीजण एका शनिवारी थांबलो आणि थांबतच राहिलो. मराठी वाङ्मय मंडळाचे अ‍ॅक्टिव्ह सदस्य आम्ही कधी झालो ते कळलेच नाही. अ‍ॅन फ्रँकची डायरी बाईंनीच आम्हाला दाखवली. कार्व्हर, अलबर्ट श्वाइटझर,लिंकनशी ओळख बाईंनी करुन दिली आणि आणि पुलंच्या गटणे, अंतूबर्वा, नारायणाशीही मैत्री बाईंनीच करवली.

आठवीच्या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच त्यांनी वहीच्या मागच्या दोन पानांवर काही कॉलम्स करायला सांगितले. त्यात धड्याचे /कवितेचे नाव त्याचा लेखक/कवी ,त्याचे टोपणनाव,तो उतारा/कविता कोणत्या पुस्तकातली आहे, ह्या साहित्याचा/काव्याचा वाङ्मय प्रकार कोणता अशी सारी माहिती प्रत्येक नव्या धड्याच्या सुरुवातीला त्या सांगत आणि आम्हाला त्यात भरायला लावत, नंतर नंतर त्या आम्हाला ती माहिती शोधायला लावत. आवडलेला धडा किवा कविता कोणत्या पुस्तकातली आहे ते आपसूकच कळत असे आणि ते पुस्तक मिळवून वाचण्याची ओढ लागे.बाईंनी दहावीपर्यंत आम्हाला मराठी शिकवलं, नुसतं टेक्टबुक नाही तर मराठीशी, मराठी साहित्याशी ,कवितेशी आमची मैत्री करुन दिली. मला आठवत आहे नववीत असताना आमच्या वर्गातल्या ८/१० मुलांचा एक असे गट करुन प्रत्येक गटाला बाईंनी एकेक साहित्यप्रकार दिला आणि त्यावर निबंध लिहवून घेतले आणि त्याचे हस्तलिखित तयार करायला लावले. त्या हस्तलिखिताला साजेसे नावही आम्हीच शोधायचे होते. आमच्या वर्गाची अशी ५/६ हस्तलिखिते झाली. मग वर्गातच बाईंनी त्याचे प्रकाशनही केले आणि सगळ्या पुस्तिका वाचून त्यातल्या उत्तम लेखांना आणि सर्वोत्तम पुस्तिकेला बाईंनी बक्षिसही दिले.

वर्षासहलीच्या खर्‍या मजेची ओळख बाईंनीच आम्हाला करुन दिली. येऊरच्या जंगलात पावसाच्या कवितांनी बाईंनी श्रावण उभा केला होता. आमच्या दहावीच्या वर्गाची मेच्या सुटीत आम्ही ट्रीप काढायचे ठरवले तेव्हा जोशीबाई आवर्जून आमच्याबरोबर येऊरच्या जंगलात आल्या. त्यांच्या कवितावाचनाने आणि गुप्तेबाईंच्या गाण्यामुळे सुंदर झालेली ती सहल आज इतक्या वर्षांनतरही मनाच्या खूप जवळ आहे. शाळेच्या १५ ऑगस्टच्या गौरवसमारंभाच्या कार्यक्रमाकरता एखादी थीम घेऊन त्याची संहिता जोशीबाई किवा साठेबाई स्वतः लिहित आणि मग त्या दोघी आणि गोडबोलेबाई तो कार्यक्रम उत्कृष्ठरीत्या बसवत असत. बाईंनी लिहिलेला 'ज्ञानाचे मानदंड!' आज २५ वर्ष झाली तरी मनात ताजा आहे. कार्यक्रमाच्या तालमीसाठी बाईंच्या घरी आम्ही जात असू. अंगणातले लगडलेले रायआवळ्याचे झाड खुणावत असे पण बाईंना न विचारता आवळे वेचायचे धाडस आदरापोटी होत नसे, खरं तर बाईंना कधीच रागवतानाच काय पण आवाज चढवून बोलतानाही पाहिले नाही. अतिशय मृदू, ऋजु तरीही ठाम बोलत असत त्या! तालमीच्या ब्रेकमध्ये मग बाईच म्हणत, जा आवळे हवेत ना, घेऊन या जा.. मग काय? पर्वणीच असायची. त्यांचे 'साद देती हिमशिखरे'.. ऐकताना अभिवाचन कसे असावे, कसे करावे याचे वस्तुपाठच मिळत होते. एका टिळकपुण्यतिथीला बाईंनी नेहमीच्या 'टिळककथा' आणि भाषणबाजीला छेद देत एक नवा प्रयोग केला. लो.टिळकांच्या काही ग्रंथ,पुस्तकातले निवडक उतारे आम्हा काहीजणांकडून वाचून घेतले होते आणि नंतर चांगले वाचन केले म्हणून कॅडबरीही बक्षिस दिली त्या कॅडबरीचं अप्रूप आज ढिगानी उपलब्ध असणार्‍या चॉकलेटात कुठून असणार?

