अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग पहिला
अशा व्यक्ती अशा वल्ली -१ अच्युत गणपुले - भाग दुसरा
तर लोकहो,
या गृहस्थाची कोणत्याही परिस्थितीत आज माहिती काढायचीच या इराद्याने आम्ही विजू दिक्षिताच्या
मुलीच्या लग्नात पेटून उठलो होतो. वड तुटो वा पारंबी आज या इसमाची माहिती काढायचीच.
दिवसभर याच्यावर पाळत ठेवायची. आमच्या अंगात जणू बहिर्जी नाईक संचारले होते.हा कोणाशी
बोलतोय ते पहायचे आणि त्यातील ओळखीच्या लोकांना कोपर्यात घ्यायचं असे आम्ही मनोमन
ठरवले होते.
हे सगळ ठरलं खरं, पण आम्ही कार्यालयात फार लवकर गेलेलो. त्यावेळेस माणसे फारच कमी होती. आणि हे आपल्या चरित्राचे नायकही कोणाशी बोलतांना दिसले नाहीत. आता आली का पंचाईत?
हा दिक्षिताकडील म्हणजे वधूकडील आहे का पेंडश्यांकडील म्हणजे वराकडील आहे ते समजेना.
कदाचित हा वेलणकरचा माणूसही असू शकेल. ( वेलणकर म्हणजे त्या कार्याचे कंत्राटदार -
मनोगतकार महामहोपाध्याय प्रातःस्मरणीय आदरणीय वंदनीय माननीय महेशराव वेलणकर नव्हेत.
हा खुलासा येथे करणे आवश्यक आहे आणि तो तसा केला आहे. असो.)
पण ठीक आहे. हळूहळू वर्दळ वाढेल तसे कळून येईलच, असे म्हणून आम्ही श्रद्धा आणि सबूरी दाखवली.
पण आम्हांला फार वाट पहावी लागली नाही. कारण आमचे स्नेही श्री. आठवले त्यांच्या सुंदर आणि सुदृढ कुटुंबकाबिल्यासह तेथे हजर झाले.
आम्ही दिसताच "काय पंत, तुम्ही आमच्या आधी आलात". असे म्हणत ते आमच्याशी बोलायला लागले.
आमचा आठवले यांच्याशी संवाद सुरू असतांना आपल्या चरित्रनायकाने " आठवले!! आधी खाऊन घ्या" असे फर्मान त्यांना त्यांच्या नावासकट सोडले त्यामुळे आठवल्यांचा या इसमाशी दाट परिचय असावा, असा अर्थबोध आम्हांला होताच, आम्हाला हायसे वाटले.
तेवढ्यात त्या गृहस्थाने उपम्याने "भरलेली"( होय इतर बश्यांपेक्षा त्यात उपमा जास्त होता हे नक्की आणि वर शेव सुद्धा जास्तच पेरलेली होती.)बशी आठवल्यांच्या हातात दिली आणि वायुवेगाने तो परत गेला.
आठवल्यांचा हातात उपम्याची बशी येताच आठवले जणू काही आदल्या दिवशीची विनायकी सोडायची
आहे, अशा थाटात त्यावर हात मारू लागले. हात मारू लागले म्हणण्यापेक्षा तोंड चालवू लागले. तशा परिस्थितीत आठवल्यांशी लगेच काही बोलण्यात अर्थ नाही हे आम्हांला कळून चुकले.
एकामागून एक दोन बशा उपमा पोटात गेल्यावर ते जरा माणसात आल्यासारखे वाटले. मागाहून चहा आला. तो झाल्यावर आठवल्यांनी खिशातून डबी काढली आणि तंबाखू मळायला सुरूवात केली. हाच मुहूर्त योग्य आहे असे समजून आम्ही आठवल्यांना प्रश्न केला;
"काय हो, हे जे गृहस्थ आहेत ज्यांनी उपमा आणून दिला, ते कोण?"
"म्हणजे? पंत, तुम्ही यांना ओळखत नाही???" आमच्या प्रश्नाला उत्तर येण्याऐवजी प्रतिप्रश्न आल्यावर आम्ही जरा वैतागलो. दादरमध्ये श्री. राजसाहेब ठाकरे आणि श्री. मनोहरपंत जोशी यांना न ओळखणारे कोणी नसेल हे मान्य. पण या गृहस्थात एवढे काय आहे की याला दादरमध्ये सर्वांनी ओळखावे?
