आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

नीधप's picture
नीधप in जनातलं, मनातलं
10 Feb 2010 - 9:12 am

हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं.

शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्‍या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात...

गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या. आणि गेल्या ५ वर्षांपासून मला हा उपरीनिर्दिष्ट (म्हणजे वरती लिहिलेला..) प्रकार अनुभवास येऊ लागलाय.

त्याचं झालं असं. एका संकेतस्थळावर थोडीशी ओळख झालेला एक इसम मला मेल करून कामासंबंधात काही बोलायचं आहे असं तस्मात भेटूया असं म्हणू लागला. भर दुपारी अति गर्दीच्या लॉ कॉलेज रोडवर भरपूर गजबजलेल्या एका हाटीलात कॉफी प्यायचं ठरलं. भेटल्यावर बोलणं झालं त्याचा गोषवारा असा की सदरहू इसम हा ५ वर्ष तांत्रिक क्षेत्रात नोकरी करून नुकतेच अमेरीकेतून परतला आहे. तो कालिजात असताना त्याने कधीतरी एकांकिकेत काम केलं होतं. त्यामुळे आपण उत्तम अभिनेता असल्याची त्याची खात्री आहे. या बळावर त्याने अभिनयक्षेत्रात पाय रोवायचं ठरवून अनेक नटोत्तमांना धक्का देण्याचे योजिले आहे. हे कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याला माझ्या मदतीची म्हणजे माझ्या ओळखींचा धागा पकडून संधी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. माझ्या खिशात काही त्यावेळेला त्याला अपेक्षित असलेली संधी नव्हती. आणि त्याच्या अभिनयकर्तुत्वाबद्दल, गुणवत्तेबद्दल त्याने केलेली स्वस्तुती यापलिकडे काही माहीतीही नव्हती. मी पडले स्पष्टवक्ती. प्रांजळपणे ते सांगितलं. आणि वर हेही सांगितलं की मला लक्षात यावं आणि तुझं वर्कशॉप व्हावं या दृष्टीने तू माझ्या प्रायोगिक नाटकाच्या वर्कशॉपमधे सामील हो. बरं वाटलं तर काम कर. पुढचं पुढे. भवती न भवती करत तो सामील झाला. पण इथे नुसतंच शिकायला लागतंय, अभिनयाची लुसलुशीत संधी मिळत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने मलाच अनेक विशेषणे देऊन येणे बंद केले. पण त्याची नाराजी मात्र सार्वजनिक संकेतस्थळावर ते दर्शवत राह्यला.

याच आसपास दुसर्‍या एका ताईंची पण श्येम टू श्येम केस झाली. एकेकाळी कालिजात किंवा तत्सम कुठेतरी केलेला अभिनय मग सॉफ्टवेअरमधली नोकरी मग अचानक आपल्या क्रिएटिव्ह बाजूचा साक्षात्कार आणि मग मला संधी द्या अशी मेल. कामांमुळे मला लगेच उत्तर द्यायला जमले नाही तर ज्या संकेतस्थळावरून माझ्याशी संपर्क साधला तिथेच चव्हाट्यावर 'काय हे अजून उत्तर पण दिले नाही?' असा जाब मागणे. मग कधीतरी नंतर मी त्यांना भेटायला बोलावणे. ताईंकडून काही वाचून घेणे. वाचल्यावर खूप वर्षं झालीयेत आणि गंज काढायला हवा याची मला खात्री पटणे. ते मी प्रांजळपणे सांगणे आणि गंज काढायला मदत करायची तयारी दाखवणे. मग ताईंचे गायब होणे. आणि संकेतस्थळांवर अधून मधून माझ्यावर राग काढणे इत्यादी ओघाने आलंच...

अश्या तर्‍हेने माझा महत्वाच्या जागी बसलेला व्हिलन होऊन गेला.