व्याकरणासारखा रुक्ष विषयही बाई किती रसाळपणे आणि सोपी,सोपी लक्षात राहण्यासारखी उदा. देऊन शिकवत. व्याकरणासाठी त्यांनी आम्हाला आठवी पासून दहावीपर्यंत एकच वही ठेवायला सांगितली होती आणि ती वही पुढेही जपून ठेवा असं सांगितलं होतं. समास, शब्दालंकार,अक्षरगणवृतांची अगदी लक्षात राहतील अशी उदाहरणे त्या देत. त्यामुळेच 'ताताजगागा गणी इंद्रवज्रा' किवा 'मंदाक्रांता वृत्त हे मंद चाले'.. हे आजही लक्षात आहे. एम ए चा अभ्यास करतानाही 'त्या' जपून ठेवलेल्या वहीचा उपयोग झाला हे विशेष! बहुतांश मुलं दहावीनंतर विज्ञान शाखा घेतात आणि भाषेपासून, लिहिण्यापासून दुरावतात असे त्यांना वाटे. जेव्हा बी.एस्सी नंतर मी एम. ए. केले आणि त्याचे पेढे द्यायला आवर्जून बाईंकडे गेले तेव्हा त्यांना खूप बरं वाटलं.

संक्रातीला तिळगूळ द्यायला बाईंकडे गेलं की आशीर्वादाबरोबरच त्यांनी आता नवीन काय वाचलं आणि त्यात काय आवडलं ते ही ऐकायला मिळायचं आणि त्याचबरोबर तू काय नवीन वाचलंस, लिहिलंस हा प्रश्नही! बाई जेव्हा मुख्याध्यापिका झाल्या तेव्हाही त्यांना भेटायला आवर्जून गेले होते. आमच्या शाळेच्या अमृतमहोत्सवात बाई भेटल्या होत्या पण नंतर ठाण्याबाहेर आणि मग देशाबाहेर गेल्यावर बाईंशी भेटी जवळ जवळ थांबल्याच !
बाईंना खूप दिवसात भेटलो नाही, एकदा वेळ घेऊन जायला हवं, नवीन लिहिलेलं,वाचलेलं बाईंशी शेअर करायला हवं.. बाईंना खूप बरं वाटेल. मित्रमंडळींकडून बाई आजारी असल्याचं समजलं तेव्हा तर असं फारच वाटलं.
आणि एक दिवस समजलं की 'जोशीबाई गेल्या..'
सुन्न व्हायला झालं. ह्या भारतभेटीत बाईंकडे जाऊ, नवीन लिहिलं, वाचलेलं बोलू.. असं मनात म्हणत होते ते आता अधुरंच राहिलं ह्याची रुखरुख आहे.

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

11 Feb 2010 - 12:50 pm | मदनबाण

प्रकटन फार आवडल्...शाळेचे रम्य दिवस परत आठवले. आमच्या शाळेतले बरेच शिक्षक सुद्धा आठवले...
विशेष म्हणजे चोपडे सर आठवले,कधी टाळक्यात केमिकल लोचा झाला तर त्यांच्यावर नक्की लिहीन.

(नेहमीच इध्यार्थी)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

नंदन's picture

11 Feb 2010 - 12:52 pm | नंदन

लेख. मराठी आणि संस्कृत समरसून शिकवून त्यांची गोडी लावणार्‍या शाळेतल्या भांगे मॅडम आठवल्या.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शुचि's picture

11 Feb 2010 - 4:41 pm | शुचि

वा सकाळची सुरुवात इतक्या छान लेखानी झाली :)
स्वाती फार सुन्दर लिहीता तुम्ही.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

स्वाती२'s picture

11 Feb 2010 - 4:48 pm | स्वाती२

खूप आवडले. अशा बाई लाभल्या, भाग्यवान आहात!

मेघवेडा's picture

11 Feb 2010 - 5:48 pm | मेघवेडा

सुंदर.. आवडलं..

