गरुडाची मुले

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
4 Feb 2010 - 2:13 pm

आजच्या व्याख्यानात काय सांगायचे हा मी विचारच केला नव्हता.
एका वर्तमानपत्राचा वर्धापनदिन. त्यानी काही पालकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.
निमन्त्रण खरेतर पंधरा दिवसाअगोदरच मिळाले होते. व्याख्यानाला नेहमी तयारीनिशी जातोच असे नाही. बरेचदा काही ठराविक विषयावर बोलायचे असे ठरवून जाऊनही उपस्थित गर्दीचे अ‍ॅव्हरेज वय पाहून विषय बदलावा लागतो असा अनुभव गाठीशी बरेचदा होता.
वर्तमानपत्राचा वर्धापनदिन ..न नक्की कोणकोण बोलावले आहेत याचा अंदाज लावणे कठीण असते. गर्दीत कधी जहिरातदारांची जंत्री असते तर कधी महीलांचीच्.महीला आल्या तर वयोगटनुसार त्यांचे विषय बदलतात.
त्यामुळे यावेळेस काही अगोदर न ठरवताच जायचे असे निश्चीत केले होते.
मी हॉलवर गेलो.उपस्थित गर्दी पाहून नक्की अंदाज येत नव्हता.
आयोजकानी सांगितले की ती सर्व बारावी सायन्स ची मुले आहेत. पालकाना घेऊन आली आहेत.
त्याना काही शंका आहेत. कॉलेज ने काहीदिवस अगोदर या वर्तमानपत्राला त्याबद्दल विचारणा केली होती.वर्धापनदिनानिमीत्त त्यानी हे व्याख्यान आयोजित केले होते.
मुलांनी अभ्यास / स्मरणशक्ती / एकाग्रता याबद्दल काही विचारले. पालकानी नेहमीप्रमाणेच मुले उद्धट वागतात रागीट आहेत वगैरे प्रश्न विचारले.
एक प्रश्न मात्र फारच वेगळा होता. तो त्या मुलाच्या पालकानी विचारला होता आणि मुलानेदेखील विचारला होता.
पालकांचा प्रश्न होता की मुलांचे करीयर काय असावे हे त्याना उमजत नाही
मुलाचा प्रश्न होता की मला काय करायचे आहे ते मला ठरवू देत नाहीत.
दोघांच्याही बाजू बरोबर होत्या.
मी मुलाला विचारले की त्याला जे काही व्ह्यायचे होते त्यातल्या धोक्याच्या/कष्टाच्या बाजूचा त्याने विचार केला होता का?
मुलाचे उत्तर फार मार्मीक होते. सर धोके आणि कष्ट तर प्रत्येक गोष्टीत आहेत्.त्याना कशासाठी घाबरायचे.
पालकाना ते उत्तर फार उद्धट वाटत होते.
पालकांचेसुद्ध एका अर्थाने बरोबर असावे. कारण त्याना स्वतःला जे कष्ट करावे लागले/ आयुष्यात जे निर्णय चुकले त्यामुळे जे भोगावे लागले ते मुलाच्या नशेबी येवू नये असे त्याना वाटत होते.
दोन्ही बाजू बरोबरच होत्या.
कोणाची बाजू बरोबर.
आपल्याला नेहमीच शिकवले जाते की एक बाजू बरोबर असेल तर दुसरी चूकच असते. दोन्ही बाजू बरोबर असू शकतात हे आपण ध्यानातच घेत नाही.
पण इथे प्रश्न एका वेगळ्यामुद्द्याला स्पर्श करत होता.
खलील जिब्रान म्हणतो त्याप्रमाणे मुले ही तुमच्या मार्फत या जगात आली म्हणुन ती तुमच्या मालकीची आहेत असे सम़जू नका. मुलाना तुम्ही तुमची स्वप्ने दाखवू शकता. स्वप्ने देऊ शकत नाही.
मुले ही धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे आहेत. सुटलेल्या बाणावर मालकी हक्क दाखवायचा नसतो.
मी ऐकली एक गोष्ट.
एका कोंबडीला उकीरड्यावर एक अंडे सापडले. ते एका गरूडाचे अंडे होते. कोंबडीने सवयीने सोबतच्या तीनचार अंड्याबरोबरच ते अंडेही उबवले. त्यातून गरुडाचे पिलु बाहेर आले.
ते इतर कोंबडीच्या इतर पिलांप्रमाणेच त्यांच्या सोबत खेळू लागले.
असेच उकीरड्यावर खेळताखेळता त्यांच्यावर एक मोठी सावली पडली. कोंबडीची पिली घाबरली. गरुडाच्या पिलाने वर पाहिले. एक मोठा गरूड पक्षी उडत होता. या पिल्लाला त्याचे फार अप्रूप वाटले. त्याच्या मनात आले . काय तो मोठा पक्षी...काय त्याची ती भरारी.....आपल्याला घेता येईल अशी भरारी....
त्याने कोंबडीला हे बोलूनही दाखवले ती म्हणाली चला रे पिला नो आत चला.....ती सावली गरुडाची आहे. त्याची भरारी त्यालाच जमेल्... कोंबडीला तशी भरारी घेऊन काय उपयोग्...आणि एवढ्याउंचावर जायचे तर खाली पाहिल्यावर घेरीच येईल..... चला रे आत चला
कोंबडीची पिल्ले लपून बसली...गरुडाचे पिलु सुद्धा त्यांच्याबरोबर गेले.....
गरुडाचे पिल्लु असूनही आयुष्यभर कोंबडी म्हणून जगले.....
कधीकधी तरी त्याला त्या गरुडाची आठवण यायची....आणि तसे आपल्याला जमणारच नाही म्हणून ते तो विचार मनातून काढून टाकायचे
क्षमता असूनही गरूडाचे पिल्लु त्याच्या पालकानी सांगितले होते म्हणून कोंबडी म्हणूनच जगले वावरले. आणि कोंबडे म्हणूनच मेले.