अजूनही विविध पद्धतीने अभिनयाचे काम मागणार्‍यांच्या मेल्स थडकत असतात. आणि दर वेळेला या लोकांचं कौतुक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे. अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय, कधी काळी थोडसं काम केलंय असं हे लोक म्हणतात. हे प्रशिक्षण वा अनुभव महिन्या दोन महिन्याचं नाट्यशिबीर किंवा एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली एखादं नाटक इतपतच असतो. अशी कोणे एके काळी घातलेली अभिनयाची पाटी अचानक उठून अभिनयक्षेत्रात व्यावसायिक पातळीवर उतरण्यासाठी कशी काय पुरेशी वाटू शकते हा प्रश्न मला दर वेळेला पडतो. बर कुठलीतरी जेमतेम तोंडओळख पकडून असा इमेल करायचा आणि एवढ्याश्या ओळखीवर/ माहीतीवर मी अभिनयाचं काम द्यावं अशी अपेक्षा बाळगायची हेही अचाट आणि अतर्क्यच. नाही का?

या लोकांचा संकेतस्थळांवरचा आयडी मला माहीत असतो. त्यापलिकडे फारशी काही माहीती नसते. त्या व्यक्तीचा अभिनय कधी बघितलेला नसतो. त्या व्यक्तीचा चेहरा मला माहीत नसतो. हो इथे चेहराही महत्वाचा असतो. ठराविक प्रकारच्या व्यक्तिरेखेला ठराविक प्रकारचाच चेहरा उपयोगाचा ठरतो. तो मला माहीत नसतो. मग मी संधी द्यायची, शब्द टाकायचा तो तरी कुठल्या बळावर? आणि का?

बर कदाचित ह्यातले काही अजून प्रकाशात न आलेले नटोत्तम असू शकतात पण ते मला कळण्यासाठी या सगळ्यांना मी भेटले पाहीजे आणि त्यांची अभिनयाची परिक्षा घेतली पाहीजे आणि मग संधीच्या दिशेने त्यांना वळवले पाहिजे. पण मी हे करत बसले तर माझं काम कधी करू? ही समाजसेवा करून पोट नाही भरत माझं. आणि काही उत्तम असू शकतात पण अनेक दगड निघणारच हे तर आहेच मग त्यांना नकार दिल्यावर त्यांना जो राग बिग येतो त्याचं काय? आणि तसंही संधी बिंधी देणारी मी कोण?मी अभिनयाचे क्लासेस काढलेले नाहीत. मी मॉडेल कॉऑर्डिनेटर नाही. मी कुठेही कास्टींग डिरेक्टर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे अभिनयाची संधी या विषयात माझा उपयोग नाही.

प्रत्येक प्रकारचं काम मिळवण्याचा एक योग्य तो मार्ग असतो. अभिनयाच्या बाबतीत तो मार्ग आधी योग्य प्रशिक्षण आणि मग मॉडेल कॉऑर्डिनेटर्सच्या अल्बममधून जातो.

प्रशिक्षण हे कुठल्या ना कुठल्या पातळीवर गरजेचेच असते. मग ते राष्ट्रीय नाट्य विद्यालय, पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठाची अकादमी ऑफ थिएटर आर्टस, गोवा कला अकादमी असं काही असू शकतं किंवा याच संस्थांशी संलग्न अशी शिबीरे असू शकतात किंवा रोशन तनेजा, अनुपम खेर अश्यांच्या अभिनय शिकवणार्‍या संस्था असू शकतात किंवा दुबेजी नावाची एक संस्थेवत व्यक्ती असू शकते किंवा मग एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटक करत करत शिकत जाणे असू शकते. काही असले तरी शिकण्याला पर्याय नाहीच. हे शिकणं नुसतं शिकवलं ते गिरवलं स्वरूपाचं असून चालत नाही. आधी भरपूर गिरवणं, अगदी कंटाळा येईतो गिरवणं आणि मग आपल्या बुद्धीने गिरवण्यात भर घालत जाणं हे महत्वाचं असतं. वर यादी केलेल्या प्रत्येक संस्थांमधे चांगलंच प्रशिक्षण दिलं जातं. पण तरी प्रत्येक संस्थांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्यात उत्तम नट असतात तसेच दगडही असतातच की. जे काहीच घेत नाहीत, त्यांच्या आत काहीच पोचत नाही, झिरपत नाही. अर्थात असं असलं तरी प्रशिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान मेहनत हे गरजेचंच.