आमच्या जोशीबाईंची आठवण झाली!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

क्रान्ति's picture

11 Feb 2010 - 6:53 pm | क्रान्ति

तुझ्या आठवणी शाळेत घेऊन गेल्या! खूपच छान लिहिलंस. :)

क्रान्ति
अग्निसखा

क्रान्ति's picture

11 Feb 2010 - 6:54 pm | क्रान्ति

तुझ्या आठवणी शाळेत घेऊन गेल्या! खूपच छान लिहिलंस. :)

क्रान्ति
अग्निसखा

मनीषा's picture

11 Feb 2010 - 7:38 pm | मनीषा

खूप छान लेख आणि आठवणी ...

रेवती's picture

11 Feb 2010 - 8:05 pm | रेवती

मनापासून लिहिलय बाईंबद्दल!
अश्याच आठवणी असलेले इंग्लीशचे दामले सर यांची आठवण झाली. मी पाचवीत असतानाच ते रिटायरमेंटला आले होते. आताशा शिक्षकांकडे बघून मुलांनी कोणते आदर्श ठेवावेत हे पालकांनाच कळत नाही अश्या वातावरणात जोशीबाईंसारख्या शिक्षकांच्या आठवणी मन ताजं करून जातात.
रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Feb 2010 - 8:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आठवण आणि रुखरूख आवडली.

-दिलीप बिरुटे

लवंगी's picture

11 Feb 2010 - 8:40 pm | लवंगी

तुझ्या आठवणी शाळेत घेऊन गेल्या!

लवंगी's picture

11 Feb 2010 - 8:41 pm | लवंगी

तुझ्या आठवणी शाळेत घेऊन गेल्या!

प्राजु's picture

11 Feb 2010 - 8:42 pm | प्राजु

सुरेख!!
हुपरीकर सरांची आठवण झाली. मराठी आणि संस्कृत शिकवणारे.. हुपरीकर सर शाळेची शान होते आमच्या.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

विकास's picture

12 Feb 2010 - 1:24 am | विकास

छान आठवणी... माझ्यासुद्धा जागा झाल्या.

एकदम शांत, कधीही मुलांवर ओरडणे नाही आणि तरी देखील मुलांना आदरयुक्त प्रेम आपसुक करायला लावणारे हे व्यक्तिमत्व होते.

कधीतरी ६वी, ७वीत असताना त्या off period ला आल्या आणि मुलांना कंटाळा आला म्हणून हिचकॉकची "सायको" ची गोष्ट सांगायला लागल्या. अर्थातच ती पुर्ण झाली नाही. मग जेंव्हा केंव्हा आमचे शिक्षक गैरहजर असत तेंव्हा जोशीबाई येऊन ती गोष्ट पूर्ण करतील याची वाट पहायचो.

अगदी अव्वल नंबरी कार्ट्यांनाही बाईंबद्दल अतीव आदरच होता.

हे नक्की कुणाला उद्देशून लिहीत आहेस? ;) बाकी तुझ्या वरील वाक्याशी माझा संबंध नाही :-). पण त्यामुळे माझी एक विशेष व्यक्तीगत आठवण जागी झाली: एकदा एका वर्गात एक नवीन शिक्षिका आल्या. कदाचीत त्यांची शिक्षकीपेशाची नवीन सुरवात असेल अथवा टेन्शन आले असेल, काही कारण असेल पण सुरवातीस काहीतरी गडबड झाल्याने, मुले गोंधळ घालू लागली. त्यांनी त्यात मला अचानक फारच गडबड्या (याहून कडक शब्दात) म्हणत माझी अक्षरशः निर्भत्सना केली. आता गुरूचे वाक्य खोटे कसे ठरवायचे? म्हणून मी देखील त्या जे काही म्हणाल्या ते खरे करायचा निश्चय केला आणि आमलात आणू लागलो. :-) काही दिवसांनी जोशी बाईंनी तास संपल्यावर मला बाहेर बोलावले (वास्तवीक त्या आमच्या वर्गशिक्षिकाही नव्हत्या) आणि प्रेमाने विचारले की, "अरे सध्या टिचर्सरूम मधे सारखे तुझेच नाव चर्चेस येते? तुझ्याकडून अशी कधीच वागणे झाले नाही आणि अपेक्षाही नाही, मग असे का वागतोयस"? मग म्हणले, "मला (उगाच) जसे म्हणले (ठरवले) गेले, तसे मी असू शकतो हे दाखवून देत आहे". त्या मनमोकळेपणाने हसल्या. "अरे ती अजून नवीन आहे, नवखी आहे, असे वागणे बरोबर नाही. सोडून दे असा राग..." केवळ इतके प्रेमाने आणि हक्काने म्हणले म्हणल्याबरोबर मला अजून पटवावे लागले नाही. काही दिवसांनी परत बाजूला येऊन त्यांनी माझ्या वागण्यातील फरक टिचर्स रूम मधे "acknowledge" झाल्याचे सांगितले. ;)