पण आंम्हाला आठवल्यांना ठोकायचे नव्हते तर अनेक दिवस आमच्या डोक्यात थैमान घालणार्या प्रश्नाचे उत्तर कोणत्याही परिस्थितीत हवे होते. म्हणून विषयाला फाटे न फोडता उत्तर मिळविण्याकडे संभाषण न्यावे या हेतूने म्हटले की,
"नाही हो."
तेवढ्यात आठवल्यांच्या सौभाग्यवतींनी कुणाची तरी ओळख करून देण्यासाठी त्यांना "अहो, जरा इकडे या".... अशी प्रेमळ पण धाकयुक्त हाक मारली आणि आठवले एखाद्या आज्ञाधारक चाकरासारखे आमच्यासमोरून जणू काही शेपूट घातल्यासारखे पसार झाले.
बोंबला तिच्याआयला.... ही पण संधी गेली.
उर्वरीत पुढील भागात.
आपला,
(हवालदिल) धोंडोपंत
प्रतिक्रिया
12 Mar 2008 - 1:49 pm | मनस्वी
हा पण भाग छान पण...
आठवल्यांची बायको यायच्या आत त्यांना कोपर्यात का नाही घेतले!
मनस्वी
12 Mar 2008 - 1:58 pm | विसोबा खेचर
ए धोंड्या, लेका भाग जरा अंमळ थोडे मोठे लिही की!
असो, बाकी हाही भाग मस्त मजेशीर... छानच लिहितोसस तू!
वेलणकर म्हणजे त्या कार्याचे कंत्राटदार -
मनोगतकार महामहोपाध्याय प्रातःस्मरणीय आदरणीय वंदनीय माननीय महेशराव वेलणकर नव्हेत.
हा हा हा! :)
एकामागून एक दोन बशा उपमा पोटात गेल्यावर ते जरा माणसात आल्यासारखे वाटले.
हे पण मस्त!
आपला,
तात्या वेलणकर! :)
12 Mar 2008 - 2:06 pm | केशवसुमार
आहो काय हे काय चलय काय? किती ताणायचे ते.. का एकता कपूर चावली..
छ्या बॉ, कोण असेल हा माणूस..
हा ही भाग उत्तम.. तात्या वेलणकर म्हणतात तसे भागाची लांबी वाढवावी ही विनंती..
(अजून हैराण्)केशवसुमार..
12 Mar 2008 - 2:14 pm | धमाल मुलगा
प॑त,
आपण भविष्यविषयक लेख मोठ्या हातोटीने लिहिता हे ठाऊक होत॑, पण, व्यक्तिचित्रही काय ऊत्तम लिहिता हो!
पहिल्या भागाला प्रतिसाद देऊ देऊ म्हणेपर्य॑त दुसरा भाग हजर !! वा वा.
भट्टी छान जमली आहे, आवडली. :-)
आणि...आपण बा॑गड्या-त॑गड्या टाईप शिरियला पण ल्हिता का काय? एकदम पर्फेक्ट 'क्रमशः' येत॑य :-) (ह.घ्या.)
अवा॑तरः बा॑गड्या-त॑गड्या हा वाक्प्रचार (!) बा॑गडीत बा॑गड्या (एका लग्नान॑तर बक्कळ लफडी) आणि त॑गडीत त॑गड्या (घरगुती / व्यावसायिक / राजकारणातील कबड्डी) ह्या॑चा स॑गम आहे. कृपया हे 'अश्लील' नाही याची नो॑द घ्यावी.
तात्या...अभ्भी तुमकू रोशनी का अगला एपिसोड लिखनाईच पडे॑गा, नै तो हमकू लगे॑गा के तात्याबा बिर्यानी खा खा के इतना खुश हो गया के उस टैम पे सोया तो अभ्भीतक उठ्ठ्याच नै | :-))
12 Mar 2008 - 2:24 pm | आनंदयात्री
एकता कपुरची उपमा जरा साधीच झाली, आम्ही तुम्हाला न्युज चॅनलची उपमा देउत. आता दिवसात २ भाग टाका मग !!