यानंतर मुद्दा येतो फोटोंचा. चेहरा बघूनच तुम्हाला स्क्रीनटेस्टला बोलवायचं का नाही हा विचार केला जातो. यात अपमानास्पद वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही दृकश्राव्य माध्यमात काम करू बघत असता तेव्हा तुमचं दिसणंही महत्वाचं असतंच. चांगलं वाईट, सुंदर कुरूप यापेक्षा तुमचा चेहरा आणि तुमची शरीरयष्टी व्यक्तिरेखेला अनुरूप असणं नसणं हे महत्वाचं असतं. चेहरा आणि शरीर हेच नटाचं साधन किंवा माध्यम असल्यामुळे ते नीट राखणं, व्यसनांनी, चुकीच्या सवयींनी शरीराची वाट न लावून घेणं हे नटासाठी महत्वाचं असतं. आणि मग त्या राखलेल्या चेहर्‍याचे फोटो काढून घेणं हे पण महत्वाचंच.

अनेक नवीन नटमंडळी वेगवेगळ्या गेटप्समधे, वेगवेगळ्या स्टाइल्समधे फोटो काढून घेत असतात. पण तुम्ही नवीन आहात, तुमचा चेहरा फारसा माहीत नाहीये आणि तुम्ही अमुक लुक तमुक लुक करत उत्तम फोटोग्राफरकडून भरपूर फोटो काढून घेतलेत तर ते फोटो म्हणून उत्तम होतीलच यात काही वाद नाही. पण ते तुमचा चेहरा, तुमचं व्यक्तिमत्व यांची ओळख करून द्यायला उणे पडायला नको हे महत्वाचे.

आता हे फोटो काढून घरी ठेवून द्यायचे नाहीत. चित्रपट, टिव्ही आणि जाहीराती इथल्या संधी शोधण्यासाठी मॉडेल कॉऑर्डिनेटरकडे जाऊन ते फोटो आणि रेझ्युमे देऊन स्वतःचे नाव नोंदवून यायचे. ते फोटो त्यांच्या अल्बममधे लागतात. विविध ठिकाणी कास्टिंग ( धातूचे नव्हे... पात्रनियोजन)च्या वेळेला हे अल्बम्स बघून त्यातून निवडून स्क्रीनटेस्टला बोलावलं जातं.

नाटकामधे रस असेल तर वेगवेगळ्या नाटकाच्या ग्रुप्समधे काम करत रहायचं. हौशी, समांतर आणि व्यावसायिक अश्या पातळ्या यात येतात. पहिल्या दोन पातळ्यांवर काम करत असताना तुमच्यातल्या मेहनत करायच्या क्षमतेचा कस लागतो. अभिनयाची संधी मिळाली तर अभिनयाचाही कस लागतो. व्यावसायिकमधे सततच्या फिरतीवर राहूनही आरोग्य सांभाळणे आणि सगळ्या परिस्थितींमधेही उत्तम परफॉर्मन्स देणे याची सवय होऊन जाते.

दुबेजींच्या वर्कशॉपच्या आधी दुबेजी काही उतारे साधे सरळ पाठ करून यायला सांगतात. त्यातल्या एका उतार्‍यात असतं 'आज हिंदुस्थानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है. --------- अ‍ॅक्टर बननेके लिये सरींडर चाहीये.. ----- अ‍ॅक्टर बननेके लिये मेहनत करनी पडती है. --- प्रतिभाका होना भी बहोत जरूरी है --- लक, लक की भी जरूरत पडती है.... ' अश्या तर्‍हेचा हा पानभर उतारा घोकत दुबेजींनी सांगितल्याप्रमाणे पावलं मोजत, फोकस हलू न देता सगळे हलत असतात. अधून मधून दुबेजी मस्त ओरडत असतात. प्रतिभा आणि नशीबाचं त्यांच्या त्यांच्यावर सोडून देऊन सरींडरचे, मेहनतीचे वळसे देत असतात. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेला हळूहळू या अभिनयाच्या धंद्यात स्थिरावतोच.

सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात. इमेल करायचा त्याला आधी उगाचच मोठेपण आणि मग व्हिलनपण देऊन...

- नी

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Feb 2010 - 9:35 am | विसोबा खेचर

सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात.

लाख रुपये की बात!

आज अभिनय काय, संगीत काय, यांसारख्या फाईन आर्टस् मध्ये अनेकांना इन्स्टंट संधी आणि यश हवे असते. परंतु त्याकरता किती अपार जिद्द लागते, अखंड मेहनत, कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव फार कमी असते. या मंडळींना वर वर पाहता या गोष्टी अतिशय सोप्या आणि केवळ वशिलेबाजीने होणार्‍या वाटत असतात याची गंमत वाटते!

अतिशय सुंदर लेख..

तात्या.

शुचि's picture

10 Feb 2010 - 9:52 am | शुचि

या लेखात अभिनय क्षेत्रातील अनेक पैलूंचा आढावा लीलया घेतला आहे. अतिशय महीतीपूर्ण लेख. मला फार अवडला.

>>आधी भरपूर गिरवणं, अगदी कंटाळा येईतो गिरवणं आणि मग आपल्या बुद्धीने गिरवण्यात भर घालत जाणं हे महत्वाचं असत>>>

वा कमाल केलीत!!! हॅटस ऑफ!!

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

विंजिनेर's picture

10 Feb 2010 - 11:02 am | विंजिनेर

वा! लेख आवडला.
कुठल्याही क्षेत्रात जाणकारी मिळवायची तर कष्ट करावेच लागतात. त्यात नवीन काहिच नाही आणि अभिनय-क्षेत्र सुद्धा त्याला अपवाद नाही.
पण बहुदा इतर क्षेत्रात नाव कमावलेले प्रतितयश लोक अभिनयात येऊ बघतात ते पूर्वीच्या तळमळीने/शिकाऊ वृत्तीने उतरत नसावेत (किंवा "मला "ते" जमलं तर अभिनय काय चीज आहे? असं म्हणून शॉर्टकट घेऊ बघत असावेत) असं तर होत नसाव?

योगी९००'s picture

10 Feb 2010 - 11:02 am | योगी९००

मस्त मस्त मस्त...

सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात.

एकदम बरोबर....भरमसाट झालेल्या Reality Shows चा परिणाम.. प्रत्येकाला "पी हळद आणि हो गोरी" अशा पद्धतीने म्हणजे instanst यश हवे असते.

पण काही गुणी व्यक्ती recommendation च्या अभावी मागे पडतात हे ही तितकेच खरे...

(मी सुद्धा छान अभिनय करतो. बर्‍याच वेळा मला अभिनयात पारितोषिक मिळाले आहे (उत्तेजनार्थ का असेना..))

खादाडमाऊ

प्रभो's picture

10 Feb 2010 - 11:03 am | प्रभो

तुमच्या ब्लॉगवर आधीच वाचला होता.... परत आवडला.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

स्वाती२'s picture

10 Feb 2010 - 8:48 pm | स्वाती२

+१

टारझन's picture

11 Feb 2010 - 12:18 pm | टारझन

सर्व "रंगकर्मीं"नी वाचावा असा लेख ;)

असो बदलीन :)

स्वाती दिनेश's picture

10 Feb 2010 - 1:10 pm | स्वाती दिनेश

सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात.
अगदी.. पटले.
लेख आवडला हे वेसांनल.
स्वाती

नीधप's picture

10 Feb 2010 - 1:43 pm | नीधप

धन्स सगळे...
अश्याच आलेल्या एका मेलमुळे वैतागून लेख लिहायला घेतला. पहिले दोन किस्से लिहील्यावर लक्षात आलं की हे नुसतंच वाफेला वाट करून देणं झालंय मग काय करायला पाहीजे हे जेवढं माझ्या अकलेला कळत होतं तेही लिहिलं..
:)
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

ज्ञानेश...'s picture

10 Feb 2010 - 4:27 pm | ज्ञानेश...

तुमचा ई मेल आयडी मिळेल का हो? :?