"It takes a village to raise a child" अशी जी म्हण आहे त्यात शाळेचे महत्व खूप असते. केवळ अभ्यास आणि अभ्यासूवृत्तीच नाही तर अवांतर गोष्टी (extracurricular activities), अवांतर पाठांतर/वाचन आणि "सोशल स्कील्स"चे संस्कार शाळा करत असते. आज मागे वळून पाहताना आपण त्यातील बरेच काही त्या काळात आणि वयात नकळत शिकलो असे वाटत राहते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

भानस's picture

12 Feb 2010 - 5:31 am | भानस

स्वाती, प्रकटन आवडले.

विसोबा खेचर's picture

12 Feb 2010 - 8:08 am | विसोबा खेचर

बाईंना खूप दिवसात भेटलो नाही, एकदा वेळ घेऊन जायला हवं, नवीन लिहिलेलं,वाचलेलं बाईंशी शेअर करायला हवं.. बाईंना खूप बरं वाटेल. मित्रमंडळींकडून बाई आजारी असल्याचं समजलं तेव्हा तर असं फारच वाटलं.
आणि एक दिवस समजलं की 'जोशीबाई गेल्या..'
सुन्न व्हायला झालं. ह्या भारतभेटीत बाईंकडे जाऊ, नवीन लिहिलं, वाचलेलं बोलू.. असं मनात म्हणत होते ते आता अधुरंच राहिलं ह्याची रुखरुख आहे.

सुंदर व्यक्तिचित्रण, सुरेख लेखन..!

तात्या.

प्रमोद देव's picture

12 Feb 2010 - 9:05 am | प्रमोद देव

सुंदर लेखन.
स्वाती बरेच दिवसांनी दिसलीस.
पुनरागमन अगदी झोकात.

अवांतर: विकास ह्यांचा अनुभवही आवडला.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

चित्रा's picture

12 Feb 2010 - 9:32 am | चित्रा

जोशीबाईंचे नाव ऐकलेले आहे, लेख आवडला.

स्वाती दिनेश's picture

15 Feb 2010 - 10:24 pm | स्वाती दिनेश

प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्‍यात अशा एक जोशीबाई असतातच, ह्या लेखाच्या निमित्ताने त्या बर्‍याच जणांना आठवल्या, धन्यवाद.
स्वाती

चतुरंग's picture

16 Feb 2010 - 12:36 am | चतुरंग

ज्या जोशीबाईंना कधी बघितलंही नाही त्या माझ्याच बाई वाटायला लागल्या हेच त्या व्यक्तिरेखेचं यश! खूप दिवसांनी लिहिलंस स्वातीताई, छान वाटलं वाचून.
तीळगूळ द्यायला गेलं की तोंडावरुन हात फिरवून, कानशिलावर बोटं मोडून, तोंड भरुन हसत "ये रे ये! किती मोठा झालास! कसा आहेस बाळा? हा घे खाऊ." म्हणत हातावर वडी ठेवणार्‍या आणि निरोप घेऊन निघताना "पुन्हा आलास की असले तर भेटू. माझ्या विठूला काळजी!" असं म्हणून आशीर्वाद देणार्‍या रसाळबाई आठवल्या आणि डोळे भरुन आले!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

16 Feb 2010 - 12:53 am | विसोबा खेचर

तीळगूळ द्यायला गेलं की तोंडावरुन हात फिरवून, कानशिलावर बोटं मोडून, तोंड भरुन हसत "ये रे ये! किती मोठा झालास! कसा आहेस बाळा? हा घे खाऊ." म्हणत हातावर वडी ठेवणार्‍या आणि निरोप घेऊन निघताना "पुन्हा आलास की असले तर भेटू. माझ्या विठूला काळजी!" असं म्हणून आशीर्वाद देणार्‍या रसाळबाई आठवल्या आणि डोळे भरुन आले!

!!!

तात्या.