`बोध-कथा'

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
25 Jan 2010 - 6:50 pm

त्या दिवशी बसमध्ये घडलेल्या मिनिटभराच्या त्या प्रसंगानंतर रोज तिथून वळताना मी सिग्नलच्या खांबाकडे पाहातो.
`सबसे प्रेम करो' असा संदेश देणारा फलक हातात ऊंच धरून तो खांबाला टेकून उभा असतो. निर्विकारपणे.
बाजूने वाहात असलेल्या गर्दीशी आपल्याला काहीच देणेघेणे नाही, असे भाव चेहेर्‍यावर सांभाळत.
... त्या दिवशी पुन्हा मी सवयीनं तिथे पाहिलं.
तो तिथे नव्हता. त्याच्या हातात असणारा तो फलक मात्र, खांबाला टेकून व्यवस्थित ठेवलेला होता.
`कंटाळला असणार'... मी मनाशी म्हटले. तरीदेखील, आजूबाजूला कुठे `तो' दिसतो का, हे शोधत माझी नजर भिरभिरत होतीच.
तासाभरानंतर त्याच रस्त्यावरून परतताना मी पुन्हा तिथे पाहिले. फक्त फलकच तिथे होता.
दुसर्‍या दिवशीही मी पाहिले. फलकच होता...
... मग एकदा सिग्नलला थांबलेलो असताना, ट्रॅफिक पोलिसालाच विचारलं.
खांबाला टेकून असलेल्या फलकाकडे बघून तो हसला.
`सकाळीच फलक उभा करून गेलाय'... तो म्हणाला.
म्हणजे, `सबसे प्रेम करो' संदेशाचा फलक हातात धरून दिवसभर उभं राहाणं, हे त्याचं रोजगाराचं साधन असावं. मी तर्क केला.
... अलीकडे तो बर्‍याचदा `दांड्या' मारतोय.
`सबसे प्रेम करो' संदेशाचा तो फलकही, एकाकी पडलाय.
पण, रस्त्यावरून वाहणार्‍या गर्दीला, त्या फलकाचंही कुतूहल असतं.
`आलिशान' गर्दीने वाहणार्‍या त्या रस्त्यावर जाहिरातींची स्पर्धा करणार्‍या आसपासच्या झगमगाटी होर्डिंग्जच्या गर्दीतही, खांबाला टेकून डिव्हायडरवर एकाकी पडलेल्या त्या फलकाकडे अजूनही सगळेच जण कुतुहलाने पाहातात...
`अपने धर्म पर चलो... सबसे प्रेम करो'... तो मूक फलक बहुधा नंतर प्रत्येकाच्या मनात रुतून बसत असावा...
माझ्या मनात तरी त्यानं `घर' केलंय.
म्हणूनच, कुठे प्रेमाचा `साक्षात्कार' जाणवला, की माझी पावलं मंदावतात.
.... आणि, एक नवी `बोध-कथा' मनात रुजते...
-------------- ----------- ------------
त्या दिवशी ऒफिसला निघण्यासाठी घरातून उतरलो.
दुपारची वेळ होती.
दोनतीन बिल्डिंग सोडून पलिकडच्या बिल्डिंगचा वॉचमन त्याच्या केबिनमधून बाहेर आला. त्याच्या हातात जेवणाचा छोटासा डबा होता.
रस्त्यावर इकडेतिकडे पाहातच, एखाद्या कुत्र्याला बोलावण्यासाठी त्यानं तोंडानं चुकचुक केलं... आणि पलीकडच्या बाजूला झाडाखाली मलूल वेटोळं करून बसलेलं एक कुत्रं शेपूट हलवतच उठलं. एकदा अंग ताणून त्यानं निवांत आळस दिला, आणि शेपूट हलवत ते वॉचमनच्या समोर येउन उभं राहिलं.
त्या माणसानंही, प्रेमानं त्या कुत्र्याच्या अंगावरून हात फिरवला...
आता ते कुत्रं शेपटाबरोबर अंगदेखील हलवत होतं.
त्या माणसाच्या मायाळूपणाची बहुधा त्याला खात्री पटली असावी.
ते शांतपणे त्याच्या बाजूला उभं होतं.
... सिग्नलजवळच्या खांबाला टेकून ठेवलेला `तो फलक' माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट झाला.
... मग त्या माणसानं हातातल्या डब्यातलं उरलेलं अन्न काढलं... आणि कुत्र्यासमोर ठेवलं.
कुत्रं लाचारपणानं शेपूट हलवतच होतं.
मग त्या माणसानं, त्याच्या अंगावरून हात फिरवतच, काढून ठेवलेल्या अन्नाकडे बोट दाखवलं, आणि आज्ञाधारकपणे ते कुत्रं तिकडे वळलं.
त्या माणसाच्या डोळ्यात प्रेम उमटलं होतं...
त्या कुत्र्यानं एकवार ते काढून ठेवेलेलं अन्न नाकानं हुंगलं, आणि ते पाऊलभर मागे झालं...
पुन्हा त्या माणसानं प्रेमानं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्या अन्नाकडे बोट दाखवलं.
पुन्हा त्या कुत्र्यानं ते हुंगलं, आणि ते मागं वळलं. बहुधा त्याला भूक नसावी.
हा माणूस त्याला बोलावत होता... पण आता ते कुत्रं लांब निघालं होतं.
मी हा प्रसंग पाहातोय, हे त्या माणसाच्या लक्षात आलं होतं.
तो काहीसा ओशाळला...
आणि दुसर्‍याच क्षणाला, बाजूचाच एक दगड घेऊन त्यानं कुत्र्यावर भिरकावला.
रागानं काहीतरी पुटपुटलादेखील...
... त्यानं भिरकावलेला दगड नेमका त्या कुत्र्याला लागला होता...
दुपारच्या त्या सामसूम वेळी, कुत्र्याची किंकाळी आसपास घुमली.
आता त्या माणसानं डब्यातलं आणखी उरलेलं अन्न रस्त्यावर फेकून दिलं, आणि तो आत वळला.
गेटाच्या आतल्या `केबिन'मध्ये जाऊन बसला...
... मला तो फलक आठवला.
पण त्याचा अर्थ मात्र समजत नाहीये...
.... क्षणापूर्वी, प्रेमानं त्या कुत्र्याला खाऊ घालणार्‍या त्या माणसाच्या हृदयातला माणूसकीचा, प्रेमाचा ओलावा खरा, की कुत्र्यानं पाठ फिरवताच त्यानं घेतलेलं रूप खरं?
-----------------------------
http://zulelal.blogspot.com