समाजविचार

प्रतिक्रिया

शुचि's picture

4 Feb 2010 - 4:13 pm | शुचि

विजुभाऊ, कथा खूप आवडली. पंचतंत्रातील ही गोष्ट नेहेमीच ऐकलेली पण त्यावर असं सुन्दर लिखाण करायची कल्पना कधी सुचली नाही. फार कमी शब्दांत विषय खूप हातोटीने हाताळलेला आहे.

आजही काही वोकेशन्स जशी "मरीन एन्जीनीरींग" टाबू आहेत का तर रिस्क जास्त/ गृहसौख्य कमी. पण दुसरी बाजू ही आहेच की "देशोदेशी फिरल्याने, परक्या लोकांत २४ तास वावरल्याने अनुभवविश्वाची समृद्धता" मिळू शकते. धोके आहेत पण अनुभवांची श्रीमंती देखील आहे.

(एका खलाशाची पत्नी)
शुची
***************
फक्त जीभच अस इन्द्रिय आहे जे की ज्ञानेंद्रिय ही आहे आणि कर्मेंद्रिय ही.

टारझन's picture

4 Feb 2010 - 4:28 pm | टारझन

गुड वन :)

- (विज्ञानाची मुले) टारझन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2010 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभौ, कथा आवडली...!

-दिलीप बिरुटे

मीनल's picture

4 Feb 2010 - 6:36 pm | मीनल

चांगली आहे गोष्ट.
विचार करायला लावला लेखाने.
पण माझ्या अनुभवानुसार आताशा इझी मनी ने जो तो पछाडलेला आहे. बहुतांशे तरूण मुलही कमीत कमी श्रमात मोठ्या यशाची अपेक्षा करताना दिसतात. गरूड असूनही कोंबडी राहण पसंत होत. "कोण उंच भरा-या घेणार ? इथेच जमिनीवर आहे की किडे मुंगी". असा अ‍ॅटिट्युड पाहायला मिळतो.
कोंबडी असून गरूड व्हायची स्वप्न पहाणारा आणि त्यासाठे तेवढे श्रम करणारा एकादाच .
पालकांच म्हणाल तर दोन्ही बाजूची आहेत. बहुतांशी कोंबडीला गरूड बनवणारी. " अरे , उंच आकाशात जा. तिथे खूप छान आहे. आम्ही जमिनीवरच फिरलो. तू मात्र अजून काहीतरी चांगल कर. ट्युशनला जा. प्राईव्हेट कोच ठेव. आम्ही काही करू तूला आभाळात उडवण्यासाठी . काहीही!"
मीनल.

सुनील's picture

4 Feb 2010 - 8:25 pm | सुनील

सुंदर कथा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पाषाणभेद's picture

5 Feb 2010 - 7:10 am | पाषाणभेद

मस्त गोष्ट सांगितलेली आहे.
अवांतर: प्रभू सरांसारखेच तुम्ही एकाच व्यवसायातली आहेत काय?
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)

श्रीयुत संतोष जोशी's picture

5 Feb 2010 - 4:49 pm | श्रीयुत संतोष जोशी

मस्तंच हो विजुभौ.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.