बाकी भट्टी छान जमलीये बरका.
(मारले की नाही एकदम मनोगती वाक्य !!)
12 Mar 2008 - 4:22 pm | बिपिन कार्यकर्ते
छानच जमले आहेत दोन्ही लेख. मी दोन्ही एकदमच बघितले. पहिला वाचला... मग वाटले दुसर्या भागात खुलासा होईल, पण कसले काय?
धोंडोपंत, के.एल.पी.डी. दिली काय? किती ताणणार?
बिपिन.
12 Mar 2008 - 5:08 pm | किशोरी
प॑त दोन्ही भाग एकदम मस्त्,उत्सुकता लागली आहे, कोन असतील ते गणपुले
आता लवकर सांगुन टाका.
12 Mar 2008 - 5:19 pm | स्वाती राजेश
उत्तम जमले आहे...आमची उत्सुकता ताणायला.
अहो किती उत्साहाने वाचत होते कि आज हा माणूस कोण आहे ते कळेल..
पण...जाऊ दे तुम्ही वाट पाहायला लावलीतच.
हा भाग पण मस्त जमला आहे.
12 Mar 2008 - 5:40 pm | वरदा
आहो काय हे काय चलय काय? किती ताणायचे ते.. का एकता कपूर चावली..
पटले..कसली ताणलेय...सांगा ना लवकर कोण हे गणपुले काय करतात....
12 Mar 2008 - 5:53 pm | धोंडोपंत
अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद.
लोकहो, तुमची उत्कंठा ताणली गेली हे चांगले आहे.
जी वल्ली समजण्यासाठी आम्हांला एवढी वाट पहावी लागली ,त्यातील थोडीशी धग आपल्यापर्यंत पोहोचविण्यात आम्ही यशस्वी झालो, ही श्री व्याडेश्वराची कृपा.
लवकरच आम्ही तुम्हाला अच्युत गणपुल्याची भेट घडवू.
आपला,
(आश्वासक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
12 Mar 2008 - 8:18 pm | सुधीर कांदळकर
वाचकांशी थेट संवाद साधण्याची लकब छान आहे. कथन प्रवाही, प्रसन्न आणि वेगवान. त्यामुळे भाग छोटे वाटतात. मोठे हवे होते. दादरचा हा परिसर माझ्या खास ओळखीचा. म्हणून जास्तच रमलो. उत्सुकता छान ताणलेली आहे.
अवांतर. या विठ्ठल मंदिरात एकदा गोवींदराव पेटीवर्धन यांनी कीर्तनाला साथ केली होती.
धन्यवाद.
पु भा वाट पाहात आहे.
13 Mar 2008 - 9:52 am | धोंडोपंत
ए धोंड्या, लेका भाग जरा अंमळ थोडे मोठे लिही की!
आपला,
तात्या वेलणकर! :)
हा ही भाग उत्तम.. तात्या वेलणकर म्हणतात तसे भागाची लांबी वाढवावी ही विनंती..
(अजून हैराण्)केशवसुमार..
एकदम मान्य. यापुढील भाग अंमळ मोठे लिहू.
या भागात गणपुल्याला पुढे आणायचे नाही असे धोरण होते. त्यामुळे त्याच्या एन्ट्रीच्या आधीच पडदा टाकावा लागला.
आपला,
(सूत्रधार) धोंडोपंत
कांदळकर साहेब,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपणाला लेखन आवडले हे वाचून आनंद झाला.
आपला,
(आभारी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
13 Mar 2008 - 11:45 am | चित्तरंजन भट
साध्या, सोप्या, ओघवत्या मराठी भाषेतले उत्तम लिखाण. पंत, पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
12 Apr 2008 - 11:42 am | विष्णुसूत
धोंडोपंत, पुढचा भाग कधि लिहिणार आहात ?
बरेच दिवस वाट पहात आहे.
21 May 2008 - 10:23 pm | विष्णुसूत
पंत ! दोन महिने झाले ... किती दिवस वाट बघायची पुढ्च्या भागाची ?
15 Sep 2017 - 11:05 pm | गुल्लू दादा
कुठे गेलात...कार्यालयात अजून कुणी आले नाही का.