(होतकरू अभिनेता B) )
-ज्ञानेश.

भडकमकर मास्तर's picture

10 Feb 2010 - 5:19 pm | भडकमकर मास्तर

सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात.

तुम्ही अशा लोकांना भेटता , त्यांना आलेला राग वगैरे सहन करता ...??? तुमच्या पेशंसची कमाल वाटते.

अजून एक गंमत म्हणजे ऑर्कुटवरच्या नाटक कम्युनिट्यांमध्ये ५० % टॉपिक हे मी अमुक नाटक करत आहे आणि कलाकार हवे आहेत, असले काहीतरी असतात. ...
आता ऑर्कुटवर अभिनेते मागवून कसे मिळणार आणि या जगाभरातल्या कट्ट्यावरती त्याच्याच गावात उपलब्ध होणारे अनेक आणि चांगले अभिनेते कसे मिळणार, असले प्रश्न या तथाकथित दिग्दर्शकांना काही पडत नाहीत....
असले टॉपिक सुरूच राहतात...
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

नीधप's picture

10 Feb 2010 - 5:32 pm | नीधप

तुम्ही अशा लोकांना भेटता , त्यांना आलेला राग वगैरे सहन करता ...??? तुमच्या पेशंसची कमाल वाटते.<<
मलापण वाटायची... :)
आता नाही भेटत..

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

10 Feb 2010 - 5:22 pm | प्रकाश घाटपांडे

असाच एक मानुस पुण्यातील अनेक सभांमदी येत असतो. चेहर्‍यानी थोडीफार वळख. अनेक मोठ्या मोठ्या लोकांसमवेत नवीन नवीन फोटु / बातम्या दाखवायचा. यकदा डायरेक व्हाईट हाउस ची मेल दाखवली. नंतर अशीच काही गोष्टी.
यकदा म्हन्ला राष्ट्रपतीना सांगितलय कि राज्यसभेच तिकीट आपल्याला पाहिजे. सामान्य मानुस का नाई राज्यसभेत खासदार होउ शकत? मला डॉ श्रीकांत जोशींचे मनोविकाराचा मागोवा पुस्तक आठवले. त्याला म्हनल तुमच म्हन्न बरोबर आहे पन राज्यसभेला लई लोकांचे नंबर पेंडिंग हायेत. कुमार केतकर बी हायेत. तुमचा नंबर कवा लागनार? त्यांनी माझ्याकड अस पाहिल कि मी जनु व्हीलनच हाये. शुब बोल रे नार्‍या सारखी गत झाली.
बाकी लेख उत्तम! आमाला अभिनय कशाशी खातात हे माहित नाई याचा आनंद झाला. कालच काटकोन त्रिकोण हे नाटक पाहिले. त्यात मोहन आगाशे यांचा अभिनय खुप आवडला. नाटकच जाम आवडल.डॉ विवेक बेळे यांनी लेखन दिग्दर्शन व भुमिका केली होती.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2010 - 6:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला...! आपली कारकीर्द कमी वेळात घडावी असे स्वप्न अनेकांना पडतात आणि स्वप्न प पाहणे काही गैर नाही. मेहनत आणि सारखं शिकायचं तरी किती दिवस, असे वाटून आपल्या भावना ते सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करीत असावे. पण, त्यांना अधिक प्रेमानं आणि जवाबदारीनं समजून सांगायला हवे असे वाटते. आणि नेमका आपला स्पष्ट असलेला स्वभाव अनेकांना अहंकारी आणि खडूस वाटू शकतो.