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Jan 2010 - 7:25 pm | मदनबाण

माणसातली माणुसकी परिस्थीतीनुसार बदलत असावी !!!
बोध कथा आवडली...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

हर्षद आनंदी's picture

26 Jan 2010 - 7:25 am | हर्षद आनंदी

कुत्र्याने खाणे नाकारणे ही कुत्र्याची इच्छा!!

कुत्र्याला दगड मारण्याची कृती, ओशाळुन लज्जित झालेल्या मनाची सर्वसाधारण प्रतिक्रिया होती.

माझे अन्न डावलल्याचा राग त्यातुन ध्वनीत होतो, अहंभाव आड आला. अन्यथा, खायला टाकुन तो निघुन गेला असता तरी काही फरक पडला नसता, तो खातोय की नाही याच्याशी काहीही देणे-घेणे नसले पाहीजे.

त्याच्याशी माणुसकीचा बादरायण संबंध जोडण्याचे कारण दिसत नाही.

ऊरलेले अन्न मुक्या प्राण्यांना देणे अथवा उकीरड्यावर फेकुन देणे, ही भारतीय खासीयत आहे. गरजेपुरते शिजवणे आम्हाला कधी माहीतच नसते.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

विंजिनेर's picture

26 Jan 2010 - 7:53 am | विंजिनेर

मस्त!
एकदम प्रिया तेंडुलकरस्टाईल मधे लिहिल्यासारखं वाटलं.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2010 - 8:53 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत

बिपिन कार्यकर्ते

सुनील's picture

26 Jan 2010 - 8:19 am | सुनील

मी हा प्रसंग पाहातोय, हे त्या माणसाच्या लक्षात आलं होतं

हा कळीचा मुद्दा! आपण दिलेले अन्न कुत्रा (देखिल) नाकारतोय आणि मुख्य म्हणजे हे सारे कुणीतरी पाहतो आहे, यातून आलेल्या ओशाळलेपणातून त्याने दगड भिरकावले असावेत. अन्यथा (कुणी पाहणारे नसते तर) असे झाले नसते.

बाकी लिहिण्याची धाटणी आवडली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jan 2010 - 1:23 pm | प्रकाश घाटपांडे

क्षणापूर्वी, प्रेमानं त्या कुत्र्याला खाऊ घालणार्‍या त्या माणसाच्या हृदयातला माणूसकीचा, प्रेमाचा ओलावा खरा, की कुत्र्यानं पाठ फिरवताच त्यानं घेतलेलं रूप खरं?

दोन्ही खर आहे.
आपण एवढ प्रेमान आग्रह करुन खायला घालतोय पण हा खातच नाही हे अपेक्षाभंगाचे दु:ख तो दांडगाईने व्यक्त करतो आहे. दातृत्वाच्या गर्वाला त्या भुभु ने ठेच पोहोचवली.
एक माणुसः- यु यु यु यु
एक भुभु:- (मनात) हा माणुस आपल्याला एवढ प्रेमान कस काय बोलवतोय? हळूच दगड बिगड मारायचा विचार दिसतोय! छॅ नको जायला
माणुसः यु यु यु यु
भुभु:-(मनात) प्रेमान बोलावतोय तर जाव सगळी माणस काय सारखी नसतात. जाव कि नाही जाव?
माणुस- ( मनात) च्यायला हे कुत्तारड बी आपल्याला विचारत नाय दगड च घालतो. माजलय सालं.
भुभु जाण्याच्या इराद्याने पाउल उचलायला आणि त्याच्या दिशेने दगड यायला एकच वेळ. भुभु तेच पाउल पुढ घेउन कल्टी मारत सुटलो ब्वॉ याच्या तावडीतुन
भुभुगीत कार
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.