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Feb 2010 - 7:10 pm | बिपिन कार्यकर्ते

पण कमीतकमी या क्षेत्रात तरी 'स्टारी आइड' लोक स्वतःचे नुकसान करून घेतात त्यांचे या स्पष्टवक्तेपणामुळे भलेच होत असावे.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

11 Feb 2010 - 1:05 am | चतुरंग

नाही त्या भ्रमात राहून नुकसान होण्यापेक्षा क्षणिक निराशा/राग आला तरी चालेल.
वाईटपणा नको म्हणून भलावण करणार्‍या/फसवणार्‍या लोकांची कमी नाहीये, स्पष्टवक्ते लोक हे बहुदा अप्रियच ठरतात!

चतुरंग

मेघवेडा's picture

10 Feb 2010 - 6:50 pm | मेघवेडा

अतिशय सुंदर लेख! आवडला!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मीनल's picture

10 Feb 2010 - 6:55 pm | मीनल

लेख आवडला.
आजकाल नुसत टिव्हीवर यायला मिळाल तरी तेवढी पुरेस असत काही जाणांना.
श्रम करायची तयारी फारच कमी जणात असते.
अनरिअ‍ॅलिस्टिक एम्स असलेले ही दिसतात.
असो. छान लिहिले आहे.
अनेक अनुभवांचे बोल आहे ते. असणारच वाचनिय!

मीनल.

रेवती's picture

10 Feb 2010 - 7:03 pm | रेवती

खूप छान लेखन!
अभिनयाच्याबाबतीत किंवा कलाकार निवडणूकीत फारश्या कोणत्याही गोष्टींची कल्पना नाहीये त्यामुळे "अरे बापरे!" असं वाटत राहिलं. नाहीतर मला तर आधी वाटायचं की नट नट्यांच्या मुलाखतींमध्ये सांगतात तसं,"निर्माते/दिग्दर्शकांनी मला अमक्या ठिकाणी पाहिलं आणि हाच्/हिच तो/ती अशी त्यांची खात्री पटली."अश्याप्रकारांनी निवड होत असावी किंवा तुमचे आईवडील आधीच या क्षेत्रात काम करणारे असायला हवेत.

रेवती

नीधप's picture

10 Feb 2010 - 7:07 pm | नीधप

,"निर्माते/दिग्दर्शकांनी मला अमक्या ठिकाणी पाहिलं आणि हाच्/हिच तो/ती अशी त्यांची खात्री पटली."अश्याप्रकारांनी निवड होत असावी किंवा तुमचे आईवडील आधीच या क्षेत्रात काम करणारे असायला हवेत. <<
या दोन्हीही शक्यता अमान्य करत नाही मी. पण तो नशिबाचा भाग आहे. आणि केवळ हेच मार्ग नाहीत.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

चतुरंग's picture

11 Feb 2010 - 1:01 am | चतुरंग

स्वप्न आणि वास्तव ह्यातली दरी पार करण्याचे प्रयत्न करताना आपले स्वप्न हे दिवास्वप्न तर नाही ना आणि कदाचित त्यामुळेच अंती टोकाची निराशा पदरी आल्याने ते दु:स्वप्न तर ठरणार नाहीना ह्याची चाचपणी करत रहाणे हे शहाणपणाचे असते.
'अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे' तर आजकालचा सर्वसामान्य स्वभाव झालाय की काय अशी शंका यावी इतपत सर्वदूर पसरलाय!

जिद्द, योग्य दिशेने मेहनत करण्याची तयारी, डोळे उघडे ठेवून शिकण्याची तयारी, कामावरची निष्ठा, गुरुवरची श्रद्धा ह्या गोष्टी तुमचं रॉकेट उंच घेऊन जाणारं इंधन आहेत हे लोक विसरत चालले आहेत.

(इ.पाचवीत एकांकिकेत पाटलाचे काम करुन पहिला नंबर पटकावलेला - नाट्यभूषण ;))चतुरंग

नीधप's picture

11 Feb 2010 - 11:42 am | नीधप

(इ.पाचवीत एकांकिकेत पाटलाचे काम करुन पहिला नंबर पटकावलेला - नाट्यभूषण )चतुरंग<<
पाचवीतल्या बक्षिसावर स्वतःला नाट्यभूषण समजणं हा विनोद काहींच्यासाठी वस्तुस्थिती होतो हं.. :)
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/